हिंडलगा जेलमधील कारावास आणि आप्पासाहेब
पटवर्धनांचा सहवास :
जेलमध्ये समध्येयी मंडळी एकत्र होती.
याळगींचा गट कधी पोवाडे, कधी गाणी-पदावली म्हणून सर्वांची करमणूक करत असे. जेलमध्ये सभा संमेलने
चालत, नाटके बसविली जात, कानडी,
इंग्रजीचे क्लासेसही चालत. जेलमध्ये सदाशिवराव व मित्रमंडळींनी
गांधी टोपी हे नाटक बसविले होते. हुबळीच्या दीक्षित गुरुजींची आध्यात्मिक प्रवचने
चालत. तसेच सदुभाऊ जेलच्या पदार्थांना रुचकर कसे करता येईल याबाबत मनोवेधक चर्चाही
करत असत. खाण्या-पिण्यात, वागण्यात- विचारात समानता
असल्यामुळे जेलचे आयुष्य सुसह्य झाले.
प्रेरणा (१)
सन १९४४ सालचा फेब्रुवारी महिना
असावा. वेंगुर्ला टपाल लुटीच्या खटल्यातून निर्दोष सुटल्याबरोबर सदाशिवरावांना
स्थानबद्ध केले गेले व हिंडलगा जेलमध्ये पाठविले गेले. तेथील एका मोठ्या बराकीत
शंभर लोकांमध्ये सदाशिवराव एक होते. स्थानबद्ध असल्यामुळे काम काहीच नव्हते. सूत
कातणे, थोडे वाचन व चर्चा
हाच दिवसाचा कार्यक्रम. दोन वेळ २-२ भाकऱ्या, कधी डाळ तर कधी
पाल्याची पातळ भाजी असा खाना मिळे. मग हा पाला कधी शेवग्याचा तर कधी पोपईचाही असे.
रविवारी थोडा कांदा व थोडा गूळही मिळे. मटण खाणारे असतील तर थोडे मटणही 'मिळे. यातून शरीर पोषण होत नसे हे सांगणे नकोच. सदाशिवरावांचा अकरा जणांचा
गट होता. बाहेरून आलेले २ जेवणाचे डबे व १ तांब्याभर दूध एवढेच यांचे जेलबाहेरचे
खाद्यपदार्थ. एकाच ध्येयाने सर्वजण भारलेले असल्याने एकमेकांच्या उपयोगी पडणे हे
सर्वांचे कर्तव्य. त्यामळे दुधाचे वाटप कोणी आजारी असेल त्याच्यासाठी होत असे.
जेलमधले त्यावेळचे चलन म्हणजे बिड्या असे. काही श्रीमंत डेटिन्यू याचा चांगलाच
फायदा घेत असत. सदाशिवरावही केव्हातरी एखादा बिडीचा कट आणवून जेलच्या कोठारातून
काही जिन्नस वॉर्डरकडून मिळवत असत. अर्थात हे फारच क्वचित चालत होते.
असे दिवस चालले असताना एक दिवस असा
उजाडला की त्यादिवशी कोकणचे पुढारी श्री. आप्पासाहेब पटवर्धन हे प्रथम वर्गातून
तिसऱ्या वर्गात आले. प्रथम वर्गामधील कैद्यांना जेवणाची सोय उत्तम असे.
आप्पासाहेबांना प्रथम वर्ग मिळाला होता,
परंतु तिसऱ्या वर्गामधल्या कैद्यांची त्यांना कणव येई. त्यासाठी
त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या कैद्यांत राहाण्याची व जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून
खटपट केली व ते सदाशिवरावांच्या बराकीत आले. सत्य बोलणे, खरेपणाने
वागणे व हालअपेष्टा सोसणे हा त्यांचा बाणा होता. पण त्यांचा हा बाणा
सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता. सदाशिवराव जेलमध्ये सूत कातत असत, तसेच सभा भरवून राजकीय परिस्थितीवर चर्चाही करत असत. काही काळ थट्टामस्करी
व आरामातही घालवत असत. वर सांगितल्याप्रमाणे वॉर्डकडून थोडेबहुत खाद्यपदार्थ आणवत
असत. पण आप्पासाहेबांच्या आगमनाने हे सर्व प्रकार बंद पडणार होते. ते खरे बोलणारे
गृहस्थ. जे घडेल ते सर्व जेलरला सांगतील, असे सर्वांना वाटले
व त्यामुळे बराकीतील सर्वचजण चूपचाप होते. त्यांच्यावरोवर बोलण्यासही कोणी गेले
नाही व त्यांच्याबरोबर जेवायलाही कोणी बसले नाही. सर्वजण एक अंतर राखून होते.
जेवणे झाली. झोपा झाल्यावर दुपारी
सदाशिवराव सूत कातीत बसले. मग आप्पासाहेबांना
गप्प बसवेना. त्यांनी सदाशिवरावांना जवळ बोलाविले व नाव विचारले. सदाशिवरावांनी
नाव-गाव सांगितल्यावर आप्पा म्हणाले,
“मी फर्स्टक्लासमधून इकडे आल्यावर मला वाटले होते की तुम्हांस आनंद
होईल. माझ्याबरोबर तुम्ही खूप बोलाल, चर्चा कराल. पण इथे
पाहावे तो सगळे चिपचाप ! माझे इथे येणे तुम्हाला आवडले नाही का ?” सदाशिवराव चाचरतच म्हणाले, "तसे काही नाही'.
आप्पा पुढे म्हणाले की, “मला सर्व कामे सांगा
व माझे इथे येणे आवडले नसल्यास तसे सांगा.” सदाशिवराव
म्हणाले, “अहो, खरंच तसं काही नाही.
परंतु आपण तर गांधींचे सच्चे अनुयायी. सत्य व अहिंसा ही तर आपली आवडती ध्येये.
त्यामुळे आपले व आमचे पटणे थोडे कठीण तुम्ही सत्य बोलणारे असल्याने जेलरने
विचारताच खरे दिसेल ते सर्व त्याला सांगून टाकणार व मग आमची पंचाईत होणार.”
आप्पासाहेब म्हणाले, “इथे जे घडते ते
सर्व मी जेलरला कशासाठी सांगणार ? मी सत्य बोलणारा असलो तरी
जेलरचा हेर नव्हे हे लक्षात ठेवा. जेलरने विचारले तरी काय घडते ते सर्व जेलरला मी
कशासाठी सांगणार ? मी मनात ठेवीन व विसरून जाईन. तुम्ही सर्वांनी
माझ्यासारखे वागले पाहिजे असा माझा अट्टाहास नाही हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या
मार्गाने जा. मी माझ्या मार्गाने जाईन. हेरगिरी करणे हे तर माझे काम नव्हेच”.
आप्पासाहेब पुढे म्हणाले, “आपण सर्वजण एका
ध्येयाने भारून चळवळीत भाग घेऊन येथे आलो आहोत हे तर खरे. मग पटेल तेवढे तरी मिळून
करणे हे योग्य नाही का ? बसणे, उठणे,
पटेल ते बोलणे हे तरी आपण करू शकतो ना ? तेवढे
करू व न पटणाऱ्या गोष्टींत लक्ष घालायला नको म्हणजे झाले”.
सदाशिवरावांना त्यांचे हे विचार
पटले. पुढे जेवणा-खाण्याच्या गोष्टी निघाल्या. सदाशिवरावांनी विचारले, आप्पा जेवणाला आपण
एकत्र बसलो तर तुम्हाला सोडून एखादी चांगली वस्तू आम्ही खाल्ली तर तुम्हाला काय
वाटेल ? आप्पासाहेब म्हणाले, “जेवण-खाण्याला
आपण एकत्र बसत जाऊ. पण एक पथ्य पाळा. तुमच्या वस्तू खाण्याचा आगृह मला करू नका.
जेलचे येईल ते मी खाईन. तुम्ही तुमचे काय असेल ते अन्न खा. मी त्यासंबंधी काही
बोलणार नाही, म्हणजे झालं ना ? फर्स्टक्लासमध्ये
घरच्यापेक्षाही चांगले अन्न मिळते. माझे थर्डक्लासचे बांधव नुसती भाजी भाकरी
खातात. त्यांच्यात समरस होणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून तर मी थर्डक्लासमध्ये
आलो”.
आप्पासाहेब थर्डक्लासमध्ये आले तरी
दूध वगैरे त्यांचे सर्व त्यांना व्यवस्थित मिळे.
प्रेरणा (२)
तद्नंतर आप्पासाहेबांच्या व
सदाशिवरावांच्या रोजच गप्पा होऊ लागल्या. रोज नवीन-नवीन विषय निघत. असेच एके दिवशी
नेहमीप्रमाणे सदाशिवराव सूत कातून झाल्यावर त्यांच्याकडे गेले. आज विषय होता
गोरगरिबांचा. गरीब लोकांना मदत केली पाहिजे,
त्यांचे जीवन सुधारले पाहिजे या गोष्टींवर चर्चा झाली.
सदाशिवरावांनीही ते दुकानात गडी माणसांना कसे वागवितात, गोरगरिबांना
कशा प्रकारे मदत करतात, विद्यार्थ्यांना काय-काय मदत करतात
असे सर्व सांगितले.
आप्पा
: इथे राहूनही
तुम्हांला गोरगरिबांना मदत करता येईल.
सदुभाऊ :
हे कसं शक्य आहे ? आमची वस्तीच कारावासात. आम्हालाच जेवण मिळण्याची मारामार, ज्या भाकऱ्या आम्ही खातो त्यात किती रवा-कोंडा असतो हे आपण पाहाताच. हे
खाऊन आम्ही उपजीविका कशी करायची हा प्रश्न आणि त्यात आम्ही गरिबांना काय मदत करणार
?
आप्पा
: मी त्याच्याबद्दल
म्हणत नाही. येथेही बचत केल्यास, बाहेर गेल्यावर त्याचा
उपयोग तुम्हाला गरिबांना मदत करण्यास करता येईल.
सदुभाऊ :
ते कसे काय ?
आप्पा :
एक प्रकार मी सुचवितो. तुम्ही इथे जेलमध्येही सूत कातू शकता. चरखा आहेच. कापूस आणू
शकता.
सदुभाऊ :
मग त्याचे काय करायचे ?
आप्पा :
सूत कातून झाल्यावर तुम्ही लडी करता ना?
या एका लडीतील दहा फेरे गरिबांचे असा विचार करून त्याचा हिशोब
ठेवलात तर थोडे थोडे पैसे जमा होतील कि नाही सांगा.
सदुभाऊ : थोडे
फार जमतीलही. पण तेवढ्याने काय होणार ?
आप्पा :
तुम्ही रोज एक लडी कातता त्याचे दहा फेरे ठेवून तरी पहा. ‘थेंबे थेंबे तले साचे’
याचा अनुभव घेवून तरी बघा.
प्रेरणा (३)
एके दिवशी सकाळी फिरत असताना आप्पा म्हणाले –
आप्पा :
सदुभाऊ, तुम्ही कपडे किती
वापरता त्याचा हिशोब वगैरे ठेवला आहे का ?
सदुभाऊ :
हिशोब असा काही नाही. पण साधारण सांगता येईल.
आप्पा :
मग सांगा पाहू किती कपडे लागतात ते ?
सदुभाऊ :
मी एकसारखा कामावरच असल्याने वर्षातून दोन वेळा कपडे शिवतो. गुढी पाडवा व दिवाळी
या सुमारास मी कपडे शिवतो. दोन हाफ पँट व दोन हाफ शर्ट हा माझा कामाचा ड्रेस .
त्याबरोबर दोन हातरुमाल व एखादी टोपी. बाहेर जाताना केव्हातरी नेसावयास एक
धोतरजोडी तसेच २-३ वर्षांनी एखादा कोट व लांब हाताचा एक शर्ट. एवढेच कपडे मी
वापरतो. एखादा टॉवेल अंग पुसण्यासही लागतो.
आप्पा :
पुरे पुरे. समजले! हे कपडे तुमच्या कामाच्या दृष्टीने ठीक आहेत. यांत तुम्हाला एक
बचत करता येईल.
सदुभाऊ :
यात कोणती बचत, आप्पा
?
आप्पा
: तुम्ही साधारण गुढी
पाडवा व दिवाळीला कपडे शिवता, होय ना ?
तसे का करता ?
सदुभाऊ :
आठवणीसाठी. तारखा टिपून ठेवावयास नकोत म्हणून. तसेच सणावारी नवीन कपडे घालता
येतात.
आप्पा:
ठीक. यात तुम्ही एकच
सुधारणा करावी असे मला वाटते.
सदुभाऊ :
कोणती सुधारणा करावी म्हणता ?
आप्पा :
सणाला कपडे शिवायचेच पण घालण्याची पद्धत बदलायची. कपडे जपून वापरायचे. गुढी
पाडव्याला व दसऱ्याला कपडे शिवून नवीन घालायचेच. पण पहिले कपडे चांगले असतील तर
टाकायचे नाहीत. आठ दिवस नवीन कपडे वापरून जुने चांगले कपडे वापरत राहायचे व किती
महिने टिकतात त्याचे टाचण ठेवायचे. जेवढे महिने जास्त वापराल त्याची किमत करून ते
पैसे धर्मादाय फंदात टाकायचे? समजले ?
प्रेरणा (४)
एक दिवस आप्पा म्हणाले,
“सदुभाऊ, तुम्हाला नाटक-सिनेमाचे वेड दिसत
नाही.”
सदुभाऊ :
असे कसे म्हणता येईल ? सिनेमा व नाटके हे तर माझ्या आवडीचे विषय. त्यातल्या त्यात ऐतिहासिक नाटके
व सिनेमा माझ्या प्रीतीचा विषय.
आप्पा :
मग त्या नाटक सिनेमांना तुम्ही प्रथम वर्ग पहिली रांग, दुसरी रांग असेच जात
असाल.
सदुभाऊ :
ते मात्र विचारू नका.
आप्पा :
ते का ?
सदुभाऊ :
आम्ही काही गर्भश्रीमंत नव्हे. अत्यंत गरिबीतून वर येत असलेले हॉटेल चालविणारे
आम्ही लोक. त्यातून गरीब विद्यार्थ्यांना आपल्या हातून होईल तेवढी मदत करावयाची.
शिवाय ही देशभक्तीची ओढ. सर्व बाजूने ओढाताण. पण त्यांत हे नाटक सिनेमाचे वेड.
नाटकाला पीटाचे तिकिट तर सिनेमाला तृतीय वर्गाचे तिकिट काढायचे, पण जायचे हाच
निर्धार. लहानपणी तर एकादशी, शिवरात्र, गोकुळ अष्टमी, श्रावण सोमवार व दसरा यादिवशी
सिनेमाला जायचोच. काका-काकी यांच्याकडून देवाला ठेवण्यासाठी पैसे गोळा करायचे.
त्यातील एक पैसा देवाला ठेवून बाकीचे पैसे सिनेमा-नाटकाला वापरायचे हा तर आमचा
उद्योग.
आप्पा: ज्यात काटकसर
सुचवायची तीच वाट तुम्ही बंद करून टाकलीत. मग पुढे काय बोलणार?
सदुभाऊ :
म्हणजे आपले म्हणणे काय होते ?
आप्पा :
वरची तिकिटे काढून तुम्ही सिनेमा नाटकाला जात असाल अशी माझी कल्पना होती. त्यात
थोडी काटकसर करून ती मदत देशकार्याला अगर गरिबांना द्या असे मी सांगणार होतो. पण
ती वाट तुम्ही बंद केलीत. आणखी एक विचार सुचतो,
पण तुमचे नाटक-सिनेमाचे वेड पाहिले तर शक्यता दिसत नाही.
सदुभाऊ : आणखी दुसरा विचार कोणता म्हणालात आप्पा ?
आप्पा : नाटका-सिनेमाचे एवढे
वेड बरे नव्हे. एवढे बघण्यासारखे त्यात काय असते ?
सदुभाऊ :
आप्पा, नाटकातील गाणी,
हावभाव, देखावे हे सर्व पाहण्यासारखे असते.
आपणाला त्याचे वेड नसल्याने काहीच कळणार नाही हे मात्र खरे. सिनेमातील हाव-भाव
चार-सहा वेळा कसरत करून योग्य वेळी टिपले जातात. पण त्यातील देखावे व इतर गोष्टी
मनाचा ठाव घेऊन जातात हे मात्र खरे. पण आपण काय सुचविणार होता ?
आप्पा :
तुम्ही महिन्यातून सिनेमा-नाटके किती पाहता बरे ?
सदुभाऊ :
नाटकाचे काही सांगता येत नाही. पण सिनेमा आठवड्यातून एक वेळ म्हणजे साधारणपणे
महिन्यातून चार खेळ पाहतो.
आप्पा :
परांजपे, आपली नाटके अगर
सिनेमा कोणते ?
सदुभाऊ :
लहानपणी धारावाहिक, सरपोतदार व फाळकेंचे चित्रपट पाहण्याचा नाद मला होता. चित्रपट बोलके
झाल्यावर अयोध्येचा राजा, कुंकू, समुद्रमंथन
तसेच कोल्हापूरचे भालजी पेंढारकर यांचे ऐतिहासिक चित्रपट पाहणे हा तर माझा प्राण
होता. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तसेच इतर ऐतिहासिक भागावर त्यांनी चित्रपट
काढले ते तुम्ही पाहिले असते तर तुम्हीही माझ्याप्रमाणे वेडे झाले असता.
आप्पा : ते राहू दे. मुख्य मुद्दा बाजूला ठेवू नका.
सदुभाऊ :
बरं. सांग काय ते !
आप्पा :
माझे म्हणणे एवढेच की आपण महिन्याला सिनेमा-नाटके बघता त्यातील एखादा सिनेमा किंवा
नाटक वर्ज्य करून त्यातील राहतील ते पैसे आपण जमा करावेत व ते देशाच्या कामी खर्च
करावेत. पहा आपणाला पटते का ?
सदुभाऊ :
आपण सांगता ते माझ्या ध्यानी आले. मी बाहेर गेल्यावर अवश्य प्रयत्न करीन.
प्रेरणा (५)
आज विषय होता घरातील धार्मिक कार्यांचा.
आप्पा : सदुभाऊ, तुमच्यात सणवार, लग्न-मुंज, वाढदिवस
वगैरे समारंभ तुम्ही साजरे करत असालच.
सदुभाऊ: ते करावे लागतातच,
त्यात तुम्ही कोणती काटकसर काढली आहे ?
आप्पा : काटकसर नव्हे. माझ्या
मते खर्चाची अधिकता त्यात साधता येईल.
सदुभाऊ :
त्यात काय करावे म्हणता तुम्ही ?
आप्पा : लग्नमुंजी, वाढदिवस वगैरे सण साजरे करता ना ? त्यात आहेर येतात.
ते काही तुम्ही हिशोबात धरलेले नसतात. लग्नामुंजीत काही जास्तीचे खर्च करता त्यातही
थोडी वाढ धरता येईल. लग्नाच्या वेळी पातळे, खण-कापडे वगैरे
घ्यावे लागतात. त्यातही थोडी वाढ धरता येईल. भांडी-कुंडी, गडी
माणसांना जास्त पगार वगैरे द्यावे लागतात. त्यातही थोडीशी वाढ धरली तरी चालून
जाईल. अशा रीतीने सर्व प्रकरणात थोडी थोडी वाढ धरली तरी चालून जाईल. ती रक्कम
तुमच्या फंडात जमा करता येईल.
सदुभाऊ :
पैसे जमा करण्याची ही पद्धत मला पटत नाही. घरची कार्ये म्हटली की काही आपली
एकट्याची असत नाहीत. घरातील सर्व यात असतात. त्यांना हे कसे पटेल ?
आप्पा
: सर्वांचा संबंध असेल त्यावेळी हे करता येणार
नाही. पण ज्यावेळी स्वतंत्रपणे तुम्ही कार्ये कराल त्यावेळी तर हे शक्य होईल ना ?
सदुभाऊ :
तेव्हा मात्र हे करणे शक्य होईल हे खरे आहे. पण आम्हां संसारी माणसांना एवढी सर्व
हिशोबा-हिशोबी करत बसणे कसे शक्य आहे ?
हा हिशोब ठेवणे आणि परत खर्च केल्यावर तो लिहीत बसणे ! आम्हाला
धंद्याचे हिशोब ठेवताना किती त्रास होतो. त्यात आणि बनवाबनवी असली म्हणजे तर किती
तारांबळ उडते. हे सर्व हिशोब लिहिले व इन्कमटॅक्सला दाखविले नाहीत तर तो एक पेचच
पडणार.
आप्पा: म्हणजे सदुभाऊ तुम्ही
हिशोबात बनवाबनवीही करता काय ?
सदुभाऊ :
थोडेबहुत सर्वचजण करतात. आम्ही सर्वजण गांधीतत्त्वाप्रमाणे वागलो तर सर्व फायदा
सरकारला देऊन आम्हाला माशा मारत वसावे लागेल त्याचे काय ? तुम्हाला हे पटणार
नाही, यामुळे आम्ही तुमच्यापासून थोडे दूर राहातो. तुम्हाला
न पटणाऱ्या गोष्टी आम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना कराव्याच लागतात. अर्थात
त्यात अतिशयोक्ती नसल्याने कुणाचे नुकसान व घात होत नाही. त्यामुळे ते पाप नव्हे
असे मला वाटते. या माझ्या बोलण्याने माझ्याविषयी आपले मत कलुषित होण्याचाही संभाव
आहे व आपणाला थोडा फार रागही आला असेल.
आप्पा :
सदुभाऊ, हे तुमचे स्पष्ट
बोलणे मला आवडले कारण ते सत्य आहे. याचा मला अभिमान वाटला. राग तर मुळीच आला नाही.
प्रेरणा (६)
एक दिवस गप्पा मारता मारता आप्पा म्हणाले, “हे माझे मार्ग मी
सांगितले. तुमच्या अनुभवाचे इतर काही मार्ग असतील तर ते कोणते ? काही सुचवू शकाल ?”
सदुभाऊ :
काही मार्ग आहेतच की. माझ्या लहानपणी आमच्या मातोश्री दुकानातून काही माल आणला की
पुड्या नीट सोडून त्याचा दोरा गुंडाळून ठेवीत व कागदाच्या घड्या करून ठेवीत. रद्दी
व दोरा हे दोन्हीही कामाप्रमाणे वापरीत कारण आत्तासारखी त्यावेळी वर्तमानपत्रे
रद्दीत मिळत नसत व दोराही कमी असे. लहान पुड्या बांधून ठेवायचे झाल्यास कागद व
दोरा उपयोगी पडे. दोरा बटन लावायला,
शिवायला, हार करण्यासाठीही उपयोगी पडत असे.
दुसरे उदाहरण ह. भ. प. पटवर्धनबुवा
यांचे आहे. ते नेहमी कच्चे लिहायचे झाल्यास पाठकोरे कागद वापरत. आम्हाला पाकिटातून
पत्र पाठवावयाचे झाल्यास पाठकोऱ्या कागदावरच लिहीत असत. जेवताना पानात काही न
टाकणे म्हणून ताट-वाटी अगदी स्वच्छ करीत असत. लुगडी लवकर फाटू नयेत म्हणून काठ
बाजूला करून ते वाळत घालावयास लावत. कपडेही अत्यंत काटकसरीने वापरत असत.
आणखी एक उदाहरण म्हणजे सांगलीच्या
गजानन मिलचे मालक धनि वेलणकर यांचे. ते रोज सकाळी फिरावयास जात. जाताना बरोबर एक
पिशवी असे. रस्त्यातून जाताना रस्ता निरखून पाहात ते चालत. वाटेत नाल, स्कू वगैरे लोखंडाचे
काही सामान पडलेले दिसले की तो जिन्नस ते पिशवीत टाकत. लोखंडाचे उपयोगी न येणाऱ्या
अशा कितीतरी वस्तू गोळा झाल्यावर शेवटी ते त्या सर्व वस्तू लोखंडाच्या मोडीत विकत.
याप्रमाणे असेही लोक मी पहिले आहेत
की जे बरोबर घेतलेल्या पिशवीत घट्ट शेण गोळा करून घरी नेवून घर सरावाने, शेणाच्या शेणी थापून
त्याचा उपयोग जाळण्यासाठी करणे अशा गोष्टींतूनही जलन वाचविण्याचा प्रयत्न करीत. हे
सर्व काही मी करू शकणार नाही. पण यातील काही गोष्टी करण्याचा जरूर प्रयत्न
करीन.
आप्पा :
ठीक, ठीक नजर ठेवा व
काटकसरीने वागून पैशाचा उपयोग गरीबांसाठी करा म्हणजे देशकार्याला हातभार
लावल्यासारखेच आहे.
प्रेरणा (७)
एक दिवस सकाळी फिरत असताना गोष्टी निघाल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या.
सदुभाऊ :
आप्पा, आम्हाला स्वातंत्र्य
आमच्या नजरेसमोर मिळालेले दिसेल का हो ?
आप्पा :
स्वातंत्र्य नक्की मिळेलच पण ते केव्हा हे सांगता येणार नाही. प्रयत्न करीत राहाणे
इतकेच आपले काम..
सदुभाऊ :
मग आम्ही राब-राब राबायचे ते कशासाठी असेही पुष्कळ वेळा मनात येऊन जाते...
आप्पा : सदुभाऊ, एवढे निराश होण्याजोगे त्यात काय आहे ? तुम्ही संसार
करता म्हणजे तरी काय करता ? बायकामुलांसाठी झिजत असता हेच ना
! तसेच ही देशभक्तीही देशासाठी एक कर्तव्य म्हणून करावयाचे.
सदुभाऊ : आप्पा, मला तेच काय ते समजत नाही. सावरकर म्हणतात, 'हिंदूंनो
एक व्हा.' गांधीजी म्हणतात, 'सर्व
धर्मांत समानता ठेवा. 'कम्युनिस्ट म्हणतात, 'ब्रिटिशांना साहाय्य करा.' क्रांतिकारक म्हणतात,
'बंड करा.' रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?'
हे तर प्रसिद्धच आहे. 'हिंसा-अहिंसा हा काय
गोंधळ आहे? हे समजत नाही. अहिंसेचा संदेश देणारे गांधीजी 'करेंगे या मरेंगे' हा पण संदेश देतात. हे सर्व
अहिंसेविरुद्ध नाही का ? आम्ही दारु दुकानांवर निदर्शने केली,
स्टेशने जाळली, टपाले लुटली, बुलेटिन वाटली अशा बऱ्याच गोष्टी केल्या. कोर्टात खटलेही चालवले नाहीत, या
सर्वांचे परिणाम काय झाले ? स्टेशने जाळून, गाड्या पेटवून काय झाले? आमच्या समस्या
जातील होत चालल्या. आमचे प्रवास खंडित होत चालले. टपाल लुटले त्यामुळे पत्रे
मिळेनात. व्यत्यय येवू लागला. तारा तोडल्या त्यामुळे संदेश येणे बंद झाले. दफ्तरे
जाळली. आमच्याच जमिनीचे पुरावे नष्ट झाले.
हे सर्व करताना हुरूप असतो. पण पुढे
स्वस्थपणे विचार करू लागलो की विवेक बुद्धी जागी होते. या आमच्या कृत्यातून पुढे
गुंडगिरी वाढणार नाही ना! असे वाटू लागते. वाटते एवढेच नाही तर आमच्याबरोबर
ज्यांनी टपाल लुटीत भाग घेतला,
त्यातील काहींनी स्वतंत्रपणे रनरला लूटून त्यातील रकमा हडप केल्या.
म. गांधींनी एक वर्षात स्वराज्य ही घोषणा केली. आज त्या गोष्टीला वर्षे झाली. ब्रिटिश अजूनही काही निघून गेले
नाहीत. ते वरचष्मा करत अजूनही राज्य करीत आहेत, खरं ना?
आप्पा :
सदुभाऊ, देशप्रेमाने असे
अधीर होऊन चालत नाही. पुढाऱ्याकडून देशभक्ती वाढविण्याचे काम चालू आहे हे तरी
तुम्ही मान्य कराल. देशभक्ताने असे हळवे होऊन चालत नाही. त्याने धीर धरला पाहिजे.
हळूहळू लोकांची देशभक्ती वाढत आहे हे तरी तुम्हाला मान्य आहे ना ?
सदुभाऊ : आता लोक देशभक्तीने भारले आहेत व त्यांची संख्यादिवसेंदिवस वाढत आहे हे
मला मान्य आहे.
आप्पा : मग झाले तर !
पुढाऱ्यांची कर्तव्ये ते करत आहेत. निरनिराळे प्रयोग, घोषणा,
चळवळी करून देशभक्ती वाढवित आहेत. आपले कर्तव्य पुढाऱ्यांच्या आज्ञा
मानणे व चळवळीत भाग घेणे हेच आहे. स्वातंत्र्य काय आमच्या हयातीत अगर आमच्या नंतर
एक ना एक दिवस मिळेलच. पण त्याची काळजी करणे आमचे हाती नाही. निष्ठेने काम करणे
इतकेच आपले काम. तेवढेच नीट करा म्हणजे पुरे.
सदुभाऊ :
फळाची इच्छा न धरता काम करीत राहणे हे आपले मत मला मानलेच पाहिजे.
प्रेरणा (८)
एक दिवस आप्पांना सदुभाऊंनी विचारले, 'आप्पा, एक प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्यावर
राज्य कोण करणार ?’
आप्पा :
हा प्रश्न विचारण्याचे कारणच नाही. ब्रिटिशांनंतर लोकशाहीचा उदय होईल. निवडणुका
होतील. निवडून येणारे आमचे लोक आमच्यावर राज्य करतील.
सदुभाऊ :
ते मी समजलो. पण कायदे अंमलात आणणारी नोकरशाही कोणती राहील ? ती बदलेल का ?
आप्पा : हा प्रश्न माझ्या
लक्षात आला नाही. कायदे करणारे लोक बदलले मग ते अंमलात आणणारे कोणीही असले तर काय
बिघडले ? दुसरे लोक येतील अगर हेच लोक असतील. हा प्रश्न
तुम्ही मला का विचारला ते तरी नीट सांगा.
सदुभाऊ :
हीच नोकरशाही पुढे राहणार असली तर कायदे करणाऱ्याच्या डोक्यावर मिरे वाटल्याशिवाय
राहणार नाही. कायद्यातून पळवाटा कशा काढायच्या हे ही नोकरशाही पूर्ण जाणते. आप्पा, तुम्हा
गांधीवाद्यांना ही नोकरशाही कशी अगदी फुलासारखी वागविते. त्यामुळे तुम्ही अगदी
फुलून जाता. तुमच्याप्रमाणे आम्ही आमच्या देशासाठीच काम करतो आहोत ना ? मग तुमच्याइतके नाही पण थोडेतरी सौजन्य आम्हांस त्यांनी दाखवावयास नको का?
आमची इतकी छळवणूक होते, मारबडव होते की काही
विचारू नका. मारबडव तर होतेच पण उपाशी ठेवणे, बर्फाच्या
कांड्या पृष्ठभागात घालणे, रक्तबंबाळ होऊन चामडी लोळू
लागण्यापर्यंत भरमाप्पाने मारणे हे तर त्यांचे नेहमीचेच खेळ आहेत. काहीजण माराने
मेले तर त्यांची कायदेशीर विल्हेवाट लावली जाते. सिव्हील सर्जनही त्यांचाच दोस्त
असतो ना ? फक्त वरच्या अधिकाऱ्याला खूष करण्यासाठी हे सर्व
चालते. नोकरशाहीची यंत्रणा इतकी अजब आहे की हीच नोकरशाही पुढे राहिली तर
याच्यापेक्षा निराळे काही घडेल असे मला तरी काही वाटत नाही.
आप्पा : तुम्ही कराल ते
झटदिशी कबूल केले असते व होईल ती शिक्षा भोगली असती तर झाले असते. तुम्ही तसे का
केले नाही ?
सदुभाऊ :
तुम्हाला मी ते कसे पटवून देऊ तेच मला समजत नाही. एखादे गुप्त काम करायचे झाले तर
किती लोकांचे साहाय्य घ्यावे लागते याची तुम्हाला कल्पना आहे का ? तुम्ही पुढारी
‘करू नाही तर मरू’ ही घोषण देवून मोकळे झालात.
आमच्या टपाल लुटीचे उदाहरण घ्या.
दोनदा प्रयत्न फसले. तिसऱ्यावेळी आम्ही यशस्वी झालो ते किती लोकांच्या सहाय्याने.
याप्रकरणात आम्ही वीसजण होतो. पण सातजण उजेडात आलो. आम्ही सातजण बाहेरच्या
लोकांच्या म्हणजे जज्ज व वकिलांच्या
मदतीने या खटल्यातून सुटलो. हे प्रकरण तुम्हाला समजणार नाही. बाकी लोकांचा बचाव
करणे हे आमचे कर्तव्यच होते. हीच नोकरशाही पुढे राहिली तर तिचा काही उपयोग होईल
असे मला वाटत नाही.
आप्पा :
ही गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे हे मी कबूल करतो.
प्रेरणा (९)
‘स्वातंत्र्याचे फायदे’ या विषयावर एकदा बोलताना सदुभाऊंनी
आप्पांना विचारले,
सदुभाऊ :
स्वातंत्र्य मिळाल्याने आम्ही स्वराज्यात राहू. ठीक, स्वराज्याचे फायदे कोणते आहेत ते मला समजावून
सांगा.
आप्पा :
१) आज जे ब्रिटिश लोक पगाराच्या,
व्यापाराच्या व इतर बाबतीत जी लूट करतात ती थांबेल.
२) आता व्हॉईसरॉय व गव्हर्नर फिरतीवर आले की त्यांच्या
रक्षणार्थ जो पोलीस बंदोबस्त असतो तो अवाढव्य खर्च आमच्याच लोकांनी त्या जागा
भूषविल्यामुळे कमी होईल.
३) आता लोकांना दारू पिणे व इतर जी व्यसने आहेत ती सर्व नष्ट
होऊन लोक निर्व्यसनी व सदाचारी बनतील.
४) देशातील गरीबी व श्रीमंती यातील भीषण दरी पुष्कळच कमी होईल, सर्वांना उद्योगधंदा
मिळेल.
५) शेजारच्या राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित झाल्याने
युद्धाचा धोका कमी होईल. सैन्यात कपात करून तो खर्च वाचविता येईल. सदाचारी लोक
वाढल्यामुळे जेलसुद्धा कमी करावे लागतील. हाही खर्च वाचेल. अर्थात हा खर्च
पूर्णपणे वाचणार नाही तरी बराचसा कमी करता येईल.
६) आयात करावयाचा माल कमी प्रमाणात असेल, निर्यात करण्याच्या
मालात बरीच वाढ होईल. शेतीतही चांगली वाढ झाल्याने धन्यचे उत्पन्न वाढेल.
उद्योगधंदे आपल्या देशातच सुरु होतील. एकंदरीत आपण सार्वजन सुखी व संपन्न होऊ.
७) गांधीजींची तत्त्वे, खादी ग्रामोद्योगही वाढीस लागतील व
महात्माजींनाही आपला प्रयोग यशस्वी झाला म्हणून अंड होईल.
सदुभाऊ : तुमचे
हे भविष्य खरे ठरो व सर्वांच्या तोंडात साखर पडो हीच देवाजवळ प्रार्थना !
प्रेरणा (१०)
‘थेंबे थेंबे तळे साचे' प्रेरणा ते आचरण
सदुभाऊंनी आप्पासाहेब पटवर्धनांच्या
सल्ल्यानुसार वागण्यास सुरुवात केली. सुताचे धागे मोजून ठेवणे, लडी झाल्यावर किमत
जमेस धरणे, कपडे जपून वापरणे वैगैरे गोष्टींची वागणूक जेलमध्ये असतानाच सुरु केली.
या सर्व प्रयत्नाचा जमाखर्च सदुभाऊंच्या नोंद वह्यात दिला आहे. प्रारंभी रोख रकमा म्हणजे २-४ आणे
होत्या. आताच्या मानाने त्या नगण्यच होत्या. परंतु त्या जमवल्या जात होत्या.
तुरुंगातून बाहेर आल्यावर नातेवाईक, मित्र, दुकानातील कामगार यांना काटकसर करून या फंडात रकमा जमा करण्यास त्यांनी प्रोत्सात्न दिले. त्याचे तपशील त्यांच्या नोंद
वहीत आहेत .एवढेच काय! रस्त्यात सापडलेले २ आणे अशी नोंद देखील आहे.
स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्नेही मित्र या काटकसरीच्या आवाहनाला थोडाफार
प्रतिसाद देत. पण स्वातंत्र्यानंतर हा
संकल्प फक्त सदुभाऊचाच राहिला. त्यांनी याबचतीसाठी बँकेत खाते उघडले होते, त्यावर
काही व्याज जमा होत होते. सदुभाऊचा संकल्प १९८६-८६ पर्यंत चालू होता. पत्नी
रमाच्या निवर्तनानंतर त्यांनी ही जमा झालेली सुमारे ४६,००० हजारांची गंगाजळी विविध संस्थाना
देणगी रूपाने दान दिली. विविध संस्थांना
दिलेल्या रकमेचा हिशोब त्यांच्या नोंद वह्यात आहेत.
आप्पासाहेव पटवर्धनांबरोबर जेलमध्ये
झालेल्या संवादातून मिळालेली प्रेरणा त्यांनी व्रत रूपाने अंगिकारली.
Comments
Post a Comment