तंत्रस्नेही
अध्यापकत्व : लेख ९
मी, यु-ट्यूब आणि माझा
अभ्यास (भाग १)
मित्रांनो, या वर्षी पण शाळा ऑनलाइन सुरू झाल्या! आनंद झाला का बोअर
वाटलं ? तुम्ही सगळेजण मित्र-मैत्रिणी, शाळेतील शिक्षक, दंगा यांची आठवण होऊन चुकल्यासारखं
होत आहे ना? आम्ही शिक्षक देखील ऑनलाइन तासांना कंटाळलो
आहोत. वर्गात प्रत्यक्ष शिकवताना जी मजा येते, ती ऑनलाइनमध्ये
येत नाही; पण गेल्यावर्षी ऑनलाइन शाळा सुरू झाल्यावर आनंद
झाला होता ना?
आई-बाबा ज्या गोष्टींपासून दूर ठेवायचे; त्या मोबाइल, लॅपटॉप,
इंटरनेट, यु-ट्यूब हे वापरण्याचा •आग्रह सुरू
झाला; नव्हे, तुम्हाला वापरायला दयावेच
लागले. तुम्हीच का, लॉकडाऊनच्या काळात तुमचे आई-वडील देखील
यु-ट्यूबचा भरपूर वापर करत होते. दुरुस्ती-देखभालीची जी कामे एरवी कोणाकडून तरी
करून घेत होते, ती स्वतःच कशी करायची याच्या चित्रफिती शोधून
बाबांनी अनेक गोष्टींची दुरुस्ती केली असेल; तर आईने
यु-ट्यूब रेसिपीज पाहून अनेक पदार्थ करून खायला घातले असतील. काही उत्साही आयांनी
त्यांचे स्वतःचे यु-ट्यूब चॅनेल देखील सुरू केले असेल. हे ऑनलाइन शिक्षण म्हणजे
आपणा सर्वांच्या आयुष्यातील टर्निंगपॉईंट आहे.
मला माहीत आहे, शिक्षकांनी सुचवलेल्या वेबसाईट, यु-ट्यूब
व्हिडिओ या पलीकडे जाऊन तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी सर्फिंग केलेत.
माईन क्राफ्ट, क्लॅश ऑफ क्लॅन्ससारखे अनेक गेम डाउनलोड केलेत
आणि खेळले. यु-ट्यूबवर 'भाडीपा' पासून
कॅरी मीनाटीसारखे अनेक चॅनल सबस्क्राईब केलेत, ओटीटी वर
फॅमिली मॅन, जीओटी, सेक्रेड गेम्स
यांसारख्या मालिका पहिल्या.
मराठीत व्हिडिओला 'चित्रफीत' म्हणतात. या चित्रफिती
पाहताना तुमच्या लक्षात आले का, की त्यांच्यासाठी वेगवेगळे
शब्द वापरले जातात; जसे प्रोमो, टीजर, ट्रेलर,
फिचर फिल्म, डॉक्युमेंटरी, रिकॅप इ.
प्रोमो ही जाहिरात करणारी चित्रफीत असते. ज्याद्वारे आपल्याला जे दाखवले जाणार आहे, ऐकवले जाणार आहे;
त्याबद्दल मनात उत्सुकता निर्माण होते, आपले
कुतूहल चाळवले जाते. आणि आपण ती मालिका वा चित्रपट पाहण्याचे ठरवू; प्रसंगी त्यासाठी पालकांकडे हट्ट करू, अशा प्रकारे
त्याची मांडणी केलेली असते.
टीजर ही पण प्रोमोसारखी जाहिरात करणारी चित्रफीत असते. टीजर हे अतिशय कल्पक
असतात. कथेतील गूढ अजून गडद करणारे, विनोद पुढे आणणारे आणि थरारक
दृश्यांची झलक दाखवणारे असतात.
ट्रेलर आपल्या मनात चित्रफीत बघण्याची उत्सुकता निर्माण करतातच; पण त्यापुढे जावून
कथानकाची थोडीशी ओळख करून देतात.
रिकॅप हे मालिकेत आधीच्या भागात काय घडले याची आपल्याला आठवण करून देतात.
बींज वॉच मालिकांचे विशेष भाग प्रक्षेपित करून कधी कथानकाची
उजळणी केली जाते वा कथानक झटपट पुढे नेऊन नवीन विशेष टप्प्यावर, कथा पोहोचवली जाते.
प्रेक्षकाने मालिका, चित्रपट
पाहण्यासाठी प्रवृत्त व्हावे
यासाठी काय केले पाहिजे
याबद्दल निर्माते, दिग्दर्शक जो विचार करतात
त्यातून तयार झालेले हे वेगवेगळे प्रकार आहेत.
अभ्यासाचे पण असेच
आहे!
आपण काय शिकणार आहोत याबद्दल आपल्या मनात उत्सुकता
निर्माण झाली पाहिजे, आपण काय
शिकणार आहोत याचा थोडासा अंदाज आपल्याला आला पाहिजे
म्हणजे चांगले शिक्षण होऊ शकते. मग प्रत्यक्ष शिकणे होते.
'शिकणे' एका
टप्यात/दिवसात/बैठकीत स होऊ शकत नाही.
ते एखादया धारावाहिकेप्रमाणे अनेक भागात होते.
अभ्यासाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करावे लागते.
अभ्यासच्या प्रत्येक बैठकीला/स्तराला पण एक रिकॅप लागतो की, ज्यामुळे आधी काय शिकलो हे आठवते; त्याची उजळणी होते.
मग कधीतरी मागे पडलेले अभ्यास महाएपिसोड (बींज वॉच) करून पूर्ण करावा लागतो. कधी तरी सलग उजळणी करण्यासाठी अभ्यासाचा विशेष भाग!
आपल्या अभ्यासाचे चक्रपण यांसारखेच आहे की नाही ?
मग आपल्याला प्रत्येक धड्याच्या अभ्यासाचे नियोजन करताना प्रोमो, टीजर, ट्रेलर, धारावाहिक, फिचर फिल्म, रिकॅप इ. यु-ट्यूब शोधता येतील का? हे चित्रफितींचे प्रकार जणू आपल्याला अभ्यास कसा करत जावा याचा मार्ग दाखवतात.
आपण एखादया मालिकेत जसे गुंतत जातो तसेच आपण आपल्या पुस्तकतील धड्यांमधील
आशयाचे प्रोमो, टीजर, ट्रेलर, धारावाहिक,
फिचर फिल्म, रिकॅप व्हिडिओ शोधू डाउनलोड करून
ठेवले, तर नक्कीच आपल्याला पुस्तकासारखेच एक अभ्यासाचे साधन
म्हणून चित्रफिती वापरता येतील.
उदा. मला दहावीच्या भूगोलातील ब्राझीलचा अभ्यास करायचा आहे, तर मी ब्राझीलच्या
पर्यटन मंत्रालयाच्या छोट्या जाहिराती, डिस्कव्हरी चॅनलवर
ब्राझीलमधील नदया, वन्यजीवन यांच्या
बद्दलच्या मालिकांचे प्रोमो, टीजर, ट्रेलर पाहीन. यातून मला ब्राझीलची
तोंड ओळख होईल.
एकदा ब्राझीलचा परिचय झाला की, तपशीलात अभ्यास करण्याचा म्हणजे धारावाहिकेचा टप्पा येतो. त्यासाठी मी
ब्राझीलच्या इतिहासाबद्दल, लोकजीवनाबद्दल माहिती देणान्या शॉर्ट फिल्म्स पाहीन. त्यानंतर डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर अॅमेझॉन नदी, अॅमेझॉनच्या
खोऱ्यातील सदाहरित जंगले अशा विशेष मालिका पाहीन. त्यानंतर ब्राझीलच्या पर्यावरण, उद्योग, दळणवळण अशा मंत्रालयांच्या त्यांच्या
कामाबद्दल माहिती देणाऱ्या चित्रफिती शोधेन, त्या-त्या
खात्याच्या मंत्रांच्या मुलाखती बघेन, हिस्टरी चॅनलवर
ब्राझीलच्या इतिहासाबद्दलच्या मालिका पाहीन; म्हणजे माझा
ब्राझीलचा अभ्यास तपशीलात होईल. अभ्यास झाल्यानंतर उजळणीसाठी 'ब्राझीलमधील दहा महत्त्वाची पर्यटन स्थळे' यांसारख्या
प्रश्नमंजूषा प्रकारच्या चित्रफिती
पाहीन!
आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध असलेला वेळ, अभ्यास करायचा आशय आणि
अभ्यासाचे उद्दिष्ट यानुसार आपल्याला यु-ट्यूबवर योग्य सारशब्द (की-वर्ड) वापरून
चांगल्या आणि उपयोगी चित्रफिती शोधता येतील. यु-ट्यूबने आपल्यासाठी माहिती,
ज्ञान आणि करमणूक अशा वेगवेगळ्या चित्रफितींचा खजिनाच उपलब्ध करून
दिला आहे!
( छात्र प्रबोधन,सौर आषाढ, शके १९४३, जुलै २०२१,
वर्ष २१ अंक 10 मध्ये ‘तंत्रस्नेही अध्ययन कौशल्ये’ या लेखमालेत प्रकाशित )
( क्रमशः )
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील.
इडियट बॉक्स मधील संज्ञा आणि अभ्यास तंत्र जोडणी भारीच!
ReplyDeleteअभ्यासाची उत्सुकता कशी निर्माण करता येईल ?खूप छान मांडणी....
ReplyDeleteपूर्वा देशमुख
ReplyDeleteखूप छान !!असा अभ्यास करण्याची थोडी मजा अनुभवत आहे
नेहमीसारखे भारी
ReplyDeleteप्रशांतजी, आपण अतिशय चपखल उदाहरण देऊन सहसंबंध अभ्यासाशी जोडून समजावून सांगितले. लेख नेहमी प्रमाणे छानच झालाय.
ReplyDeleteतंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासाची उत्सुकता कशी वाढवता येईल आणि त्याबरोबरच एखाद्या विषयाची पुस्तका बाहेरची माहिती कशी मिळवता येईल याचं खूप छान उदाहरण.
ReplyDelete