संस्कृतीच्या प्राणधारा : १
दोन
दिवसांपूर्वी त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास अनके घरांमध्ये तुळशीचे लग्न लावले जात
होते. तुळशीचे लग्न बघताना काही महिन्यांपूर्वी एका प्रशिक्षणासाठी गोव्याला फोंडा
परिसरात झालेला प्रवास आठवला. कळव्याला शांतादुर्गा देवस्थानाच्या जवळ मुक्कामी
होतो. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या आधी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या
अभ्यासवर्गाच्या निमित्ताने दिवाळीच्या आधी फोंड्यात जाणे होते. दिवसभर प्रशिक्षण
सत्र झाल्यावर संध्याकाळी मंदिरांना भेटी, ज्या
मंदिरात परवानगी असेल तेथील पुष्करणीत पोहणे हा ठरलेला कार्यक्रम.
संध्याकाळी
गावात फिरत असताना अनेक घरांसमोर बांधलेली
आकर्षक तुळशी वृंदावने पाहायला मिळाली. सुंदर घडवलेली वृंदावने हे गोव्याचे एक
वैशिष्ट्य आहे.
ही
वृंदावने पाहत असताना काही वर्षांपूर्वी पणजीत पाहिलेल्या एका संग्रहालयाची आठवण
झाली. गोव्यातील आकर्षक तुळशी वृंदावनांचा व त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह तेथे
होता. संग्रहालयात दोन प्रकारची वृंदावने
होती ;
एकात तुळस लावली होती तर दुसऱ्या वृंदावनात क्रॉस लावला होता.
गोव्यात हिंदू आणि इसाई दोन्ही धर्मांची लोकं राहतात. गोव्यातील घरांच्या पारंपरिक
रचनेत घर म्हटल्यावर घराला अंगण हवे, पडवी हवी, माजघर हवे, स्वयंपाकघर हवे, देवघर
हवे तसे वृंदावनही हवे. दिवसभरातील वेगवेगळी कामे करण्याच्या या जागा. तुळशी
वृंदावन ही भारतीय घरामधील महिलेसाठी त्या परमेश्वराशी एकटीने संवाद साधत दिवसाची
सुरुवात करण्याची उपासनेची जागा.
घराच्या
रचनेत तुळशी वृंदावन, देवघर अशा रचनांचा
समावेश असल्याने धर्म बदलला तरी गोव्यात वृंदावनाला स्थान राहिले. धर्मांतर
झाल्याने तुळशीच्या जागी क्रॉस आला हा बदल झाला.
पण
मनात प्रश्न आला की
गोव्यातील
घरांच्या पारंपरिक रचनेमध्ये वृंदावन रचना का टिकून राहिली?
याच
प्रवासात संध्याकाळी शांतादुर्गा मंदिरात छबिना होता. मंदिराच्या प्रांगणात देवीची
प्रदक्षिणा होती. नामघोष करत पेट्रोमॅक्स दिवे, वाजंत्री
, अब्दागिरी असा साग्रसंगीत छबिना होता. या मिरवणुकीत एक
वेगळीच धुपदाणी वापरात असलेली दिसली.
नेहमीच्या
मातीच्या धुपदाणीपेक्षा ही धुपदानी चर्चमध्ये वापरतात अशा एन्संसोरसारखी ( encensoir : censer
used to burn incense during religious processes), साखळी आणि झाकण
असलेली धुपदानी होती.
मनात
आले की
चर्चमधील
हा ऐवज छबिन्यात कसा घुसला ?
रोजच्या जीवनात अनेक
गोष्टी अशा असतात की ज्याबद्दल आपल्या साधारण प्रतिक्रिया -
त्यांच्याकडे असे
असते , आमच्याकडे असे नसते !
आमच्याकडे असे असते, त्यांच्याकडे
वेगळेच असते !
अशा
असतात.
मुळात ते म्हणजे कोण आणि आम्ही म्हणजे कोण हे कसे ठरते, कशाच्या
आधारावर ठरते ?
या त्यांच्या आणि आमच्यात अनेक गोष्टींची देवाणघेवाण होत असते, ती कशी होते ?
कोणत्या गोष्टी नकळत स्वीकारल्या जातात ? कोणत्या गोष्टी सहज स्वीकारल्या जातात? कोणत्या गोष्टी नाकारल्या जातात? आणि कोणत्या
गोष्टींचा स्वीकार करणे भाग पाडले जाते ?
अशा देवाणघेवाणीतून काय घडते - काय बिघडते ?
रोजच्या जीवनात अनेक गोष्टी अशा असतात की
हे कोणी सुरू केलं ? हे का करायचं ?
हे असचं का करायचं ? नाही केलं तर काय बिघडणार आहे ?
असे अनेक प्रश्न
आपल्याला पडत असतात.
बरेचदा अशा
प्रश्नांना एकच उत्तर मिळते ‘शास्त्र असतं ते! '
आपल्या रोजच्या जीवनात आपण बहुतांश गोष्टी रीत असते म्हणून करत असतो.
मानवी समाजाची ही रीत कशी विकसित होत जाते ?
रीत स्थळकालानुरूप बदलत जाणारीच असते का त्यातील काही रिती चिरंतन, स्थळकाळ निरपेक्ष असतात ?
मनुष्याने
मनुष्यासाठी सामाजिक जीवन जगण्यासाठी बांधून दिलेले मनुष्यनिर्मित धारे म्हणजे
रीतभात.
यातूनच
वेगवेगळ्या प्रदेशातील मानवी समाजात संस्कृतीमय जीवनाची निर्मिती झाली.
v कोणती
जीवनतत्त्वे (जीवनदर्शन) सनातन भारतीय संस्कृतीतील लोकांच्या जीवनाचा आधार आहेत ?
v कोणती
मार्गदर्शक मूल्ये भारतीय समाजात व्यक्तीची वर्तणूक, समाज आणि लोकजीवनाची उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आधारभूत आहेत ?
v आचरणाचे
कोणते नियम ; संकेत भारतीय समाजातील
लोकजीवनाच्या व्यवस्था निश्चित करतात ?
'संस्कृतीच्या प्राणधारा ' ह्या लेखमालेत प्रवासाच्या
निमित्ताने समाजात वावरत असताना भारतीय जीवन व्यवस्था, जीवन
मूल्ये आणि जीवन दर्शने याबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, पडलेले
प्रश्न यातून भारतीय संस्कृतीच्या प्राणधारांचे अवचित झालेले दर्शन मांडणार आहे.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Interesting opening ...waiting for the next !
ReplyDeleteमस्त... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत
ReplyDeleteअतिशय महत्त्वाचा विषय हाती घेतला म्हणून अभिनंदन. शेवटी उल्लेख केलेल्या तीन प्रश्नांचे विवेचन वाचायला उत्सुक आहे.
ReplyDelete