गुरुपौर्णिमा अर्थात ज्ञानाच्या परंपरांचे पाईक होण्याचा दिवस
इमं
विवस्वते योगं प्रोत्कवान हम व्ययम् ।
विवस्वान्
मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१)
भगवद् गीतेत देखील भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने इश्वकूला सांगितला. भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्त्वज्ञानाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.
ज्ञान प्रबोधिनीने पथकाधिपती म्हणून समर्थ रामदास, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद
या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.
त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास!
कवि वामन पंडितांनी समर्थांची महती गाताना खालील श्लोकाची रचना केली.
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवि वाल्मिकीसारखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
जयजय रघुवीर समर्थ ।।
समर्थांचे वर्णन करताना शुक, वसिष्ठ, वाल्मिकी या तीन जणांचा उल्लेख का केला आहे? कोण होते ते? त्या तिघांमधील गुणांचा समुच्चय रामदास स्वामींमध्ये झाल्याने त्यांना सद्गुरू ही उपाधी प्राप्त झाली
का? असे अनेक प्रश्न श्लोक म्हणताना आपल्या मनात उमटतात.
कोण होते शुक, वसिष्ठ, वाल्मिकी ?
शुक हे व्यासांचे पुत्र. त्यांना वैरागी असे का म्हटले आहे? आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर परीक्षा देण्यासाठी व्यास शुकमुनींना जनक राजाकडे जायला सांगतात. शुकमुनी राजा जनकाच्या राजवाड्याच्या पहारेकऱ्याला ते आल्याची सूचना राजापर्यंत पोचवायला सांगतात. जनकाच्या राजवाडयातील पहारेकरी शुकांच्या आगमनाची वार्ता जनक राजापर्यंत पोहोचवतात. जनकाकडून उत्तर येते, ''मी बोलवेपर्यंत त्यांना तेथेच थांबायला सांगा.'' राजाच्या आज्ञेप्रमाणे द्वारपालांनी शुकांना निरोप दिला. शुक तिथेच थांबले. किती वेळ? घटका गेली, प्रहर गेला, दिवस मावळला, पुन्हा उगवला, पुन्हा मावळला असे लागोपाठ तीन दिवस, तीन रात्री गेल्या. शुक प्रवेशद्वारावर थांबून होते. त्यांच्या मनात दुःख,राग, चीड कोणतीही भावना निर्माण झाली नाही. ते शांतपणे राजाच्या निरोपाची वाट पाहत राहिले.
चौथ्या दिवशी वाद्यांच्या गजरात दरबारातील अधिकारी, मंत्री अशा लव्याजम्यासकट जनक राजा स्वतः शुकांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारात येतात आणि शुकाला सोन्याच्या पालखीत बसवून मोठया थाटामाटात राजवाडयात घेवून जातात आणि एका स्वतंत्र कक्षात त्यांची निवास व्यवस्था करतात. कक्षात सर्व प्रकारच्या सुखसोयी, पंचपक्वांन्नाचे भोजन, गाद्यागिरद्या, नृत्यगायन सगळे काही शुकांच्या दिमतीला तत्पर होते. त्याचा शुकांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. जनक राजाची शुकांच्या वागण्यासवरण्यावर बारीक नजर होती.
दुसऱ्या दिवशी जनकाने दरबार भरविला आणि त्या दरबारात अनुपम सुंदर अशा नृत्यांगनांचा कार्यक्रम ठेवला. नृत्य चालू असताना जनक राजाने दुधाने काठोकाठ भरलेला पेला शुकांच्या हाती दिला आणि म्हणाले, ''ह्यातील एकही थेंब दूध जमिनीवर न सांडता ह्या राजवाडयास सात प्रदक्षिणा घाल.'' शुकांनी पेला हाती घेतला, त्याच्या काठावर आपली नजर स्थिर केली आणि सावकाश चालत सातही फेरे पूर्ण करुन जनकाने जसा त्याला पेला दिला होता तसाच काठोकाठ भरलेला पेला शुकांनी जनकाकडे सुपूर्द केला. प्रसन्न झालेला जनक शुकांना म्हणाला, ''महामुनी, मी अनेकप्रकारे तुमची परीक्षा पाहिली, तुम्हाला शिकविण्यासारखे माझ्यापाशी काही नाही. तुमच्या वडिलांची इच्छा होती की, तुम्ही माझ्याकडून काही शिकावे पण मलाच तुमच्याकडून काही शिकण्यासारखे आहे एवढी जाणीव झाली.''
शुकमुनींसारखा आपल्या उद्दिष्टांवर स्थिर असलेला नारायण
वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकात येतो, बारा वर्ष स्वयं अध्ययनाने ज्ञान मिळवतो,
देशाटन करतो, समाज जाणून घेतो आणि आयुष्यभर धर्म संस्थापनेसाठी
शुकासारखे उद्दिष्टांपासून विचलित न होता
विरागी मार्गक्रमण करणारे समर्थ!
ज्ञानी लोकांच्या सभेचे नेतृत्त्व करणारा, न्याय सभेत न्यायदान करणारा
आणि
रणकर्कश असणाऱ्या श्रीरामांचे गुरु म्हणजे वसिष्ठ ऋषी.
वसिष्ठ ऋषींसारखे ज्ञानी आणि ज्ञानदान करणारे समर्थ!
ज्यांनी पहिल्या महाकाव्याची, रामायणाची रचना केली त्या वाल्मिकींप्रमाणे
दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक, आरत्या अशी
वाल्मिकींप्रमाणे विविधांगी काव्य निर्मिती करणारे समर्थ!
म्हणून कवि वामन पंडितांनी या तिघांचा उल्लेख करून समर्थांचे गुण गायीले आहे.
समर्थांचे चरित्र बघितले तर त्यांना लहानपणापासून दोन प्रकारचे प्रश्न पडलेले दिसतात.
पहिला प्रश्न म्हणजे आपल्या आजुबाजुच्या सृष्टीबद्दल होते आणि दुसरे म्हणजे सृष्टीच्या रचनाकाराबद्दल होते. नाशिक क्षेत्री केलेले अध्ययन, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक यांची रचना करत त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आयुष्यभर ज्ञानयोगाचे आचरण केले.
दुसरा
प्रश्न म्हणजे आपल्या गावात सुलतानाचे चार शिपुर्डे येतात, हवे ते लुटून नेतात. गाव त्यांना विरोध का करत नाही ? भारत भ्रमणाच्या काळात समाजाच्या गुलामगिरीबद्दल, स्वातंत्राच्या आकांक्षेबद्दलचे हे प्रश्न अधिक दृढ झाले. यांची उत्तरं शोधण्यासाठी, समाजाला बलोपासनेची दीक्षा देण्यासाठी, समाज जागृती करण्यासाठी समर्थांनी आयष्यभर ज्ञानयोगाबरोबरचं कर्मयोगाचे आचार केले. देशभर संघटनेचे जाळे विणले.
असे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे आचार करणारे समर्थ रामदास शुक, वसिष्ठ, वाल्मिकी या ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांना वंदन करायचे.
गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कोण होते महर्षी व्यास ?
'व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते:पौत्रमकल्मषम् ।
पराशरात्मजं वन्दे, शुकतातं तपोनिधिम्' ।।
अर्थात् जे वसिष्ठ ऋषींचे पणतू, शक्ति ऋषींचे नातू, पराशर ऋषींचे पुत्र आणि शुक ऋषींचे वडील आहेत, त्या तपोनिधी व्यासांना मी नमस्कार करतो.
महाभारत, श्रीमत् भागवताचे रचनाकार, सर्व वेदांचे ज्ञानी, वेदाच्या अभ्यासाची पद्धत बसवणारे, वेदांच्या अभ्यासाची परंपरा निर्माण करणारे महर्षी व्यास हे ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. ज्ञानाच्या या व्यास परंपरेचे दर्शन भाषेत देखील प्रकट होते, म्हणूनच वक्ता ज्या स्थानावरून आपले विचार मांडतो त्या स्थानाला व्यासपीठ म्हणतात. अर्थात वक्त्याने या ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणेच समाजाला अपेक्षित आहे.
जगात अशी ज्ञानाची परंपरा जोपासणाऱ्या अभ्यासकांची अनेक कुळे आहेत.
अणूच्या रचनेचा अभ्यास करून अणूचे अंतरंग उलगडणारे
जे. जे. थॉम्पसन, हेन्री रुदरफोर्ड, चॅडविक
ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतात.
प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ लुई लिकी आणि
चिपांझी, गोरिला आणि ओरांगउट्टाण यांचा अभ्यास करण्याऱ्या
त्यांच्या शिष्या जेन गुडाल, डायन फॉसी, बायरूट गाल्डीकस
ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतात.
विक्रम साराभाई, सतीश धवन, वसंतराव गोवारीकर, ए.पी.जे. अब्दुल कलाम
या अभ्यासकांच्या साखळीमुळेच
आज भारताचा मानबिंदू असेलेली इस्त्रो संस्था अर्थात् भारताचे अंतराळ संशोधन
एका ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करते.
या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेकांनी शुभेच्छा संदेश पाठवले!
हल्ली प्रत्येक सण-उत्सवाला शुभेच्छा संदेश पाठवतात, अगदी संक्रांतीला पण!
'शिक्षक दिन' हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नाही
तर अधिक नम्रतेने गुरूला अर्थात् गुरुने जी ज्ञानाची परंपरा धारण केली आहे,
त्या ज्ञानाच्या परंपरेला वंदन करून
आपण त्या परंपरांचे पाईक होण्याचा निश्चय करण्याचा दिवस आहे.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील.
भारतीय व पाश्चात्य दोन्ही ज्ञान परंपरा मांडताना त्यातील ज्ञान मार्गाचे महत्त्व सहज ठसवले आहे
ReplyDeleteअत्यंत सुंदर विवेचन..गुरू पौर्णिमेचे वेगळे महत्त्व अधोरेखित केले. धन्यवाद व अभिनंदन.. आपल्याला शुभेच्छा
ReplyDeleteगुरू परंपरा खूप छान समजली
ReplyDeleteखूप छान लेख. श्लोक म्हणत असताना त्यात उल्लेख असलेल्या व्यक्तींबाबत माहिती बरेचदा नसते. शुकांबद्दल माहिती खूप कमी जणांना असते. वाल्मिकी ऋषींची माहिती रामायण महाकाव्यामुळे असते. तुम्ही शुकमुनींची माहिती यानिमित्ताने करून दिली यासाठी धन्यवाद.
ReplyDeleteThere is no depth in education without Art.
ReplyDeleteखूप छान सुंदर लेखन
ReplyDeleteगुरुपौर्णिमेच्या दिनाचे महत्व वेगळ्या पद्धतीने खूप छान मांडले....
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteKhup chan mahiti milali. Vyaspeeth ya shabdacha khara arth atta kalala. Ani khup chan vichar mandala, dnyanachya parampareche paiik honyacha nishchay karne.
ReplyDeleteअधिक माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर.
ReplyDeleteआवडला लेख. शुक, वसिष्ठ, वाल्मिकी या सर्व विभूति समर्थ रामदासांमध्ये कशा एकरूप आहेत हे ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्योस्मि. प्रणाम
ReplyDeleteखूप सुंदर लेख.
ReplyDeleteनेमका आणि विविधांगी माहितीपूर्ण लेख. वाचून माहितीत भर पडली . छान
ReplyDeleteखूपच छान सर
ReplyDeleteवामन पंडितांच्या श्लोकाचे आणि ज्ञानमार्गाचे मंडन करणारा सुंदर लेख
ReplyDeleteExcellent! Enriched with guru parampara and our tradition. Good work and knowledgeable article.
ReplyDeleteProfound and Rich Scientific articles. Thank you for the datails 🙏
ReplyDelete