पुस्तक परिचय : ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’
वाच. गिरीश श्री.
बापट, संचालक ज्ञान प्रबोधिनी लिखित ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ हे पुस्तक
ज्ञान प्रबोधिनीच्या औपचारिक शाळा आणि ज्ञान प्रबोधीनिद्वारा संचालित विविध पूरक शिक्षण
विस्तार उपक्रमांचे संचित, त्यामागचा विचार आणि या प्रयोगशील उपक्रमांमधून ज्ञान
प्रबोधिनीला सापडलेला शिक्षण विचार आपल्यापर्यंत पोचवते. पुस्तकातील अनेक लेखांमधून
हा शिक्षण विचार विकसित होण्याच्या प्रवासाचे दर्शन वाचकाला होते. प्रबोधिनी
अंतर्गत आणि अन्य व्यासपीठांवर प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांची मांडणी
करण्यासाठी मा. गिरीशरावांनी दिलेली भाषणे व त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘राष्ट्रघडणीसाठी
मनुष्यघडण’ या पुस्तकात केलेला आहे.
मनुष्य
घडणीसाठी ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक रचना आणि प्रयोगांची मांडणी या पुस्तकातील लेखांमध्ये
केलेली आहे. ‘मनुष्य घडणीसाठी शिक्षण’ असा विचार
करताना भूमिका लेखात लेखकाने शिक्षणाचे तीन आयाम सांगितले आहेत
१. आशयाचे
शिक्षण,
२.
प्रक्रियांचे शिक्षण,
३. संदर्भ
तयार करण्याचे शिक्षण.
ज्ञान
प्रबोधिनीच्या या त्रिवेणी शिक्षण पद्धतीच्या गोफामध्ये आशयाच्या शिक्षणाला दिलेली
प्रक्रियांच्या शिक्षणाची आणि संदर्भ तयार
करण्याच्या शिक्षणाची जोड या पुस्तकात
आपल्या लेखकाने आपल्या समोर उलगडली आहे.
राष्ट्र घडण
हा हेतू ठेवून मनुष्य घडणीसाठीच्या या
त्रिवेणी शिक्षण पद्धतीत लेखकाने अनेक दशके या शिक्षण पद्धतीचा अध्वर्यू म्हणून
काम केलेले असल्याने पुस्तकात शैक्षणिक तत्त्वज्ञान अनेक शैक्षणिक प्रयोगांच्या
प्रात्यक्षिकांचा दाखला देत मांडले आहे. शैक्षणिक
तत्वज्ञान प्रत्यक्षात येते ते शैक्षणिक प्रयोगांमधून आणि उपक्रमातून या पुस्तकतील
लेखांचे वेगळेपण म्हणजे शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा परिचय करून देताना जागोजागी
शैक्षणिक प्रयोग आणि उपक्रमांची उदाहरणे दिलेले आहेत. त्यातून लेखकाच्या ‘कर्ता तत्त्वज्ञ
वृत्तीचे’ आपल्याला सहज दर्शन होते.
ज्ञान
प्रबोधिनीची शिक्षणाची संकल्पना व्यापक आहे. तिला वयाचे, आशयाचे, पद्धतीचे बंधन
नाही. त्यामुळे ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगात विद्यार्थी, पालक, औपचारिक
आणि अनौपचारिक शिक्षक, युवक-युवती कार्यकर्ते अशा अनेकांचा सहभाग असतो. त्याच
बरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगात अनेक प्रकारचे विद्यार्थी अनेक प्रकारे सहभागी होत असतात. ज्ञान
प्रबोधिनीत शाळा ही रचना देखील अनेक रुपात व्यक्त होते औपचारिक शाळा, संध्याकाळी
काहीवेळ प्रबोधिनीत येणाऱ्यांची प्रबोध शाळा, प्रयोगशील विशेष शाळा, पालावरची शाळा
अशा अनेक प्रकारच्या ‘शाळांचा’ उल्लेख पुस्तकात येतो. यातील शैक्षणिक प्रयोगांची
उदाहरणे समजावून घेताना वाचकांना विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांच्या रूढ अर्थांच्या
पलीकडचा विचार करावा लागेल. असा विचार केला तर या पुस्तकातील शैक्षणिक प्रयोगांची
रंजकता वाचक अनुभवू शकतील.
‘राष्ट्रघडणीसाठी
मनुष्यघडण’ पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत
पुस्तकतील लेखांची पाच भागात विभागणी दिली आहे.
१. क्षमता विकास
२. आंतरिक
क्षमता विकास
३. मनुष्यघडणीचे आयाम
४. अध्यापकांना उद्देशून
५. क्षमता विकासासाठी शाळांचा विकास
अनुक्रमणिकाच
सांगते की शिक्षणाचे रूप पालटून गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक रचना निर्माण करण्यासाठी
वक्तीविकासापासून सुरुवात करून शालेय रचनांच्या समृद्धीचा विचार शिक्षण क्षेत्रात
काम करणाऱ्या शिक्षक कार्यकर्त्याने करणे गरजेचे आहे.
स्वामी
विवेकानंद शिक्षणाची व्यापक संकल्पना मांडताना म्हणतात, "माणसात
असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण."
(एज्युकेशन इज द मॅनीफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन). ज्ञान
प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगाचे उद्दिष्ट स्वामी विवेकानदांच्या शिक्षण
विचारांचे शैक्षणिक प्रात्यक्षिक उभे करणे असे मांडले जाते. या पुस्तकातील पहिले दोन
भाग क्षमता विकास, आंतरिक क्षमता विकास स्वामी विवेकांदांच्या शैक्षणिक विचारांचा
अर्थ उलगडणारे आहेत.
स्वामी विवेकानंद व्यक्ती विकासनासंबंधीचे विचार
मांडताना ‘अव्यक्त आणि व्यक्त मानव’ या व्याख्यानात म्हणतात ‘व्यक्तीचे शरीर, इंद्रिये,
मन आणि बुद्धी हे तात्त्विक दृष्ट्या व्यक्तीचे स्वरूप आहे आणि व्यक्तीचा आत्मा हा
तात्त्विक दृष्ट्या व्यक्तीचे अस्वरूप आहे’. क्षमता विकास आणि आंतरिक क्षमता
विकास या दोन भागांमधील प्रकरणात या दोन्ही अंगांबद्दलच्या प्रयोगांचा परिचय करून
दिला आहे. ज्ञान प्रबोधिनीमधील समग्र व्यक्तिमत्त्व विकसनाची कल्पना मांडताना लेखकाने
‘व्यक्त स्वरूपाचे विकसन आणि अव्यक्त स्वरूपाचे प्रकटन म्हणजे मनुष्यघडण’ अशी
मनुष्य घडणीची संकल्पना मांडली आहे. पुस्तकाच्या शीर्षकानुसार ‘राष्ट्रघडणीसाठी
मनुष्यघडण’ पुस्तकाचा परिचय करून घेताना वाचकाने ही व्याख्या मनात घोळवली तर पुस्तकातील
आशय वाचकाला सहज उलगडत जाईल.
मनुष्यघडणीची
प्रक्रिया ज्या प्रयोगशाळेत होत असते ती प्रयोगशाळा म्हणजे व्यक्ती ज्या समाजात
राहते तो समाज; ते राष्ट्र. शिकलेल्या गोष्टींचे उपयोजन करण्याची जागा म्हणजे
देखील व्यक्ती ज्या समाजात राहते तो समाज; ते राष्ट्र. त्यामुळे मनुष्य घडण कोणामुळे
आणि कोणासाठी याचे उत्तर समाजासाठी राष्ट्रासाठी हेच आहे.
राष्ट्रीय
शिक्षण या विषयावर सोलापूर येथे दिलेल्या भाषणात लोकमान्य टिळक राष्ट्रीय
शिक्षणाची संकल्पना मांडताना म्हणतात, ‘देश ओळखण्यास शिकणे म्हणजे राष्ट्रीय
शिक्षण’.
‘राष्ट्रघडणीसाठी
मनुष्यघडण’ यातील राष्ट्र घडणीसाठी या शब्दाबद्दल विद्यार्थाला देश ओळखण्यासाठीच्या शिक्षणाची संकल्पना, भूमिका आणि शैक्षणिक
प्रयोगांचा वाचकांना परिचय होईल. समाज दर्शन ते राष्ट्रीय प्रश्नांची ओळख, संकल्पना
परिचय ते कृतियुक्त सहभाग यातून राष्ट्रघडण या संकल्पनेचा परिचय यापुस्तकातून
आपल्याला होईल. पुस्तकाच्या ‘मनुष्य घडणीचे आयाम’ या तिसऱ्या भागात
राष्ट्रीय शिक्षणाच्या अर्थ उलगडून सांगणारे निबंध समाविष्ट केलेले आहेत.
‘राष्ट्रघडणीसाठी
मनुष्यघडण’ ही शिक्षण प्रक्रिया ज्यांच्या प्रेरक सहभागाने होणार आहे तो घटक
म्हणजे अध्यापक. नवीन शैक्षणिक धोरणात देखील अध्यापकाची शिक्षणातील भूमिका ठळकपणे
अधोरेखित केलेली आहे. पुस्तकाच्या चौथ्या ‘अध्यापकांना उद्देशून’ भागात या शिक्षण प्रक्रियेसाठी अध्यापकाने स्वतःला कसे
तयार करायचे, आपल्यामधील ‘ अध्यापकत्व’ कसे जोपासायचे याबद्दलचे लेख आहेत.
शिक्षकाच्या शिक्षण प्रक्रियेतील भूमिकेबद्दल लेखक एका लेखात म्हणतात, ‘प्रेरक,
प्रचोदक, नियंत्रक व चिकित्सक या सर्व भूमिका आपल्याला नीट पार पडता आल्या तर आपण
पोटविद्या शिकवणारे गुरु न राहता मनुष्य घडणीला हातभार लावणारे गुरु होऊ.’
पुस्तकाच्या
पाचव्या ‘क्षमता विकसनासाठी शाळांचा विकास’ भागात समृद्ध शिक्षण प्रक्रिया
घडवण्यासाठी शाळा या रचनेचा विकास करण्यासाठीचे सूत्र सांगितले आहे. ‘आपले
अस्तित्व टिकवून आधुनिकातील आधुनिक होणे,बाहेरील परिस्थितीचा वेध घेवून व स्वतः
प्रयोगशील राहून आपली साधने व तंत्रे कालानुरूप अद्ययावत करत राहणे ही प्रबोधिनीची
कार्यपद्धती आहे. त्याचा वापर पुस्तकी शिक्षण अधिक गतिशील बनवण्यासाठी करायचा आहे.’
बदलत्या
आर्थिक-सामाजिक रचनेत, तंत्रज्ञानाच्या दिशादर्शक प्रभावाखाली देशातील शिक्षण
प्रक्रिया समृद्ध करायची असेल, की ज्या शिक्षण प्रक्रियेतून समर्थ भारत निर्माण
करणारे नागरिक तयार होतील, तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक अध्यापक
कार्यकर्त्याने येत्या काळात लागणाऱ्या दोन गोष्टींची आवश्यकता लक्षात घेतली
पाहिजे एक म्हणजे आपल्या कार्याला आवश्यक असणारे तात्त्विक अधिष्ठान आणि शैक्षणिक
प्रयोगशीलता. या दोन गोष्टी असतील तर समृद्ध शिक्षणातून समर्थ भारताच्या निर्मितीचे स्वप्न
आपण पाहू शकू. हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे असेल तर ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’
हे वाच. गिरीशराव बापट लिहित लेखसंग्रहाचे पुस्तक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या
प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दिशादर्शक आहे.
प्रशांत दिवेकर
शैक्षणिक उपक्रम संशोधिका
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
समतोल दीपावली विशेषांक २०२१ मध्ये
प्रकाशित
ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने खरेदी करण्यासाठी भेट द्या https://www.jpprakashane.org/
Comments
Post a Comment