Skip to main content

आ. कै. उषाताईंबद्दल .....

 आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी

माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये  एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल,  थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी  प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव, उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , "आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक, सहली, शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत  आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा.

त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलापूरला महिना-दोन महिन्यातून आठदहा दिवस राहायला येत असत. मी निवासी राहायला आल्यावर  त्या पहिल्यांदा आल्या , तेव्हा भोजनगृहातील फ्रीज बंद पडला होता. न्याहारीच्या वेळी  त्यांनी मला विचारले फ्रीज किती दिवस बंद आहे ? मी सांगितले की  मी आल्यापासून बंदच आहे. मग मी, अमोल व राजशेखर तिघांना त्यांनी एकत्र  बोलवून घेतले आणि विचारणा केली. कार्यवाह आल्यावर बघू अशा अर्थाचे काहीतरी उत्तर आम्ही दिले. तेव्हा 'कार्यवाहांशी मी बोलेन . आत्ता दुकाने उघडली की जायचे ; कोटेशन घेऊन यायची आणि आज दुपारी जेवणाच्या आत मोडकी वस्तू बदलली गेली पाहिजे ' असा आदेश निघाला. आणि स्वयंपाकघरातून आमच्या गप्पा सुरू झाल्या. आधीच सोलापूरला खाण्यापिण्याची मजा असते , पण उषाताई आल्यावर मावशींचे नवीन पदार्थांचे प्रशिक्षण असे आणि आमची मजा असे. असे मावशींना कायकाय करायचे सुचवता सुचवता त्यांनी त्यांना एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे बघितले आहे.  

एकदा विषय अध्यापनाबरोबर अजून काय करतो याबद्दल आम्ही बोलत होतो.  त्यात स्वयं - अध्ययन, वाचन कौशल्य असे कोणकोणते विषय घेतो ते त्यांना सांगितले. प्रशिक्षणासाठी तयार केलेले साहित्य दाखवले. ते बघितल्यावर त्यांनी पहिला प्रश्न केला ‘वाचन कौशल्याचे तुझे प्रशिक्षण झाले आहे का ?’ ‘नाही !’ ‘प्रशिक्षण नाही मग का  घेतोस वाचन कौशल्याची सत्र ?!!’ आता आली का पंचाईत! प्रमासंच्या शिस्तीत प्रशिक्षण लागले ! मी त्यांना म्हटले मी पोंक्षेसर,महेंद्रभाई, मिलिंदपासून अनेकांचे वाचन कौशल्याचे वर्ग बघितले आहेत, खूप पुस्तकं वाचली  आहेत  आणि मला वाचायला खूप आवडते  एवढे पुरेसे आहे. हे उत्तर ऐकल्यावर त्या म्हणाल्या ‘समज हे प्रशिक्षणासाठी तयार केलेलं सराव साहित्य उपलब्ध नाहीये तर काय करशील ?’ असे म्हणून त्यांनी त्यांच्या समोरचे ज्ञान प्रबोधिनी सोलापूरचे वृत्त का  छात्र प्रबोधनचा अंक मला दिला आणि मग आमच्या बराच वेळ त्यावर गप्पा झाल्या.

आज असे वाटते की अध्यापकाला विषयाचा आशय माहिती असेल, प्रशिक्षणाची; विषय शिकण्याची  पद्धत माहिती असेल आणि प्रशिक्षण विषयाचे  महत्त्व  माहिती असेल तर प्रशिक्षणासाठी उपलब्ध असेल ती गोष्ट साधन म्हणून वापरता येऊ शकते हा विचार त्यांच्याबरोबरच्या या  गप्पांमधून सुरू झाला.

पण मुद्दाम भेटून किंवा फोन करून आमच्या गप्पा सुरू झाल्या त्या करोना काळात. 'स्वाध्याय प्रवचन ' ही लेखमाला लिहायला सुरुवात केली तेव्हा त्या हराळीत निवासी होत्या. कोणाकडून तरी त्यांच्या कानावर या लिखाणाबद्दल पोहोचले असावे. त्यांचा फोन आला काय लिहितो आहेस चौकशी करण्यासाठी. त्यानंतर दोन दिवसांनी परत फोन आला. दिसत  नसले तरी त्यांनी कोणाकडून तरी लेख वाचून घेतला होता. त्यांच्याबरोबरच्या सहाय्यकाकडे त्यांनी सांगितलेले मुद्दे असावेत बहुदा. त्याला आधी नोंदवलेला एकेक मुद्दा विचारात त्या लेखाचा आशय, मांडणीची पद्धत, त्यातील भावलेल्या गोष्टींबरोबर त्या लेखातील प्रबोधिनी आणि अजून काय विचार करता आला असता अशा त्यांचा कल्पना अशा गप्पा. फोन चांगला अर्धापाऊण  तास चालत असे.

 लेखमालेच्यानिमित्ताने  मला समृद्ध करणाऱ्या आमच्या  लेखन गप्पा सुरू राहिल्या त्या आगदी शेवटपर्यंत !

त्या विनायक भवनमध्ये राहात असताना झालेल्या काही गप्पा... त्यावेळी त्यांना दिसत नव्हते आणि नीट ऐकूपण येत नव्हते, त्या  एक नळी  कानाला लावत ; तिच्या दुसऱ्या टोकाला आपण बोलायचे...

एकदा त्यांना वाचन कौशल्य आणि बौद्धिक विकसन लेख वाचून दाखवला. ऐकल्यावर त्यांनी लगेच भावलेले मुद्दे सांगितले आणि निघताना विचारले यातील उदाहरणे दिलेली पुस्तकांची नावे आजच्या वाचकांची आहेत का तुला आवडलेल्या पुस्तकांची आहेत ? आणि उद्या परत भेटू असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी वाचन आणि बौद्धिक विकसन यावर सविस्तर प्रतिसाद ! अगदी कोणते मुद्दे सुटले, अजून कोणते संदर्भ प्रमासंमध्ये उपलब्ध आहेत अशा तपशिलांसह. निघताना त्या म्हणाल्या

 ' ते वाचन कौशल्य विकसन, त्यातून बौद्धिक विकसन हे सगळे ठीक आहे.

पण तू एक शिक्षक आहेस  हे लक्षात घे, वाचन हे प्रेरणा जागरणासाठी असते.'

एकदा शिक्षक प्रशिक्षणाबद्दल माहिती करून घेतल्यानंतर त्यांनी विचारले , 'आपण शिक्षण विस्तारासाठी एखाद्या शाळेत गेल्यावर  शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर काम करतो .पण पालकांसाठी काय करतो ?’ मी : फार काही करत नाही.. ‘तर मग पालक संवाद सुरू कर. जोपर्यंत आपण शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी एकत्र प्रयत्न करत नाही तोपर्यंत शिक्षण विस्तारला मर्यादा राहणार.’

त्यानंतर त्यांचा दोनतीन आठवड्यांनी फोन यायचा - कुठं प्रवास झाला आणि पालकांशी बोललास का ? एखाद्या सुचवलेल्या गोष्टीचा पाठपुरवा करावा तर उषाताईंनीच !

अगदी शेवटचा प्रसंग.. चेन्नईहून एक संस्थाचालक, शिक्षक असा गट गेल्यावर्षी प्रबोधिनी परिचय सहलीला आला होता. अनघाताईंबरोबरच्या प्रश्नोत्तरात उषाताईंचा उल्लेख आला.. नव्वदीत त्या सतत प्रबोधिनीचा विचार करतात तर आमच्या सारख्यांनी तर करायला हवा या अर्थाने काही संदर्भ आठवणी त्यांनी सांगितल्या . त्यामुळे गटाला त्यांना भेटायचे होते. त्यांच्या आजारपणामुळे सगळ्यांनी न जाता दोघातिघांनी जावे , ओळख करून द्यावी आणि अगदी पाचच मिनिटे भेटावे असे ठरले. कोण-कुठून आलात, का आलात प्रबोधिनीत याबद्दल ऐकल्यावर त्या काही वाक्येच बोलल्या गटाबरोबर ...

विद्यार्थी विकसनात  शाळा, पालक , शिक्षक याचे एकदिश प्रयत्न.....

यात अध्यापक महत्त्वाचा...

शिक्षक  प्रशिक्षणात

ज्ञान आणि कौशल्यवृद्धीबरोबर शिक्षकात मातृभावाबरोबर खरंतर संतत्वाची जोपासना करायला हवी!

इति उषाताई

Shall the spirit of sainthood be sown in the heart of a teacher

along with spirit of motherhood?

Let the teacher's heart bloom with the fragrance of sainthood!

May the radiance of sainthood illuminate every teacher’s life path!!

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. An informal yet deep article. It talked about the mentee and the mentor, which I liked.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

Jivo Jivasya Jeevanam: Unfolding the Transformative Power of Life

  Jivo Jivasya Jeevanam : Unfolding the Transformative Power of Life If you are in the Delhi or Agra area during the winter months, the Bharatpur Bird Sanctuary is a magical place to visit. A few years ago, I spent a day exploring this stunning sanctuary in North India, renowned for being a haven for birds. Over 350 species flock to Bharatpur during the winter, making it a paradise for bird enthusiasts. The sanctuary is not just about birds; it also features a small museum filled with fascinating exhibits. Inside, you will find detailed information: diversity, anatomy, physiology, migration patterns, etc about the sanctuary’s feathered residents. However, one section of the museum particularly caught my attention. It showcased photographs from the British colonial era, revealing a darker chapter in history: hunting for tiger and bird trophies. One striking photo depicted British officers proudly standing on what appeared to be a large staircase, holding guns with their chest...