Skip to main content

सह वीर्यं करवावहै।

 सह वीर्यं करवावहै।

गेल्या महिन्यात व्हॉट्स अॅपवर एक व्हिडिओ शेअर झाला. कोकणी जेवणातील पदार्थ त्या चित्रफितीत दाखवले होते. त्याची लिंक २००१ मध्ये अपरांत अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या मुलींना पाठवली आणि यातील कायकाय आठवते? असं विचारल्यावर या गावात या काकूंकडे या सहलीत मी पहिल्यांदा सांदण खाल्ले होते, आम्ही सर्वांनी मिळून फणस सोलला होता, रात्री मांडवाखाली पोंक्षे सरांनी अंतुबर्वा वाचून दाखवला होता, दिलीप कुलकर्णींबरोबर देवराई पाहिली होती, एका बंदरात छोट्या बोटीने मोठ्या बोटीपर्यंत गेलो आणि मग मोठ्या बोटीवर दोरीची शिडी चढून गेलो होतो, खाजण पाहिले होते, सागरी गुहा पाहिली होती असे अनेक शब्द गोळा झाले.

एक अध्यापक म्हणून मी आयोजित केलेली ती पहिलीच सहल होती. आज मागे वळून बघताना या सहलीच्या आयोजनात मी काय शिकलो ?

 परिसर बघायचा कसा हे मला थोडेफार माहिती होते पण परिसर दाखवायचा कसा हे शिकलो. 

दुसऱ्याला परिसराची ओळख करून देताना आपण परिसर अनुभवायचा कसा असतो हे शिकलो.

एखादा उपक्रम फक्त शिक्षकांचा न राहता तो उपक्रम   विद्यार्थ्यांचा उपक्रम कसा होईल, नव्हे दोघांचा एकत्र शिकण्याचा उपक्रम कसा होईल, हे कसे घडवायचे हे शिकलो......

या मुद्द्यांची यादी करताना मनात एक प्रश्न आला शालेय रचनेत अशा कोणत्या जागा आहेत; कोणते उपक्रम आहेत जेथे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र शिकत आहेत, एकत्र अनुभव घेत आहेत. असा एकत्र कार्य करण्याचा , एकत्र शिकण्याचा भाव किती वेळा तयार होतो ? का बहुतेक वेळा कोणी तरी देणारा आहे, कोणीतरी घेणारा आहे याच भूमिकेतून शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

अनेक शाळांमध्ये शाळेच्या सुरुवातीला परिपाठामध्ये प्रार्थना म्हंटली जाते. परमेश्वराकडे केलेले हे मागणे शिक्षक आणि विद्यार्थी समरसून एका भावनेने करत आहेत असे वर्षात किती वेळा घडते? का आम्ही शिक्षक बहुतेक वेळा प्रार्थना योजणारे असतो, शिस्त सांभाळणारे असतो वा  प्रार्थनेचे तटस्थ प्रेक्षक असतो ?

शालेय रचनेत शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन काही कृती करत आहेत, एकत्र शिकत आहेत अशा जागा , अशा संधी कोणत्या याबद्दल विचार करत असताना  तैत्तिरीयोपनिषद् ब्रह्मानंदवल्लीतील – शांतिपाठ आठवला. या शांतीपाठाचे अनेक संघटनांमध्ये, आम्ही एकत्र येवून काय करणार आहोत यासाठीची प्रार्थना म्हणून सामूहिक पठण केले जाते. उपनिषद हा गुरु-शिष्यांमधील संवाद असल्याने खरंतर ही प्रार्थना गुरु आणि शिष्य शिक्षणासंदर्भात  एकत्र येऊन काय करू इच्छितात याबद्दलची प्रार्थना आहे.

ॐ सह नाववतु।

सह नौ भुनक्तु।

सह वीर्यं करवावहै।

तेजस्वि नावधीतमस्तु

मा विद्विषावहै।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

(तैत्तिरीयोपनिषद् ब्रह्मानंदवल्लीतील – शांतिपाठ)

Om, May we all be protected!

May we all be nourished!

May we work together with great energy!

May our intellect be sharpened!

Let there be no Animosity amongst us!

Om, peace (in me), peace (in nature), peace (in divine forces)

हा श्लोक सर्वात लोकप्रिय शांती मंत्रांपैकी एक आहे. कोणत्याही अभ्यासाच्या किंवा शिकण्याच्या सुरुवातीला याचे पठण  केले  जाते.

ॐ सह नाववतु।

प्रार्थनेच्या सुरुवातीला शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र ओंकाराचा उच्चार करत. ओंकार म्हणजेच परब्रह्म शक्तीला आवाहन करत आहेत.

पहिले आवाहन एकत्र संरक्षणाचे  केले आहे.

कशापासून संरक्षण?

आपत्तीपासून, अपघातापासून संरक्षण!

आळस,अविचार, अश्रद्धा यापासून संरक्षण!

अज्ञान, अकृती, अकार्यक्षमता यापासून संरक्षण !

निरुत्साह, आसूया, संशय, द्वेष यापासून संरक्षण !

सह नौ भुनक्तु।

दुसरे आवाहन आहे एकत्र पोषणासाठी,

कशाचे पोषण?

 शरीराचे, बुद्धीचे, मनाचे, अंतराचे !

ज्ञानकोशाचे, भावकोशाचे!

कार्यसंचाचे, कार्यानुभावाचे ,कार्यसंघाचे!

सह वीर्यं करवावहै।

तिसरे आवाहन आहे सहकृतीचे

कोणत्या आणि कशा कृती

श्रमशक्तीदायी, पराक्रमदायी, धैर्यदायी, आव्हानदायी!

बुद्धीदायी, ज्ञानदायी, विवेकदायी, दृष्टीदायी  कृती !

प्रेरणादायी , आनंददायी, ऊर्जादायी, चैतन्यदायी कृती !

या तीन आवाहनातून म्हणजेच संरक्षण, पोषण आणि सहकृती

या तीन प्रकारच्या शैक्षणिक कृतीतून, तीन प्रकारच्या 

शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रियेतून एकत्र काय व्हावे, काय होईल, काय होऊ दे!

तेजस्वि नावधीतमस्तु

तर आमच्यातील तेज प्रकट होऊन आम्ही तेजस्वी व्हावे.  

तेज म्हजे अग्नी ! तेज म्हणजे पराक्रम !

तेज म्हणजे ओज ! तेज म्हणजे उत्साह, उल्हास,आनंद !

आमची बुद्धी अधिकाधिक तेजस्वी बनू दे. आमच्या कृती अधिकाधिक तेजस्वी होण्यासाठी आमच्या हातून पराक्रमाच्या कृती घडाव्यात.

आमची म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्याची आंतरक्रीया चैतन्यमय होऊ दे!

आमचा प्रवास स्वतःमधील तेजाचे प्रकटीकरण करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे होऊ दे!

मा विद्विषावहै।

अभ्यासातून काय साध्य झाले ते आम्हाला कळू दे.

यासाठी आमच्यात कधीही अस्पष्टता, असहकार्य, संघर्ष निर्माण होऊन

शिक्षणप्रक्रिया फलदायी होणार नाही असे कधी घडू नये.

यासाठी आमच्यात विश्वास, सहकार्य, सामंजस्य निर्माण व्हावे.

असा विश्वास निर्माण झाल्याने हेवा, दीनता, लाचारी, संकुचितपणा यांचा त्याग करून

आमची व्यक्तिमत्वे उमदी, ओजस्वी, शीतल, मृदू आणि नम्र होऊ दे!

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

शेवटी तीन वेळा शांती मंत्राचे उच्चार आहेत.

शैक्षणिक आंतरक्रिया या व्यक्तीकेंद्रित असल्याने

भौतिक, वैचारिक आणि भावनिक स्तरावर, शांती लाभू दे! अशी प्रार्थना आहे.

शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. शिक्षणात आशय महत्त्वाचा आहेच; पण शिक्षणही शिक्षक आणि  विद्यार्थी यांच्यातील परिसरात घडत असलेली एक आंतरक्रिया आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शिकणे घडते त्या ठिकाणी हा ‘आम्ही’ भाव तयार होणे महत्वाचे आहे.

सहभोजन, सहनिवास जिथे घडतो त्या त्या ठिकाणी हा ‘आम्ही’ भाव सहज निर्माण होतो. शालेय रचनेत स्नेहसंमेलन, सहली या याच्या जागा आहेत. पण सहशिक्षण घडते अशा जागा कोणत्या ? अशा संधी कोणत्या ? प्रकल्प, स्पर्धा अशा काही जागा लगेच लक्षात येतील.

असा  सहशिक्षणाचा  आपला  अनुभव आणि त्या अनुभवात या शान्तिपाठातील कोणत्या  आवाहनाला स्पर्श केल्याचे  जाणवते  याबद्दल कॉमेंट्समध्ये जरूर शेअर करा ?

आणि सध्याच्या उपक्रमांच्या रचनेत थोडासा बदल करून कुठे आपण अध्यापक-विद्यार्थी यांच्या एकत्र सहशिक्षणाच्या संधी कशा निर्माण करू शकू याबद्दलच्या आपल्या कल्पना कॉमेंट्समध्ये जरूर शेअर करा. 

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधनी, पुणे



Comments

  1. Satyashray HasabnisJuly 12, 2022 at 12:34 PM

    Such a simple yet profound article. 'प्रासादिक' is the word that comes to my mind. Probably there is no equivalent word in English for it. As a teacher I have always tried to maintain that I am a co - learner on the journey with the students. Younger students have a more flexible mindset because of less exposure to the 'Conditioning' that adults undergo. They are also more keen to stretch the limits - be it of a concept or a process. They are also comparatively uninhibited in their expressions. These and a few other opinions that I hold have enabled me to learn from my learners (students) almost in every interaction.
    Presently in Jnana Prabodhini Prashala I am conducting 'Project Based Learning of Mathematics' which is essentially an open ended approach to learning Mathematics. It is enabling me to learn a lot regarding Mathematics as a discipline and the process of acquiring mathematical skills and a mathematical mindset as well.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रशांत, परमात्म्याने गुरूशिष्याचे एकत्र रक्षण, पालन होण्यासाठी, एकत्र शक्ती चे वितरण करावे, एवढाच या शांतीमत्राचा अतीशय सीमित अर्थ माहित होता. पण त्याचा, एक शिक्षक म्हणून तू सर्व अंगानी केलेला विचार भावला, पटला.. माणिक मावशी

      Delete
    2. 'प्रासादिक ' हा शब्द फारच समर्पक अन् चपखल आहे.

      Delete
    3. @Satyashray Hasabnis I would like to know in details.

      Delete
  2. सहज सुंदर विश्लेषण

    ReplyDelete
  3. प्रशांत, हे शांतीपाठाचे विवेचन सुंदर सोपे आणि नेमके आहे. याचा जास्तीत जास्त प्रसार व्हायला हवा. याचा इंग्रजी अनुवाद मिळेल का?

    ReplyDelete
  4. सर्व शिक्षक, अध्यापकांनी वाचून विचार करावा असा लेख. सहज पटेल असे विश्लेषण.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर विश्लेषण प्रशांतजी... शिक्षक - विद्यार्थी सहशिक्षणाच्या संधी सामान्यतः क्वचित आढळतात. तर काही शिक्षक आप-आपल्या स्तरावर धडपड करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञान प्रबोधिनी व अशा काही संस्थेत तसे जाणीव पूर्वक ठरवून प्रयत्न केले जातात. कारण त्या व्यवस्थेचा भाग झालेल्या आहेत. परंतु व्यवस्था नाहीत अशा प्रकारच्या व्यवस्थेत करण्यासाठी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

    ReplyDelete
  6. खूपच छान माहिती या श्लोकाचा आणि शिक्षण याचा संबंध आज स्पष्ट झाला म्हणून

    ReplyDelete
  7. खूप छान ..

    ReplyDelete
  8. खूप छान लेख सर. शिक्षक हा फक्त देणारा, विद्यार्थी हा फक्त घेणारा या कल्पनेवर जास्त उपयुक्त कल्पना तुम्ही मांडली. दोघेही एकत्रित अनुभव घेत विकसित होत आहेत. आता तर माझ्या विद्यार्थी मला अनेक गोष्टी शिकवतात. उदा. Genetic engineering झालेली पूनम मला genetics शिकवते. गुगल फाॅर्म कसा तयार करायचा हेही एका विद्यार्थिनीने शिकवले. निसर्गात भटकंती करत असताना वेगवेगळ्या झाडांची माहिती शेतकरी कुटुंबातील राणीने सांगितली. हे सगळे अनुभव लेख वाचताना आठवले.

    ReplyDelete
  9. वास्तवात शिकवता शिकवतात शिक्षकही खूप गोष्टी शिकतो. जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना आपणही जास्त जास्त खोलवर विचार करतो. हेही शिक्षण प्रक्रियेतील अध्यापनाचे अध्ययन आहे.

    ReplyDelete
  10. शांतीमंत्राचा एक सरळ मर्यादित अर्थ माहित होता परंतु आपल्या या लेखाने त्याची व्याप्ती वाढवली उपक्रम राबवताना नक्कीच दूरदृष्टी बाळगून विद्यार्थी आणि शिक्षक असा विचार नक्कीच करतील किंवा तो अंमलात आणतील.खूप छान लेख सर.मनापासून खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  11. छान विवेचन , सगरोळी च्या शाळेत सदरील ऊपक्रम नियमीत राबविले जातात .
    डॉ जयंत जकाते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Discovering the Wild: Lessons from a Zoo

Discovering the Wild: Lessons from a Zoo      Vacations are the perfect time to explore and learn. Teachers often assign exciting activities to help students discover new things. One science teacher gave students an interesting task: visiting a zoo or zoological museum. Here’s an example of how to prepare for and make the most of such an experience:   Dear Students, The Thrill of the Wild Have you ever seen an elephant run? Or watched elephants fight? I had an incredible experience in 1998 at Kaziranga Sanctuary in Assam, one of the few places in India where the majestic one-horned rhinoceros can be spotted. The sanctuary’s marshy terrain, covered with tall elephant grass, makes it difficult to see the animals unless you ride an elephant. One morning at 6 a.m., while waiting for an elephant safari on a watch tower, I witnessed a dramatic scene. A group of elephants approached the platform to pick up passengers when suddenly, a t...

Fostering Inquiry: Reflections of a Vijnana Doot in Chhote Scientists

 Fostering Inquiry: Reflections of a Vijnana Doot in Chhote Scientists Namaste, I am  Jidnyasa,  working as a Vijnana Doot , a teacher at the Chhote Scientists program at the Educational Activity Research Centre, Jnana Prabodhni, Pune. With a Master’s degree in science, I'm passionate about nurturing curiosity and fostering inquiry in school students for science. During the Chhote Scientists sessions, I am deeply engaged in activity-based science education. In this narration, I will share my experience of how I prepared, practiced, and what I observed during Chhote Scientists sessions. I feel glad to share my reflections during the journey.  As I geared up to prepare for a session on light for the 8th-standard students in the Chhote Scientists program....... Before diving into the inquiry-based session planning, I decided to perform a concept analysis of light. With a notebook in hand, I started jotting down different keywords (attributes) associated with light. The...

द हिलिंग नाईफ !

  द हिलिंग नाईफ ! सतरा वर्षांचा जॉर्ज , व्हाइट रशियन नौदलामध्ये लेफ्टनंट पदावर अधिकारी होता.   बोल्शेविक सेनेच्या एका गटाविरुद्ध   उघडलेल्या आघाडीवर   त्याला पाठवले जाते. किनारपट्टीवर उतरल्यावर त्याच्या तुकडीला बोल्शेविक खंदकावर हल्ला करण्याचा आदेश मिळतो. जॉर्ज त्याच्या तुकडीचे नेतृत्व करत खंदकावर घमासान हल्ला चढवतो. तुफान गोळाबारी सुरू होते. खंदकात उतरून संगिनी आणि तलवारींचा खणखणाट सुरू होतो. जखमी सैनिकांना मागे तळावर पाठवून त्यांची जागा नवे सैनिक घेत असतात. लढत असताना जॉर्जच्या एका मित्राला गोळी लागते. गोळी लागलेली दिसताच जॉर्ज त्याच्या जागी कुमक पाठवून ,   मित्राला सुश्रुषेसाठी मागे तळावर पाठवतो.          संध्याकाळनंतर लढाईचा जोर ओसरतो. दोन्ही बाजू योग्य अंतर राखत माघार घेत आपापले मोर्चे पक्के करतात. रात्री तळाकडे परत आल्यावर जॉर्ज जखमी सैनिकांची चौकशी करत मशाली आणि शेकोट्यांच्या उजेडात   तात्पुरत्या उभारलेल्या उपचार केंद्रात आपल्या मित्राला शोधून काढतो. मित्र बराच जखमी होऊन ग्लानीत गेलेला असतो. तळावरील परिचार...