Skip to main content

बौद्धिक विकसनासाठी वाचन

 बौद्धिक विकसनासाठी वाचन

‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!

    असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते.

वाचकाचा  पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन  पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात.

चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,  शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,  समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्या वाचनाच्या हेतूनुसार मजकुराचा अर्थ लावता येणे हे बोधनाचे टप्पे आहे. 

कशासाठी वाचायचे आणि

वाचताना; वाचून झाल्यावर मी काय केले तर मला वाचनाचा  उपयोग होईल?

वाचायचे कशासाठी ? वाचनामुळे वाचक  ज्ञानसमृद्ध होतो. त्याच बरोबर वाचक काय वाचतो म्हणजेच कोणत्या प्रकारचे साहित्य वाचतो, कोणत्या लेखकाचे साहित्य वाचतो यानुसार त्याच्या जाणीवा समृद्ध होत वाचकाची अनुभवसमृद्धी वाढते.  कशासाठी  वाचायचे ? याचे उत्तर आहे बौद्धिक विकसनासाठी, जाणीव विस्तारण्यासाठी आणि अनुभव समृद्धीसाठी.

आपण कायकाय वाचतो; तर कथा, कविता,कादंबरी,प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, टीका, समीक्षा अशी मोठी यादी करता येईल. त्यातील एक कथा घेतली तर लघुकथा, विज्ञानकथा,  परीकथा, दंतकथा, पुरणकथा, बोधकथा अशी त्यातील उपप्रकारांची यादी करता येईल.  लेखकाला काय पोहोचवायचे आहे आणि लेखकाची प्रतिभा यानुसार लेखक साहित्यप्रकार माध्यम म्हणून निश्चित करतो.

वाचनातून बौद्धिक विकसन करायचे असेल, आपल्या जाणीवेचा विस्तार करत अनुभव समृद्ध व्हायचे असेल प्रथम साहित्यप्रकारानुसार वाचनाचा प्रकार निवडावा लागेल,  जसे मी सूक्ष्म वाचन करणार ( यात वेगावर नियंत्रण असते आणि मजकुराचा अर्थ आणि तपशील समजून घेण्यावर भर असतो, वाचताना महत्त्वाचा भाग नोंदवला जातो किंवा अधोरेखित केला जातो ) का चिकित्सक वाचन करणार ( यात वाचताना वाचक मजकुरातील गृहीतके लक्षात घेतो, आशयातील मुद्द्यांची क्रमवारी लावत संबंध शोधतो, कारण-परिणाम; योग्य-अयोग्य याची संगती लावत लेखाचा आशय स्वीकारतो) का रसग्रहणात्मक वाचन करणार ( यात लेखकाने मांडलेला प्रसंग; विचार यामध्ये वाचक गुंततो आणि आशयाला बुद्धीबरोबर भावनिक प्रतिसाद देतो, वाचक आनंदी –दुःखी होतो आणि असा प्रतिसाद देताना वाचक लेखकाच्या प्रतिभेला दाद देतो ) का कल्पक वाचन करणार ( वाचन करताना वाचक आशयाबद्दल मनात कल्पनाचित्र रेखाटतो , लेखकाने मांडलेल्या कल्पनेपलीकडे जाऊन वाचताना आशयासंदर्भात त्याला स्वतःच्या कल्पना  सुचतात ) हे वाचताना निश्चित करावे लागते.

विद्यार्थ्यांना वाचताना आणि वाचनानंतर

मी अध्यापक म्हणून कोणत्या कृती सुचवू शकेन

की ज्यातून  वाचन करताना त्यांचे बौद्धिक विकसन होऊ शकेल !

कोणकोणत्या बौद्धिक क्षमता विकसित करता येतील

आणि कायकाय केल्यावर त्या विकसित होतील.


      वाचन क्रियेची सुरुवात होते ती शारीरिक क्रियेपासून. वाचकाच्या नजरेची हालचाल, दृष्टीचा आवाका आणि वाचकाची बैठक हे वाचन कौशल्य विकसनात महत्त्वाचे घटक आहेत. अशा क्षमता म्हणजे शरीर-गती कुशलता विषयक बुद्धिमत्ता. यात स्व-हालचालीवर नियंत्रण, वस्तू कौशल्यपूर्ण रीतीने हाताळण्याची क्षमता, कारक कृतीवर नियंत्रण अशा क्षमतांचा विकास महत्त्वाचा आहे.

                शल्य विशारद, नर्तक, खेळाडू, गिर्यारोहक याची चरित्रे वाचताना त्यांनी ज्ञानेंद्रिये; कर्मेंद्रिये यांच्या क्षमता कशा विकसित केल्या याचे मार्ग कळतात. असे वाचन करताना त्यांनी केले तसे करून पाहण्याची, स्वतःच्या क्षमता ताणून पाहण्याची इच्छा निर्माण होते; प्रेरणा जागृत होते.

          याप्रकारच्या क्षमता विकसित होण्यासाठी काही वाचनकृती करून घेता येतील:

·       ज्ञानेंद्रियांच्या क्षमता विकसित होण्यासाठीच्या अभिवचन; नाट्यवाचन यासारख्या कार्यशाळांत सहभागी होणे.

·       गडकिल्ल्यांची वर्णने वाचून  कागद, मातीचा वापर करून त्यांच्या प्रतिकृति तयार करणे.  

·       डोंगर यात्रा, साहस सहलीत सहभागी होणे.

·       कथाकाव्यांवर  नृत्य नाट्य बसवणे



वाचन हे मूळात भाषिक बुद्धिमत्तेशी जोडलेले आहे. शब्दाचा अर्थ लावणे, त्याचा बोधार्थ आणि भावार्थ समजून घेणे, शब्दांच्या उच्चारातील चढउतार व त्यामागचा अर्थ कळणे, भाषेची रचना अर्थात व्याकरण समजणे, बोलताना; आपल्या मनातील विचार-भावना व्यक्त करताना नेमक्या शब्दांची निवड करता येणे अशा अनेक गोष्टी भाषिक बुद्धिमत्तेच्या विकसनाशी निगडीत आहेत. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांची ओळख करून घेताना वाचकाला लेखकामधील भाषिक बुद्धिमत्तेचे दर्शन होत असते.

आधी काव्य समजले पाहिजे, मग अर्थ समजला पाहिजे, मग कवीची कवित्व शक्ती समजली पाहिजे, मग उपहास कळला आणि मग विनोदाचा आस्वाद घेत विनोदाचा अस्सलपणा कळला तरच झेंडूची फुले, उदासबोध समजून घेता येईल.

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाहले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचला असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥

( उदासबोध : मंगेश पाडगावकर )

भाषिक क्षमता आणि समज विकसित करायची असेल तर काही वाचनकृती करून घेता येतील :

·       वाचलेली कथा, कादंबरी याची गोष्ट सांगायला सांगता येईल.

·       त्यावर नाटुकले लिहायला सांगता येईल.

·       शब्दांशी निगडीत खेळ घेता येईल.

·       शब्दांच्या भेंड्या खेळता येतील. 

·       चारोळी, जाहिरातीसाठी घोषवाक्य (स्लोगन) लिहायला सांगता येईल.

·       अपूर्ण कथा पूर्ण करायला सांगता येईल.

     


साहित्य प्रकारातील काव्य या साहित्य प्रकाराला एक अंगभूत लय असते, नाद असतो आणि  गेयता असते. वेगवेगळ्या गीतांचा अभ्यास करताना व्यक्तीची ताल, स्वर , लय ओळखण्याची आणि समजण्याची  क्षमता विकसित होत असते. अशा बौद्धिक क्षमतेच्या विकासनाला संगीत विषयक बुद्धिमत्ता म्हणतात.   

श्राव्यमाध्यमाशी निगडीत या बुद्धिमत्तेच्या पैलुबरोबर दोन वाचन प्रकारांची 

जोड देता देईल: प्रकट वाचन आणि अभिवाचन

शब्दातील; शब्दामागच्या भावना पोचवण्याचे सामर्थ्य संगीतात असल्याने काव्यवाचन, काव्यश्रवण भाषिक आणि सांगीतिक बुद्धिमत्तेच्या विकसनात जोडीने येतात. संगीत विषयक क्षमता विकसित होण्यासाठी काही वाचनकृती करून घेता येतील :

·       कथानकाबद्दल लयबद्ध कविता (रॅप ) लिहिणे.

·       पार्श्वसंगीतासह नाट्यवाचन ऐकणे.

·       अभिवाचनाला पार्श्वसंगीत देणे.  



प्रभाकर पेंढारकरांचे रारंगढांग वाचल्यावर वेगळी जिद्द मनात घेऊन जीवनाला सामोरे जाणार, वेगळे भाव विश्व असणार कथानायक मनात रेंगाळत राहतो. पण हे  रेंगाळणे  तो हिमालय, त्याची ऊंची, तो ढांग, भूस्खलन आणि ती अपघाताची जागा याचे मनःचित्र वाचक कसे रेखाटतो यावर अवलंबून असते. 

दिशाज्ञान, अवकाश आणि त्रिमीतिय संवेदना याबद्दलचे आकलन म्हणजे अवकाशविषयक बुद्धिमत्ता. एखादे प्रवास वर्णन, ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना वाचकाच्या डोळ्यासमोर त्या मार्गाचे दृश्यचित्र म्हणजेच  नकाशा तयार होत असतो. एखाद्या चित्रकाराने, अभियंत्याने त्याच्या आत्मचरित्रात चित्र निर्मिती, वास्तुनिर्मिती यांचे केलेले वर्णन वाचत असताना त्याने त्याला उपलब्ध असलेला कॅनवास, उपलब्ध असलेली जागा तो कशी वापरत गेला याचे वाचक मनाच्या अवकाशात चित्र निर्माण करत असतो.

याप्रकारच्या क्षमता विकसित होण्यासाठी काही वाचनकृती करून घेता येतील:

·       प्रवास वर्णन, खजिना शोधकथा, ऐतिहासिक कादंबरी वाचताना त्याचा नकाशा तयार करणे.  

·       नकाशाचा वापर करून वाचलेली युद्धकथा सांगणे.

·       नाटक वाचताना त्यातील प्रसंगांची चित्र-चौकटीत  रेखाटणे करणे.

·       चित्रवर्णन; शिल्पवर्णन वाचणे  आणि त्याप्रमाणे चित्र रेखाटणे; शिल्प तयार करणे.  

·       वास्तूचे वर्णन वाचून प्रमाणबद्ध प्रतिकृती तयार करणे.



विज्ञान कथा वाचताना विज्ञानातील संकल्पना समजावी लागते, त्या संकल्पनेवर  आधारित मांडलेली विज्ञानातील भविष्यवेधी कल्पना तर्कविचारांनी डोळ्यासमोर आणावी लागते, कथाबीजातील मानवी जीवन समजावे लागते तरच विज्ञानकथांचा आनंद घेता येतो.  

सर आर्थर कॉनन डॉयलयांच्या  शेरलॅाक होम्सच्या कथा, शरदिंदू बंडोपाध्याय यांच्या ब्योमकेश बक्शीच्या कथा अशा सत्यान्वेशी कथा वाचताना वाचक त्याची निरीक्षणशक्ती, विश्लेषण-संश्लेषण क्षमता, तर्कविचार क्षमता यांचे रसग्रहण करायला शिकतो. तार्किक विचार करण्याची आणि  समस्या सोडविण्याची क्षमता म्हणने तार्किक गणितीय बुद्धिमत्ता वाचनातून विकसित करण्यासाठी गणित, विज्ञान आणि समस्या परिहार असा आशय असलेले साहित्य वाचनासाठी देता येईल.

विज्ञान कथा, सत्यान्वेषण कथा, वैज्ञानिक; संशोधकांची चरित्र, संशोधनाच्या कथा, समीक्षा साहित्य  वाचनासाठी वाचनासाठी देऊन  तार्किक गणितीय बुद्धिमत्तेचे रसग्रहण करायला शिकता येईल. 

वाचनातून तार्किक गणितीय बुद्धिमत्ता विकसित करायची असेल तर काही वाचनकृती करून घेता येतील :

·       एकाच वृत्तातील कविता ओळखता येणे.

·       दोन भिन्न कथा;त्यातील पात्रे; कथानक इत्यादींची तुलना करून त्यातील साधर्म्य शोधणे.

·       एखाद्या निबंधातील लेखकाची मते आणि मजकुरातील तथ्ये वेगळी करणे.

·       एकच घटनेबद्दल दोन वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेल्या माहितील संगती-विसंगती; कालौघात गहाळ झालेली माहिती शोधणे.



गो. नी. दांडेकर लिखित माचीवरला बुधा वेगवेगळ्या वेळी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर परतपरत वाचताना दरवेळी त्यातील वेगळ्याच गोष्टी भावल्या. कथेची ओळख झाल्यावर परत एकदा पुस्तक वाचताना लक्षात आले, अरे !  यात बऱ्याच वनस्पतींची नावे परिसराचे वर्णन करताना आली आहेत आणि यादी करायला घेतली तर शे-सव्वाशे नावांची यादी झाली आणि त्यावेळी लेखकाची  निसर्गाबद्दलची जाण भावून गेली.

कोणती कथा, प्रसंग असो  त्या प्रसंगातील व्यक्तींचे नातेसंबंध लेखक  कसे उलगडतो हे साहित्यात महत्त्वाचे असते पण साहित्य ऊंची केव्हा गाठते जेव्हा लेखक ती कथा-तो प्रसंग ज्या परिसरात घडतो त्याचे नेमके वर्णन करू शकतो आणि त्याच्याशी व्यक्तीचे भावविश्व जोडू शकतो. .

परिसरातील घटक, त्यांच्यातील सहसंबंध असे निसर्गात सापडणारे आकृतिबंध ओळखण्याची, ते समजून त्याचा वापर करण्याची क्षमता म्हणजे निसर्गात्मक बुद्धिमत्ता.

 शेतकरी जीवशास्त्रज्ञ, निसर्ग अभ्यासक, भटके पर्यटक, शिकारी यांची चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचताना त्यांचे झपाटलेपण, जमीन-हवामान-वनस्पती-प्राणी-पक्षी-माणूस  एकूणच  निसर्ग पाहण्यासाठी त्यांची निरीक्षणशक्ती, त्यातील सहसंबंधांचे दर्शन होण्यासाठीचा डोळसपणा, निसर्गाबद्दलची आस्था आणि पर्यावरणदृष्टी यांचे दर्शन होते. आज शहरीकरण, यंत्राधारित आधुनिक जीवनशैलीत निसर्गात्मक बुद्धिमत्ता जोपासणे आणि विकसित करणे हे एक आव्हान आहे. 

निसर्ग  आणि निसर्ग-माणूस यांच्यातील सहसंबंध उलगडण्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी काही वाचनकृती करून घेता येतील :

·       गो.नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली, श्रीकांत इंगळहळ्ळीकर, कृष्णमेघ कुंटे, मिलिंद वाटवे, जिम कॉर्बेट,मिलिंद बोकील यांसारख्या लेखकांची पुस्तके वाचणे .

·       दोन कथा- कादंबऱ्यामधील परिसराच्या वर्णनांची तुलना करणे.

·       कथेतील परिसराचा; निसर्गाचा कथेतील पात्रांच्या आहार, विहार , भाषा , राहणीमान, दैनंदिन जीवन यावर काय परिणाम झाला असा तुलनात्मक अभ्यास करणे.

·       कथेवर चित्रमालिका काढणे.

·       कथा घडली त्याठिकाणी क्षेत्रभेटी करणे.

·       दुर्गा भागवत यांच्या  ऋतूचक्र, निसर्गोत्सव या  पुस्तकातून त्यात्या ऋतूमध्ये काय पाहायचे याची निरीक्षण सूची करून ऋतूकाळात छायाचित्रे घेत निरीक्षण नोंदी ठेवणे.



एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक ......

........ पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक

त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

या सारखे काव्य समजून घ्यायचे असेल तर आधी भाषिक अर्थ समजावा लागतो, मग तर्कबुद्धीला त्यातील रूपक सापडावे लागते, एकदा का रूपक सापडले की वाचक स्वतःच्या जीवनाशी ते किती जोडू शकतो, स्वतःच्या अंतःकरणात किती डोकावू शकतो  यावर वाचकाच्या मनात त्या रूपक काव्याचा अर्थ फुलणे अवलंबून राहते.

माचीवरला बुधा, जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल सारख्या कथांची समज वाचक कथाबीजाचा आधार घेत स्वतःच्या भावविश्वात किती डोकावून पाहू शकतो यावर अवलंबून असते. असे वाचन करताना वाचकाला स्वतःचा शोध लागेल अशी ताकत अशा साहित्याच्या वाचनात आहे.

याप्रकारच्या वाचनातून स्व-ज्ञानात्मक बुद्धिमत्ता विकसित होते. स्वतःच्या भावना, इच्छा, प्रेरणा यांचे विकसन म्हणजे स्व-ज्ञानात्मक बुद्धिमत्तेचा विकास करणे.

वाचनातून या प्रकारची क्षमता विकसित करायची असेल तर काही वाचनकृती करून घेता येतील : 

·      वाचन करताना कथेतील एखादे पात्र निवडा आणि तुम्ही त्या व्यक्तीशी का आणि कसे  संबंधित आहात ते नोंदवा.

·      चरित्र वाचत असताना चरित्रनायकाने परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला,  मी कसा दिला असता, एखाद्या प्रसंगात मी कसा वागलो असतो असा विचार नोंदवा.  

·      कथेतील पात्रांशी; कथा ज्या ठिकाणी घडली त्या स्थानाशी मौन-संवाद करणे.  

·      वाचत असताना स्वतःचे विचार, प्रतिसाद यांच्या नोदी करणे.

 अशा कृतिकार्यातून स्व-ज्ञानात्मक जाणीवेचा विस्तार होत जाईल.     


स्वतःला जाणून घेणे याबरोबर दुसऱ्याला समजून घेणे हे पण महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या  व्यक्तीची आत्मचरित्रे वाचताना मला त्या क्षेत्राची, त्या समाजाची, त्यांच्या अनुभव आणि भावविश्वाची ओळख होते.

माझे वर्तन माझ्या अनुभव आणि भावविश्वावर निश्चित होत असते. एखाद्या बरोबरचे माझे वागणे मला त्याची किती ओळख आहे यावर अवलंबून असते. असे दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करण्याची, त्याच्या बरोबर नातेसंबंध निर्माण करण्याची क्षमता म्हणजे आंतरव्यक्तिक संबंध विषयक बुद्धिमत्ता.

इतरांची परिस्थिती, भावस्थिती, इच्छा, आकांक्षा, प्रेरणा समजून घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी गटात सामूहिक वाचन व चर्चा उपयोगी पडते. अशा चर्चेत दुसऱ्याचे विचार-मते ऐकून घ्यायची सवय लागते.

·       सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारे निबंध वाचून त्यावर गटचर्चा करणे.

·       एखादे आत्मवृत्त निवडून त्याचे वाचन करणे जसे आनंद यादवांचे  झोंबी वाचणे.  

·       वाचनानंतर व्यक्तिपरिचय मुलाखत घेणे जसे झोंबी वाचल्यावर एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घेणे.

·       डोंगर यात्रेला गेलो असताना गावातील शाळेला भेट देऊन त्यांच्याशी गप्पा मारणे.  

अशी कृतीकार्ये या प्रकारची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी उपयोगी ठरतील. अशा वाचन-कृती कार्यांनंतर ओल्या दुष्काळाच्या बातमीला वाचन केलेल्या व वाचन न केलेल्या व्यक्तीचा प्रतिसाद वेगवेगळा असेल.   



लेखन हे लेखकाची अभिव्यक्ती असते. लेखकाला माहिती पोचवायची आहे, विचार पोचवायचे आहेत का कल्पना पोचावायच्या आहेत यावर त्याचे अभिव्यक्तीचे माध्यम निश्चित होत असते. लेखकाचे विचार, भावना आणि कल्पना वाचकाने समजून घ्यायची असेल तर मोठी बौद्धिक प्रक्रिया वाचकाच्या मेंदूत आणि मनात घडावी लागते. या प्रक्रियांनुरूप वाचकाचा बोधात्मक आणि भावात्मक कोश समृद्ध होत असतो.

नुसते वाचन कर असे न सुचवता, वाचन करताना आणि वाचनानंतर वेगवेगळी कृतीकार्ये देत अध्यापक कोणत्या विचार प्रक्रियांना चालना देऊ शकतात यांवरच विद्यार्थ्याचे बौद्धिक विकसन होत असते आणि अर्थात विद्यार्थ्याच्या वाचनाची गुणवत्ता ठरत असते. वाचन अर्थवाही होण्यासाठी वाचताना आणि वाचल्यानंतर रवंथ करण्यासाठी अशा कोणत्या अभ्यासकृती योजता येतील यासाठी वाचकांच्या  कल्पनांचे स्वागत !!!

                                                                                          प्रशांत दिवेकर    

                                                                                                                           ज्ञान प्रबोधिनी, पुणे



Comments

  1. नमस्कार
    अत्यंत उपयुक्त, खरे मार्गदर्शन होईल, असा हा लेख आहे. सतत डोळ्यासमोर ठेवून वाचन करण्यासाठी प्रेरणा मिळते आहे...

    धन्यवाद प्रशांत दिवेकर सर...!

    ReplyDelete
  2. फारच छान लेख.. कृतीपर सुचवलेल्या गोष्टी उपयुक्त वाटतायत..बुद्धीमत्तेच्या विविध पैलूंबरोबर घातलेली सांगड यामुळे लेखाच्या विषयाला वेगळी उंची आली आहे. अमूक एक व्यक्ती अग्रक्रमाने अमूक एका विषयावरचं पुस्तक वाचते किंवा एकच पुस्तक वेगवेगळ्या स्वभावाच्या ज्याला विशिष्ट बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्ती म्हणून . त्यांना ते जाणीवेच्या वेगवेगळ्या पातळीवर कसं भिडू शकतं ,हे फारच समर्पकपणे उलगडून या लेखात दाखवलेले आहे. अतिशय मुद्देसूद लेख.गोळीबंद मांडणी...
    प्राची परांजपे

    ReplyDelete
  3. समृद्ध वाचनाला तर्क शास्त्र आणि मिवांसा ची जोड मिळाल्याचे समाधान वाटले.

    ReplyDelete
  4. अशीच काही इंग्रजी पुस्तकांची नावे मिळतील का ?

    ReplyDelete
  5. नमस्कार सर
    अभ्यासपूर्ण आणि विशेष म्हणजे multiple intelligence व त्याला अनुरूप पुस्तके त्यातून चालना असा मोठा विचार मांडला आहे. अत्यंत उपयुक्त

    ReplyDelete
  6. अतिशय सखोल चिंतन करून लिहिलेला लेख आहे. माहितीपूर्ण अन् उपयुक्त असा लेख आहे. वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी उपयुक्त लेख प्रत्येक शिक्षकाने वाचावा अन् विद्यार्थ्यांना यावर छान उद्बोधन करता येईल. धन्यवाद प्रशांतजी!🙏🏻🌹👍🏻

    ReplyDelete
  7. सुंदर लेख

    ReplyDelete
  8. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने परत एकदा विविध अंगाने वाचणं व वाचानाशी निगडित असणाऱ्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी सुचविलेले उपक्रम मार्गदर्शक असेच आहेत. धन्यवाद प्रशांतजी 🙏🏻

    ReplyDelete
  9. वाचन प्रवृत्त होण्यासाठी विषय ,पद्धती व परिणाम यांची छान मांडणी. खूप उपयुक्त !!अशी वाचन शैली बहुतांश उद्दिष्ट्ये साध्य करेल.🙏

    ReplyDelete
  10. नेहमीप्रमाणेच सुरेख लेख

    ReplyDelete
  11. खूप छान आणि उपयुक्त!

    ReplyDelete
  12. पूर्वा -------- वाचन कशासाठी करावयाचे आणि वाचनाचे असणारे प्रकार. तसेच एखादे पुस्तक वयाच्विया विध टप्प्यांवर वाचले असता येणारे अनुभव .सर्वच गोष्टींचे अतिशय अभ्यासपूर्ण लेखन .त्यामुळे अधिकाधिक वाचनाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

    ReplyDelete
  13. Aditee Puranik DeshpandeOctober 17, 2023 at 8:16 PM

    Excellent reader yourself sir! खुपच classic references 👌 I will definitely try the map and story activity with my Geog class.
    My suggestion- Esp for Mathematical and Computational thinking is - Model United Nations or Parliament like role play. Children stun you with their observations. 2. Creating a comic strip or graffiti wall from the book series. 3. T shirt painting (it's beautiful) with their favourite characters. and so on...
    Thank you for this wonderful sharing.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam

  Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam Namaste to all. I feel honoured to speak on Indian Knowledge Systems in Education at Samvit Sangam , organized by Samvit Research Foundation. I had the privilege to represent Jnana Prabodhini and speak at Samvit Sangam — a one-day symposium on the integration of Indian Knowledge Systems (IKS) in school education. I’ll keep to the time and share a few key points and practices from Jnana Prabodhini, so we can stay on track with the schedule. In the inaugural session, Anuragji raised important questions regarding the term Indian Knowledge System —its acronym IKS, and whether we ought to replace it with Bhartiya Gyan Parampara . For clarity, I will continue to refer to it as IKS-Parampara . The distinction between “ Indian Knowledge System ” and “Bhartiya Gyan Parampara” is significant. The English term “system” invokes several dimensions: What is the foundation of this system? What are the sources of its knowl...

বন্দে গুৰু পৰম্পৰা

বন্দে গুৰু পৰম্পৰা গুৰু পূৰ্ণিমা মানে জ্ঞান পৰম্পৰাৰ বাহক হোৱাৰ দিন । ইয়াম বিৱস্বতে যোগ প্ৰক্তৱনহম্ভায়ম । বিৱস্বণ মনভে প্ৰাহ মনুৰিক্ষৱকভে ব্ৰেৱীত ।। ( ৪ - ১ ) ( এটি অক্ষয় যোগৰ বিষয়ে মই সূৰ্য দেৱতাক বৰ্ণনা কৰিছো । বিৱস্বণে তেতিয়া মনুক সম্বোধন কৰিলে , আৰু মনুৱে ইক্ষৱাকুক সম্বোধন কৰিলে ) ।           ভাগৱত গীতাত   অৰ্জুনক উপদেশ দিওঁতে ভগৱান শ্ৰীকৃষ্ণই জ্ঞানৰ পৰম্পৰাৰ উদাহৰণ দাঙি ধৰিছে । তেওঁ কয় ,” মই এই অবিনাশী যোগ সূৰ্যক ( বিবাস্বণ ) প্ৰদান কৰিলোঁ , যিয়ে ইয়াক মনুলৈ আগবঢ়াই দিলে । “           ভাৰতীয় পৰম্পৰাত যেতিয়াই নতুন জ্ঞান বা দৰ্শন উপস্থাপন কৰা হয় , তেতিয়াই গুৰুৰ পৰম্পৰাৰ উত্তৰাধিকাৰিকো স্বীকৃতি দিয়া হয় , কাৰণ জ্ঞানৰ বংশ সংৰক্ষণ পাৰ হৈ গ ’ লেহে জ্ঞান বিস্তাৰিত হৈ উঠে ।           জ্ঞান প্ৰবোধিনীয়ে চাৰিজন মহান ব্যক্তিত্ব সমৰ্থ ৰামদাস , স্বামী বিবেকানন্দ আৰু যোগী অৰবিন্দক নিজৰ দূৰদৰ্শী হিচাপে ...

Task Instructions for PBL Guide Teachers : Enriching Skills Required for PBL

  Task Instructions for PBL Guide Teachers Thoughts on Enriching Skills Required for PBL Objective: To enrich the understanding of skill enrichment required for Project-Based Learning (PBL) by developing a comprehensive mind map and writing a short note. Steps: 1.     Review Shared Diagram: Begin by reviewing the diagram that lists a few skills required for project work, which has been shared with you along with activity instructions. 2.     Expand the Skill List: Add to the list of skills required for effective project work. 3.     Develop a Mind Map: Create a new mind map that represents the importance and scope of skill enrichment for PBL, Organize the skills into categories and show their relationships and interdependencies. 4.     Write a Short Note: ·        Based on your mind map, write a short note covering the following points: ·      ...