Skip to main content

महाराष्ट्रधर्म

                                                                     महाराष्ट्रधर्म

१९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी, “कुठून आलात? किती दिवस प्रवास आहे? काय काय पाहिले?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले, “तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का?” आम्ही “हो, रायगड पाहिला आहे,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला.

आम्ही गोंधळलो. “काय झाले?” म्हणून त्यांना  विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा  म्हणाले, “तुमच्या पायांना रायगडाची धूळ लागली आहे. ज्या गडावर शिवरायांचे वास्तव होते, त्या भूमीची माती तुमच्या पायांना लागली आहे. म्हणून त्या मातीला तुमच्या रूपात नमस्कार!”

गप्पांमध्ये ते पुढे म्हणाले, “तुम्हाला मराठी माणसाला याचे महत्त्व लक्षात येणे थोडे अवघड आहे. पण एक असमिया म्हणून मी तुम्हाला सांगतो— आमच्या इथे शिवराय जन्माला आले  असते  तर आम्ही आज  वेगळे असतो आणि आजचा आसाम वेगळा असता. तुमच्या इथे शिवाजी जन्माला आल्याने तुम्ही महाराष्ट्रीय वेगळे आहात. देशाप्रती, समाजाप्रती महाराष्ट्रीयांचा भाव वेगळा असतो आणि तो उपजत असतो. स्वतंत्र लढा असो वा स्वातंत्र्यानंतर समाजासाठी काम करणाऱ्या चळवळी असोत— मग त्या समाजवादी असोत वा हिंदुत्ववादी— त्यांच्यात समाजभाव, राष्ट्रभाव असलेली अनेक उदाहरणे आहेत.”

पुढे ते म्हणाले, “मराठी माणसांबद्दल अनेक तक्रारी करता येतील, शंका घेता येतील; पण त्यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल शंका घेता येणार नाही. कारण शिवभाव म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वराज्य— महाराष्ट्राच्या मातीत आणि पाण्यात उतरलेले आहे; कारण शिवराय तुमच्या इथे जन्माला आले !”

त्यांनी बरेच आपले कौतुक केले असेले तरी; या शिवभावाबद्दल आपण आज  कसे आहोत हा प्रश्न गेल्या वर्षी एका प्रवासात मनात उभा राहिला.

 गेल्या वर्षी मी, श्रेयसदादा आणि प्रणवदादा एका सहाध्याय दिनाची तयारी करण्यासाठी मावळात गेलो होतो. कारी आणि भोर परिसरातील गावांना भेटी देत होतो. उद्देश असा होता की, प्रसंगी समजावून वा विरोध मोडून ज्यांना बरोबर घेत, ज्यांच्या  बरोबर शिवाजी महाराजांनी मावळ भागात स्वराज्यनिर्मितीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली, अशा घराण्यांबद्दल इतिहास वाचताना आपण एखादी ओळ वाचतो— त्या घराण्यांचा परिचय प्रत्यक्ष भेट देवून करून घेता येईल का? त्यांच्या कडील ऐतिहासिक वस्तू पाहता येतील का? त्यांच्या पूर्वजांची कथा त्यांच्या वारसांच्या तोंडून ऐकता येईल का? अशा सहलीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही तो प्रवास केला.

त्या प्रवासात जेधे, खोपडे, बांदल, शिळीमकर अशा अनेक वतनदारांच्या गावांना व वाड्यांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान लोकांशी गप्पा मारताना तीन संवादांनी मनात प्रश्न निर्माण केले.

प्रथम आम्ही कारीला गेलो. जेधे वाडा पाहिला. कान्होजी जेधे यांचे कर्तृत्व त्यांच्या वारसांकडून ऐकले. त्यांच्या घराण्यातील ऐतिहासिक वस्तू पाहिल्या. वाड्याबाहेर आल्यावर गावात पारावर बसलेल्यांकडे चौकशी केली की, “खोपड्यांचे गाव कुठे आहे?” त्यांनी विचारले, “कशासाठी फिरता आहात?” आम्ही शिवचरित्र अभ्यासासाठी आलो आहोत हे सांगितल्यावर त्यांनी विचारले, “तुम्हाला शिवाजी महाराजांना मदत केलेल्या लोकांशी बोलायचे आहे ना? मग खोपड्यांचा काय संबंध? खोपड्यांकडे कशाला जायचे? तिकडे जाऊ नका.” असे म्हणत त्यांनी माहिती द्यायलाच नकार दिला.

नंतर आम्ही आंबवड्यात आलो. तेथे एक झुलता पूल आहे. त्याजवळ कान्होजी जेधे आणि जिवा महाला यांच्या समाध्या आहेत. कान्होजी जेधे यांची समाधी साधी आहे, तर जिवा महाला यांची समाधी त्यांच्या वंशजांनी सुंदर सजवलेली आहे. गप्पा मारताना तेथील एक व्यक्ती सहज म्हणाली, “असं कधी असतं का? मालकाजवळ नोकराची समाधी असते का? कोणाची समाधी मोठी असायला पाहिजे?”

नंतर पिसावऱ्याला गेलो. पावनखिंडीच्या लढाईत बांदल सेनेने पराक्रम गाजवला; त्यांचे एक सेनानी बाजीप्रभू देशपांडे होते. त्या बांदलांच्या समाध्यांचे दर्शन घेतले. तेथील एक स्थानिक आजोबा म्हणाले, “काय उपयोग या सगळ्या पराक्रमाचा? बामणाचं  नाव झालं; आमचं काय?”

दिवसभर हे तीन प्रतिसाद मनात रेंगाळत होते.

एका खोपड्याने स्वार्थापोटी किंवा भीतीपोटी स्वराज्याला विरोध केला असेल; पण पुढील पिढ्यांतील वारस स्वराज्याच्या मोहिमेत वा ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले असतीलच ना? परंतु आपण एका प्रसंगावर शिक्का मारून संपूर्ण घराण्याकडे तसचं  पाहत राहतो.

कान्होजी आणि जिवा महाला प्रतापगडच्या लढाईत एकत्र लढले. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” असे आपण म्हणतो; पण वतनदाराच्या वारसाला आपल्या प्रजेतला जिवा इतका मोठा आहे याचा अभिमान वाटण्याऐवजी “मालकाजवळ नोकराची समाधी कशी?” असा प्रश्न पडतो.

पावनखिंडीनंतरच्या दरबारात स्वतः महाराजांनी बांदलांना मानाचे पान दिले. खरंतर  बाजीप्रभूंचे नाव झाले म्हणजेच बांदलांचे नाव झाले. तरीही “बामणाचं नाव झालं; आमचं नाही,” अशी खंत होती.

आज महाराष्ट्राच्या पराक्रमाबद्दल आपल्या मनात दर्शनी अभिमान असला, आपण घोषणा देत असलो तरी मनामनात नाराजी, रोष, आक्रोश दडलेला आहे.

ज्या शिवाजी महाराजांच्या कृतीवरून समर्थांनी “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” हा मंत्र दिला, तोच महाराष्ट्र आज छोट्या अस्मितांच्या अभिमानात अडकून मूळ महाराष्ट्रधर्माचे सूत्र विसरत आहे का! अशी परिस्थिती आहे. 

आजची खरी परीक्षा घोषणांची; शक्ती प्रदर्शनाची नाही, तर अंतर्मनातील महाराष्ट्रधर्म जागा ठेवण्याची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र मेळवून श्रींचे राज्य निर्माण केले. त्या महाराष्ट्रधर्माच्या जोरावर आपण औरंगजेबाशी व त्याच्या वारसदारांशी घराघरांत, दारादारांत लढलो. 

आज आसाममधील फालूदांनी म्हटल्याप्रमाणे आपल्यातील महाराष्ट्रीय भाव— म्हणजेच महाराष्ट्रधर्म— पुन्हा वाढवण्याचा संकल्प करूया. कारण आजही भारतभरातील अनेक फालूदा महाराष्ट्राकडे राष्ट्रधर्माच्या शिवसूत्रावर आधारित जिवंत आदर्श म्हणून पाहत आहेत, कारण आमच्या मातीत छत्रपती शिवराय जन्मले.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।

सगट स्वकीयांचा जिव्हाळा। सोडु नये।।

धर्मासाठी झुंजावे। झुंजोनी अवघ्यासी मारावें।

मारितां मारितां घ्यावें। राज्य आपुलें।।

आधी गाजवावे तडाखे। तरिच भूमंडळ धाके।

हे न करिता धक्के। राज्यास होती।।

धटासी आणावा धट। उद्धटासी उद्धट।

खटनटासी खटनट। सामर्थ्य करीं।।

देशद्रोही तितुके कुत्ते। मारोनि घालावे परते।

देवदास पावती फत्ते। यदर्थी संशयो नाही।।

आहे तितुके जतन करावें। पुढे आणिक मेळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें। जिकडे तिकडे।।

                                                समर्थ रामदास स्वामी





Comments

  1. समर्पक, महापुरुषांची विभागणी जी केली जाते, ते पाहिले की वाईट वाटते. या निमित्ताने जो समारोप केलेला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा प्रयत्न करूया...

    ReplyDelete
  2. Dr. Nandkishor BagulFebruary 19, 2026 at 4:39 PM

    समर्पक, महापुरुषांची विभागणी जी केली जाते, ते पाहिले की वाईट वाटते. या निमित्ताने जो समारोप केलेला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा प्रयत्न करूया...

    ReplyDelete
  3. महाराष्ट्र धर्म वाढवावे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

RIWATCH IKS Lokvidya

   This video is based on a part of plenary talk delivered by me at RIWATCH, Arunachal Pradesh, during an international conference Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses.  Drawing reflections based on my limited travel experiences from the North-East, it explores Bhartiya Jnana Parampara i.e Indian Knowledge Systems (IKS) as living educational traditions and reflects on how community wisdom and Lokavidyā can enrich contemporary education.