पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत
अनुबन्ध
चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे
गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी
सज्जनगड येथे जाण्याचा योग आला. श्रीसमर्थ
रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे
विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात सहभागी झालो होतो.
(विद्याव्रत
संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण
जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा
परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा
व्रतांचा परिचय करून घेवून विद्या
अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे. )
सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची
समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला
जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना,
अभिषेक–पूजन, महाप्रसाद , भजन आणि संत
रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्रीमद् दासबोध या ग्रंथाचे पारायण अशा अनेक गोष्टींचा
समावेश असतो. संध्याकाळच्या या दासबोध
पारायणात श्रोते म्हणून सहभागी झालो होतो. यावेळी पहिल्या दशकातील समास सातवा : कवेश्वरस्तवन आणि समास आठवा : सभास्तवन यांचे
श्रवण केले.
दासबोध म्हणजे “शिष्याला दिलेला उपदेश”.
हा १७व्या शतकातील भक्ती (श्रद्धा) आणि ज्ञान (बोध) या दोन परंपरांचा समन्वय
करणारा हा एक अद्वितीय ग्रंथ आहे. या ग्रंथात भक्ती, आत्मज्ञान आणि दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तर
देणारे व्यावहारिक मार्गदर्शन देखील आहे.
दासबोधाच्या श्रवण सत्रानातर मी दासबोध चाळत असताना त्यातील पहिला श्लोक
वाचला —
श्रोते पुसती
कोण ग्रंथ
काय बोलिलें जी
येथ
श्रवण
केलियानें प्राप्त
काय आहे ।।१।।
अर्थ —
“श्रोता विचारतो
— हा ग्रंथ कोणता आहे?
यात काय
सांगितले आहे?
आणि हे ऐकून
काय लाभ होणार आहे?”
हा श्लोक एक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो —
जो प्रश्न प्रत्येक वाचकाने पुस्तक वाचण्यापूर्वी स्वतःला
विचारावा,
आणि हाच प्रश्न
जो प्रत्येक लेखकाने पुस्तक लिहिण्यापूर्वी स्वतःलाच विचारावा!
जेव्हा मी ‘दशक १ – स्तवनांचा’ आणि ‘समास १ – ग्रंथारंभलक्षणनाम’ वाचला,
तेव्हा मला
पुस्तक (किंवा पाठ्यपुस्तक) लेखनाशी संबंधित अनेक मार्गदर्शक तत्त्वे वा सिद्धांत यात मांडले आहेत असे लक्षात आले. . ही
मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच भारतीय
ज्ञानपरंपरेतून (Indian
Knowledge System – IKS) प्राप्त झालेले पाठ्यपुस्तक लेखनासाठीचे मार्गदर्शक नियम
आहेत.
ग्रंथ लेखनाचा उद्देश आणि ग्रंथ लेखनाची तत्त्वे; सूत्रे भारतीय परंपरेत कशा प्रकारे सांगितली आहेत हे
जाणून घेण्यासाठी मी काही संदर्भ शोधले . —
“तत्त्वबोध” —
श्री शंकराचार्यांनी रचलेला वेदांताचा एक प्रारंभीक ग्रंथ, जो
जीवनशास्त्राच्या मूलभूत संकल्पना प्रश्नोत्तरांच्या रूपात मांडतो.
त्याचा पहिला श्लोक असा आहे —
वासुदेवेन्द्रयोगीन्द्रं
नत्वा ज्ञानप्रदं गुरुम्।
मुमुक्षूणाम्
हितार्थाय तत्त्वबोधोऽभिधीयते॥
या श्लोकातील दुसरी ओळ स्पष्ट करते —
शोधक कोण आहे, विषय काय आहे, ज्ञाता आणि
ज्ञेय यांचा संबंध काय आहे, आणि अध्ययनाचा
लाभ काय आहे.
भारतीय परंपरेतील ग्रंथांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आरंभी उपस्थित
केलेले दिसतात. जे ग्रंथाच्या मांडणीचा उद्देश,
विषयवस्तू आणि
उपयुक्ततता याबद्दलचे संदर्भ स्पष्ट करतात. असे प्रश्न, सूत्रे आणि तत्त्वे आधुनिक
पाठ्यपुस्तक लेखनासाठीही दिशादर्शक ठरू शकतात.
अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे
भारतीय परंपरेत कोणत्याही ग्रंथाच्या
उद्देश आणि रचनेशी संबंधित तत्त्वांना “अनुबन्ध चतुष्टय” असे म्हणतात. या शब्दाचा
अर्थ आहे — चार संबंध किंवा चार आवश्यक घटक.
अनुबन्ध चतुष्टयाचे चार घटक:
१. अधिकारि (योग्य
वाचक / श्रोता ):
‘अधिकारी’
म्हणजे त्या ग्रंथाचा अपेक्षित वाचक किंवा पात्र विद्यार्थी. ग्रंथ कोणासाठी
लिहिला आहे याबद्दलची मांडणी. प्रत्येक
ग्रंथाची गुंतागुंत, खोली, व जटिलता वेगवेगळी असते;
म्हणून वाचकाची
समज, भूमिका, तयारीआणि पात्रता अर्थपूर्ण अध्ययनासाठी महत्त्वाची असते. अर्थात
वाचक कोण आणि वाचकाने अध्ययनासाठी काय
तयारी केली पाहिजे, काय भूमिकेतून वाचले पाहिजे याचा निर्देश आरंभी केलेला असतो.
समास १ – ग्रंथारंभलक्षणनाम मधील या
संदर्भातील काही श्लोक खाली देत आहे.
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें
जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥१॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो
दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥२२॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें
घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥२६॥
२. प्रयोजन
(उद्देश):
हा ग्रंथ का
अभ्यासावा? या प्रश्नाचे
उत्तर देणारा घटक म्हणजे प्रयोजन. ग्रंथाचा अभ्यास का करायचा, याचं कारण आणि हेतू याची मांडणी प्रयोजन सांगताना केलेली असते. अध्ययनातून
वाचकाला काय साध्य होणार आहे,
हे स्पष्टपणे
ग्रंथारंभी सांगितलेले असते.
समास १ – ग्रंथारंभलक्षणनाम मधील या
संदर्भातील काही श्लोक खाली देत आहे.
भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती
मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥४॥
शुद्ध उपदेशाचा
निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे
तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥
नासे अज्ञान
दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे
फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥
३. विषय
(विषयवस्तू):
‘विषय’ म्हणजे ग्रंथात
नेमके काय मांडले आहे, त्याचा आशय काय
आहे, त्यात कोणती शिकवण वा संदेश दिला आहे, याबद्दलची
मांडणी ग्रंथाच्या सुरुवातीलच केलेली असते. ग्रंथामध्ये मांडलेला आशय आणि त्यात
दडलेलं तत्त्वज्ञान नीट समजून घेण्यासाठी विषयाची व्याप्ती सुरुवातीला समजणे
अभ्यासकासाठी उपयोगी ठरते. त्याच्या डोळ्यासमोर विषयाच्या विस्ताराचे संकल्पना
चित्र वाचताना उभे रहाते. यात लेखकाने दिलेले संदर्भ विषयाचा विस्तार स्पष्ट
करतात. .
समास १ – ग्रंथारंभलक्षणनाम मधील या
संदर्भातील काही श्लोक खाली देत आहे.
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा
संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥२॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें
वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा
निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥
मुख्य
उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥
मायोद्भवाचें
लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला
विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥
नाना
ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य
आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥१८॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता
पाण्डवगीता । गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥१९॥
४. संबंध
(विषय–उद्देश संबंध):
‘संबंध’ म्हणजे
विषय आणि प्रयोजन यांच्यातील नातं. संबंध ग्रंथातील शिकवण आणि त्यातून उद्दिष्टानुसार
साध्य होणाऱ्या अंतिम फल वा निष्पत्तीमधील जोड स्पष्ट करतो. हा संबंध समजून
घेतल्याने वाचकाला त्या ग्रंथातील शिकवणीचं महत्त्व आणि उपयोजन समजते. ग्रंथ
लेखन, वाचन आणि विषय मांडणीचा उद्देश वाचना आधीच स्पष्ट झाल्यामुये अध्ययन
अधिक अर्थपूर्ण बनते.
समास १ – ग्रंथारंभलक्षणनाम मधील या
संदर्भातील काही श्लोक खाली देत आहे.
भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती
मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥४॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे
तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥
मार्ग सांपडे
सुगम । न लगे साधन दुर्गम । सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥
नाना दोष ते
नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥ जयाचा
भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥
हे चार घटक लक्षात घेऊन लिहिलेला ग्रंथ
किंवा पाठ्यपुस्तक अधिक स्पष्ट,
परिणामकारक आणि
शिक्षणसुसंगत ठरते. ग्रंथाच्या सुरुवातीच्या प्रकरणात याची मांडणी केल्यामुळे
वाचकाची वाचनाबद्दलची भूमिका, तयारी वाचनाच्या प्रारंभीच होते.
अनुबंध चतुष्टय आणि पाठ्यपुस्तक लेखनाचे तत्त्वे यातील सुसंगती
१.
अधिकारि (योग्य वाचक): विविध विद्यार्थ्यांशी जुळवून घेण्याची क्षमता:
हे तत्त्व
विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी
(भौगोलिक/सामाजिक),पूर्वज्ञान, अपेक्षित बौद्धिक विकास,
क्षमता आणि शिकण्याच्या
शैलीनुसार साहित्याचे अनुकूलन याच्याशी संबंधित आहे. अशी पार्श्वभूमी लक्षात घेवून
त्यानुसार शैक्षणिक साहित्य तयार केले तर प्रत्येक
विद्यार्थी आपल्या स्तरानुसार अर्थपूर्ण शिकू शकतो.
२.
प्रयोजन (उद्देश) : शिकण्याच्या
उद्दिष्टांमधील स्पष्टता
प्रयोजनात शैक्षणिक उद्दिष्टे आणि अध्ययन निष्पत्ती (अपेक्षित
फळ) स्पष्टपणे निश्चित केली जातात. पाठ्यपुस्तकातील आशय आणि आशयाची मांडणी, अध्ययन
उद्दिष्ट्ये आणि अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत असणे गरजेचे असते. पाठ्यपुस्तकाचा हेतू
शैक्षणिक उद्दिष्टांशी सुसंगत असावा.
३.
विषय (विषयवस्तू) : आशय
व्याप्ती,रचना आणि मांडणीतील शिस्तबद्धता
विषयाची मांडणी
अध्ययन निष्पत्तीनुरूप असावी. विषयाचा विस्तार, मांडणीतील सुलभता, संकल्पना चित्र,
उदाहरणे अशा अनेक गोष्टींबद्दल विचार मांडणारे हे तत्त्व आशयाची योग्य रचना, वर्गीकरण आणि
मांडणी करण्याच्या महत्त्वावर भर देते. विषय सुसंगत, स्पष्ट , उदाहरणांसह आणि शैक्षणिक निकषांनुसार मांडला गेला, तर शिकण्याची
प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.
४.
संबंध (विषय–उद्देश संबंध) : सुसंगती आणि
उपयोगिता
हे तत्त्व अभ्यास
साहित्यातील आशयाचा वास्तव जीवनाशी
जोडण्यावर भर देते. विषय, उद्देश आणि
शिकण्याचे परिणाम यांच्यातील सुसंगती निर्माण करून ज्ञानाची व्यवहारातील उपयोगिता वाचकाला स्पष्ट करते. जीवनाशी
आणि व्यवहाराशी जोडलेले अध्ययन साहित्य अध्ययन अधिक सुसंगत आणि उपयोज्य करण्यास
मदत करते.
पाठ्य पुस्तकाची लेखनासाठी ही सूत्रे
वापरली तर पाठपुस्तकाची उपयोजकता वाढून व्यवहार्य शिक्षण मिळू शकेल. ही सूत्र पुस्तक लेखनात उतरली तर शिक्षणं आणि शिकवणं दोन्ही
उद्दिष्ट्पूर्ण होईल करण यातून वर्गात शिकण्याच्या हेतू बद्दलची एक वेगळी सवय
हळूहळू रुजत जाईल :
हे शिकण्याची
माझी तयारी काय ? हे शिकवण्याचा माझा अधिकार काय ?
मी हे का
शिकतोय ? मी हे का शिकवतोय ?
मी हे कस
शिकतोय ? मी हे कसं शिकवतोय?
याचा माझ्या
आयुष्यात काय उपयोग ? याचा विद्यार्थ्यांच्या आणि माझ्या आयुष्यात उपयोग काय ?
यातून पाठ्यपुस्तकं म्हणजे फक्त
माहितीचा संग्रह नसतात म्हणजेच शिकणे म्हणजे माहिती गोळा करणे आणि शिकवणे म्हणजे
माहिती ओतणे नसून शिक्षण म्हणजे स्वतःला शिकण्यासाठी सक्षम करत स्वतःला समजून घेणे
आहे हे स्पष्ट होत जाईल.
पाठ्य पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या भागात
अनुबन्ध चतुष्टयाच्या चार पायाभूत तत्त्वांनुसार
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक पत्र संपादकीय मंडळ लिहू शकेल.
लेखाच्या दुसऱ्या भागात भारतीय
परंपरेतील अभ्यासाच्या पद्धती आणि पाठ्यपुस्तक लेखन-वाचन याबद्दल अधिक जाणून
घेवूया.
– प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Comments
Post a Comment