ओळख कीटकभक्षी वनस्पतींची
प्राण्यांचा आपले अन्न म्हणून वापर
करणाऱ्या अर्थात मांसाहारी वनस्पती तुम्ही मानव साहित्यिकांच्या कल्पनांचे नेहमीच
आकर्षण ठरले आहेत. मित्रांनो, तुम्ही अशा मोठ्या प्राण्यांना अगदी मनुष्याससुद्धा खाणाऱ्या
वनस्पतींच्या गोष्टी वाचल्या असतील. अशा गोष्टी अर्थातच पूर्णपणे काल्पनिक आहेत.
अरे! माझी ओळख करून द्यायची विसरलो.
मी आहे एक कीटकभक्षी वनस्पती, ‘दवबिंदू.’
पृथ्वीतलावरील वनस्पती वर्गातील आम्ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहोत. माझे अनेक
भाऊबंद आहेत. पृथ्वीतलावर तुम्हा मानवांसकट सर्व प्राणी, अन्नासाठी आम्हा
वनस्पतींवर अवलंबून आहेत. पण मानव आणि इतर प्राणी आम्हा वनस्पतींच्या अबोल,
संयमिपणाचा गैरफायदा घेत आहेत. आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणावर वनस्पतीजीवन
नष्ट करत आहेत. अशा पृथ्वीतलावर आम्ही कीटकभक्षी वनस्पती अशा आहोत की ज्या शांतपणे, अशा
अधाशी कीटकांचा बदला घेत आहोत. त्यांचा बळी
घेऊन आपली अन्नाची गरज भागवत आहोत.
आम्हा कीटकभक्षी वनस्पतीत, असे काही अवयव
आणि यंत्रणा असतात की ज्याच्या सहाय्याने आम्ही प्राण्यांना पकडू शकतो. अरे! पण म्हणून
मला घाबरते कारण नाही. कारण आम्ही जास्तीत जास्त फुलपाखरू, नागतोडा एवढ्या मोठ्या
आकाराचा प्राणी (कीटक) पकडू शकतो. आम्ही म्हणजे मी ‘दवबिंदू’ आणि माझे भाऊबंद
घटपर्णी, यु्ट्रीक्युलारीया, सरसिना, व्हिनस फ्लायट्रॅप आदी आमच्या शरीरात
असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण, यंत्रणांच्या सहाय्याने कीटकास पडतो. व्हिनस फ्लायट्रॅपकडे अशी पानांची जोडी असते की
जी किटकांचा स्पर्श झाल्यावर ताबडतोब मिटते व कीटक त्या दोन पानांत पूर्णपणे फसतो.
आम्ही प्रामुख्याने दलदलीच्या प्रदेशात
किंवा भरपूर पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीवर, दमट जागी वाढतो. असा अधिवास आमच्या
वाढीस योग्य असतो. पण अशा ठिकाणची माती आणि पाणी आम्लधर्मीय असून त्यात क्षारांची
कमतरता असते. म्हणूनच नत्र प्रथिनयुक्त् पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी आम्हाला कीटकांवर
अवलंबून राहावे लागते. कीटक पकडल्यावर पाचक ग्रंथीतील पाचक रसांच्या सहाय्याने आम्ही
त्यांचे पचन करतो व नत्र प्रथिनांची कमतरता भरून काढतो. करणार काय ‘जिवो जीवस्य जीवनम्.....’
‘मला भेटायचंय’ थांबा! आधी माझ्या कुटुंबाची
ओळख करून देतो आणि मग मी कुठे भेटेन, मला कसे ओळखायचे ते सांगतो. माझे इंग्लिश नाव
‘सनड्यू’. वनस्पतीशास्त्रात मला ‘ड्रॉसेरा’ या नावाने ओळखतात. मी ड्रॉसेरा कुटुंबाचा
सदस्य आहे. आम्हा ड्रॉसेरा भावांपैकी ड्रॉसेरा इंडिका, ड्रॉसेरा बर्मानी आदी भारतात
राहतात. मला भेटायला कुठे लांब जायची गरज नाही. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या शेवटी
डोंगर उतारावर, डोंगर पठारावरील गवताळ रानातून, भात खाचरातून मी वास्तव्य करून
असतो. कोकण, पन्हाळा, अंबोली, महाबळेश्वर, लोणावळा एवढेच काय तोरणा किल्ल्याच्या
परिसरात देखील मी राहतो.
हां, मला भेटायचं असेल तर तुमच्या
जवळ सूक्ष्म निरीक्षण शक्ती असायला हवी. कारण माझा आकार काही सेंटिमीटर एवढाच असतो.
माझ्या शरीरावरची लव चिकट द्रव्य स्त्रवतात. हा चिकट स्त्राव केसांच्या टोकाला असतो
व दवबिंदूसारखा दिसतो म्हणून मला ‘दवबिंदू’ म्हणतात. सूर्यप्रकाशात हे दवबिंदू चमकतात तेव्हा माझे सौंदर्य
तुम्हाला हेवा वाटेल असे असते. म्हणूनच मला इंग्लिशमध्ये सनड्यू म्हणतात. कीटक या लाकाकणाऱ्या दवबिंदूकडे आकर्षित होतात.
एकदा का कीटक माझ्या जवळ आला की तो माझ्या ग्रंथीमय केसांच्या चिकट स्त्रावात फसतो.
अंगावरील ग्रंथीमय केस त्या कीटकाला सर्व बाजूंनी वेढून टाकतात व तो कीटक मृत
पावतो. ग्रंथीतून पाचक रसांचे स्त्रवन होऊन कीटकातील प्रथिनयुक्त पदार्थाचे पचन
होते. पचन पूर्ण होईपर्यंत ते त्या स्थितीत राहतात. पचन झालेले शरीरात शोषले
जातात.
पश्चिम महाराष्ट्रातील लोक मला विंचवीचा
पाला या नावाने देखील ओळखतात. अरे ‘घटपर्णी’ तू कधी आलीस? थांब हं! तुझी ओळख करून
देतो. ही माझी बहिण घटपर्णी. ही वैशिष्ट्यपूर्ण घटामुळे वनस्पती अभ्यासकांबरोबर सर्व मानवाचेच
ती आकर्षण ठरली आहे. अनेक मासिकांतून हिची छायाचित्रे कायम प्रकाशित होत असतात.
भारतात आसाम व मेघालयात गारो, खासी, जेन्तिया टेकड्यांच्या परिसरात सापडणारी ही
महत्त्वाची कीटकभक्षी वनस्पती आहे. इंग्लिशमध्ये हिला ‘पिचर प्लांट’ म्हणतात.
भारताबरोबरच श्रीलंका, मादागास्कर, न्यू गिनिया आदी उष्ण कटिबंधीय प्रदेशात घटपर्णीचे
७० प्रकार सापडतात. घटपर्णीच्या वाढीस दमट व ओलसर परिसर आदर्श असतो. घटपर्णीचे वेल
असतात व लतातंतूंच्या सहाय्याने ती आधारावर वाढते. लतातन्तुंच्या टोकाशी
वैशिष्ट्यपूर्ण असा घट असतो. घटाचे मुख एका झाकणीने संरक्षित केलेले असते. तर घट चमकदार अशा लाल लाल हिरव्या रंगाचे असतात
व त्यावर ठिपक्याचे नक्षीकाम असते. घटाच्या मुखाशी मधू स्त्रावणाऱ्या ग्रंथी असतात.
ह्यामुळे घटाकडे कीटक आकर्षित होतात. घटाचा आतील पृष्ठभाग अतिशय बुळबुळीत
आणि घटात खालच्या दिशेने वळलेले केस असतात, त्यामुळे कीटकाने एकदा का घटात प्रवेश
केला की त्याला बाहेर पडणे अशक्य होते. घटाच्या तळाशी असलेले पाचस्त्राव त्याचे
पचन करतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण घटपर्णीच्या घटाची लांबी २ ते २५ सें.मी. आढळते.काही ठिकाणी घटात छोटे
पक्षी, बेडूक फसल्याच्या नोंदी आहेत.
भारतात मी दवबिंदू, घटपर्णी, यु्ट्रीक्युलारीया
या सारख्या कीटकभक्षी वनस्पती सापडतात.
आम्हा कीटक भक्षी वनस्पतीत स्त्रवणारे पाचकरस तुलनेने अतिशय विरळ असतात. अर्थात, जोपर्यंत
माणूस एखाद्या कीटकापेक्षा आकाराने मोठा आहे तोपर्यंत तरी त्याला आमची भीती
बाळगण्याची गरज नाही. मग! पावसाळ्याच्या शेवटी सह्याद्रीत मला भेटायला येणार ना!
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
छात्र प्रबोधन , सौर चैत्र शके १९२३ मध्ये प्रकाशित
Comments
Post a Comment