तंत्रज्ञानी नवे सहस्रक…
ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील
एका पद्याचे धृवपद आठवते.
तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे
अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे
मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका
बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे
ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि
तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या
शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल
मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी
प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी,
आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास
प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव, टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात
आले. आजच्या गरजा लक्षात घेवून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, मेकर्स स्पेस, इन्स्पायर
पुरस्कार, इग्नाइट पुरस्कार असे अनेक नवीन उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबवले जात
आहेत.
गेल्या पंच्चाहत्तर
वर्षांतील तंत्र शिक्षणाचा आढावा घेतला तर तंत्रज्ञानाच्या शिक्षणात तीन प्रमुख
आयामांचा विचार करणे आवश्यक वाटते. कौशल्य विकसनासाठी हाताने काम करण्याची संधी देणारे
कृतीप्रधान शिक्षण, नवनिर्मिती करण्याची
क्षमता विकसित करण्यासाठी कल्पकतेलावाव देणाऱ्या शैक्षणिक रचना, फक्त नोकरी मागणारे
कामगार तयार न होता संपत्ती निर्माण करणण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी
उद्योजकता विकासाचे अनुभव या तीन मुद्द्यांचा विचार केलातर तर वरील काव्यपंक्तीतील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या हाकेला आपण ओ/प्रतिसाद
देवू शकू.
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक रचनांमधून
निर्माण होणारे मनुष्यबळ पाहिल्यावर मानवी स्वभाव वा वृत्तीबद्दलची दोन प्रमुख
आव्हाने जाणवतात. एक विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार कसे करायचे आणि दुसरे, असे श्रम
करून जे निर्मितीचे काम करतात त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव विद्यार्थ्यांच्या
मनात कसा जागवायचा?
हे दोन संस्कार करता आले तर तंत्रज्ञानाच्या सहस्त्रकात मानवातील मनुष्यत्व
जोपासता येईल, देशात भौतिक संपत्तीच्या जोडीने सद्गुणसंपत्ती निर्माण करता येईल आणि
शिक्षण फक्त जेवणदायी न राहता जीवनदायी होईल.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शिक्षणातून हे घडावे, यासाठी एक
प्रार्थना
वदनि कवळ
घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण
होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल
कृषीकर्मी राबती दिवसरात्र
श्रमिक श्रम करोनी
वस्तू या निर्मितात
स्मरणकरुनी
त्यांचे अन्नसेवा खुशाल
उदरभरण
व्हावे चित्त होण्या विशाल
प्रशांत दिवेकर
Awesome, khoop chaan Prashant ji
ReplyDelete