Skip to main content

ज्ञान वारशाचा पुनर्शोध आणि भारताचे आत्मभान

ज्ञान वारशाचा पुनर्शोध आणि भारताचे आत्मभान

काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका शिक्षकाची प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी आज लिहित आहे. त्यांच्या वर्गातील एका साध्या प्रसंगाला त्यांनी ज्या संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला, त्या एका घटनेमुळे त्यांच्या पुढील आयुष्याने एका विलक्षण बौद्धिक प्रवासाचे रूप घेतले. ही कथा फ्रान्समधील गणित शिक्षक आणि इतिहासकार जॉर्ज इफ्रा यांची आहे. त्यांचे कार्य आपल्याला शिक्षण, जिज्ञासा आणि संशोधनाच्या खऱ्या भावनेची जाणीव करून देते.

१९७० च्या दशकात जॉर्ज इफ्रा फ्रान्समध्ये एका प्राथमिक शाळेत  गणित शिकवत होते. अनेक संवेदनशील शिक्षकांप्रमाणेच त्यांनाही वाटत होते की, विद्यार्थ्यांनी भीती, संकोच किंवा लाज न बाळगता प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांचा विश्वास होता की कोणताही प्रश्न छोटा नसतो. एकदा वर्गातील चर्चेदरम्यान एका विद्यार्थ्याने त्यांना साधासा प्रश्न विचारला—संख्या कुठून आल्या? त्यांचा शोध कोणी लावला? आपण त्या अशाच प्रकारे का लिहितो?” यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही अनेक प्रश्न विचारले— १, २ आणि ३ सारखे अंक असेच का लिहिले जातात? प्राचीन संस्कृतींमध्येही आज वापरतो त्याच संख्या वापरल्या जात होत्या का? शून्याचा शोध कोणी लावला? कागद आणि कॅल्क्युलेटर येण्यापूर्वी लोक मोजमाप आणि गणना कशी करत होते? हे प्रश्न परीक्षेतील नव्हते; तर ते विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेतून निर्माण झालेले प्रश्न होते.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी जॉर्ज इफ्रा यांनी ते प्रश्न अत्यंत गांभीर्याने ऐकले. गणिताचे शिक्षक असूनही त्यांना जाणवले की, संख्यांचा इतिहास त्यांनाही पूर्णपणे माहीत नाही. तोच क्षण त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. त्यानंतर त्यांनी जवळजवळ दहा वर्षे विविध देशांमध्ये प्रवास करून तेथील संस्कृती आणि सभ्यतांमधील गणितीय ज्ञान जाणून घेण्याचा ध्यास घेतला. गणिताच्या विकासाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी हस्तलिखिते, पुरावशेष आणि प्राचीन गणना पद्धतींचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या संशोधनातून गणिताच्या संकल्पनांच्या विकासातील  अनेक संस्कृतींचे योगदान समोर आले; विशेषतः भारताने दिलेला शून्याचा शोध आणि दशमान स्थानमूल्य पद्धतीचे (Decimal Place-Value System) महत्त्व अधोरेखित झाले. अनेक वर्षांच्या अभ्यास आणि संशोधनानंतर त्यांनी आपले निष्कर्ष 'द युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ नंबर्स' (The Universal History of Numbers) या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात संकलित केले.

ही कथा आपणा  शिक्षकांसाठी महत्त्वाची ठरते ती केवळ जॉर्ज इफ्रा यांच्या विद्वत्तेमुळे किंवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे नाही, तर शिक्षक म्हणून त्यांच्याकडे असलेल्या दृष्टिकोनामुळे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेकडे दुर्लक्ष केले नाही, पटकन उत्तर देण्याची घाई केली नाही, की विचारलेल्या प्रश्नांना “साधे” म्हणून कमी लेखत त्यांची बोळवण केली नाही. उलट, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी स्वतःची समज वाढवण्याची एक सुवर्णसंधी मानले. त्यांचा हा प्रवास आपल्याला स्मरण करून देतो की, शिक्षण म्हणजे केवळ माहितीचे हस्तांतरण नाही. खरी शिक्षणप्रक्रिया तिथून सुरू होते जिथे जिज्ञासेचा सन्मान केला जातो. अनेकदा वरकरणी साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनीच इतिहासातील सर्वात गहन शोधांचे दरवाजे उघडले आहेत.

नुकत्याच  प्रकाशित झालेल्या  इयत्ता नववी गणिताच्या  पाठ्यपुस्तकात  एनईपी २०२० (NEP 2020) वर आधारित 'भारतीय ज्ञान प्रणाली' (IKS) समन्वित आहे. पुस्तकात गणिती संकल्पनांबरोबर भारतातील  गणिताचा इतिहास आणि उत्क्रांतीच्या अनुषंगाने गणिताचा परिचय करून दिला आहे.  भारताच्या  सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या शिक्षणाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल आहे. या पुस्तकात गणितीय संकल्पनांच्या संदर्भातील भारतीय बौद्धिक परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली आहे. तसेच बौधायन, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट आणि संगमग्रामचे माधव यांसारख्या महान विद्वानांचे योगदान अधोरेखित केले आहे. निर्देशांक भूमिती (Coordinate Geometry) आणि दशमान पद्धतीसारखे विषय प्राचीन भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरेशी जोडण्यात आले आहेत. तसेच केरळ गणित परंपरेने कलनशास्त्राशी (Calculus) संबंधित अनंत श्रेणींवर (Infinite Series) केलेल्या अग्रणी कार्याचाही परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला आहे.

भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासाचे विस्तारणारे क्षेत्र आणि नवीन शैक्षणिक धोरणात झालेला त्याचा समावेश, या पार्श्वभूमीवर एक भारतीय शिक्षक म्हणून आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण चिंतनात्मक प्रश्न उभा राहतो; ज्याची चर्चा एका उदाहरणाच्या आधारे पुढे केली आहे.

भूमितीतील सर्वात मूलभूत संकल्पनांपैकी काटकोन त्रिकोणाशी निगडीत एक सिद्धांत आज जगभर “पायथागोरस प्रमेय” या नावाने ओळखला जातो. मात्र, आज ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर भारतीय गणितीय परंपरा असे सूचित करते की, काटकोन त्रिकोणाच्या भुजांमधील या संबंधाचे वर्णन बौधायनांच्या शल्बसूत्रांमध्ये पायथागोरसच्या खूप पूर्वीच केले गेले होते. त्यामुळे आज अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वान त्याला “बौधायन–पायथागोरस प्रमेय” असे संबोधतात. सीबीएसईच्या (CBSE) इयत्ता आठवीच्या गणिताच्या पुस्तकातही आता या प्रमेयाची ओळख “बौधायन–पायथागोरस प्रमेय” याच संयुक्त नावाने करून देण्यात आली आहे.

अशा बदलांमुळे अनेकांसमोर एक गंभीर वैचारिक,  शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रश्न उभा राहतो आहे — भारतीयांचे योगदान इतके आधीचे असतानाही, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक पिढ्या फक्त “पायथागोरस प्रमेय” हेच नाव का वापरत राहिल्या? आपण स्वतःच आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेच्या गाभ्यापासून अनभिज्ञ होतो का? आपणच आपल्या ज्ञानपरंपरेला कसे पारखे होत गेलो?  हळूहळू आपण आपल्या बौद्धिक वारशावरचा विश्वास कसा गमावून बसलो? की आज आपल्याला आपल्याच ज्ञान परंपरेबद्दल बोलताना एक प्रकारचा संकोच वाटायला लागला!

भारतीय ज्ञानपरंपरेचा (IKS) अभ्यासक्रमात समावेश करण्याचा उद्देश जागतिक ज्ञान नाकारणे वा पुराणातील वानगी उकरून काढणे हा कदापि नाही; तर आपल्याच सांस्कृतिक मुळांशी पुन्हा जोडले जाणे, ज्ञानाबद्दलची बौद्धिक प्रामाणिकता जपणे आणि सत्याधारित ज्ञानावर विश्वास निर्माण करणे हा आहे. जर प्राचीन भारताने मानवजातीला महत्त्वपूर्ण ज्ञान दिले असेल, तर आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा संतुलित, वस्तुनिष्ठ परिचय करून द्यायला हवा. जॉर्ज इफ्रा यांनी ज्या प्रकारे जिज्ञासा आणि संशोधनाच्या भावनेतून संख्यांचा इतिहास समजून घेतला, त्याचप्रमाणे आज भारतीय शिक्षकांनीही ज्ञानाच्या जागतिक वारशाबरोबरच भारताच्या विज्ञान,गणितीय, वैद्यकीय, धातू विज्ञान, अभियांत्रिकी, कला, तत्त्वज्ञान अशा  विविध  ज्ञान वारशाचा संशोधनपूर्वक व प्रामाणिकपणे पुनर्शोध घेण्याची गरज आहे.

जेव्हा आपण “बौधायन–पायथागोरस प्रमेय” असे म्हणतो, तेव्हा आपण फक्त नाव बदलत नाही, तर मानवी ज्ञानाच्या अखंड प्रवाहाला मान्यता देत गणिताच्या जागतिक इतिहासात भारताचे स्थान पुनः प्रतिष्ठित करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते की, ते केवळ ज्ञानाचे ग्राहक  नसून एका समृद्ध बौद्धिक परंपरेचे वारसदार आहेत.

दुर्दैवाने, आजवर आपण सर्व शोध केवळ पाश्चात्य देशांतच लागले, असेच शिकत आलो आहोत. आपल्या शिक्षणपद्धतीने विद्यार्थ्यांना भारताच्या ज्ञानवारशाचा, पराक्रमाचा किंवा भारतीय तत्त्वज्ञानाचा म्हणावा तसा परिचय करून दिलाच नाही. परिणामी, 'आपण पराभूत, अज्ञानी, दरिद्री, बुरसटलेले  आणि मूल्यहीन आहोत' असा एक न्यूनगंड अनेक भारतीयांच्या मनात खोलवर रुजला गेला. त्यामुळेच जुन्या काळाबद्दल बोलताना किंवा व्यक्त होताना अनेकांच्या मनात शंका आणि संकोच असतो.  झालेल्या चुकांबद्दल केवळ नकारात्मक सूर लावणे किंवा खंत व्यक्त करणे हा यावरचा उपाय नाही, तर त्या चुका स्वीकारून, त्यांची जाण ठेवत योग्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगून स्वतःची नवी अस्मिता कशी निर्माण करायची; स्वप्रतिमा कशी जोपासायची, हा खरा प्रश्न आहे.

हा प्रश्न निव्वळ माहितीचा नाही, तर दृष्टिकोनाचा आहे. भारत-चीन युद्धाची कथा आपण 'पराभव' म्हणून मांडायची की सैनिकांच्या 'पराक्रमाची गाथा' म्हणून? पानिपतच्या लढाईच्या दिवसाला केवळ 'पराभवाचा दिवस' म्हणायचे की 'शौर्य दिवस' म्हणून गौरवायचे? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची 'हत्या' केली की त्याचा 'वध' केला? वॉस्को द गामाने 'भारताचा शोध' लावला म्हणायचे की तो  'भारताच्या किनाऱ्यावर' पोहोचला असे मांडायचे?

शब्दयोजना दिसायला खूप छोट्या असतात, पण त्या संपूर्ण कथनाचा रोख आणि उद्दिष्ट बदलून टाकतात. त्यामुळे कामातील सहभाग आणि त्याचे परिणाम सांगणारे आकलनच बदलते. आपण कोणते कथन (Narrative) ऐकतो, त्यानुसारच आपला दृष्टिकोन तयार होत असतो. काय आणि कसे कथन केले जाते, यावरच संपूर्ण समाजमन आणि समाजभान आकाराला येत असते.

"जंगलाची गोष्ट जंगलातील प्राणी सांगणार का जंगलाचा राजा सांगणार की जंगलातील शिकारी!” कारण यावर कथेचा नायक ठरतो!

भारताचे आत्मभान जर खऱ्या अर्थाने जागे करायचे असेल, तर काळाच्या उदरात हरवलेली ज्ञानसूत्रे शोधणे आज अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या सर्व कालखंडांतील भारताची खरी अभिमानस्थळे विद्यार्थ्यांसमोर योग्य पद्धतीने मांडली पाहिजेत.

भारतीय समाजाने आपली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक गाथा जगासमोर कशी मांडायची, हे आपण भारतीयांनीच ठरवायचे आहे! “बौधायन–पायथागोरस प्रमेय” सारखा बदल हे केवळ एक तात्कालिक 'फॅड' (Fad) आहे की भारतीयांच्या  दृष्टिकोनात सकारात्मक बदल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न, याचे उत्तर आपणच आपल्या कृतीतून द्यायचे आहे.

कदाचित आजच्या शिक्षकांसाठी भारतीय ज्ञान परंपरा हाच सर्वात मोठा संदेश देते की, त्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील माहितीचे कोरडे प्रसारक न बनता ज्ञानाचे सक्रिय शोधक व्हावे. शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की, विद्यार्थ्यांना भारताने गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, स्थापत्य, भाषा, कला आणि मानवी विचारविश्वाला दिलेल्या महान तत्त्वज्ञानात्मक योगदानांची जाणीव करून देणे  आणि त्यांच्यात या वारशाविषयी  आत्मविश्वास निर्माण करणे.

भारतीय ज्ञानपरंपरा ही प्रश्न, संवाद, निरीक्षण, प्रयोग आणि सतत चिंतन यांच्या माध्यमातूनच विकसित झाली आहे.  भारतीय ज्ञान  परंपरेचा शिक्षणात समावेश करताना, आपल्या समोर हे उद्दिष्ट स्पष्ट हवे कि आपल्याला वर्गावर्गांमध्ये प्रश्न, संवाद, निरीक्षण, प्रयोग आणि सतत चिंतन या परंपरेची पुनर्स्थापना करायची आहे.

जॉर्ज इफ्रा यांची कथा आपल्याला हेच सांगते की, शिक्षक जेव्हा स्वतः निरंतर शिकत राहतात, तेव्हाच ज्ञानाचा खरा विकास होतो. चला, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आपण अशा वर्गांची निर्मिती करूया जिथे  जिज्ञासेचे स्वागत होईल, प्रश्नांचा सन्मान केला जाईल आणि शिक्षण हे केवळ माहितीचे हस्तांतरण करणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे साधन न राहता शोध, चिंतन आणि आत्मबोधाचा एक सुंदर प्रवास बनेल.

प्रशांत दिवेकर

 ज्ञान प्रबोधिनी, पुणे



Comments

  1. Deep study and inspirational

    ReplyDelete
  2. Dr. Nandkishor BagulJune 2, 2026 at 10:47 PM

    प्रशांतजी, निश्चितपणे भारतीय ज्ञान परंपरेची माहिती शिक्षकांनी करून घेतल्यास विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचवली जाऊ शकते. त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरांची ओळख आपल्या माध्यमातून झाली. आता ती साधने उपलब्ध झाली पाहिजेत.

    ReplyDelete
  3. विचार करायला लावणारा लेख.. खूप छान

    ReplyDelete
  4. चिंतनीय लेख

    ReplyDelete
  5. सर मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. सध्याच्या AI च्या काळात तुझे लेखन खूप fresh आणि खरे वाटते... विषय खूप चांगला आणि महत्त्वाचा आहे... विचार करायला लावणारा आहे.

    ReplyDelete
  7. वा सर शिक्षकांना फारच छान संदेश आपण दिला आहे .

    ReplyDelete
  8. खूप माहिती पूर्ण लेख. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्यापर्यंत काय पोहोचवायचे आहे याचा किती खोलात जाऊन विचार आणि कृती करायला हवी हे लक्षात आहे. खूप खूप धन्यवाद सर 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...