Skip to main content

इतिहास शोधताना...

इतिहास शिकता- शिकवताना भाग ४

इतिहास शोधताना

जंगले मानवी वस्तीवर आक्रमण करत आहेत.......

जंगलाने काही वर्षात नगराला गिळंकृत केले.....

अशी वाक्य कथाकादंबऱ्यामध्ये अनेकदा वाचली होती. गेल्यावर्षी अंदमान निकोबारला गेलो होतो त्यावेळी रॉस बेटाला भेट दिली तेव्हा याची प्रत्यक्ष साक्ष मिळाली.

कोण्या एकेकाळी......आटपाट नगर होते.... अशा टॅगलाईनने सुरू होणारी इतिहासातील गोष्ट प्रत्यक्ष दृश्यमान होती.

आजचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट, पूर्वी रॉस आयलंड म्हणून ओळखले जात असे. अंदमान निकोबार बेटांची व्यवस्थापकीय राजधानी होती. समुद्रावरील ब्रिटीश वर्चस्वाचे प्रतीक होते.  रॉस  बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीसाठी देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्व्हेयर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जियोग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं.

रॉस स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश कॉलनीच्या ताब्यात होते. १८५० च्या सुरुवातीस, ब्रिटीश सरकारने रॉस बेटावर ताबा मिळवला आणि हे बेट ब्रिटीश सत्तेचे केंद्र बनले. ब्रिटीशांनी या बेटावर जवळपास 80 वर्षे राज्य केले. प्राचीन प्रेस्बिटेरियन चर्च, चीफ कमिशनरचा बंगला , बेकरी, चर्च, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, टेनिस कोर्ट, क्लबहाऊस,  हॉस्पिटल, स्मशानभूमी आणि इतर अनेक पायाभूत सुविधा उभारल्या. दुसऱ्या  महायुद्धाच्या काळात काही काळ या बेटांचा ताबा जपानकडे होता.

आज रॉस बेटावर ब्रिटीश आणि जपानी इमारतींचे जुने अवशेष विपुल प्रमाणात आहेत. रॉस बेट एकेकाळी पूर्वेचे पॅरिस म्हणून ओळखले जात होते.  बेटावर ब्रिटीशांची जी विलासी जीवनशैली होती त्याचा प्रत्यय देणाऱ्या इमारती अजूनही पाहायला मिळतात.

पण आज, निसर्गाने बहुतेक जमिनीवर; इमारतींवर पुन्हा दावा केला आहे. वड-पिंपळ वर्गीय वनस्पतींच्या मुळयांनी  आणि पारंब्यांनी  हे जीर्ण अवशेष वेढून गिळंकृत केले आहेत.

 


रॉस बेटाला  भेट दिल्यावर रुपेश श्रीवास्तव यांच्या एका  हिंदी कवितेतील काही ओळी आठवल्या


खंडहर की भी अपनी कहानी है,

देखा है इसने सभ्यता को बनते, बिगड़ते खत्म होते,

गूंजी हैं यहाँ असंख्य किलकारियां, ठहाकेरुदन और चीखें,

सजी हैं यहाँ तमाम डोलियांसेहरे और अर्थियां,

गवाह है ये अनेक किस्सों का, कहानियों का।


रहा था कभी शान इसका भी, झाड़ - फानूस से लदा हुआ

संगमरमर से सजा हुआ, दरबारियों से भरा हुआ,

रोशनी से जगमगाता हुआ, घुंघरुओं से छनछनाता हुआ,

गीत गाता हुआ, संगीत सुनाता हुआ।


अब ये वीरान है, धूल गर्दे से भरा है, अंधकार में डूबा है,

फिर भी ...आज ये देता है पनाह-

प्रेमियों को, पागलों को, राहगीरों को, चोरों को, पशुओं को, पक्षियों को।


कितना दिया हैकितना दे रहा है और ना जाने कितना देगा?

बनाने वाले इसे भूल गये, पर ये ना भूला, जबसे बना है,

बस दे ही रहा है ,बिना रुके बिना थके।


मिट जायेगा एक दिन, ये अंतिम अवशेष भी दब जायेंगे,

ज़मींदोज़ होकर भी छोड़ जायेगा कुछ निशानियाँ,

जिसे खोज निकालेगी कोई नई सभ्यता, लिखी जायेंगी फिर से किताबें,

गढ़ी जायेंगी फिर से कहानियाँ, नई कहानियाँ!

"खंडहर की भी अपनी कहानी है।"




काही दशकात रॉस बेटावरील माणसाच्या स्मृती होत्याच्या नव्हत्या झाल्या. तर काही शतके, सहस्त्रके मानवाच्या स्मृती स्वतःच्या पोटात सामावून घेतलेल्या अवषेशातून माणसाचे जीवन शोधणे किती आव्हानात्मक काम आहे!

काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या गटाबरोबर उत्खननात सहभागी झालो होतो. अभ्यासकांचे मिळालेल्या भांड्याच्या एका तुकड्याचे निरीक्षण करत, निरीक्षणांना प्रश्न विचारत त्याचा काळ निश्चित करण्याचे प्रयत्न चालू होते . निरीक्षण नोंदींना प्रश्न विचारत त्यावेळेच्या मानवास अवगत असलेले तंत्रज्ञान, त्याच्या गरजा, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने, त्याच्या सवयी, त्यांचे संबंध, त्यांच्या श्रद्धा जाणून घेत त्यावेळच्या संस्कृतीचे चित्र साकारण्याचा प्रयत्न करायचा हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे.

असे पुराव्यांचे तुकडे जोडत  दृश्यमान होत असलेले मानवी संस्कृतीचे चित्र जिगसॉ कोडयासारखे असते. ज्यातील बहुतांश तुकडे हरवलेले असतात.

नेहमीच्या जिगसॉ कोडयासारखे हे द्विमितीतील एका स्थळाचे चित्र नसते

तर त्याला काळाच्या मितीचा एक आयाम असतो.

 हे चित्र तयार करण्यासाठी सापडलेले , गोळा केलेले तुकडे वेगवेगळ्या काळातील असतात. इतिहास शोधताना असे ‘स्थळ-काळाचे’ कोडे सोडवण्यास शिकावे लागते.

इतिहास शिकता-शिकवताना, इतिहास शोधायला शिकणे-शिकवणे आणि इतिहास अभ्यासायला शिकणे-शिकवणे या दोन प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत.

या लेखमालेत या दोन प्रक्रियांचा अर्थ आणि त्यासाठी शिकणे-शिकवणे घडवण्यासाठीच्या साधनांचा परिचय आपण या लेखमालेत करून घेत आहोत. 

आपल्या आजूबाजूला विखुरलेल्या गोष्टीतून भूतकाळ जाणून घेणे मजेचे आणि आव्हानात्मक आहे. पण ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. शाळेत;वर्गात अशा प्रक्रिया घडवून आणता येतील.

आपल्या आजूबाजूच्या वर्तमानातील  गोष्टीत इतिहास दडलेला आहे याचे भान अभ्यासकाला असले तर

इतिहास शोधण्याची दृष्टी देणाऱ्या उपक्रमांची रचना शालेय अनुभवात करणे शक्य आहे. प्रश्न आहे अभ्यासकाने

असे इतिहासाचे भान जोपासत इतिहास शोधण्याची दृष्टी कशी विकसित करायची !

अगदी आपण रोज अनेक शब्द सहज वापरतो, त्यातपण इतिहास दडलेला असतो. अनेक गावांमध्ये विसावा मारुती, गावकूस मारुती, वेशीतील मारुती  अशा नावाची मारुती मंदिरे आज भरवस्तीत आढळतात. अंतयात्रा नेताना स्मशान लांब असेल तर वाटेतील विसावा म्हणून विसावा मारुती. गावकूस म्हणजे गावाची हद्द सांगणारी कच्चे वा पक्के बांधकाम असलेली भिंत, वेस म्हणजे गावाचे प्रवेशद्वार अशा भिंतीतील, वेशीतील मारुती मंदिर म्हणून  गावकूस मारुती; वेशीतील मारुती.     अशा मंदिरांच्या  आसपास असे बांधकामाचे अवशेष सापडतात. काही वर्षांपूर्वी पुण्यातील कसबा पेठेतील   मंदिरे पाहण्यासाठी  इतिहास प्रेमी मंडळाने योजलेल्या एक वारसा दर्शन सहलीत मोहन शेटे सरांबरोबर सहभागी झालो होतो. त्यावेळी गावकूस मारुती मंदिराशेजारी एका घराच्या नूतनीकरणासाठी पाया खणण्याचे काम चालू असताना गावाच्या कुसाच्या भिंतीच्या बांधकामाचे सापडलेले अवशेष बघितलेले आठवतात.

अशी आपल्या परिसरातील मंदिरे  कधी बांधली , त्याच्या सनदा, मंदिरात पूजा करणारे गुरव यांच्या वंशावळ्या, मंदिराला उपलब्ध असलेली जमीन अशी माहिती शोधत गेलो  तर त्यावरून गावाची हद्द कशी बदलत गावाचा विस्तार कसाकसा झाला असेल  याची कालरेषा मांडता येऊ शकेल.

माणसाचे इतर प्राण्यापेक्षा वेगळेपण म्हणजे भाषा. त्याला सापडलेले शब्द. आपण बोलताना जे शब्द वापरतो त्यात इतिहास दडलेला असतो. शब्द आणि इतिहास याचे नाते उलगडणारे अजून एक उदाहरण पाहू.

आपल्याला माहीत आहे की भारताचा खुश्कीच्या मार्गाने अरबस्तानातील देशांशी व तेथून पुढे  युरोपमधील देशांशी व्यापार चालू होता. पुढे कॉन्स्टंटिनोपल या शहरावरील युरोपचे नियंत्रण कमी झाल्यावर हा व्यापार टिकविण्यासाठी वेगवेगळ्या सागरी मार्गांचा शोध युरोपमधील देशांनी घेतला. तात्पर्य भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचत. या प्रवासात व्यापाऱ्यांबरोबर फक्त वस्तूंचा प्रवास होत नसे तर  वस्तूंबरोबर व्यापाऱ्यांच्या भाषेचा प्रवास पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात होत असे. हा व्यापारी मार्ग एका शब्दाची उकल करत कसा सापडतो ते एका उदाहरणातून पाहून.

चिंचेला इंग्रजीमध्ये टॅमरिंड (Tamarind) म्हणतात. टॅमरिंड हा शब्द इंग्रजीमध्ये कसा आला हे समजण्यासाठी इतिहासाची थोडी ओळख असावी लागेल. भारतातील व्यापारी खुश्कीच्या मार्गाने भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचवत. भारतातून चिंच अशीच अरबस्तानात पोहोचली व तेथून युरोपात. अरबी भाषेत खजूराला तमार (tamar) म्हणतात. चिंच आणि खजुरामध्ये तपकिरी रंग, कोळ काढता येणे, एक बी असणे असे साम्य आहे. त्यामुळे चिंचेला अरबीमध्ये तमार - हिंद (Tamar-hind) म्हणजेच भारतीय (हिंदी) खजूर (Date of India) म्हटले जाते. याचाच भ्रंश होत पुढे टॅमरिंड (tamarind) हा शब्द तयार झाला. मार्कोपोलो टॅमरिंडचे स्पेलिंग (tamarandi) असे करतो. शब्दाचा उगम शोधणे खरेच मजेचे असते.

मराठीमध्ये 'ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये' अशी म्हण आहे. वरील दोन्हीपैकी नदीचे मूळ शोधणे खरंच एक शैक्षणिक अनुभव होऊ शकेल. ऋषीचे माहीत नाही पण अभ्यास करताना आपल्या कानावर पडणाऱ्या लोककथा, आपल्या आजूबाजूच्या घरातील वा परिसरातील वस्तू आपल्याला काहीतरी सांगत असतात. त्या काय सांगतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे इतिहास शोधणे. अशा जुन्या गोष्टींचा मूळ स्थानापासून आजपर्यंतचा प्रवास शोधणे ही कृती इतिहास अभ्यासात नक्कीच आनंददायक आणि अभ्यासाची समज, आकलन वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे.

            आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला काय सांगतात हे समजून घ्यायचे असेल तर आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न पडावे लागतात. याच अंदमानच्या प्रवासात, एका जागेला भेट दिले ‘हॅम्प्रीगंज’. नाव ऐकताच त्याची फोड मनात होऊन यातील एक ब्रिटीश नाव आहे तर गंज हा शब्द गाव,पूर, हळ्ळी, पल्ली, पूरम सारखा शब्द आहे हा अर्थ लावला होता. होम्फ्रेय (Homfrey) ब्रिटीश अधिकारी कोण होता याची माहिती काढणे आणि गावाच्या नावात गंज आहे तर या भागात बिहार, छत्तीसगड भागातून लोक स्थलांतरित होऊन हे गाव वसले असावे असा अंदाज बांधला. इतिहास शोधताना आता या नावाच्या अधिकाऱ्याचा अंदमानशी संबंध सापडणे आणि गावात लोकांशी बोलून त्याच्या मूळस्थानाची माहिती मिळवणे या दोन गोष्टी केल्या की त्याचा अर्थ शोधता येऊ शकेल. योग्य पुराव्यासह माहिती सापडली तर त्या गावाच्या नावात गावाचा इतिहास सापडेल. माहिती नाही सापडली,वेगळीच माहीत सापडली; प्रश्न चुकीचा ठरला तर नवीन अंदाज बांधता येईल.

अंदमानचा इतिहास हा स्थलांतरचा इतिहास असल्याने अंदमान-निकोबर बेटांवर प्रवास करताना अशा इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा इतिहासाचे भान असलेल्याला जाणवतील.  

            आपण महाराष्ट्रात नामस्मरण करताना सहज ‘ज्ञानेश्वरमाऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा एका दमात उच्चार करताना मी १२७५, तेरावे शतक ते १६०८, सत्राव्वे शतक जवळजवळ चारशे वर्षांची उडी मारतो हे किती जणांच्या लक्षात येते?

याचा पुढचा चरण आहे ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’ यांची जन्म वर्ष बघितली तर  ‘निवृत्ती (१२७३) ज्ञानदेव (१२७५) सोपान (१२७७) मुक्ताबाई (१२७९) एकनाथ (१५३३) नामदेव (१२७०) तुकाराम (१६०८)’.  हा चरण म्हणताना आपण इतिहासाच्या कालरेषेवर बऱ्याच उलटसुलट कोलांटीउड्या मारल्याचे लक्षात येईल.  कालरेषेनुसार हा चरण नामदेव-निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-तुकाराम’ असा  होईल. 

इतिहास शोधताना असे शब्द, मौखिक वा छापील साहित्य, वस्तू, पदार्थ, प्रथापरंपरा  अशा अनेक गोष्टींबद्दल प्रथम मनात कुतूहल निर्माण व्हायला हवे, एकदा उत्सुकता निर्माण झाली की चौकसपणे माहिती देणाऱ्या साधनाचा शोध घ्यावा लागतो, त्यांना प्रश्न विचारात अभ्यास करत साधनांची योग्यता तपासावी लागते मग अर्थ शोधत आपले निष्कर्ष मांडावे लागतात. नवीन अभ्याससाधने सापडली, त्यातून नवा संदर्भ सापडला; नवा अर्थ सापडला तर आपल्या निष्कर्षात भर घालावी लागते, काहीवेळा आपले निष्कर्ष बदलून परत नव्याने मांडणी करावी लागते. 

काल सोसायटीच्या पार्किंगमध्ये सहज हिंडत होतो तेव्हा काही मोडक्या बंद पडलेल्या, टायर गायब झालेल्या गाड्यांपासून आधुनिक ई-बाइकपर्यन्तच्या नव्याने घेतलेल्या दुचाकी दिसल्या. सहज नोंदवले तर बजाज कंपनीच्या  चेतक , एम 80, सनी, पल्सर, स्पिरीट, डिस्कव्हर, प्लॅटिना अशा अनेक दुचाकी होत्या. जर ठरवून गावातील, शहरात मोठ्या सोसायटीतील वापरत असलेल्या-नसलेल्या बजाज कंपनीच्या दुचाकी वाहनांचे फोटो काढले, कंपनीने त्या कधी बाजारात आणल्या, गाडीचा परिवहन कार्यालयातील नोंदणी क्रमांक,  मालकांनी कधी विकत घेतल्या, काय किमतील विकत घेतल्या अशी माहिती गोळा करत गेलो तर बजाज कंपनीचा इतिहास लिहिण्याचा अनुभव घेता येईल. वाहनांच्या किमती, विक्रीची संख्या, शासकीय धोरणे आणि कायदे, बदलेले तंत्रज्ञान असा अभ्यास विस्तारत नेला तर ‘बुलंद भारत कि बुलंद तसबीर’ याचा प्रत्यय तपासता येईल.

पण त्याआधी पार्किंग मधील वाहने वेगवेगळ्या काळातील आहेत हे नोंदवले गेले तरच असा विचार, असा अभ्यास सुरू होऊ शकतो.   

आपल्या आजूबाजूला असलेल्या रोजच्या वापरतील घरातील वस्तू जसे घरात प्रकाश मिळवण्यासाठी असलेली उपकरणे, उष्णता मिळवण्यासाठी वापरात असलेले-नसलेली उपकरणे, स्वयंपाकघरातील उपकरणे, घरातील चार पिढ्यांचे फोटो, वीजबिले, घरपट्टी बिले अशा असंख्य गोष्टी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला गेल्या शे-सव्वाशे वर्षातील तंत्रज्ञानाच्या बदलांचा-विकासाचा इतिहास समजेल, आर्थिक-राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक स्थित्यंतरे समजतील.

मानवी जीवनातील

विज्ञान-तंत्रज्ञान-आर्थिक- राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक  स्थित्यंतरे समजली

तर आजचे वर्तमानाचे आकलन अधिक चांगले होऊन अर्थपूर्ण जीवन जगता येईल.

वर्तमानचे भान विकसित होण्यासाठी इतिहासाचे भान असणे 

महत्त्वाचे आणि उपयोगी आहे.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे


इतिहास शिकता- शिकवताना भाग १,२,३ वाचण्यासाठी भेट द्या


https://prashantpd.blogspot.com/p/blog-page_23.html


Comments

  1. प्रशांत सर, फारच भारी मांडणी.

    ReplyDelete
  2. फारच भारी मांडणी केलीयत.

    ReplyDelete
  3. वर्तमानाचे भान विकसित होण्यासाठी इतिहासाचे भान महत्त्वाचे...छान झाला आहे लेख

    ReplyDelete
  4. डोळसपणे पाहण्याची दृष्टी देत आहात सर.

    ReplyDelete
  5. ओघवत्या आणि सोप्यि शैलीत दर्शन घडते. 👌👌

    ReplyDelete
  6. Purva Deshmukh
    Ekdam bhari lekh sir 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्व-विकासाचा मार्ग

  स्व-विकासाचा मार्ग दुकानातून पातळ पोहे आणून त्याचा तयार केलेला चिवडा आणि तेच पातळ पोहे दोन दिवस उन्हात वाळवून त्याचा केलेला चिवडा — कोणता चिवडा जास्त आवडतो ? अळूची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात कधी खवखवले आहे का ? हे दोन स्वयंपाकघराशी आणि खाण्याशी निगडीत प्रश्न सुरुवातीला का विचारतो आहे , असा प्रश्न मनात आला का ? दुकानातून आणलेले पोहे जरी कोरडे असले तरी पातळ पोहे उन्हात वाळवल्याने त्यातील उरलेसुरले बाष्प निघून जाते , तसेच उन्हात भाजल्याने ते जास्त खरपूस बनतात. कुरकुरीत असलेले पोहे उन्हात वाळवल्याने त्यांच्या कुरकुरीतपणा या गुणात वाढ होते. अळूच्या पानात , देठात आणि कंदात कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात , ज्यामुळे घसा खवखवतो. अळू शिजवण्यापूर्वी नीट धुतला आणि शिजवताना त्यात चिंच वा आंबट चुका वापरल्यास ही स्फटिकद्रव्ये कमी होऊन घसा खवखवण्याची शक्यता कमी होते. अळूच्या भाजीत शेंगदाणे–खोबरे ही चव वाढवणारी भर नंतरची , पण आधी चिंच वापरून भाजीतील दोष दूर करावा लागतो. स्वयंपाक करताना आपण पदार्थावर अनेक क्रिया करत असतो , ज्यामुळे पदार्थातील दोष कमी होतात किंवा निघून जातात ,...

Task Instructions for PBL Guide Teachers : Enriching Skills Required for PBL

  Task Instructions for PBL Guide Teachers Thoughts on Enriching Skills Required for PBL Objective: To enrich the understanding of skill enrichment required for Project-Based Learning (PBL) by developing a comprehensive mind map and writing a short note. Steps: 1.     Review Shared Diagram: Begin by reviewing the diagram that lists a few skills required for project work, which has been shared with you along with activity instructions. 2.     Expand the Skill List: Add to the list of skills required for effective project work. 3.     Develop a Mind Map: Create a new mind map that represents the importance and scope of skill enrichment for PBL, Organize the skills into categories and show their relationships and interdependencies. 4.     Write a Short Note: ·        Based on your mind map, write a short note covering the following points: ·      ...

বন্দে গুৰু পৰম্পৰা

বন্দে গুৰু পৰম্পৰা গুৰু পূৰ্ণিমা মানে জ্ঞান পৰম্পৰাৰ বাহক হোৱাৰ দিন । ইয়াম বিৱস্বতে যোগ প্ৰক্তৱনহম্ভায়ম । বিৱস্বণ মনভে প্ৰাহ মনুৰিক্ষৱকভে ব্ৰেৱীত ।। ( ৪ - ১ ) ( এটি অক্ষয় যোগৰ বিষয়ে মই সূৰ্য দেৱতাক বৰ্ণনা কৰিছো । বিৱস্বণে তেতিয়া মনুক সম্বোধন কৰিলে , আৰু মনুৱে ইক্ষৱাকুক সম্বোধন কৰিলে ) ।           ভাগৱত গীতাত   অৰ্জুনক উপদেশ দিওঁতে ভগৱান শ্ৰীকৃষ্ণই জ্ঞানৰ পৰম্পৰাৰ উদাহৰণ দাঙি ধৰিছে । তেওঁ কয় ,” মই এই অবিনাশী যোগ সূৰ্যক ( বিবাস্বণ ) প্ৰদান কৰিলোঁ , যিয়ে ইয়াক মনুলৈ আগবঢ়াই দিলে । “           ভাৰতীয় পৰম্পৰাত যেতিয়াই নতুন জ্ঞান বা দৰ্শন উপস্থাপন কৰা হয় , তেতিয়াই গুৰুৰ পৰম্পৰাৰ উত্তৰাধিকাৰিকো স্বীকৃতি দিয়া হয় , কাৰণ জ্ঞানৰ বংশ সংৰক্ষণ পাৰ হৈ গ ’ লেহে জ্ঞান বিস্তাৰিত হৈ উঠে ।           জ্ঞান প্ৰবোধিনীয়ে চাৰিজন মহান ব্যক্তিত্ব সমৰ্থ ৰামদাস , স্বামী বিবেকানন্দ আৰু যোগী অৰবিন্দক নিজৰ দূৰদৰ্শী হিচাপে ...