आचार्य प्रशिक्षण शिबीर, कन्याकुमारी
५
एप्रिल ते ११ एप्रिल २०२२, कन्याकुमारी
पहाटे पुणे- तिरुअनंतपूरम विमान प्रवास,
नंतर जणू माझ्यासाठी आरक्षित अशा कमी गर्दीच्या बोगीतून रेल्वेने
तिरुअनंतपूरम नागरकोविलपर्यंतचा प्रवास नंतर खचाखच भरलेल्या बसने नागरकोविल ते
विवेकानंदपूरम, कन्याकुमारी प्रवास करून आचार्य प्रशिक्षण
शिबिरासाठी विवेकानंद केंद्रात पोचलो.
आचार्य
प्रशिक्षण शिबिरात ५ राज्यांमधील ७२
विवेकानंद केंद्र विद्यालयांतील २३१ अध्यापक
सहभागी झाले आहेत. याचे संयोजन करण्यासाठी विवेकानंद केंद्र विद्यालयातील
छात्रावासातील स्वयंपाकी ते विवेकानंद
केंद्र विद्यालयात ४० वर्षे अध्यापनाचा अनुभव असणारे जेष्ठ अध्यापक अशी ३३ जणांची भक्कम संयोजक टीम आहे.
विवेकानंदपूरमच्या प्रवेशद्वारात श्री.
कृष्णकुमारसरांनी प्रसन्न हास्याने स्वागत केले. वाटेत नागरकोविलला केळीच्या
पानावर इडली कालवून भक्कम न्याहारी केली असल्याने चहापानासाठी सरांबरोबर स्वयंपाकघरात
गेलो. साखर न घालता चहाकॉफी काहीही चालेल असे सांगितले. एक अरुणाचली आचारी कॉफी
घेऊन आले. मला पाहिल्यावर विचारले 'सार, आप जयरामपूर आया था?' चला!
चहाचा प्रश्न सुटला. साखर नसलेला चहा कॉफी
पिणारा शिबिरात मी एकटाच आहे बहुतेक ! पहिल्या दिवशी अर्धादिवस शिबिरात असलो
तरी रात्रीपर्यंत वेगवेगळ्या सत्रांसाठी
साधारण पाच कि.मी. चालणे झाले. (मोठा कॅम्पस झाला तर प्रबोधिनीतील निम्म्या जणांचा
डायबेटीस नियंत्रणात येईल. ☺️)
साधारण साताठशे जण बसू शकतील अशी दोन सभागृहे
प्रशिक्षणासाठी नव्याने बांधली आहेत.
मोठ्या सभागृहात सोळा गण, चार मंडलात विभागलेले दोनशे पन्नास जणांचे सैन्य गटाकार्यासाठी हलवता येईल
उद्यापासून. भोजनापूर्वी एका सत्रात सहभागी झालो. दुपारच्या जेवणानंतर रात्रीची
झोप पूर्ण केली.
संध्याकाळी केंद्रवर्गासाठी(दल) मैदानावर
आधी एकत्र आज्ञांचा सराव आणि नंतर सोळा
समांतर गटात आज्ञांनुसार कवायती, छोटे खेळ,
दिवसभरातील केंद्राच्या कार्यपद्धतीचा परिचय करून देणाऱ्या सत्रांवर
आधारित प्रश्न मंजूषा व शेवट
केंद्रप्रार्थनेने झाला. केंद्रवर्ग
घेणाऱ्या एका युवतीचा कमलकांतजींनी परिचय करून दिला. दिब्रूगडजवळील मोरानमधील
चहाच्या मळ्यात चालणाऱ्या आनंदालयात कार्यकर्ती म्हणून संपर्कात आलेली जुही गुप्ता
आज भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन वि. के. वि. मध्ये अध्यापक म्हणून काम
करते.
संध्याकाळी भजनसंध्येत सहभागी झालो. आज
दिवसभरात मामाजी, अण्णाजी, वासुदेवजींबरोबर
गप्पा झाल्या. कमलकांतजी , दीक्षितसर, कृष्णकुमारजी
, मुरलीसर हे जुने स्नेही परत भेटले.
रात्रीच्या जेवणाच्या वेळी एक शिक्षिका
विचारत आल्या 'आप प्रशांतसर है ना? हम
ऑनलाइन ट्रेनिंगमें मिले हैं।' जुने ओळखीचे आणि ज्यांनी मला
अर्धेच पाहिले आहे ☺️ अशांच्या ओळखीने आजचा दिवस संपला.
५
एप्रिल २०२२
***
६ एप्रिलचा दिवस हा शिबिरात पूर्णवेळ उपस्थित
असण्याचा पहिला दिवस. त्यामुळे सुरुवातील थोडे दिनाक्रमाविषयी : सकाळी ४.३० ला
उठून आवरून ५.१५ वाजता अर्धातास प्रात:स्मरण -
यात श्लोकपठण , गीतेतील कर्मयोग सांगणाऱ्या श्लोकसंग्रहाचे
पठण, केंद्रप्रार्थना इ.चे
पठण त्यानंतर तासभर योग, आसन, प्राणायाम
आणि ध्यानाचा अभ्यास घेतला जातो.
त्यानंतर अर्धातास श्रमसंस्कार. श्रमसंस्कारात
निवासकक्ष, परिसर , मैदानाची
स्वच्छता, झाडांना पाणी घालण्यापासून स्वच्छतागृहांची सफाई
अशी विविध कामे गटांना वाटून दिली जातात. अध्यापकांवर श्रमसंस्कार करणे , त्यांच्यात शाळा परिसर आपली जबाबदारी आहे, प्रसंगी
पडेल ते लागेल ते काम करण्याची तयारी असणे हे या कार्याच्यावेळी अध्यापकांपर्यंत
पोचते.
केंद्राच्या अनेक शाळा निवासी शाळा आहेत. त्याठिकाणी सहनिवासातील विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेच्या, नेटकेपणाच्या विद्यार्थ्यांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या २५ दिवस स्वतः करणे हा पण गुणवत्तेचे आग्रह निर्माण करणारा एक संस्कार आहे.
एका
सत्रात मा. राधादिदींनी याबद्दलचा त्यांचा अरुणाचालच्या शाळेतील अनुभव सांगितला. 'एक दिवस सहनिवासातील मुले तुम्ही रोज आम्हाला स्वच्छतेबद्दल, काटकसरीबद्दल, नेटकेपणाबद्दल सांगता, आम्हाला आज अध्यापक कार्यकर्ते निवासातील स्वच्छतागृहे पाहायची आहेत अशी
मागणी घेऊन आले. त्यांना परवानगी दिली. मग विद्यार्थी जाऊन पाहून आली. पाहून
आल्यावर एक मुलगी दिदींना म्हणाली की संपत आलेला साबण फेकून देऊ नका, नवीन साबणाला तो चिकटवा आणि वापरा असे तुम्ही नेहमी सांगता. तुमच्या
मोरीतील साबणाला असा चिकटवलेला साबण मी पहिला. आता मी नक्की हे करत जाईन.'
सेवेच्या
सुरवातीच्या दोन वर्षात असा २५ दिवसांचा प्रशिक्षण वर्ग अध्यापकांच्या वृत्तीघडणीचा
वेगळा आणि विशेष प्रयत्न आहे हे दिवसभरात
अनेकवेळा जाणवले.
श्रमसंस्कारानंतर आवरून न्याहारी करून शाळेच्या
प्रार्थनासभेसाठी सर्वजण एकत्र जमतात. रोज शिक्षकांचा एक गट
पद्य, प्रार्थना, सुविचार,
दिनविशेष, बातम्या अशा प्रार्थनासभेत सर्व
अपेक्षित गोष्टींची योजना करतो. सभेच्यावेळी दीक्षितसर शिक्षकांच्या उभ्याआडव्या
रांगा, प्रत्येकाची नमस्कारस्थिती नेमकी करून घेत होते.
दीक्षितसर सुमारे ३५ वर्ष विवेकानंद
केंद्राच्या शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि सध्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अपेक्षित गुणवत्तेच्या
निकषांचे संस्कार शिक्षकांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्याचा
अशा अनेक जागा आचार्य प्रशिक्षण शिबिरात लक्षात आल्या.
सत्तरपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण शाळांचे अरुणाचल, आसाम, नागालँड, कर्नाटक, तामिळनाडू,
अंदमान निकोबार राज्यात पसरलेल्या जाळ्याचे संचालन करायचे असेल तर
प्रशिक्षणाबरोबर सहवासातून संकेतांचे संक्रमण हे पण महत्त्वाचे आहे.
प्रार्थना सभेनंतर तीन अभ्याससत्रे, दुपारचे भोजन विश्रांती , पद्यसत्र , परत एक अभ्याससत्र, दल, भजनसंध्या
असा भरगच्च दिनक्रम आहे. रात्री भोजनानंतर एक अर्धा तासाचे हलकेफुलके अनुभवकथन,
चित्रफीत, विविध गुणदर्शन असे सत्र असते.
एखादं सत्र हलकेफुलके कसे ठेवायचे ! म्हणून सत्राचे नाव भरभक्कम आहे 'प्रेरणा से पुनरुत्थान' ☺️
असा सकाळी ४.१५
ला सुरू झालेला दिवस रात्री साडेनऊला संपला.
प्रत्येक सत्राच्या वेळी एकत्र जमणे, खुर्च्यांच्या रांगा, विसर्जनानंतर सभागृह सोडणे
यातील शिस्त , नेमकेपणा आणि नेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे.
शिक्षकांची २५ दिवसांची शाळा
अनुभवण्याजोगी आहे ! ☺️
प्रशिक्षणार्थीचा दिवस संपल्यावर संयोजक गटाची बैठक! त्यात दिवसाचा आढावा : सत्राच्या व्यवस्था, जबाबदाऱ्या यांच्या आढाव्यापासून
सत्राला उशीरा आलेले, निवासकक्ष कसा ठेवला आहे अशा अनेक
गोष्टी होत्या. संयोजकांचे निरीक्षण,
टेहळणी भारी आहे.
आढाव्यानंतर दुसऱ्या दिवसाचे नियोजन!
माझी दोन सत्रे झाली आणि मा. निवेदितादिदींबरोबर
सत्राचा आशय, गटाकार्य इ. बद्दल चर्चा झाली. मा. अण्णाजी जे निगडी शिक्षण परिषदेत आले होते
त्यांची भेट झाली.
६
एप्रिल २०२२
***
भारतीय संस्कृती या विषयावर मा. निवेदितादिदी,
उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र ,यांची व्याख्यानमाला हा आचार्य प्रशिक्षण शिबिराचा खरंतर मुख्य आशय. ज्ञान
प्रबोधिनीच्या त्रिवेणी शिक्षणपद्धतीत आशयाचे शिक्षण, प्रक्रियांचे
शिक्षण आणि संदर्भांचे शिक्षण हे तीन प्रमुख घटक मांडले आहेत. भारतीय संस्कृतीवरील
ही व्याख्यानमाला विवेकानंद केंद्रातील अध्यापकांसाठी संदर्भाचे शिक्षण यासाठीचा
खुंटा बळकट करणारी आहे. ‘मनुष्यघडण आणि राष्ट्रनिर्माण’ या स्वामी विवेकानंदांच्या
विचाराचे शाळांमध्ये प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकांना ‘ विवेकानंद केंद्र
विद्यालये का? कशासाठी?’ याची उत्तरे
आणि वैचारिक बैठक तयार होणे यासाठी
व्याख्यानमाला !
आचार्य
प्रशिक्षण शिबिरात मी ‘Indian Culture : Exploring, Experiencing and
Setting Practices’ या शीर्षकाखाली कृतीसत्रे घेतली. भारतीय
संस्कृतीचा आशय आणि विविध अध्ययन-अध्यापन पद्धती यांची सांगड अनुभवांचे नियोजन
करताना कशी घालायची असा विचार करून सत्रांची योजना आखली होती. ‘भारताच्या जीवनरेखा’ या सत्रात दृक्-श्राव्य
साधनांचा वापर, भारतीय संस्कृतीचे आयाम या सत्रात संकल्पना
चित्र, भारतीय आदर्श यात गटचर्चा, मौनसंवाद
आणि समर्थ भारत या सत्रात भित्तीचित्रे अशी कृतीसत्रे योजली होती. एका सत्रात
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जाणीवसंवर्धन यासाठी सहाध्यायदिन, समाजदर्शन, मातृभूमी परिचय, प्रकल्प
यासारख्या प्रबोधिनीतील शैक्षणिक
उपक्रमांची ओळख अनुभव कथनाच्या माध्यमातून करून दिली.
भारतीय संस्कृती या संकल्पनेवर आठ संकल्पना चित्रे
तयार करण्याचे गटकार्य एक दिवस करून घेतले. दुपारच्या जेवणाच्या वेळात मंडलप्रमुख
आणि गणप्रमुख यांना गटकार्याचे स्वरूप समजावून सांगितले. सर्व सदस्य चार मंडलात
विभागलेले आहेत. एका मंडलात पुरुषांचे
दोन आणि
महिलांचे दोन गण आहेत. गटकार्यासाठी एका मंडलाचे आठ गट आणि गटात पुरुष आणि
महिला दोन्ही सदस्य असले पाहिजेत अशी अट होती. सत्राच्या सभागृहात सर्वांना एकत्र
सूचना दिल्या आणि गटकार्यासाठी दुसऱ्या सभागृहात जाण्यास सांगितले. दिलेल्या
निकषांवर सदस्यांची आठ गटात
विभागणी करून पहिले मंडल सातव्या
मिनिटाला कामाला लागले होते. गटकार्य, समूहगुण अशा
अनेक अंगांनी आचार्य प्रशिक्षण अनुभवण्याची गोष्ट आहे. (समूहगुणासाठी समूह उपलब्ध आहे. 😊) गटकार्यात गट छान गुंतला होते. रात्री पटकन जेवण करून आणि सकाळी न्याहारीच्या वेळीदेखील वेळ चोरून कामाच्या
जागी येऊन लोक संकल्पनाचित्रात भर घालत होते.
प्रशिक्षणार्थी गट संख्येने मोठा असला तरी प्रक्रिया घडवून
आणता येतील याची आचार्य प्रशिक्षण शिबिरानंतर आता खात्री वाटते . त्यासाठीच्या
रचना आणि साहित्याच्या तयारीचा अजून विचार करावा लागेल.
७,८ एप्रिल २०२२
***
काल अन्य सत्रांच्या वेळी शेवटच्या रांगेत बसलो
होतो. शेजारी एक कार्यकर्ता एका वहीत टिपणे काढत
होते. ओळख करून घेतल्यावर काय
जबाबदारी आहे विचारले तर म्हणाले 'साक्षी विनायक'
म्हणून जबाबदारी आहे. सत्राची टिपणे घेणे या खात्याला चांगलेच
भरभक्कम नाव आहे. आज्ञा, खाती , जबाबदाऱ्या
यांची भारतीय परंपरेतील , संस्कृतमधील अनेक नावे विशेष आहेत.
आज दोन
दिवसांची दक्षिणप्रांताची बैठक सुरू झाली. पहिल्या दिवशी दक्षिण प्रांतसमितीची बैठक होती , दुसऱ्या दिवशी त्यात दक्षिणेतील केंद्रांच्या साधारण १२५ समिती सदस्यांची भर पडेल.
व्यवस्था, आस्थापना आणि जबाबदाऱ्या घेतलेल्यांचे उत्तम संघ कार्य यामुळे कामाचा फार ताण न येता आणि न
घेता कार्यकर्ते सदस्य परिचयासाठी पुरेसे
उपलब्ध आहेत. विवेकानंद केंद्र विद्यालय, शेर, अरुणाचल प्रदेशचे मुख्याध्यापक ओमाना कुट्टन व्ही. सरांकडे भोजनगृह आणि
रसशाळेची जबाबदारी होती. वर्गात त्यांना कोबी चिरण्यापासून अनेक कामे करताना
बघितले. रोज आपल्या सहकाऱ्याबरोबर एवढ्या लोकांसाठी दोन वेळा चहा, दोन वेळेची न्याहारी, दोन भोजन एवढे असले तरी
न्याहारी, जेवणाच्या वेळी अनौपचारिक संवाद हेच मुख्य काम आणि
यासाठी कुट्टनसर उपलब्ध असायचे.
एका बाजूला निश्चित केलेले काम करत खुल्या संवादाची
संधी घेत माणसे जोडणे हे सूत्र कुट्टन सरांपासून ते विवेकानंदपूरममधील जेष्ठ
जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या सहज आचारात दिसत होते.
काल
रामनवमी असल्याने रामायण प्रदर्शनीच्या प्रांगणातील साधारण २० फुटी हनुमंतासमोर
भजनसंध्या केली. दोन दिवस रात्री 'प्रेरणा से
पुनरुत्थान' सत्रात अध्यापकाची भूमिका यावर चित्रफिती दाखवून
चर्चा घेतली.
९ ,१० एप्रिल २०२२
***
रोज विवेकानंदपूरममधील समुद्रकिनाऱ्यावरून शिलास्मारकाचे दर्शन होत होते.
शेवटच्या दिवशी शिलास्मारकावर जाऊन आलो.
भारतीय मूल्यांसह आधुनिक भारताचे स्वप्न आणि त्या कार्याची दिशा याबद्दलचे चिंतन
स्वामी विवेकानंदांनी जेथे केले ते स्थान
आज भारतीयांसाठी एक प्रेरणा स्थान, त्रिवेणी संगमावरचे एक तीर्थक्षेत्र बनले आहे.
या अधिष्ठानावर आज विवेकानंद केंद्राचे काम
योगशिक्षण, शालेय शिक्षण, ग्राम विकसन,
संस्कृती संवर्धन, संघटन अशा आयामांवर भारतभर
विस्तारले आहे. स्वामी विवेकानंदाचे विचार आणि शिलास्मारक या दोन भक्कम
अधिष्ठानावर विवेकानंद केंद्राचा सेवायोग भारतभर विस्तारत आहे.
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो
करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान
पाहिजे।।
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
भारी आहे हे .
ReplyDeleteअशा आचार्य प्रशिक्षण शिबिराचा मलाही अनुभव घ्यायचा आहे.