मनोगत
नमस्कार! गेलं वर्षभर
प्रतिज्ञेचा कालावधी वाढवून पुन्हा तृतीय प्रतिज्ञा घ्यावी का असा विचार चालला
होता. बऱ्याच जणांनी हे समजल्यावर ‘परत तृतीय प्रतिज्ञा का?’
असा प्रश्न केला. खरंतर मलाही तेव्हा हा प्रश्न पडला होता. काय काम
करायचे, का करायचे आणि कशासाठी करायचे, रोजचे प्रबोधिनीतील निहित केलेलं काम आणि प्रतिज्ञा घेऊन केलेलं काम
याबद्दल वेळोवेळी आ. संचालकांसोबतच्या मासिक बैठकीत प्रश्नोत्तरे होत होती. यातून
मला प्रतिज्ञा परत का याचे माझ्या संदर्भातील माझ्यापुरते उत्तर सापडतं होते.
अनेकांनी विचारलेल्या ‘परत तृतीय प्रतिज्ञा का?’
या प्रश्नाच्या टाळलेल्या उत्तरासाठी बहुदा काल प्रतिज्ञा ग्रहण कार्यक्रमाच्या
आदल्या दिवशी मला आज प्रतिज्ञेविषयी मनोगत
व्यक्त करण्यास सांगितलं आहे.
सूचना मिळाल्यावर यावर थोडा
विचार केला. प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करायचा आहे तर आपण परत परत उच्चारण केल्याने
मनात घोळत राहिलेली वाक्य कोणती, असे
आठवण्याचा प्रयत्न केला. अनेक वाक्य,श्लोक, कवितांची धृवपदे
असे बरेच काही आठवले. लगेच आठवलेल्या ओळींतील एक ओळ अनेक वर्षे मनात घोळत असलेली 'मनसा सततं स्मरणीयं, लोकहितं मम करणीयं ' ही एक. साधारण तिसरी-चौथीत
असताना कानावर पडलेलं कधीतरी शाखेत किंवा राम मंदिरात म्हटलेलं हे गीत.
आज असे वाटते की हे गीत नुसतंच ऐकलेलं नव्हे तर लहापणापासून घरात
सामाजिक संस्थाना मदत करणारे आजोबा, अपंगांसाठी काम करणारी मावशी असे
अनेकजण, माझ्या
आजूबाजूला घरी, मी राहत असलेल्या गावात या विचाराने जगणारे,
कृती करणारे लोक पाहिलेले होते. त्यामुळेच असेल कदाचित पण 'मनसा सततं स्मरणीयं, लोकहितं मम करणीयं ' हे मनात सतत कुठेतरी होतं.
मला असं वाटतं की इतर लोकांचं
अहित करावं अशी कोणाचीच इच्छा नसते. दर्शनीदृष्ट्या इतरांचं अहित करणारे अनेक लोक
आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, पण
त्यांचीदेखील मनातून असे अहित करण्याची इच्छा नसते. काहीवेळा परिस्थिती तसे
वागायला भाग पडते किंवा नपेक्षा त्यांची
हिताची व्याख्या अजून नेमकी झालेली नसते, आपण करत असलेल्या
कृतीमूळे दुसऱ्यावर होणाऱ्या परिणामांचे
भान त्यांना नसते असं मला वाटतं.
लहानपणापासून घरीदारी असे 'लोकहितं मम करणीयं ' यासाठी अभ्यास, कृती आणि साधना करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये 'लोकहितं
मम करणीयं ' या वृत्तीचं दर्शन होत होतं पण त्यादृष्टीने मी
काही कृती करावी यासाठी कोणती जागा सापडली नव्हती किंवा अशी जागा शोधण्यासाठी
मनापासून प्रयत्न देखील केला नव्हता.
पण अपघाताने म्हणा,
कर्मधर्म संयोगाने म्हणा, योगायोगाने म्हणा,
ज्ञान प्रबोधिनीत येऊन पडलो आणि हळूहळू ही जागा मला सापडत गेली.
मी पदव्युत्तर शिक्षण घेताना
माझा विषय होता वनस्पतीशास्त्र आणि त्यात स्पेशलायझेशन होते अनुवंशशास्त्र आणि
वनस्पती संवर्धन ( Genetics and plant breeding). मधल्या काळात या शब्दांशी, या क्षेत्राशी माझा फार
संबंध आला नाही. पण ज्या योगायोगाने मी प्रबोधिनीत आलो त्याची सुरुवात ग्रामविकसन
विभागातील औषधी वनस्पती लागवडीच्या प्रकल्पातून झाली, शिक्षणाद्वारे
नाही !
जेव्हा मला माझ्या
प्रतिज्ञेविषयी आढावा घ्यायला सांगितलं, तेव्हा मी प्रबोधिनी कसा आलो याचा
विचार करताना हे आठवले आणि माझ्या लक्षात आलं की वनस्पती संवर्धन हा शब्द फार
महत्त्वाचा आहे. मी शिकलेला हा विषय मी
प्रबोधिनीत फारसा शिकवला नाही किंवा या विषयात परत काम केलं नाही पण प्रबोधिनीत
येण्याचे निमित्त मात्र झाला!
प्रबोधिनीमध्ये व्यक्तीची
जडणघडण,
व्यक्ती विकास, व्यक्तिमत्त्व विकसन , नेतृत्वगुण संवर्धन असे अनेक भरभक्कम शब्द कानावर पडत असतात. यादृष्टीने आपण विचार करत असतो, आपल्या योजना आखत असतो आणि त्याप्रमाणे काम देखील करत असतो.
माझ्या सुदैवानं मला 'तू हे केलं पाहिजेस, असे बदल तू स्वतःमध्ये केले पाहिजेस, या कौशल्यावर
प्रभुत्व मिळवले पाहिजेस, तू असं स्वतःला घडवलं पाहिजेस ' असं सांगणारे,
असा आग्रह धरणारे कोणी मार्गदर्शक भेटले नाहीत. पण अशा
बदलासाठी काम करणाऱ्या अनेकांबरोबर कामाला
सहज सुरुवात झाली. प्रशालेत अध्यापक म्हणून काम करताना शिक्षणासंदर्भातील उपक्रम
पोंक्षेसरांबरोबर करत गेलो. तर मिलिंद, प्रवीण, शिवाजीबरोबर ग्रामीण प्रज्ञाचे काम करताना प्रबोधिनी समजत गेली.
मी जेव्हा प्रबोधिनीमधे
पोंक्षे सरांसोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी हे काम तू करायला हवंस असं सुचवलं नाही, तर त्यांच्या कामात बरोबर घेतले आणि त्याचबरोबर मला सुचलेल्या उपक्रमात
सहज बरोबरीच्या नात्याने ते सहभागी झाले. मी प्रबोधिनीचे काम करायला सुरुवात केली
. तीन वर्ष काम केलं. मग तीन वर्ष सरकारी
नोकरी केली. असे काम करत असताना एकीकडे प्रबोधिनीच्या व्यक्तीघडणीच्या कामाचं
दर्शन होत होतं.
वनस्पती संवर्धनामध्ये दोन
महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, बीजाची
सुप्तावस्था तोडण्यासाठी त्यावर प्रक्रिया
करणे आणि बीजासाठी जमीन तयार करणे , कारण योग्य जमिनीत योग्य
बीज योग्य प्रकारात पेरलं तरच ते रुजतं.
आज मागे वळून बघताना असं
वाटतं,
की हे जमीन तयार करण्याचं काम, त्या वेळेस
पोंक्षे सर, महेंद्रभाई अशा बऱ्याच जणांनी केलं आणि त्यावेळी
मी केवळ जमिनीवर थांबण्याचं काम केलं. कारण मन कुठंतरी ते पद गुणगुणत होतं.
तीन वर्षे सरकारी नोकरी
केल्यावर आणि सेवेत कायम झाल्यावर, प्रबोधिनीचं काम करण्यासाठी मी राजीनामा दिला. सरकारी नोकरी सोडली आणि परत
प्रबोधिनीच्या कामाला सुरवात केली. पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली तरी
पोंक्षेसरांनी एक मार्गदर्शक म्हणून मला कधीही तू आता प्रतिज्ञा घ्यायला हवीस असा
आग्रह केला नाही; नव्हे सुचवले देखील नाही, एवढेच काय, मी पहिली सात वर्ष सगळे घालतायत
म्हणून मी घालणार नाही या हट्टानं गणवेश पण घालत नव्हतो. प्रबोधिनीचं काम गणवेश न
घालता पण करता येऊ शकतं.
प्रबोधिनीच्या कामामुळे देशभर
प्रवास होत गेला, देशाच्या
वेगवेगळ्या भागात चालू असलेल्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रशालेतील
अध्यापनासोबत, अभ्यास दौरे, मुलांची
शिबिरे आणि शिक्षक प्रशिक्षणाचे काम
करताना अनेक संघटनांची देश प्रश्नांवर चालू असलेली कामं जवळून बघण्याची;
त्या कामांत भाग घेण्याची संधी मिळाली, आणि
असं काम आपल्यालाही करता येईल असं वाटल्यानंतर पहिल्या प्रतिज्ञेचा विचार आला.
पुणे केंद्रातील
प्रबोधिनीतल्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतल्यानंतर,
हेच काम दुसऱ्या ठिकाणी जाऊन करायचा अनुभव घेता येईल का? ह्यासाठी म्हणून, तीन वर्ष सोलापूरला जावं असा विचार
आला. सोलापूर केंद्रावर निवासी राहत असताना सोलापूर केंद्रावर प्रबोधिनीपणाच्या
अनेक गोष्टींचे नव्या रूपात दर्शन झाले तर काही नव्या गोष्टीदेखील समजल्या.
तिथे जाऊन, हे काम स्वतःला जबाबदारीने करता येईल
ह्याची खात्री पटली आणि द्वितीय प्रतिज्ञा सोलापूरच्या केंद्रावर घेतली.
तीन वर्ष सोलापुरात
राहिल्यावर आपण तीन वर्ष एखादी गोष्टी
ठरवून,
एखाद्या ठिकाणी जाऊन, एखादे काम निश्चितपणे करू शकतो असं कळल्यावर, तीन वर्ष
अनुभवल्यावर मग तिसऱ्या प्रतिज्ञेचा विचार मनात आला आणि ती मी घेतली.
मागची पाच वर्ष तृतीय
प्रतिज्ञेच्या कालावधीत वेगवेगळ्या निमित्ताने भारतभरातील वेगवेगळ्या संघटनांसोबत
काम करायला मिळालं. इस्कॉन, रामकृष्ण मिशन
सारख्या अध्यात्मिक संघटना,विवेकानंद केंद्रासारख्या सेवा
प्रधान संघटना, वनवासी कल्याण आश्रमासारख्या संघटन प्रधान
संघटनांबरोबर अध्यापक संघ आणि शासकीय रचनांबरोबर
देखील काम केले.
आज मागे वळून बघताना जाणवतं
की गेल्या काही वर्षात प्रबोधिनीत ज्या लोकांसोबत काम केलं ,
प्रबोधिनी पलीकडे ज्या संघटनांसाठी; त्यांच्या
शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्याची संधी मिळली, त्यानिमित्ताने
देशभर जो प्रवास झाला त्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांचे काम, त्यांची संवादाची , कामाची पद्धत जवळून पाहता आली.
त्यांच्या कामाचा परिणाम अनुभवता आला.
या प्रवासात एक लक्षात आलं की
एकीकडे कार्यकर्ता घडणीचं काम करता करता, संघटनेच्या लोकांनी कार्यकर्त्यांना रुजण्यासाठीची जमीन कसण्याचे काम
करावे लागते. अशी वेगवेगळ्या बीजांना अनुकूल भूमी घडवण्यासाठी काम करणे महत्त्वाचे
आहे. असे काम करायचे म्हणजेच प्रबोधिनीत
अनुभवाची व कामाची विविधता निर्माण करण्यासाठी काम करायचे .
हे करायचे असेल तर ‘मनसा सततं
स्मरणीयं’ तर गरजेचंच आहे पण त्याबरोबर
त्याच गीतातली पुढची ओळ जे सांगते, 'वचसा सततं वदनीयं ' म्हणजेच आपल्याला काय करायची
इच्छा आहे,आपण काय करणार आहोत याचे कधीतरी जाहीरपणे प्रकट
उच्चारण करणे महत्त्वाचे आहे . म्हणून दुसऱ्या कालावधीसाठी आज तृतीय प्रतिज्ञा घेत
आहे.
या गीताच्या पुढच्या कडव्यात ह्यासाठी काय काय
करावं लागतं त्याची सूत्रे दिली आहेत ,जी आपण शोधूया. ही सूत्रं शोधताना आपल्या प्रत्येकाचा बीज आणि जमीन घडणी
बरोबर हे करणाऱ्या शेतकऱ्याच्या घडणीपर्यंत
प्रवास होवो हीच प्रार्थना !
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी,
पुणे
विजयादशमी
२४ ऑक्टोबर २०२३
मनसा सततं
स्मरणीयम्
मनसा सततं
स्मरणीयं
वचसा सततं
वदनीयं
लोकहितं मम
करणीयम् ॥ लोकहितम् ॥
न भोगभवने
रमणीयं
न च सुखशयने
शयनीयम् ।
अहर्निशं
जागरणीयं
लोकहितं मम
करणीयम् ॥ १॥
न जातु
दुःखं गणनीयं
न च
निजसौख्यं मननीयम् ।
कार्यक्षेत्रे
त्वरणीयं
लोकहितं मम
करणीयम् ॥ २॥
दुःखसागरे
तरणीयं
कष्टपर्वते
चरणीयम् ।
विपत्तिविपिने
भ्रमणीयं
लोकहितं मम
करणीयम् ॥ ३॥
गहनारण्ये
घनान्धकारे
बन्धुजना ये
स्थिता गह्वरे ।
तत्र मया
सञ्चरणीयं
लोकहितं मम
करणीयम् ॥ ४॥
- डाॅ श्रीधर
भास्कर वर्णेकर
प्रथम प्रतिज्ञा
चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून
आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करतो की,
आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजेच आपले राष्ट्र
यांची सेवा करण्याचे व्रत मी आज घेत आहे. हे व्रत मी आजन्म पाळीन.
द्वितीय प्रतिज्ञा
चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून
आणि मला जे जे प्रिय आहे. त्या सर्वांचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करतो की,
राष्ट्रसेवेचा आणि धर्मसंस्थापनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून
मी ज्ञान प्रबोधिनीचा प्रतिजित घटक होत आहे.
प्रबोधिनीचे कार्य मी तनमनधनपूर्वक उत्तरदायी राहून आयुष्यभर करीन.
तृतीय प्रतिज्ञा
चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून
आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वाचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करतो की,
वय वर्षे .. पर्यंत, ज्ञान प्रबोधिनीचे कार्य ज्ञान प्रबोधिनीच्या आदेशानुसार
मी, वैराग्यपूर्वक / व्यवहारास अनुसरून, पूर्ण वेळ करीन.
अप्रतिम मनोगत सर !!!
ReplyDeleteलोकहितं मम करणीयम् ............ ह्या ओळींच्या आधारे मांडलेले मनोगत आवडले. सुंदर मांडणी.
ReplyDeleteसहज सुंदर मनमोकळ्या शब्दात मांडले आहेत, छानच
ReplyDeleteमनोगत मनापासून भावले
ReplyDeleteआपणास शुभेच्छा...
ReplyDelete