*शिक्षक
संवाद : १ : शिक्षक दिनानिमित्त*
सस्नेह
नमस्कार,
नुकतीच
एक कथा वाचनात आली : 'पद्मनाभ गुरुजी वर्गात एकदा
विद्यार्थ्यांच्या 'आकांक्षांची चाचणी'
घेत होते. ‘तू कोण होणार?' हा त्यांचा प्रत्येक
विद्यार्थ्यांला प्रश्न होता. 'मी विधिज्ञ होईन', 'मी स्थापत्यवेत्ता होईन', 'मी गणितज्ञ होईन',
ही सामान्य उत्तरे होती. 'मी इंजिनचालक होईन',
'मी नावा बांधीन', ही औत्सुक्य निर्माण करणारी
उत्तरे होती. 'मी जादूगार होईन', 'मी
कोंबड्यांचा व्यापारी होईन', ही ही वर्गात हसू पिकवणारी
उत्तरे होती.
छोट्या
वांचीचा क्रम यायचा होता. त्याला वाटत होते आपल्या मनातील उत्तर कोणी देऊ नये. वांचीची
पाळी आली तेव्हा आपली आकांक्षाच जणू सफल झाली आहे अशा प्रसन्न मुखाने त्याने उत्तर
दिले,
'मी साधू होईन!
हे
ऐकताच हास्याचा; उपहासाचा कडेलोट झाला. पाच मिनिटे सर्व वर्ग
हसत राहिला. 'जय अलख निरंजन' करणाऱ्या
वैराग्याच्या वेशात काही विद्यार्थी वांचीला बघू लागले. धुनी पेटवून अंगावर राख
फासून बसणाऱ्या बाबांची बालमूर्ती काही विद्यार्थ्यांना वांचीत दिसू लागली.
पद्मनाभ
गुरुजी हसले खरे; पण त्यांनी ते उत्तर खरे म्हणून
स्वीकारले, तरीही त्यांच्या प्रश्नाला ते उत्तर नव्हते.
त्यांनी विचारले, 'साथू म्हणजे काय रे?" काही दिवसांपूर्वी कीर्तनात ऐकलेले विवेचन गुरुजींना ऐकवण्याचे धाडस
वांचीच्याने होईना. त्यातच पुन्हा विद्यार्थ्यांच्या उपहासाने तो कोलमडला होता,
कोमेजला होता. त्याने त्रोटक उत्तर दिले, 'सत्पुरुष."
"बरोबर आहे!" गुरुजींनी त्याला धीर दिला.
"पण मी विचारले ते कुठला व्यवसाय करणार या उद्देशाने. सत्पुरुष
किंवा साधू हा व्यवसाय नव्हे, नाही का?" वांचीला चूक समजली. तो म्हणाला, 'मी शिकेन आणि मला
चांगला वाटेल तो व्यवसाय करीन. आता काहीच मला सुचत नाही!"
(संदर्भ: 'अपरिचितांच्या कांतीकथा गोपाळ गोडसे
यांच्या पुस्तकातील वांचीनाथ अय्यर या क्रांतिकारकाच्या जीवनकार्यदर्शन कथेतून)
आपण
वर्गात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांबद्दल विचारतो, त्यांच्या आकांक्षा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यांचे
संकल्प माहिती करून घेतो. आपल्या विद्यार्थ्याने वांचीसारखे उत्तर दिले तर आपण
त्याला कसा प्रतिसाद देणार? पण आज आपल्या वर्गात एखाद्या
विद्यार्थ्याने वांचीसारखे उत्तर दिले, तर एक शिक्षक म्हणून
आपण त्याला कसा प्रतिसाद देणार?
आज
पालक आणि शिक्षक दोघेही विद्यार्थ्यांबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत. त्यांना
त्याची बुद्धिमत्ता कशी आहे, त्याचा कल काय आहे, क्षमता काय आहेत, त्याची आकांक्षा काय आहे, त्याची अभिरुची काय आहे, अशा अनेक गोष्टींबद्दल
जाणून घ्यायचे आहे; कारण आजच्या समाजात मुलांचे शिक्षण,
नोकरी आणि सुरक्षित भविष्याबद्दल एक प्रकारची 'सामाजिक अस्वस्थता' आहे.
सध्या
कोणत्याही मुलाखतीत एखाद्या व्यक्तीबद्दल विचारले, तर
अनेकदा सहज उत्तर ऐकायला मिळते— ‘तो चांगला माणूस आहे.’ म्हणजेच, अंतिमतः ‘चांगला माणूस’ व्हावे, ही सर्वांचीच एक
सुप्त अपेक्षा असते. पण खरंच वर्गात एखाद्या विद्यार्थ्याने, वांचीप्रमाणे, ‘मला चांगला माणूस किंवा सत्पुरुष
व्हायचे आहे’ अशी जीवनमूल्यविषयक आकांक्षा व्यक्त केली, तर त्याला
आपला प्रतिसाद काय असेल ? आपण त्याचा नेमका अर्थ कसा समजून घेणार?
‘चांगला माणूस’ म्हणजे त्याच्यासाठी नेमके काय? त्याच्यामध्ये
कोणते गुण असावेत, कोणत्या मूल्यांनुसार त्याला जगायचे आहे,
कोणती कृत्ये त्याला त्या दिशेने घेऊन जातील आणि अशा
व्यक्तिमत्त्वाची घडण करण्यासाठी तो स्वतःमध्ये काय विकसित करू इच्छितो—हे
आपल्याला त्याच्याकडून जाणून घ्यावे लागेल. अशा प्रश्नांमधून विद्यार्थ्याच्या
आकांक्षेतील आंतरिक गुणविशेष, मूल्यदृष्टी आणि
व्यक्तिमत्त्वाची दिशा उलगडू लागेल.
अशी
वांचीसारखी आकांक्षा असलेले विद्यार्थी कोणत्या आकांक्षा बाळगत असतील? अशी आकांक्षा बाळगणारे विद्यार्थी मूल्याधिष्ठित जीवन जगू इच्छितात. अशा
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दिशा समजून घेण्यासाठी आपल्याला 'मानवी मूल्यांची' ओळख करून घ्यावी लागेल. अशा
गुणवाचक चाचणीत व्यक्तीची मूल्ये, नैतिकता, सद्गुण, सामाजिक जबाबदारी, म्हणजेच
त्याच्या मानवी मूल्यांची दिशा समजणाऱ्या गोष्टी लागतील.
अशा
यादीत येणारे गुण जसेः सत्यप्रियता - कोणत्याही
परिस्थितीत सत्याची साथ देणे व नेहमी खरे बोलणे, प्रामाणिकपणा - आपल्या कामात, विचारात आणि वर्तनात पारदर्शकता ठेवणे, कर्तव्यनिष्ठा - सोपवलेली जबाबदारी
पूर्ण निष्ठेने पार पाडणे, दयाळूपणा - इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना
मदतीचा हात देणे, सहकार्यशीलता - संघात/गटात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची
वृत्ती, शिस्तप्रियता नियमांचे पालन करणे, वेळेचे भान ठेवणे, नम्रता - यशाचा
अहंकार न ठेवता साधेपणाने व आदराने वागण, .परोपकार-स्वार्थाच्या पलीकडे जाऊन
समाजहितासाठी काम करणे, सज्जनता - अत्यंत सभ्य, सुसंस्कृत
आणि विवेकवादी वर्तन ठेवणे, धैर्य - संकटाच्या प्रसंगी डगमगून न जाता योग्य व
नैतिक निर्णय घेणे.
अशा
अनेक गोष्टी या यादीत येऊ शकतील. अशा मूल्यांच्या मापनाची चाचणी खरंच करता येईल का? करायची गरज आहे का? दुसन्याला आपल्याबद्दल कळावे अशी
यासाठीची चाचणी असावी, की ती विद्यार्थ्याची स्वतःची 'स्व-मूल्यमापन चाचणी' असावी?
एक
अध्यापक म्हणून : अभ्यासक्रम, करिअर अशा आकांक्षांच्या
पलीकडे जाऊन वांचीसारख्या आकांक्षा व्यक्त करणारे विद्यार्थी खरंच आपल्याला आजच्या
आपल्या शालेय वर्गात अपेक्षित आहेत का?
वांचीसारखी
जीवनमूल्यविषयक आकांक्षा विकसित होण्यासाठीचे अनुभव आपण त्यांना देऊ शकू का?
विद्यार्थ्यांमध्ये अशा
जीवनमूल्यविषयक आकांक्षा विकसित करण्यासाठी आपण शाळांमध्ये कोणते शैक्षणिक अनुभव देऊ
शकतो?
एक 'आचार्य' म्हणून
आपल्या स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून आणि
विचारांतून आपण अशा कोणत्या जीवनमूल्यांचे दर्शन विद्यार्थ्यांपुढे घडवू शकत आहोत? याबद्दल येत्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने विचार करत राहू या.
सस्नेह
प्रशांत दिवेकर, ज्ञान प्रबोधिनी, पुणे
५ September २०२६, शिक्षक दिन
*To get
updates on Dialogue with educators, subscribe*
https://whatsapp.com/channel/0029VaB2KBu7T8bXMcsIKb3o
छान..
ReplyDeleteअंतर्मुख करायला लावणारा लेख ..! सुंदर ..!!
ReplyDeleteनिगडी केंद्र: माध्यमिक विभाग: अध्यापक प्रतिसाद
ReplyDeleteशिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट अधिक चांगले कळले
आपण man making जे शिक्षण देतो ते याच्याशी पूरक आहे असे कळले
अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी वृत्तीघडणीसाठी शिक्षण असे प्रबोधिनीचे तत्व अधिक appeal झाले.
इतर शाळांमधील शिक्षण जेवणदायी व आपल्या शाळेतील यासह जीवनदायी अधिक प्रकर्षाने जाणवले
पाठ्यपुस्तकातील धड्यामधून मूल्ये पोचवण्याचा अधिक प्रयत्न
शिक्षक असताना आचार्य म्हणून कुठवर पोचलोय असे आत्मपरीक्षण करायला हवे
वांचीचे उत्तर चांगला मनुष्य म्हणजे काय हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी काय करायला हवे याचा अध्यापकांचा विचार अधिक सखोल हवा
विद्यार्थी अनुकरणप्रिय असल्याने आपल्यात उताऱ्यातील जीवनमूल्ये आहेत ना याचा विचार हवा.
विद्यार्थी अध्यापकांवर असलेला बाहेरील आकर्षणांचा (उदा. mobile) नको इतका प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न हवेत.
नैतिक मूल्ये जपणारे अध्यापक असतील तर विद्यार्थ्यांपर्यंत ती मूल्ये
पोचविणे सुलभ होते.
अध्यापकांचा भावनिक विकास खूप चांगला झालेलाच असावा
chatgpt वर दोन दिवसांपूर्वी झालेला प्रसंग ethical संदेशांबद्दल share केला.
आपण अध्यापक म्हणून मनाने परिवर्तनशील, पारदर्शक, निर्मळ आहोत का याचा विचार हवा.
समाजात अशा अध्यापकांची गरज जाणवली व ते आपण असायला हवे हेही लक्षात आले.
मूल्यांसाठी मनुष्याचीच शिक्षकाचीच ) गरज आहे.
आपण अध्यापक म्हणून जितके जास्त नियमबद्ध असू तितकी जास्तीत जास्त जीवनमूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जास्तीत जास्त सक्षम होऊ नि यासाठी अखंड प्रयत्नरत राहायला हवे.