Skip to main content

तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख 8

 तंत्रस्नेही अध्यापकत्व 

लेख 8 : डिजिटल स्वाध्याय-प्रवचन


ज्ञान मिळवण्याच्या दोन पद्धती भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या आहेत : स्वाध्याय आणि प्रवचन अर्थात शिकणे आणि शिकवणे या दोन पद्धतींनी ज्ञानार्जन करता येते.


स्वाध्याय : स्वाध्यायाचे दोन अर्थ आहेत. स्वतः अध्ययनासाठी प्रवृत्त होऊन अध्ययन करणे आणि स्वतःचा अभ्यास करणे अर्थात स्वतःबद्दल जाणून घेणे.


          स्वयंअध्ययनात माझ्या (अर्थात शिकणाऱ्याच्या) इच्छेनुसार, मी ठरवले आहे म्हणून, मला प्रश्न पडला म्हणून, मला सुचले म्हणून विद्यार्थी अध्ययनाला प्रवृत्त होणे अपेक्षित आहे. कोणीतरी सांगितले, बोर्डाचा नियम आहे म्हणून, शाळेने सक्ती केली म्हणून अभ्यास करणे अपेक्षित नाही. अर्थातच त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी शिकणारा असतो तर अध्यापक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. 

स्वाध्यायाच्या दुसऱ्या अर्थात स्वतःबद्दलचे चिंतन अपेक्षित आहे ,अर्थात मी हे का शिकणार आहे, कसे शिकणार आहे, मी हे कसे शिकलो , याचा मी कसा उपयोग करणार, यातून माझ्यात काय बदल झाला, झालेला बदल इष्ट होता का, अशा प्रश्नांंबद्दल शिकणाऱ्याने स्वतःच स्वतःचे निरीक्षण करण्याचा स्वाध्याय अपेक्षित आहे.


असा दोन्ही प्रकारचा स्वाध्याय करायचा असेल तर अभ्यासातील स्वावलंबन महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयं-अध्ययनाची कौशल्ये व तंत्रे शिकवावी लागतील. ही कौशल्ये आणि तंत्रे शिकण्यासाठीच्या , सरावासाठीच्या  आणि वापरण्यासाठीच्या अभ्यासकार्याची योजना अध्यापकाला करावी लागेल.


 प्रवचन - शब्दश: प्रवचन म्हणजे सूत्र मांडणे,विस्तार करणे, उपदेश करणे, प्रात्यक्षिक करणे असा होतो. आपल्याला जे समजले आहे ते दुसऱ्याला समजावून सांगताना आपल्या  विचारांचे सूत्रबद्ध संकलन होते आणि त्याचा विस्तार करताना  आपण आशयाची पुनर्मांडणी करतो. प्रवचनात प्रथमदर्शनी प्रवचन करणारा उपदेश करतो आहे असे चित्र दिसत असले तरी  या प्रक्रियेच्या वेळी प्रामुख्याने मांडणी करणाऱ्याचेच म्हणजे प्रवचनकराचे  शिक्षण होत असते.


भारतीय परंपरेत आर्ष ग्रंथांचे वाचन, श्रवण, मनन, चिंतन, टीका, आत्मचिंतन या स्वाध्यायाच्या पद्धती सांगितल्या आहेत तर कथा-कीर्तन,वादविवाद, खंडणमंडण, शास्त्रार्थ या प्रवचनाच्या पद्धती सांगितल्या आहेत. 


माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज माहितीचा साठा आणि ज्ञान मिळवण्याची साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. डिजिटल शिक्षणात शिकण्याच्या संधींची समानता आहे, प्रश्न आहे तो शिक्षणप्रक्रियेतील शिकणाऱ्याच्या गुंतवणुकीचा! ( आज जरी डिजिटल डिव्हाइड दिसत असला तरी तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा दर विचारात घेतला तर ही दरी न रुंदावता भरून येण्याचीच शक्यता जास्त आहे. ) त्यामुळे डिजिटल अध्यापकाला आपण काय करतो यापेक्षा कसे करतो यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

डिजिटल स्वाध्याय-प्रवचन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल तर डिजिटल शिक्षकाने स्वतःला चार  प्रश्न विचारत राहावे लागेल.


·      तंत्रज्ञानाचा वापर करून मला वर्गातील  अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कशी सुधारता येईल ?             

·      तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी विद्यार्थ्याला अध्ययन प्रक्रियेत कसा व्यस्त ठेवू शकेन ?

·      तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्याला  अध्ययन सक्षम कसा करू शकेन?

·      शिक्षणातील आभासी अनुभव अस्सल वास्तविक जगातील अनुभवांशी जास्तीतजास्त जवळ जाणारे कसे होतील ?


तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान वापरणाऱ्याशी जोडलेले असल्याने डिजिटल शिक्षणात

शिकणाऱ्याला केंद्रस्थानी ठेवून स्वाध्याय-प्रवचनाच्या अनेक कृती घडवून आणणे शक्य आहे.

स्वाध्यायासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कुतूहल, प्रश्न आणि आव्हान.

कुतूहल वाढवण्यासाठी विद्यार्थ्याला इंटरनेट सर्फिंगच्या कृती उपयोगी पडतील. गुगलवर वेगवेगळे की-वर्ड वापरून वेबसाईट शोधणे, यु-ट्यूब वर व्हिडीओ शोधायला सांगता येतील. भूगोल, परिसर अभ्यास, इतिहासाचे  शिक्षक गुगल मॅप , रेल रडार अशा वेबसाईटवर खजिना-शोधसारखे खेळ घेऊ शकतील.

स्वाध्यायासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पूर्वज्ञानाची उजळणी.  

यासाठी गुगल क्लासरूमवर आधीच्या इयत्तेचे पाठ वा काठीण्य पातळीचे प्रश्नसंचनोट्स, व्हिडीओ, इ उपलब्ध करून देत येतील. संकल्पनांचे आकलन तपासण्यासाठीच्या नैदानिक चाचण्यासाठी  गुगल फॉर्मचा वापर करता येईल,  मेंटी मीटर वापरून प्रश्न मंजुषा घेता येतील. https://www.mentimeter.com/  .

स्वाध्यायासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी शोधण्याची;तपासण्याची; प्रयोग करण्याची, नोंदवण्याची, नोंदवलेल्याचे विश्लेषण करण्याची आणि पुनर्मांडणी करण्याची संधी मिळणे. 

डिजिटल स्वाध्यायाचा विद्यार्थ्याला अनुभव देण्यासाठी अशी संधी देणाऱ्या शैक्षणिक कृती अध्यापकाला  योजाव्या लागतील. गणित विज्ञानाचे अध्यापक यासाठी अॅनिमेशन, सिम्युलेशनच्या वेबसाईट प्रभावीपणे वापरून स्वाध्याय करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देवू शकतील. (https://phet.colorado.edu/ , https://ct-stem.northwestern.edu/ )  यावर आधारित चांगल्या कार्यपत्रिका तयार करता येतील.

 

संकलन करणे, संश्लेषण  यासारख्या कृती स्वाध्याय आणि प्रवचना या दोन अभ्यास पद्धतीला जोडणाऱ्या शैक्षणिक कृती आहेत.  या कृतीतून स्वाध्याय पक्का होतो आणि प्रवचनाची बैठक तयार होईल.  

 

प्रवचन : स्पष्टीकरण करणे, विस्तार करणे , सादरीकरण करणे, नवनिर्मिती करणे, वादविवाद करणे, मतमांडणे- मतखोडून काढणे  या सारख्या कृती प्रवचनाच्या अभ्यास कृती म्हणून करून घेता येतील.


डिजिटल माध्यमात आपापल्या विषयानुसार अशा कृती करून घेण्यासाठी  अनेक अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. या अॅप्लिकेशनमध्ये विषयानुरूप आराखडे (टेम्पलटस्) उपलब्ध आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या कार्य पत्रिका तयार केल्याचा उपयोग होईल.

जसे https://padlet.com/ वर कालरेषा करून घेता येतील, वादविवाद चर्चा घडवून आणता येतील, पुस्तक परिचय लिहायला सांगता येईल, तत्क्ते तयार करायला सांगता येतील. या अॅप्लिकेशनच्या गॅलरीत https://padlet.com/gallery  असे नमुने दिले आहेत त्यातून आपल्या विषयानुर आणि आशयानुरूप साच्यांची (टेम्पलटस्)  निवड करता येईल.

https://www.mindmeister.com/ https://www.mindmup.com/ चा वापर करून माईंड मॅप करून घेता येतील. झूम ब्रेकाउट रूमhttps://info.flipgrid.com/  इ चा  वापर सादरीकरण, गटचर्चा, वादविवाद यांसाठी करता येईल. चांगले ब्लॉग वाचून त्यावर प्रतिसाद द्यायला सांगता येतील. आपला अभ्यास सादरीकर करण्यासाठी वर्गाच्या युट्युब चॅनेलवर संधी उपलब्ध करून देता येईल.

लॉक डाऊनच्या काळात सध्या आपण अनेक वेबिनार आणि ऑनलाईन अभ्यास वर्गांमध्ये सहभागी होत आहोत. मांडणी, वादविवाद, सादरीकरणाबरोबर प्रवचनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याला शिकवणे. या लॉकडाऊनमध्ये माझ्या मित्राच्या सातव्या यत्तेत शिकणाऱ्या मुलीने कागदाच्या घड्यांच्या वस्तू बनवण्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर दुसरी ते सहावीच्या विद्यार्थांसाठी नाममात्र शुल्क घेवून एक अभ्यास वर्ग घेतला. अशा अभ्यास सत्रांचे  नियोजन करताना आपल्या शिकण्याचे संकलन करून त्याचे  नेमकेपणाने सादरीकरण करता यावे लागते. त्यामुळे फक्त शिक्षक दिनादिवशी समारंभिक प्रवचनाची संधी न देता त्याचे नियमित शैक्षणिक अनुभवत रुपांतर करण्यासाठी आज अनेक प्रयोग होण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी मी बंगलोरच्या विकासना शाळेला भेट दिली होती. त्या शाळेत कन्नड भाषेच्या काही तासांना वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. यात लहान विद्यार्थ्यांपेक्षा मोठ्या विद्यार्थ्याचेच अधिक शिक्षण होते. आज ऑनलाईन माध्यमात अशा प्रवचनाच्या संधी निर्माण करणे सहज शक्य आहे.

अशा  डिजिटल स्वाध्याय-प्रवचनाच्या पद्धतींचा, साधनांचा आणि तंत्रांचा

परिचय करून घेत विद्यार्थी तंत्रस्नेही स्वयंअध्ययन करून शकतील.

 

स्वाध्यायाच्या दुसऱ्या अर्थात स्वतःबद्दलचे चिंतन अपेक्षित आहे.

वर म्हटल्याप्रमाणे  मी हे का शिकणार आहे, कसे शिकणार आहे, मी हे कसे शिकलो , मी याचा कसा उपयोग करणार, यातून माझ्यात काय बदल झाला याबद्दल  शिकणाऱ्याला स्वतःच स्वतःचे निरीक्षण करता येणे या स्वाध्यायात अपेक्षित आहे.

 खरेतर ही एक अवघड प्रक्रिया आहे. कारण एखाद्या अनुभवाकडे वळून बघता येण्यासाठी  विद्यार्थ्याला त्या अनुभवत मी कसा सहभागी झालो याची उजळणी करावी लागते. या स्वध्यायाच्या  प्रक्रियेत वर्तनसहभागाबरोबर स्वतःला ओळखणे, नियोजन करता येणे, त्याचा आढावा घेता येणे या गोष्टी शिकणाऱ्याने करणे अपेक्षित आहे. अशा स्वाध्यायाची सुरुवात गुगल कॅलेंडरसारख्या टूल्सचा नियोजनासाठी वापर करण्यास सुरुवात करून करता येईल. 

ग्राफिक्स, व्हिडीओ, अॅनिमेशन, सिम्युलेशन सारख्या आकर्षक, प्रभावी,खिळवून टाकणाऱ्या, भान विसरायला लावणाऱ्या खरेतर नाद लावणाऱ्या शैक्षणिक साधनांच्या जमान्यात असा आढावा घेणे अवघडच आहे.

पण तंत्रज्ञानच आपण कायकाय करतो, कधी करतो, किती वेळ करतो याच्या नोंदी ठेवत असते. त्यामुळे ब्रावूझिंग हिस्ट्री बघणे, युट्युवर;फेसबुक; इन्स्टावर  आपण किती वेळ घालवला  याचे ग्राफ पाहणे या सारख्या कृती आपण तंत्रज्ञानाच्या किती आहारी गेलो आहे, आपण त्याचा गुणवत्ता पूर्ण वापर करतो आहोत का याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.

आज अनेक ऑनलाईन परीक्षांच्या अप्लिकेशनमध्ये आपल्याला किती गुण मिळाले या बरोबर आपण प्रत्यक प्रश्नावर किती वेळ घालवला, किती वेळा उत्तरे बदलली, आपल्या उत्तराची अचूकता काय होती अशा आत्मपरीक्षणासाठी उपयोगी पडतील असे अहवाल उपलब्ध करून देतात.  याचा उपयोग नियोजनासाठी, उद्दिष्टांची पुनर्मांडणी करण्यासाठी निश्चितच होतो. असे अहवाल वापरून स्वतःच्या प्रगतीचा आणि प्रयत्नांचा आढावा कसा घ्यायचा याबद्दलच्या कृती अध्यापकांनी स्वाध्यायासाठी घडवून आणाव्यात. (https://edpuzzle.com/ http://www.competeprabodhiniway.com/ )

स्वाध्यायात शिकणाऱ्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख होणे अपेक्षित आहे आहे. आज आवड, अभिक्षमता, कौशल्य, नेतृत्वगुण इ चे मापन करणाऱ्या चाचण्या उपलब्ध आहेत. त्याबरोबर स्वतःच्या क्षमता; मर्यादा , आवड;निवड यासारख्या शोधता येतील, नोंदवता येतील अशा इन्व्हेनटरी (शोधायादी) विद्यार्थ्यांचा स्वाध्याय व्हावा यासाठी  उपयोगी आहेत

(https://www.123test.com/ , https://www.16personalities.com/)

 

२१वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक आहे या शतकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपण प्रवेश केला आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाचा विकासानुसार साधने बदलत जातील. ती अधिक प्रभावी, आकर्षक होत जातील. या दुधारी डिजिटल साधनांच्या काळात डिजिटल अध्यापकाने  तंत्रस्नेही अध्यापनाचे एक महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे.


‘आपल्याला विद्यार्थ्याला फक्त साधने वापरायला शिकवायचे नाहीये

तर साधने बदलत गेली तरी साधनाच्या सहाय्याने विचार कसा करायचा असतो

हे शिकवायचे आहे.

आणि हे शिकवायचे असेल तर 

त्यासाठी अभ्यासातील स्वावलंबन अर्थात आत्मनिर्भरता

अभ्यासक शिकेल यासाठी योजना आखावी लागेल

आणि या योजनेचे  सूत्र आहे : ‘डिजिटल स्वाध्याय-प्रवचन’.

 

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे


( विद्यार्थ्याच्या डिजिटल स्वाध्याय-प्रवचनासाठी तुम्ही आयोजित केलेले उपक्रम, वापरत असलेली अॅप्लिकेशन याबद्दल कॉमेंटमध्ये जरूर शेअरिंग करा )


तंत्रस्नेही अध्यापक भाग १ ते ७ वाचण्यासाठी खालील लिंकलं भेट द्या 

https://prashantpd.blogspot.com/p/blog-page_20.html





Comments

  1. खूप छान माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...