काश्मीर यात्रा नोंदी, मे १९५८
श्री. स.ना. परांजपे
मुलाखती :
पंडितजी
काश्मीरात
गेल्यावर तेथे हिंदू वस्तीत फिरत फिरत गेलो. जुनी वस्ती संमिश्र आहे. हिंदू व
मुसलमान हे मिळून मिसळून राहातात. तसेच त्यांची देवळे व मशिदी ही त्या मोहल्ल्यात
आहेत. जुनी वस्ती झेलमच्या काठाने आहे.
त्या दिवशी
फिरताना एक श्रीगणपतीचे देवस्थान आढळले. नमस्कार वगैरे केल्यावर आजूबाजूला लक्ष
टाकले तर लोकांना उतरण्यासाठी व प्रवासात वस्ती करण्यासाठी जागा आढळल्या. माझे
सहप्रवासी अनंतराव पाटील हे भारी चौकस गृहस्थ आहेत. त्यांनी तेथील पुजाऱ्यास
पुष्कळच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. इतक्यात त्या देवस्थानचे एक ट्रस्टी तेथे आले व त्यांनी आम्हास ऑफिसात नेले व नंतर
दोन तास आम्ही त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. त्यात एक विद्वान लेखक,
एक सेक्रेटरी आणि तेथील त्याच ट्रस्टमार्फत चालणाऱ्या शाळेचे शिक्षक
यांनी आत्मीयतेने भाग घेतला. त्यातील विद्वान लेखक हे अत्यंत अभ्यासू व
परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास केलेले दिसले. देवस्थान, धर्मशाळा,
धार्मिक शिक्षणसंस्था, एक शाळा या सर्व गोष्टी
चालविणारे ते एकीचे एक संमेलनच जमले. परदेशात आपल्यापैकी भाषेचे अगर जातीचे लोक
भेटले म्हणजे किती आनंद दोघांनीही होतो, तो आनंद सांगता येत
नाही. साधारण विषयावर चर्चा झाली ती अशी.
प्रश्न: : येथे तुम्ही हिंदू थोडे
आहात,
मुसलमानांची तुम्हास भीती वाटत नाही काय ?
उत्तर : विलकूल नाही. मुसलमान हे आज मुसलमान असले तरी पूर्वीचे हिंदूच आहेत व
पिढ्यान् पिढ्या आमचे त्यांचे संबंध दृढ झाले आहेत. मुसलमान म्हणजे क्रूर असे जे
म्हणतात ते काश्मीरी मुसलमानांना लागू पडत नाही. त्यांची वस्ती सरमिसळच आहे..
प्रश्न :
मुसलमानांचे व तुमचे स्नेहसंबंध कसे काय आहेत ?
उत्तर : फारच चांगले आहेत. वस्ती सरमिसळ असल्याने आमचे एकमेकांच्या घरी जाणे येणे
असते.मुसलमानी नोकर आमच्यात कामास असतात. त्याच प्रमाणे हिंदूही त्यांच्यात असतात.
आमच्या देवालयांत मुसलमान येत नाहीत. तसेच स्वयंपाकघरातही ते येत नाहीत व आम्हीही
त्यांच्या गोषात शिरत नाही. पण मशिदीत
जातो. सार्वजनिक हितसंबंध दोघांचेही
एकच असल्याने प्रत्येक मोहल्ल्यातले हिंदु मुसलमान एकमेकांच्या विचाराने वागतात व
एकमेकांस सहकार्य देतात. आम्ही अगदी अल्पसंख्याक असलो तरी आम्हाला त्यांची भीती
वाटत नाही. पुष्कळ वेळा मुसलमानांनी आमचे रक्षण केले आहे. परवा पाकिस्तानने चढाई
केल्यावेळीही त्यांनी आमच्या संरक्षणासाठी तरतूद केली. आम्ही हातात हात घालून उभे
होतो.
प्रश्न :
हे ऐकून आम्ही चकितच झालो. ही परस्परांच्या विश्वासाची सीमा झाली ?
उत्तर: होय, तसे आम्ही विश्वासाने वागतोच. व्यवहारातही तीच तऱ्हा
आहे. देणेघेणे ही विश्वासानेच चालते. विश्वासाची एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो.
आमच्या घरातील अगदी सोळा वर्षांच्या सुंदर सुस्वरूप मुलीला जम्मू येथे अगर इतर
गावी पाठवावयाचे झाले व शेजारचा मुसलमान त्या गावी निघाला असला तर त्या एकट्या
मुलीला त्यांच्या सोबतीने आम्ही परगावी पाठवितो. तो त्या मुलीला आमच्या घरी
व्यवस्थित नेऊन पोचवील याची आम्हास खात्री
असते. तो कोणत्याही प्रकारचा अतिप्रसंग न करता अत्यंत अदवीने तिला नेऊन पोचवील अशी
आमची खात्री असते.
प्रश्न :
म्हणजे हा अतिविश्वास झाला. तुम्हास त्याची केव्हाही भीती वाटत नाही
हे कसे ?
उत्तर : फक्त आम्हाला भीती वाटते असा एकच प्रसंग म्हणजे मुसलमान मशिदीत जमले असता.
परगावचे मुसलमान धर्मांतर संकट आले असे त्यांना सांगतात व जिहाद पुकारा म्हणतात;
त्यावेळीच फक्त आम्हाला भीती असते. त्या धर्मांच्या वेहोशीमध्ये तो
जमाव काय करील आणि काय नाही हे सांगता येत नाही. पण तेच मुसलमान गट सोडून जमाव
मोडून आपापल्या घरी परतले म्हणजे मग काही नाही; पूर्ववत्
सर्व शांत व विश्वासाचे वातावरण उत्पन्न होते.
प्रश्न :
बाकी हिंदुस्थान तुमच्या पाठीशी असल्यावर तुम्हाला कसली भीती ?
उत्तर: नेहरू आहेत तोपर्यंत आम्ही निश्चिंत आहोत.
प्रश्न : म्हणजे काय म्हणता मुद्दा थोडा स्पष्ट
कराना ?
उत्तर : पंडित नेहरूंना काश्मीरची सर्व परिस्थितीची संपूर्ण माहीत असून त्यांनी
परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. ते योग्य वेळी काश्मीर वाचवतील. योग्य तीच
पावले टाकतील. पण पुढे सर्व जड आहे.
प्रश्न :
का ? भारतीय लोक तुमच्या पाठीशी नाही म्हणता ?
उत्तर: रागावू नका. आम्हाला तो
विश्वास वाटत नाही.
प्रश्न : कारण काय पंडितजी ?
उत्तर: आम्ही येथे इतके अल्पसंख्य
असून मुसलमानांना भीत नाही. सलोख्याने वागतो पण वर्तमान पत्रावरून पाहिले,
वाचले तर तुम्हा भारतीयांचे मुसलमानांशी तर राहोच पण हिंदूंशी तरी
कोठे पटते ? प्रांतवारी वरून तुम्ही लोक किती वादंग माजवीत
आहात, आपापसात भांडत आहात, भाऊबंदकी
असल्यापूमाणे एकमेकांच्या प्राणांवर उठला आहात मग नेहरूनंतर आमच्याकडे लक्ष
ठेवण्याला तुम्हाला सवड कोठे आहे ? आपला प्रांत, आपली भाषा, आपली जमात म्हणून तुम्ही भांडत राहाणार.
एकमेकांच्या उरावर बसणार, आम्ही तुमच्यापासून इतके दूर व अलग
आहोत की आमचा हात या वादात तुम्ही सहज सोडून चाल व आम्ही परत पोरके होऊ.
आम्ही त्यावर
असे होणे शक्य नाही असा निर्वाळा दिला. त्यावर पंडितजी म्हणाले,
‘असे झाल तर ठीकच पण आम्हाला नकटी भीती काय वाटते ती सांगितली.’
प्रश्न : आता हिंदूची वस्ती येथे वाढत
जाईल काय ?
उत्तर: असे वाटत नाही. शंभर वर्षे
हिंदूचे राज्य येथे होते. त्यावेळी सुद्धा वस्ती वाढली नाही तर उलट घटली. मोठमोठे नोकरपेशाचे
सरकारी लोक येतात, येथे बंगले घेतात पण नोकरी संपली रे संपली की सर्व चंबूगबाळे
आवरून हे निघाले परत, अशी आहे अवस्था. मग हिंदूंची
वस्ती येथे कशी बरे वाढणार?
प्रश्न : भारत सरकारने काश्मीरचा
प्रश्न दिरंगाईवर टाकला आहे व बिघडविला आहे असे तुम्हास वाटते काय ?
: उत्तर: नेहरूंनी हा प्रश्न चांगला हाताळला आहे व चातुर्याने ते हा
प्रश्न सोडवीत आहेत अशी आमची खात्री आहे.
प्रश्न :: ते कसे ?
गिलगीत वगैरे काश्मीरी भाग त्यामुळे पाकिस्तानात राहिला नाही काय ?
उत्तर : काश्मीर खोरे हा मुख्य गाभा.
श्रीनगर हा उत्तमोउत्तम मध्यबिंदू आहे. या भागाचे महत्त्व आगळेच आहे. योग्य ठिकाणी
लढाई थांबवली गेली आहे. गिलगीत वगैरे भाग आमचा आहे व तो पुढे मागे आमच्यात येईलच.
आम्ही असे का म्हणतो त्याचा तुम्हाला अचंबा वाटेल पण तुम्हाला ते आज कळणार नाही.
नेहरूंनी हा प्रश्न युनोत नेला व फार वाईट केले असे तुम्ही सूचवू पाहाता,
पण त्याचे उत्तर काळच देणार आहे. नेहरूंनी योग्य तेच केले आहे.
नकाशा जर व्यवस्थित पाहिलात तर ते तुम्हाला सहज समजू शकेल. पुढे मागे गिलगीट
आमच्यात सामील होईलच होईल यात आम्हाला शंका वाटत नाही.
प्रश्न : भारताबद्दल तुम्हाला काय
वाटते ?
उत्तर: भारत व आम्ही एक आहोत ही गोष्ट
आता वज्रलेपच झाली यात आम्ही आनंदी आहोत. पुढची भारताची पावले मैत्रीच्या दृष्टीने
पडावीत,
एकमेकांचा व्यापार वाढावा, किसान कामगार यांचे
कल्याण होऊन भारत काश्मीर ऐक्य पूर्ण होऊन जावे हेच आम्हाला वाटते.
प्रश्न: शेख अब्दुल्लांबद्दल काय ?
उत्तर: ते आता या एकीत काहीच विधाड करू शकणार नाहीत. त्यांचे मुसलमानही ऐकतील असे
वाटत नाही.
प्रश्न: मग त्यांना परत का पकडले ?
उत्तर : त्यांनी जी वक्तव्ये सुरू
केली त्यात पहिली भूमिका त्यांनी साफ बदलली. मुस्लीम लीगचे रूपांतर नॅशनल
कॉन्फरन्समध्ये केले ते व भारतीयांचे लष्कर आपण आत घेतले ते दोनही चुकले असे ते
उपड प्रतिपादन करू लागले. त्यामुळे दुहीची बीजे काश्मीरात पेरली जाऊन त्याचा फायदा
शत्रूने घेऊ नये म्हणून त्यांना पकडले. एकूण प्रांतात असलेले ऐक्य दुभंगण्याची
भीती होती.
प्रश्न: मुसलमान त्यांच्या पाठीशी
नाहीत हे तुम्ही नक्की समजता काय?
उत्तर : होय खात्रीने. ते सुटल्यानंतर ज्या सभा झाल्या त्याचे अवलोकन
आम्ही केले आहे. लाखो लोक त्यांच्या सभेला येत. पूर्वी त्यांनीच केलेल्या
भाषणांतील उतारे देऊन, प्रश्न विचारून हे
मतांतर कशाने झाले असे त्यांना स्वच्छ विचारतात, त्यावेळी ती
माझी चूक झाली असे त्यांना उत्तर द्यावे लागते. शेख साहेबांना अटक झाल्यावर या
सभेस जमणाऱ्या लाखो लोकांपैकी एक दोघांनीही गडवड केली नाही हे तुम्ही पाहाताच. सर्व
व्यवहार सुरळीत चालू आहेत. बक्षी साहेबांच्या कारभारावर सर्व जन खूश आहेत. आम्ही
तर आहोतच पण भारतात आम्ही सामील झालो तेच योग्य असे येथील प्रजेला वाटते. पीडित
जनतेचा भारतच उद्धार करील व भारत हेच आघाडीवरचे राष्ट आहे, लोकशाहीच्या
मार्गावर ते आहे व भारताच्या हातात हात घालून आपण चाललो तरच आपला उद्धार होईल असेच
काश्मीरी जनता मानते. नेहरू आहेत तोपर्यंत हे सर्व बोलणे. तोपर्यंत आम्हाला कोणतीही
भीती नाही असे आम्ही मानतो.
हे सर्व बोलणे होईपर्यंत बराच वेळ झाला असल्याने
आम्ही एकमेकांचा प्रेमाने निरोप घेऊन आमच्या हॉटेलात यावयास निघालो.
नापित
न्हाव्याची दुकाने
हा राजकारण असो अगर दुसऱ्या काही गोष्टींचा असो, अड्डाच असतो. न्हावी डोक्यावर हात फिरविता फिरविता ग्राहकांची मते आजमावितो,
चर्चा करतो. त्याचप्रमाणे ग्राहकही मालीशीची लज्जत चाखत अर्धवट डोळे
मिटून समाज स्थिती अगर नवीन माहिती मिळते किंवा कसे हे पाहात असतो. आमचा हा नाव्ही
कश्मीरी मुसलमान होता. आमच्या बरोबरचे
मुंबईचे नेरकर सराफ भारी चौकस. शिवाय कसे विचारू ? काय
विचारू? हा प्रश्न मनात न आणता गोड भाषेत वाटेल ते प्रश्न
सहज करीत. एक दिवस दाढी करून घेण्यासाठी आम्ही दोघे तिघे एकत्र जमलो त्यावेळी
प्रश्नोत्तरे झाली ती अशी -
प्रश्न: काय महाराज,
आपला धंदा कसा काय चालतो ?
उत्तर: आपल्या कृपेने ठीक चालतो.
प्रश्न: नेहमीच धंदा तेजीत चालतो की
कसे ?
उत्तर: आमचा धंदा सीझनमध्ये जोरात
असतो,
इतर वेळी अगदीच मंद असतो.
प्रश्न : तुमचे कुटुंब किती माणसांचे ?
घर कोठे ?
उत्तर: आई,
वडील व चार भाऊ, एक बहीण होती ती लग्न होऊन
घरी गेली.
प्रश्न: घरात शेती वगैरे किंवा दुसरा
काही धंदा
उत्तर? : थोडीशी शेती आहे. थोरला भाऊ व वडील शेती करतात. मी हे दुकान चालवितो. एक
भाऊ शाळेत
जातो, अगदी लहान भाऊ अगदीच छोटा आहे.
प्रश्न: शेतीत वराच पैसा मिळतो की
दुकानात ?
उत्तर : आमच्या मालकीची लहानशी जमीन
आहे. त्यातून धान्य वगैरे मिळते. शेतीत फायदेशीर असे काही नाही. पीक आले तर
पोटापुरते धान्य मिळते. पण शेतीचे येथील हवामानामुळे निश्चित असे काहीच सांगता येत
नाही. गेल्यावर्षी अतिशय वर्फ पडून पिकांचा नाश झाला. आम्हाला धान्य तर राहोच
परंतु जनावरांना चाराही मिळाला नाही. त्यातच आमचा एक बैल मेला. फारच कष्ट झाले.
हिंदुस्थानातून अन्नच काय पण गवतही आले म्हणून बचाव झाला. दुकानच्या व्यापाराचा
पैसा ताजा असतो सीझन वरा गेला म्हणून सर्व ठीक...
प्रश्न: हिंदुस्थानातून आता लोक
जास्ती येतात की पूर्वी येत होते ?
उत्तर : हल्ली लोक पुष्कळच येतात.
गेला सीझन फर्स्टक्लास गेला. यंदाही ठीक दिसतो सीझन.
प्रश्न:: गुलाम बक्षचा कारभार कसा काय
वाटतो ?
उत्तर : बरा चालला आहे की. अधिकार आला म्हणजे मनुष्य बदलतोच पण एकंदरीत ठीक आहे.
प्रश्न: शेख अब्दुल्ला कसा काय होता ?
उत्तर : तो तर फर्स्टक्लास मनुष्य होता.
प्रश्न:: मग त्याला जेलमध्ये का घातले
?
उत्तर : अहो,
तो राजकारणाचा प्रश्न आहे. तो तुम्हा आम्हाला थोडाच समजणार. राजकारण,
अधिकार हे सर्व प्रश्न निराळे आहेत. भाऊ भाऊ शत्रू होतात मग
मित्राची काय गोष्ट ?
प्रश्न: पाकिस्तानच्या बाबतीत तुमचे
काय मत ?
उत्तर : यात काय मत असणार ?
इतका वेळ
दिलखुशीपणाने चर्चा चालली पण यापुढे काय प्रश्न येतील याची कल्पना त्याला आली व त्याचा
मोकळेपणा सावधपणात रूपांतरित झाला.
प्रश्न : पाकिस्तानाने तुमच्यावर
स्वारी केली, लढाई केली, तुमचे
लोक कापून काढले.
उत्तर : टोळीवाल्यांनी आमच्यावर
स्वारी केली.
प्रश्न: तुमच्या बायकांवर त्यांनी
अत्याचार केले, तुमच्या दुकानांना आगी लावल्या हे
खरे ना?
उत्तर : कुठल्याही दंग्यामध्ये गुंड
लोक असतातच. तेच यावेळी पुढारपण घेऊन दंगे, दरोडे,
बायका पळवणे,अत्याचार वगैरे करतात. तुमच्याकडे
दंगे होतात तसेच इथे झाले. दुसरे काय ?
प्रश्न: पण मुसलमानांनीच मुसलमानांवर
हे अत्याचार केले हे खरे ना ?
उत्तर: होय,
खरे आहे.
प्रश्न: त्यावेळी भारताने तुमचा बचाव
केला हे खरे काय ?
उत्तर: होय.
प्रश्न: मग भारतात राहाणे वरे असे
तुम्हास वाटते काय ?
उत्तर: आम्हाला
जो कोणी पोटभर अन्न देईल त्याच्याकडे आम्ही जाणे हेच योग्य. पोट भरणे हे प्रथम
नंतर राज्य कोणाचे हा प्रश्न.
प्रश्न:: शेख अब्दुल्ला प्रथम एक
सांगत होते पण नंतर त्यांनी आपला शब्द वदलला, असे
का झाले ?
उत्तर: : नंतर तरी ते काय म्हणत होते ?
काश्मीरी लोकांनाच काश्मीरचे भवितव्य ठरविता आले पाहिजे असे
म्हणाले. त्यात काय चुकले ते आम्हाला समजत नाही. बक्षी साहेबांचे त्यांचे का पटत
नव्हते ते आमच्यातरी लक्षात येत नाही.
होडीवाला
प्रश्न : काय होडीवाले,
कसा काय तुमचा धंदा चालतो ?
उत्तर: यंदा फारच छान. तुमच्यासारखे मुशाफीर काश्मीर
पाहावयास येतात म्हणून आम्हा गरिबांचे पोट भरते.
प्रश्न : भारताबद्दल तुम्हाला काय
वाटते ?
उत्तर: किती झाले तरी अन्नदाते आहेत,
त्यांच्यामुळे आम्हाला हे दिवस दिसतात. प्रवासी जातील येतील तरच
आमचा धंदा जोरात चालेल. त्यामुळे चार
घास आम्हाला जास्त मिळतील तेच आमचे अन्न.
प्रश्न : बक्षी साहेवांचे राज्य कसे
काय चालले आहे ?
उत्तर: ठीक आहे. त्यांच्यामुळे हे
दिवस आम्हास दिसतात. तो दूर बंगला दिसतो ना ? तिथे
ते राहात होते. आता राजवाड्यासारख्या बंगल्यात ते राहातात. आता त्यांचा रुबाव
वाढला पण माणूस एकंदरीत छान.
हॉटेलवाला
‘या हॉटेलात कोणीही राजकारणावर चर्चा
करू नये' हा
बोर्ड पाहून मी मॅनेजरास प्रश्न केला
प्रश्न : काहो मालक,
असा बोर्ड आपण का लावलात ?.
उत्तर: उघडच आहे. येथे सर्व पक्षाचे
लोक येतात. शेख साहेबांच्या अटकेनंतर या वादाला इतका ऊत आला की,
मारामाऱ्यांपर्यंत पाळी जाऊ लागली म्हणून वाद बंद करण्यासाठी हा
बोर्ड लावला.
प्रश्न : पण खाजगी विचारतो,
तुमचे मत काय ?
उत्तर: आमचे पोट या धंद्यावर अवलंबून,
बाहेरून भरपूर प्रवासी आले तर व्यापार व व्यापार झाला तर आम्ही
जगणार.
प्रश्न : मग बक्षी साहेबांचे धोरण आहे
म्हणता बरोबर?
उत्तर: होय,
अगदी अचुक. काश्मीरी जनतेला पोटभर जेऊ घालणे हे प्रथम कर्तव्य ते
समजतात. सर्वागीण विकासात भारत अग्रेसर असल्यान त्यात सामील होण्यानेच हे साधेल
अशी खूणगाठ बांधूनच त्यांनी हा पवित्रा घेतला आहे व तो योग्य आहे.
प्रश्न : हेच उद्दिष्ट पाकिस्तानात
गेल्याने साधलं नसत का?
उत्तर: ते शक्य नव्हते,
आम्हाला एवढी स्वतंत्रता तथे मिळाली नसती. जित म्हणून आमच्याकडे
त्यांनी जेत्याच्या भावनेने पाहिले असतं. शिवाय आमच्या व त्यांच्या मनोवृत्तीत
जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्ही राष्ट्रवादी तर पाकिस्तान है जातीय वादाने भारलेले,
समाज सुधारणेत आचार विचारांनी मागासलेले राष्ट्र आहे. भारताची
बरोबरी ते कधीच करू शकणार नाहीत. भारतात राहाण्यातच काश्मीरचे हित आहे.
प्रश्न : आपण मोकळ्या मनाने बोललात बरे वाटले.
उत्तर: तुम्ही मोकळ्या मनाचे दिसलात
म्हणून बोललो, नाही तर सहसा या वादात मी शिरत नाही. अच्छा! नमस्ते । म्हणून मी
त्यांचा निरोप घेतला.
प्रशांत दिवेकर : माझे आजोबा श्री. स.ना. परांजपे यांच्या काश्मीर यात्रा नोंदीतून, मे १९५८
Comments
Post a Comment