सस्नेह नमस्कार,
"अनुभव हा आपला एकमेव खरा गुरू आहे.
आपल्या संपूर्ण ज्ञानाची भक्कम पायाभरणी ही केवळ अनुभवावरच उभी असते."
— स्वामी विवेकानंद
विद्यार्थी ज्या परिसरात राहतो, तिथले वेगवेगळे घटक आणि घडणाऱ्या
घटना त्याच्या
'अनुभवविश्वाला' थेट स्पर्श करत असतात. या बाह्य
जगाला आणि घटनांना जाणून घेण्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे आपली 'ज्ञानेंद्रिये' होत. सूक्ष्म, तरल आणि प्रगल्भ 'निरीक्षणाने' हे द्वार उघडते. ज्ञानेंद्रियांच्या
तरलतेनुसार परिसरातील हे सर्व घटक आणि घटना विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षेत येत
असतात.
वास्तविक पाहता, 'चेतना' म्हणजे जाणिवेची, प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि संवेदनशील
प्रतिसाद देण्याची क्षमता होय. ही चेतना मन, मेंदू आणि ज्ञानेंद्रिये यांना
एकत्रितपणे कार्यशील बनवते. ज्ञानेंद्रिये बाह्य जगातील विविध 'चेतक' म्हणजेच दृश्य, ध्वनी, स्पर्श, वास आणि चव यांच्या माध्यमातून 'संवेदना' ग्रहण करतात. चेतना या कोरड्या
संवेदनांना अर्थ प्राप्त करून देते. थोडक्यात सांगायचे तर, संवेदना केवळ माहिती पुरवते; तर चेतना त्या माहितीचे आकलन, विश्लेषण आणि खऱ्याखुऱ्या अनुभवात
रूपांतर करते. निरीक्षणाच्या नेमकेपणातून आणि नोंदवलेल्या माहितीची तुलना व
विश्लेषण करत असताना, जेव्हा
यातील परस्परसंबंध लक्षात येतात, तसतसे
विद्यार्थी वास्तवाशी अधिक घट्ट जोडले जातात.
'अनुभव-शिक्षणात' जर विद्यार्थ्यांची संवेदनशीलता विकसित करायची असेल, तर परिसरातील (नैसर्गिक आणि मानवीय)
सूक्ष्म बारकावे,
बदल, भावभावना आणि परिस्थिती विद्यार्थी
अधिक जागरूकपणे पाहू आणि ऐकू लागतील अशा अनुभवांची योजना करावी लागेल. हे अनुभव
डिझाइन करताना स्वतःसोबतच इतरांच्या भावना, गरजा आणि दृष्टिकोन समजून घेण्याच्या
शैक्षणिक कृती विद्यार्थ्यांमधील 'सहअनुभूती' वाढवण्यासाठी अत्यंत साहाय्यक ठरतात.
अनुभव घेण्याच्या या प्रक्रियेत जर सहअनुभूतीची जोड मिळाली, तर विद्यार्थ्याला 'मानवी मूल्यांचे' उत्कट दर्शन होण्याची शक्यता निर्माण
होते.
"आपल्या भोवतालच्या चेतन वस्तूच्या
अस्तित्वाची जाणीव भवतालच्या अभ्यासाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कसे कुतूहल
निर्माण करू शकते", याचा
अनुभव एक शिक्षक म्हणून आपण सर्वांनीच घेतला पाहिजे. संवेदना आणि चेतना यांच्या
सक्रिय व एकत्रित प्रक्रियेतून जाणिवेचे आणि सहानुभूतीचे विकसन होऊन परिस्थितीला
संवेदनशील प्रतिसाद देणे शक्य होते. असे घडावे यासाठीच केनोपनिषदाच्या आरंभी, विद्यार्थी व शिक्षक दोघांच्याही
मनाला शांत,
मंगल
आणि
'ग्रहणशील' करण्यासाठी एक पवित्र
शांतीमंत्र सांगितला आहे:
भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं
पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः
व्यशेम देवहितं यदायुः ॥
"हे देवांनो, आम्हाला आमच्या कानांनी नेहमी मंगलमय
गोष्टी ऐकू येऊ देत.
आम्हाला आमच्या डोळ्यांनी नेहमी शुभ
दृश्ये पाहू देत.
आमची सर्व अंगे स्थिर, बलवान व निरोगी राहोत;
आणि आम्हाला प्राप्त झालेले आयुष्य
धर्मपूर्वक व सत्कर्मात व्यतीत करता येऊ दे."
हा मंत्र शिक्षणाच्या सुरुवातीलाच
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना समृद्ध, ग्रहणशील अनुभव मिळावेत यासाठी
केलेले एक आर्त आवाहन आहे.
ज्ञानेंद्रिये ही शिक्षणप्रक्रियेतील
'स्वाध्यायाची' मूलभूत साधने आहेत. उपनिषदांमध्ये
ज्ञानेंद्रियांना बाह्य जगाशी संपर्क साधण्याचे मुख्य प्रवेशद्वार मानले आहे. कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा या
पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातूनच व्यक्तीला आपल्या सभोवतालच्या जगाचा खरा अनुभव
प्राप्त होतो. वरील श्लोकात विशेषतः श्रवण (ऐकणे) आणि दर्शन (पहाणे) या दोन
ज्ञानेंद्रियांवर अधिक भर देण्यात आला आहे. 'श्रवणाद्वारे' व्यक्ती विचार, अनुभव, ज्ञान आणि मूल्ये आत्मसात करते, तर 'दर्शनाद्वारे' ती सूक्ष्म निरीक्षण, तुलना, विश्लेषण आणि विवेक विकसित करते.
म्हणूनच,
ज्ञानेंद्रिये
केवळ माहिती गोळा करण्याचे साधन नसून ज्ञाननिर्मितीची पहिली पायरी आहेत.
'स्वाध्यायामध्ये' ज्ञानेंद्रियांचा उपयोग अधिक सखोल
पातळीवर केला जातो. कानांद्वारे प्राप्त झालेले ज्ञान केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न
राहता श्रवण,
मनन, चिंतन आणि 'निदिध्यासन' या प्रक्रियेतून अंतर्मनात कायमचे
स्थिर होते. त्याचप्रमाणे, डोळ्यांद्वारे
घेतलेले अनुभव केवळ पाहण्यापुरते न राहता निरीक्षण, प्रश्ननिर्मिती, प्रत्यक्ष कृती, माहितीचे संकलन, सहसंबंध शोधणे आणि 'सूत्रनिर्मिती' या उच्च पातळीपर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे, ज्ञानेंद्रिये व्यक्तीला केवळ जग
पाहण्यास आणि ऐकण्यास मदत करत नाहीत, तर अनुभवांचे ज्ञानात आणि ज्ञानाचे
प्रज्ञेत म्हणजेच
'शहाणपणात' रूपांतर करण्याची अद्भुत क्षमता
देतात. म्हणूनच ज्ञानेंद्रियांचा विकास हा शिक्षणातील बौद्धिक आणि भावनिक विकाषाचा
पाया मानला जातो.
ज्ञानेंद्रिये आणि 'कर्मेंद्रिये' यांचा परस्परसंबंध मानवी विकासासाठी
अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानेंद्रिये बाह्य जगातून माहिती, अनुभव आणि प्रेरणा ग्रहण करतात, तर कर्मेंद्रिये त्या ज्ञानाला
प्रत्यक्ष आचराणात्मक कृतीत रूपांतरित करतात. योग्य श्रवण आणि योग्य दर्शन यांचा
अंतिम परिणाम योग्य कर्मामध्येच दिसून येतो. म्हणूनच आपल्या शिक्षण आराखड्यात
श्रवण आणि दर्शनानंतर 'कर्म' हाच पुढील टप्पा मानला आहे. 'अनुशासन' , साधना, कौशल्य आणि सेवा ही
कर्मेंद्रियांच्या योग्य व उदात्त वापरातून विकसित होणारी गुणवैशिष्ट्ये आहेत.
ज्ञानेंद्रियांनी प्राप्त केलेले ज्ञान जेव्हा कर्मेंद्रियांच्या माध्यमातून
व्यवहारात उतरते,
तेव्हाच
शिक्षणाचा खरा हेतू
'साध्य' होतो. ज्ञानेंद्रिये जीवनाला दिशा
देतात आणि कर्मेंद्रिये त्या दिशेला प्रत्यक्ष आकार देतात; या दोघांच्या सुंदर समन्वयातूनच
व्यक्तीचे आणि समाजाचे कल्याण साध्य होते.
'पूर्वप्राथमिक वयातील' बालकांसाठी तर ज्ञानेंद्रिये ही
शिक्षणाची सर्वात महत्त्वाची साधने असतात. या वयात मुले प्रामुण्याने ऐकून, पाहून, स्पर्श करून, वास घेऊन आणि चव घेऊनच शिकत असतात.
त्यामुळे या स्तरावर शिक्षणाची प्रक्रिया पुस्तककेंद्रित नसून पूर्णपणे 'अनुभवकेंद्रित खेळाधरीत शिक्षण' अशी असावी लागते. गोष्टी ऐकणे, गाणी म्हणणे, निसर्गातील विविध आवाज ओळखणे, चित्रे पाहणे, रंग आणि आकारांचा प्रत्यक्ष अनुभव
घेणे अशा विविध कृतींमधून बालकांच्या ज्ञानेंद्रियांचा सहज विकास घडतो. या
प्रक्रियेतील "योग्य ऐकणे" आणि "योग्य पाहणे" हे
पूर्वप्राथमिक शिक्षणातील श्रवण आणि निरीक्षण कौशल्यांच्या विकासाशी थेट संबंधित
आहे.
स्वाध्याय–प्रवचन पद्धतीका
पूर्वप्राथमिक स्तरावरील खरा अर्थ म्हणजे बालकाच्या नैसर्गिक 'जिज्ञासेला' प्रोत्साहन देणे हाच होय. बालक एखादी गोष्ट ऐकते (श्रवण), तिच्याबद्दल आपल्या परीने विचार करते (मनन), प्रश्न विचारते (चिंतनाची सुरुवात)
आणि प्रत्यक्ष कृतीतून तिचा आनंद घेते. उदाहरणार्थ, एखादे फुलपाखरू पाहिल्यावर त्याचे
बारकाईने निरीक्षण करणे, त्याबद्दल
प्रश्न विचारणे,
त्याचे
चित्र काढणे किंवा त्याच्या हालचालींचे अनुकरण करणे ही संपूर्ण प्रक्रिया त्याच्या
ज्ञाननिर्मितीची सुरुवात ठरते. अशा समृद्ध अनुभवांमधून माहितीचे आकलन, साधे सहसंबंध ओळखणे आणि प्राथमिक
स्वरूपातील
'संकल्पनांची' निर्मिती होऊ लागते.
पूर्वप्राथमिक शिक्षणात
ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचा संबंध अत्यंत निकटचा असतो. बालक जे काही
पाहते,
ऐकते
आणि अनुभवते,
ते
लगेचच आपल्या कृतीतून व्यक्त करते. म्हणूनच गाणी म्हणणे, नृत्य करणे, मातीशी खेळणे, चित्रे रंगवणे, बियाणे पेरणे, रोपट्याला पाणी घालणे, वस्तूंची जुळवाजुळव करणे अशा विविध 'हस्तव्यवसायात्मक कृतींना' येथे विशेष महत्त्व असते.
ज्ञानेंद्रियांद्वारे मिळालेला अनुभव कर्मेंद्रियांच्या साहाय्याने कृतीत उतरतो
आणि त्यातूनच कौशल्ये, चांगल्या
सवयी,
शिस्त, सहकार्य आणि 'सेवाभाव' यांचा विकास होतो. त्यामुळे
पूर्वप्राथमिक शिक्षणात "ऐकणे–पाहणे–करणे–जगणे" ही साखळी बालकाच्या
सर्वांगीण विकासाचा एक नैसर्गिक आणि अत्यंत आनंददायी मार्ग ठरते.
जन्मापासून पूर्वप्राथमिक
वयोगटापर्यंत बालकाचा विकास प्रामुण्याने ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातूनच घडत
असतो. डोळे,
कान, नाक, जीभ आणि त्वचा या
पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने बालक आपल्या सभोवतालच्या जगाशी अर्थपूर्ण संबंध
प्रस्थापित करते. विविध चवी, वास, स्पर्श, ध्वनी, रंग, आकार आणि हालचालींचे अनुभव घेत
असताना त्याच्या संवेदना क्रमशः जागृत आणि अधिक परिष्कृत होत जातात. या संवेदनांना समृद्ध
करण्यासाठी आणि मुलांमध्ये निरीक्षण, तुलना, वर्गीकरण व सूक्ष्म भेद ओळखणे
यांसारख्या क्षमतांचा विकास करण्यासाठी अनुभवांची एक 'साखळीबद्ध रचना' आवश्यक असते. या दृष्टीने अंगणवाडी
आणि बालवाडी स्तरावर नियोजनपूर्वक दिले जाणारे अनुभव बालकाच्या सर्वांगीण विकासाचा
भक्कम पाया घालतात.
बाल विकास मंदिर, सोलापूर येथील अध्यापकांनी विकसित केलेल्या
अशाच अनुभवाधारित शैक्षणिक कृतींचा समावेश या विशेष पुस्तिकेत करण्यात आला आहे. या
कृती बालकांच्या ज्ञानेंद्रियांच्या संवेदनक्षमतेचा त्यांच्या कर्मेंद्रियांद्वारे
केल्या जाणाऱ्या रोजच्या कृतींशी थेट संबंध जोडतात. हा उपक्रम बालकांच्या
जिज्ञासेचा व भाषिक कौशल्यांचा विकास करण्याबरोबरच बालमंदिरात 'कृतिशील शिक्षणाची' रचना निश्चित करण्यास अत्यंत उपयुक्त
ठरेल. अशा अनुभवसमृद्ध उपक्रमांमधून बालक ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून हे जग
अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल आणि जगाशी एक अर्थपूर्ण नाते निर्माण करेल.
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' मध्ये नमूद केलेल्या ३ ते ८ वर्षे वयोगटाच्या 'पायाभूत टप्प्यामध्ये' अनुभवाधारित, खेळाधारित आणि संवेदनाधारित
शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तिकेतील कृती
ज्ञानेंद्रियांच्या विकासातून बालकाची निरीक्षणशक्ती, जिज्ञासा, भाषा, विचारशक्ती आणि कृतिशीलता यांना
चालना देतात. त्यामुळे या सर्व कृती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मधील 'पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान' तसेच सर्वांगीण विकासाच्या राष्ट्रीय
उद्दिष्टांशी थेट सुसंगत आहेत.
बाल विकास मंदिर, सोलापूर यांनी विकसित केलेला हा 'अनुभव संच' बालकांच्या नैसर्गिक
विकासप्रक्रियेशी सुसंगत अनुभवांची साखळी मांडणारा
आहे. या पुस्तिकेतील कृती परिसरातील साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना
कुतूहलाकडून संवेदनशीलता, साध्याकडून
अवघड,
स्थूलाकडून
सूक्ष्म आणि प्रत्यक्ष अनुभवाकडून संकल्पनात्मक आकलनाकडे अशा 'क्रमवार पद्धतीने' रचलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना बालकांच्या वयानुसार, विकासपातळीनुसार आणि
संवेदनक्षमतेनुसार अनुभवांचे योग्य नियोजन करणे सुलभ होईल.
पुस्तिकेतील अनुभवसाखळीमुळे बालकांच्या ज्ञानेंद्रियांचा
क्रमशः विकास होतो,
त्यांची
निरीक्षणशक्ती आणि जिज्ञासा वाढते, तसेच भाषा, विचार आणि कृती यांच्यात एक
अर्थपूर्ण संबंध निर्माण होतो असा बाल विकास मंदिरातील अध्यापकांच्या निरीक्षण
नोंदीद्वारे अभ्यासलेला अनुभव आहे. परिणामी, शिक्षण ही केवळ कोरडी माहिती
देण्याची प्रक्रिया न राहता अनुभवातून ज्ञाननिर्मिती आणि सर्वांगीण विकासाची एक
जिवंत प्रक्रिया बनते. 'बाल
विकास मंदिर, सोलापूर यांनी विकसित केलेल्या कृतींच्या आधारे तैयार झालेली ही
पुस्तिका सर्व शिक्षकांसाठी एक उपयुक्त आणि समृद्ध मार्गदर्शक ठरेल. ती बालकांच्या
संवेदनक्षमतेचा विकास, ज्ञानेंद्रियांचे
परिष्करण आणि अनुभवातून ज्ञाननिर्मितीची एक शास्त्रशुद्ध दिशा देत पूर्वप्राथमिक
शिक्षणाला अधिक अर्थपूर्ण, आनंददायी
आणि
'बालकेंद्रित' बनवण्यासाठी नक्कीच मोलाची ठरेल, असा विश्वास आहे.
सस्नेह,
प्रशांत दिवेकर
Comments
Post a Comment