वाई गाव आणि गाढवांची विशेष आठवण आहे. हॉही... हॉही.. करत पळणाऱ्या गाढवाची
लाथ खायची का गटारात पडायचे अशा संभ्रमात
अनेकदा रस्त्यात गटाराच्याकडेला अंग चोरून उभे राहावे लागायचे.
आमचे घर नदीच्या कडेला होते त्यामुळे नदीतून वाळू काढून,
ती चाळून मग गाढवांवर लादून गावात घेवून जाणारे वाळूवाले हे तर खिडकीच्या चौकटीतून
दिसणारे रोजचेच दृश्य होते.
या सगळ्याची आठवण झाली कारण दोन दिवस संस्कृती संवर्धन
मंडळ, सगरोळी, जि. नांदेड याच्या ‘डाँकेश्वर’ केंद्रातील अतिथी गृहात निवासाला
होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या परिसरात गाढवांचे अभयक्षेत्र म्हणून ‘धर्मा
गाढवांचे अभयारण्य (Dharma Donkey Santuary )’ उपक्रम राबवला जातो.
आजही गावांमध्ये गाढव शेतमाल, बांधकाम साहित्य इत्यादींच्या वाहतुकीसाठी उपयोगात असलेला प्रमुख प्राणी
आहे. तरी देखील जगात जवळजवळ सर्वत्र, गाढव हा सर्वात दुर्लक्षित प्राणी आहे. गाढव सर्वात उपयुक्त प्राणी असूनही, त्यांचा मालक पाळीव जनावरांप्रमाणे त्यांचा सांभाळ करत नाहीत. त्यांचा आहार, त्यांचे आरोग्य यांची योग्य काळजी
घेवून त्यांची निगा राखत नाही. अनेकदा त्यांचा
गैरवापर देखील केला जातो. गाढवांच्या दुर्दशेचा विचार करून "धर्मा गाढव
अभयारण्य" स्थापन करण्यात आले. गाढव अभयारण्य प्रकल्पाची सुरुवात श्री.रतिलाल
आणि मुळच्या अमेरिकन असलेल्या श्रीमती बोनी शाह यांच्या कल्पनेतून झाली. १२
जानेवारी २००० रोजी पर्यावरणवादी
कार्यकर्त्या सुश्री मेनका गाधी यांच्या शुभ हस्ते या अभयारण्याचे उद्घाटन झाले.
गाढवांसाठीच्या या अभयक्षेत्रात शिशु, वृद्ध, जखमी, गर्भवती आणि आजारी गाढवांना निवारा आणि वैद्यकीय सेवा
दिली जात होती. गाढवांच्या मालकांसाठी गाढवांचे आरोग्य, आहार, रोग याबद्दल
जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम योजले जात. गाढवांसाठी लसीकरणाची मोहीम
योजण्यात येत असे.
एसएसएम ब्रूक हॉस्पिटल, यूके आणि ब्लू क्रॉस ऑफ हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षातून दोनदा
धर्मा गाढव अभयक्षेत्रामध्ये लसीकरण आणि जंतनाशक कार्यक्रम आयोजित केले जात असत.
सगरोळी, मुखेड, नायगाव, अतकली आणि कोंडलवाडी येथे लसीकरण शिबीर योजली जात. वर्षातून दोनदा आयोजित
करण्यात येणाऱ्या या आरोग्य छावण्यांमध्ये सुमारे १०,००० गाढवांवर
उपचार आणि लसीकरण केले जात असे
आज धर्मा गाढव अभयारण्यात गाढवांसाठी निवारा उपलब्ध नसला तरी संस्कृती
संवर्धन मंडळाद्वारे गाढवांच्या आरोग्य तपासणीची शिबिरे योजली जातात. अशा शिबिरात लसीकरणासह, गाढवांच्या आजारांचे निदान, उपचार आणि
शस्त्रक्रिया देखील करण्यात येतात.
श्रीमती बोनी शहा जन्माने परदेशी होत्या पण या कामासाठी
त्या सगरोळी राहायला येत असतं. समाजात गाढवे आणि इतर प्राण्यांसाठी करुणेची भावना
निर्माण करण्यासाठी आणि लोकांना प्राण्यांविषयी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी त्या
शिबिरे घेत असतं. गाढवांची चित्र असलेली खुंटाळी, भित्तीचित्रे, कानातील डूल अशा
अनेक गोष्टी त्यांनी प्रचारासाठी तयार करून घेतल्या होत्या. लसीकरण कार्यक्रमाच्या
दिवशी लसीकरणासाठी आलेल्या गाढवांना गरम गरम पाण्याने अंघोळ करण्याचे भाग्य देखील
मिळत असे.
एकनाथ महाराजांची तहानलेल्या गाढवाला पाणी पाजल्याची गोष्ट ऐकली होती पण गाढवाची सेवा करणाऱ्यांची गोष्ट पहिल्यांदाच ऐकायला, पहायला मिळाली. नाहीतर माणसांच्या लेखी वाहतुकीचे काम करून घेतल्यावर गाढव म्हणजे उकिरडा फुंकणारा प्राणी !
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Comments
Post a Comment