आखिरी गांव या
पहला गांव !
या वर्षीचा प्रजासत्ताक
दिवस विशेष होता. भारत चीन सीमेवरील शेवटच्या गावात; ‘किबिथू’ मध्ये स्थानिक गावकरी, भारत-तिब्बत सीमा
सुरक्षा बल आणि भारतीय स्थलसेना यांच्याबरोबर एकत्रित ध्वजारोहण आणि सांस्कृतिक
कार्यक्रमात सहभागी होता आले. त्याच दिवशी संध्याकाळी भारत-चीन सीमेवरील मॅकमोहन
सीमारेषेवरील शेवटचे ठाणे ‘वाचा पोस्ट’ ला भेट दिली. सीमेपलिकडील चीनमधील गावातील
घरं, विकसित होत असलेले रस्ते,मोबाइल
टॉवर पाहता आले. या प्रवासात सीमेजवळील गावे-वस्त्यांमधील शासकीय अधिकारी, सुरक्षा
दलांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या सदस्या, शालेय शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी, गावकरी यांना भेटता आले. त्यांची
संस्कृती, त्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या. प्रवासाचे
निमित्त होते ‘ व्हायब्रंट विलेज योजना’ समजून घेणे आणि त्यात सहभागच्या संधी शोधणे.
‘व्हायब्रंट विलेज योजना’ भारत सरकारचा महत्त्वाचा आणि प्राधान्याचा प्रकल्प आहे. भारताच्या
उत्तर सीमेवरील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील खेड्यांचा
सर्वांगीण विकास करण्याची व्हायब्रंटविलेज ही योजना आहे. सीमेवरील गावांमधील
स्थलांतर थोपवण्यासाठी रस्ते, वीज, संपर्क
व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, उपजीविकेची साधने यासारख्या अत्यावश्यक सुविधा वेगाने निर्माण करण्यावर या
योजनेत भर आहे.
गेल्या आठवड्यात इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये 'इंडिया मोमेंट' या विषयाची मांडणी करताना मा.
पंतप्रधानांनी व्हायब्रंट विलेज योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘ अब जैसे वाइब्रेंट विलेज योजना है। दशकों तक बॉर्डर के हमारे गांवों को आखिरी
गांव माना गया। हमने उन्हें देश का पहला गांव होने का विश्वास दिया,
हमने वहां विकास को प्राथमिकता दी। आज सरकार के अधिकारी, मंत्री इन गांवों में जा रहे हैं, वहां के लोगों से
मिल रहे हैं, वहां लंबा वक्त गुजार रहे हैं।‘
‘सीमेवरील गावाला शेवटचे गाव म्हटले किंवा पहिले गाव म्हटले’
खरंच काही फरक पडतो का?
भारतातून अरुणाचल
प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील वॉलोंग भागात चीन सीमेजवळ किबिथू, काहो या
शेवटच्या वस्त्या आहेत. पण आपण 1962 च्या आक्रमणाच्या वेळेचा
विचार केला तर चीनचे आक्रमण अंगावर घेणारी ही पहिली गावे आहेत. त्यांना पहिली गावे
म्हणणे रास्त आहे. एखाद्या गावाला रचनेमध्ये शेवटचे म्हणतो तेव्हा तेथे विकासाची
गंगा शेवटीच पोचते. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यांचे प्राधान्य बदलायचे असेल;
सीमेवरील नागरिकांच्या मनात देशाबद्दलचा विश्वास दृढ करायचा असेल तर
या गावांना पहिले गाव म्हटले योग्य आहे.
‘शेवटचे गाव – पहिले गाव’ यासारखी शब्द योजना आपण जेव्हा बदलतो
तेव्हा एखादी गोष्ट वेगळ्या दृष्टीकोनातून, वेगळ्या
परिप्रेक्षातून बघितली जाते.
त्यामुळे उद्दिष्टाचे नव्याने दर्शन होते.
भारतीय सैन्य अकादमी, राष्ट्रीय
संरक्षण प्रबोधिनी अशा सैन्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करणाऱ्या संस्थांमध्ये
अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या पासिंग आऊट परेडच्या वेळी जी शेवटची पायरी ओलांडावी
लागे त्याला ‘अंतिम पग-Last Step’ म्हटले जाई.
काही वर्षापूर्वी ‘अंतिम पग-Last Step’ यात बदल करून या
टप्प्याला ‘पेहला कदम- First Step’ म्हणण्यास
सुरुवात झाली. ‘अंतिम पग’ प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे दर्शवतो पण प्रशिक्षण हा पहिला
टप्पा आहे. खरे काम तर सेवेत दाखल झाल्यावर करायचे आहे. सेवेची सुरुवात करण्यासाठी
प्रशिक्षण असते हे विचारात घेतले तर ‘पेहला कदम’ मोठ्या उद्दिष्टाकडचा प्रवास
दर्शवतो आणि 'काम अभी बाकी हैं' याचे
भान निर्माण करतो.
शाळा-महाविद्यालये, नोकरी यातील शेवटच्या कार्यक्रमाला
निरोप
समारंभ म्हणायचे का शुभेच्छा समारंभ ?
प्रधानमंत्री म्हणायचे का प्रधान सेवक !
भारत-चीन युद्ध कथा पराभव म्हणून मांडायचा का
पराक्रमाची गाथा म्हणून ?
पानिपत लढाईच्या दिवसाला पराभवाचा दिवस म्हणायचे का शौर्य दिवस
म्हणायचे ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची हत्या
केली का अफजल खानाचा वध!
वॉस्को द गामाने भारताचा शोध लावला का वॉस्को द
गामा भारताच्या किनाऱ्याला पोचला !
शब्द योजना छोट्याच असतात, पण त्यामुळे उद्दिष्ट बदलते, त्यामुळे कामातील सहभाग व परिणामी कामाचा परिणाम सांगणारे कथनच बदलते.
काय कथन ऐकतो त्यानुसार दृष्टिकोन तयार होतो.
काय आणि कसे कथन केले
जाते यावरच समाजमन आणि समाजभान तयार होते.
जंगलाची गोष्ट जंगलाचा राजा सांगणार का जंगलातील
शिकारी !
भारतीय समाजाने आपली सांस्कृतिक गाथा कशी
मांडायची
हे आपणच
भारतीयांनीच ठरवायचे!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
सुंदर, वाक्य छोटी असली तरी त्यातून मानसिकतेचे प्रदर्शन होत असते. अन् त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील कळतो.
ReplyDeleteव्वा! सुरेख मांडणी. परिणाम लक्षात घेऊन बोलताना असाही विचार करायला हवा. नवीन दृष्टिकोनाकडे घेऊन जाणारा पहला पग पुढे केला आहे.
ReplyDeleteBest ..vegala v Chan vichaar
ReplyDeleteआवडला लेख प्रशांत सर
ReplyDeleteशब्दांचा उपयोग करताना वरवरचा विचार आणि त्याच्या विविध अंगांचा काळजीपूर्वक विचार केल्यास प्रेरणेत पडणारे महदंतर हे उत्तम रित्या उलगडून दाखविले आहे. असे इतरत्र पाहण्याची दृष्टी या चिंतनातून मिळते. धन्यवाद.
ReplyDelete👍🏼 👍🏼
ReplyDelete👌🙏
ReplyDeleteमोठा परिणाम साधणारा छोटासा बदल.
ReplyDeleteखूप छान मांडणी
नेहमी प्रमाणेच खुप छान लिहीलय सर.... अगदी सहज आणि सोपं.
ReplyDeleteव्यापक दृष्टिकोण तयार करणारा लेख
ReplyDelete