कथा इस्रोची ( अर्थात भारतीय अंतराळ
संशोधनाची )
‘अमूल’ द टेस्ट ऑफ इंडिया, ‘हमारा बजाज’
बुलंद भारत की बुलंद तसबीर अशा अनेक जाहिराती आपल्या मनात घर
करून आहेत. या कंपन्याची उत्पादने भारताच्या सहकार आणि उद्योग क्षेत्रातील यशोगाथा आपल्यापर्यंत
पोहोचवत असतात. स्वातंत्रोत्तर भारतात देशाबद्दल अस्मिता आणि अभिमान निर्माण होईल अशा
विक्रम गाथांची, आदर्श प्रतिमांची उभारणी हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य होते.
भारताची
ओळख आणि अस्मिता याचे पुनर्निर्माण आणि नवनिर्माण करण्यासाटी सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारापासून
ते कन्याकुमारीच्या विवेकानंद शिलास्मारकाची निर्मिती अशा अनेक घटनांचा विचार
करावा लागेल. म्हणूनच पंडित नेहरूंनी भाक्रानांगल धरणाला भारताचे आधुनिक तीर्थ
क्षेत्र संबोधले आहे.
डॉ. विक्रम साराभाई या ध्येयवेड्या शास्त्रज्ञाने भारताला अंतराळ संशोधनात
अग्रेसर करायचे करण्याचे स्वप्न पहिले. १९६३ च्या नोव्हेंबर महिन्यात केरळच्या
किनाऱ्यावरील ‘थुंबा’ या छोट्या खेड्यात अग्निबाण उडवण्यासाठी एक केंद्र स्थापन
करण्यापासून ते आजच्या चांद्रयान, मंगळयान मोहिमेचे
यशोगान म्हणजे छात्र प्रबोधनद्वारा प्रकाशित डॉ. वसंतराव गोवारीकर लिखित ‘कथा
इस्रोची’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधनाची.
एक तरुण शास्त्रज्ञ ते देशातील अग्रणी संशोधन संस्थेचा कल्पक नेता या
नात्याने डॉ. वसंतराव गोवारीकर या कथेचे प्रत्यक्ष सहभागी दर्शक आहेत. अशा
प्रत्यक्षदर्शीने या पुस्तकात विज्ञान
तंत्रज्ञानाच्या एका क्षेत्रामधील भारताच्या अभिमानस्पद प्रगतीची सांगितलेली कहाणी
म्हणजे ‘कथा इस्रोची.’
उच्च्य शिक्षण घेवून नव्या दमाने राष्ट्रीय कामात सहभागी होण्यासाठी आलेले
वसंतराव गोवारीकर नव्यानेच सुरु झालेल्या अंतरीक्ष संशोधन संस्थेत रुजू झाले. या
पुस्तकात त्यांनी विद्यार्थ्यांसमोर इस्रोने भारताला जगातील सहा प्रगत
राष्ट्रांच्या रांगेत नेवून ठेवणारी कथा सांगितली आहे. भारताची अंतरीक्ष संशोधन कार्यातील झेप खरोखरीच
अचंबित करणारी आहे.
डॉ. विक्रम साराभाई ते डॉ. के. सिवन यांसारखे दूरदृष्टी असलेले नेतृत्त्व, कामाशी समरसून गेलेले हजारो
शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या संघटीत प्रयत्नांमधून अवकाश संशोधन भारताने जी
मुसंडी मारली त्या प्रवासाचे प्रेरक दर्शन
या पुस्तकात होते.
लेखकाची कामाबद्दलची आत्मीयता, दुसऱ्याचे गुण जाणण्याची क्षमता आणि
सहज संपर्काची कला यामुळे या पुस्तकातील कथनशैली वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. अनुभवकथन
शैलीत लिहिलेले हे कथन विद्यार्थ्यानाच
नव्हे तर सर्व वयोगटातील वाचकांना आवडेल आणि भव्य स्वप्ने पाहण्याची व ती
साकारण्याची प्रेरणा देत राहतील.
ही कथा म्हणजे फक्त यशोगाथाच नाही
तर या प्रवासातील अडथळे,अपयश यावर जिद्दीने केलेली मात याचेही दर्शन आहे. लेखक समारोपात या प्रवासाचे ध्येय
वाक्य सांगताना म्हणतात.
‘ऊठ, निराश
नको होऊस. झगडत राहा.
आपल्या ध्येयाची कास
नको सोडूस.
शरण जावू नकोस. हार
मानू नकोस.
तुझा नाही कुणी पाडाव
करू शकणार.
अखेर विजय आहे फक्त
तुझाच !’
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील
लिंकला भेट द्या
Comments
Post a Comment