आज जागतिक पुस्तक दिवस आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संवादिनीच्या शिरूर गटासाठी 'वाचन समृद्धी' या विषयावर एक व्याख्यान दिले होते.
या सत्रानंतर संवादिनी गटातील सुषमाताई बोरा यांनी सत्राच्या मांडणीतील आशय सूत्रबद्ध रुपात संकलित केला होतो.
आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांनी मांडलेला सूत्रबद्ध आशय साभार ब्लॉगवर पोस्ट करत आहे.
वाचन ,एक कला
विविध पुस्तकांसंगे घेऊ,
चला उंच भरारी ,
साथीने त्याच्या नक्कीच होईल ,
गोपालकाला औंदा भारी ।
जिथे ठरले जायाचे ,
तिथे तर आम्ही जाऊ,
चक्र फिरवण्या वाचण्याचे ,
झटपट तयार होऊ ।
दिमाखात झाली सुरुवात ,
पद्द्याने मासिक बैठकीची,
Fb पोस्ट,वर्तमानपत्र,
पाने चाळली कादंबरीची ।
पॅम्पलेट पासून पुस्तकांपर्यत,
घेतला गेला धांडोळा ,
जाहिरातीतही दडलेला असतो,
रूपकात्मक अर्थसोहळा ।
कशासाठी वाचतो ? ,
याचे असायला हवे ज्ञान,
माहिती ,अनुभव,मनोरंजन,
येते जगण्याचे भान ।
करून बघावी तुलना ,
पुस्तक व सिनेमात ,
स्वतः रंगवून कल्पनाचित्र,
गढून जातो वाचनात ।
भूगोलाच्या धड्या परी,
प्रवासवर्णनाने पडते ज्ञानात भर,
लेखकाच्या अनुभवासंगे,
घडत जाते जगाची सफर ।
कल्पनाविश्वात रमणं ,
हीच वाचनाची ताकद खरी,
अनुभव, वृत्ती, भाव रुपात,
समृद्धीची कास धरी ।
करा ठरवून वाचन ,
नको शब्दाक्षरांशी झगडा,
कृती करून वेगवेगळ्या,
वाढवा वाचनावरील पगडा ।
वर्णमालेशी करू मैत्री ,
होत जाईल वाचन शुद्ध ,
घेऊ वसा वाचनाचा ,
करण्या जीवन समृद्ध ।
रद्दीतही गवसेल परीस ,
जर असेल शोधक मती ,
स्पर्शीता पानापानाला ,
वाढेल आपली वाचन गती ।
चलचित्र व जाहिरातपट्टीची,
घालायला हवी योग्य सांगड ,
करून सवय, चढायला हवा ,
भरभर वाचनाचा गड ।
वाचता आत्मचरित्र ,
कळते जीवनातील डागडुजी,
त्यांच्या पायपीट,संघर्षापुढे ,
आपली दुःखं होतात खुजी ।
असेल आवड तर मिळेल सवड,
नको काही सबब ,
क्लुप्त्या करून निरनिराळ्या,
करा संकल्प अजब ।
रूप पालटून नावडतीचे,
खाऊ घालतो मुलांना भाजी ,
तसेच वाचण्या विविध प्रकार ,
आपले मनही करावे राजी ।
आधी खूप खूप ऐका,
ऐकण्या बरोबर वाचा ,
प्रक्रिया अविरत ठेवली तर,
सुरळीत होईल वाचन ढाचा ।
सारखा येता विचार मनी ,
घ्यावा थोडा विश्राम ,
रेघ आखून त्याखाली ,
चालू ठेवा काम ।
वाढवू खोली वाचनाची ,
झटकू या जुलमी आळस,
मजबूत करू वाचन प्रणाली,
गाठू या सुवर्णकळस ।
नीता, सोनालीताईंच्या प्रयत्नाने,
अभिवाचन झाले सुलभ,
प्रशांतसरांच्या शिकवणीने ,
दूर झाले शंकांचे मळभ ।
सौ. सुषमा बोरा ,
१२..८..२०२०
Comments
Post a Comment