तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख १०
मी, युट्युब आणि माझा अभ्यास (भाग २)
युट्यूबने आपल्यासाठी माहिती, ज्ञान आणि करमणूक अशा वेगवेगळ्या चित्रफितींचा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. काय सापडत नाही
युट्यूबवर आपल्याला? मला तर मी शाळेत असताना पाहिलेल्या ब्योमकेश बक्षीसारख्या मालिका, दूरदर्शनवर पाहिलेल्या भारतीय शिल्पकलेवरचे माहितीपट, जुनी व्याख्याने ... काय सांगू अन काय नाही... मी तरी सध्या युट्यूबचा फॅन
आहे.
युट्यूबची मजा ही आहे ही आहे की एखादी चित्रफित तयार
करून प्रकाशित करणे ही फक्त चित्रपट दिग्दर्शक वा निर्मात्याची मक्तेदारी राहिली
नाही. आपण आपला चॅनल तयार करून त्यावर आपण तयार केलेल्या चित्रफिती लोकांना
बघण्यासाठी ठेवू शकतो. युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रफिती लोक तयार करून
आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध करून देतात. त्या चित्रफितींचे प्रकार आपण समजावून
घेतले तर आपण अभ्यासासाठी कोणत्या प्रकारची चित्रफित शोधायची, पाहायची वा तयार करायची हे ठरवू शकतो. कारण प्रकारानुसार चित्रफिती पाहताना
वा तयार करताना वेगळा विचार करावा लागतो अर्थात वेगळे काहीतरी पाहिले; वेगळा विचार केला की आपले वेगळ्या प्रकारचे शिक्षण होते.
१. माहिती सांगणारे,समालोचन किंवा भाष्य करणाऱ्या चित्रफिती :
यात माहितीपटापासून व्हिलॉगपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रफिती उपलब्ध आहेत.
या प्रकारच्या चित्रफिती माहितीप्रधान असतात. उदाहरण म्हणून गेल्या महिन्यात सुएज
कालव्यात एक जहाज अडकले होते आता याबद्दलचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला
कालव्याच्या बांधकामाबद्दल बद्दलचा माहितीपट, कालव्यासाठी झालेल्या युद्धांच्या युद्धकथा, षडयंत्र याबद्दल, ज्यांनी
कालवा बांधला त्यांच्याबद्दलचे जीवनपट,त्यांच्या
मुलाखती, एखाद्या प्रवाशाने सुएज कालव्याच्या प्रवासात तयार केलेला व्हिलॉग, जहाज अडकल्याने किती नुकसान झाले, या जगावर काय
परिणाम झाला याबद्दल तज्ज्ञाचे मत-विचार मांडणारे व्हिडीओ बघता येतील. या
प्रकारामध्ये आपल्याला मुलाखती, गप्पा या
स्वरूपात माहिती पोचवणारे व्हिडीओ उपलब्ध आहेत. खेळाडू, राजकारणी, वैज्ञानिक. सामाजिक कार्यकर्ते अशा विविध लोकांचे अनुभव
या प्रकारात आपण पाहू शकतो.
२. करून तर पहा :
या प्रकारच्या चित्रफिती एखादी कृती शिकण्यासाठी मदत
करणाऱ्या, सूचना देणाऱ्या, त्याचे टप्पे दाखवणाऱ्या असतात. एखादी वस्तू कशी करायची, एखादा प्रयोग कसा करायचा, एखादे खेळणे
कसे तयार करायचे, एखादा पदार्थ कसा तयार करायचा, एखादे चित्र कसे काढायचे अशा आपल्याला अभ्यास करताना नकाशा कसा भरायचा
यापासून एखादी प्रतिकृती कशी तयार करायची याचे मार्गदर्शन करणाऱ्या नव्हे
टप्प्याटप्प्याने आपल्याकडून अभ्यास होईल याची काळजी अशा चित्रफिती तयार करताना
घेतलेली असते. ख्रिसमस लेक्चर सिरीज सारख्या सादरीकरणप्रधान व्याख्यानमाला या प्रकारात आपल्याला शोधता
येतील.
३. मार्गदर्शन :
एखादी गोष्ट कशी करायची याची प्रक्रिया उलगडून
दाखवणाऱ्या अनेक चित्रफिती unboxing , gaming , प्रश्नोत्तरे या प्रकारच्या चित्रफितींमध्ये उपलब्ध
असतात. आपल्याला एखाद्या वस्तूची, उपकरणाची
रचना समजून घ्यायची असेल आणि त्यावर आधारित प्रतिकृती तयार करण्याचा प्रकल्प
करायचा असेल तर unboxing चॅनल्स शोधता येतील. एखादा खेळ शिकण्यासाठी gaming प्रकारच्या चित्रफिती तुम्ही बघत
असलाच पण तुम्ही तुमच्या चॅनलवर चांगल्या चॅनल्सची प्ले लिस्ट देऊ शकाल किंवा
स्क्रीन रेकॉर्डर वापरून एखादा छान गेमिंग व्हिडीओ तयार करू शकाल. एखादी गोष्ट आपण
दुसऱ्याला समजावून सांगण्यासाठी करतो तेव्हा ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजते. त्यामुळे असे
वेगवेळ्या प्रकारच्या चित्रफिती तुम्ही तयार करू शकाल का ? त्यासाठी संहिता लेखन आणि संकलनाची तंत्रे आणि अॅप्सची ओळख करून घ्यावी
लागेल.
Christmas Lectures |
४. उत्तम / आवडते/ लोकप्रिय : संकलन- गुणांकन :
इतिहासाचा अभ्यास करताना दुसऱ्या महायुद्धावरील दहा
उत्तम चित्रपट, खेळाचा अभ्यास करताना क्रिकेटमधील दहा सर्वोत्तम झेल, विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना जगातील महत्त्वाचे पंचवीस तंत्रज्ञान
शोध अशा प्रकारचे संकलन केलेल्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितीमध्ये
रसग्रहणात्मक आणि गुणात्मक निकषांवर माहितीचे संकलन केलेलं असतं. अनेक
चित्रफितींमध्ये एखादी कलाकृती कशी तयार केली, एखादा प्रवास कसा केला याचे अनुभवदेखील सांगितलेले असतात.
https://www.youtube.com/c/TheRankings1/featured
५. विनोद :
आज तक वा इंडिया टुडेच्या युट्यूब चॅनल्सची त्या
आठवड्यातील राजकीय घटनेवर आधारित अनेक पॉलिटून्स तुम्ही पाहू शकाल. एखाद्या
गोष्टीचे, घटनेचे, प्रसंगाचे
थोड विनोद ते उपहासाच्या अंगाने जाणारी मांडणी अशा चित्रफितींमध्ये असते. या
प्रकारची मांडणी समजावून घेताना घटना, प्रसंग, व्यक्तीचे कार्य तर माहिती असावेच लागते वा माहिती होते पण त्याचे महत्त्व
समजून घेण्यासाठी माहिती आणि विश्लेषणापलीकडे जावे लागते. याचे अनेक प्रकार उपलब्ध
आहेत. स्कीट( प्रहसन) , पॅरोडी ( विडंबन ), प्रंक
(उपहास), रोस्टींग, मिम्स इ.
https://www.youtube.com/c/SoSorrypolitoons/featured
https://www.youtube.com/c/TheChaplinFilms/playlists
६. प्रतिसाद :
एखाद्या पुस्तकाचा परिचय, संस्थेचा परिचय याप्रकारच्या अनेक चित्रफिती आपण माहितीपट या प्रकारात शोधू
शकतो पण त्याची समीक्षा करणे, त्याचे
रसग्रहण करणे या प्रकारच्या चित्रफितींमध्ये तयार करणारा त्याचे मत मांडत असतो, त्याची चिकित्सा करत असतो, त्याचे
परीक्षण करत असतो कदाचित त्याची खिल्लीपण उडवतो. अशा चित्रफिती लोक स्वमत कसे
मांडतात याची ओळख करून घेण्यासाठी उपयोगी आहे. आता भाषा, समाजशास्त्र विषयांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात.
या प्रकारांबरोबर आपण चित्रफिती खालील कॉमेंट्स वाचू
शकतो, आपले मत कॉमेंट्स मध्ये मांडू शकतो. अशा चित्रफिती
युट्यूब वर शोधायच्या असतील आपल्या अभ्यासाच्या विषयातील संकल्पनांची शीर्षके आणि
सारशब्दबरोबर पुढील सारशब्द जोडून सर्च केल्यास तुम्हांला चांगले अभ्यास साहित्य
युट्युबवर सापडू शकेल.
सारशब्द यादी :
Commentary, Product Reviews, How it works, Tutorials,
Top Lists, Challenges, Reactions,
Q&A, Interview, Docuseries, Gaming, unboxing, vlog, tutorials, favorites,
parody, memes, reactions, sketch video,
pranks, memes etc.
आपल्या अभ्यास विषयाचा आशय शोधण्यासाठी म्हणजेच
स्वाध्यायासाठी आपण जसे युट्यूब वापरू शकतो तसे आपण कसा अभ्यास केला, किती अभ्यास केला असा आपल्या अभ्यासाचा अभ्यास करण्यासाठी याच्या
सेटिंगमध्ये आपण किती वेळ आणि डेटा घालवला यावर याचा हिशेब आपल्याला मिळतो, आपण कायकाय शोधले याचा इतिहास मिळतो, आपण कायकाय बघितले याची यादी मिळते असा युट्यूब मधील आपल्या वापराचा हिशेब
ठेवणाऱ्या नोंदींमधून आपण अभ्यासासाठी, ज्ञान
मिळवण्यासाठी आणि फक्त करमणुकीसाठी किती वेळ सत्कारणी लावला किती वाया घालवला यावर
विचार केल्यास आपल्याला आपल्या स्क्रीन टाइमचे चांगले नियोजन करता येईल व परत शाळा
सुरू होईपर्यंत व आता कायमचे आपल्याला ही नवीन अभ्यासाची साधने वापराची असल्याने
ती अधिक प्रभावीपणे कशी वापरूयात हे या लेखमालेत आपण पुढील लेखात माहिती करून घेऊ.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
( छात्र प्रबोधन,सौर आषाढ, शके १९४३, ऑगस्ट २०२१, वर्ष २१ अंक ११ मध्ये प्रकाशित ‘तंत्रस्नेही अध्ययन कौशल्ये’ या लेखमालेत प्रकाशित )
कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील.
उत्तम चित्रपट रसग्रहण ऐकण्यासाठी film companion हे चॅनेल आणि उत्तम काव्य-संगीत रसग्रहण ऐकण्यासाठी सलील कुलकर्णीची 'कवितेचं गाणं होताना' ही youtube series
ReplyDeleteसहसा ठराविक गोष्टी यु ट्यूबवर पाहिल्या जातात पण तुम्ही भरपूर संदर्भ दिले आहेत त्यामुळे खजिना सापडेल☺️
ReplyDelete