अन् पारिजातक हसला..
ई प्रशिक्षक ऑगस्ट २०२१ संपादकीय
सस्नेह नमस्कार,
जुलैअखेर एका अनोख्या पुष्पोत्सवाची बातमी आणि निळाईची
छायाचित्र पाहायला मिळाली. दर आठ वर्षांनी बहरणाऱ्या कारवी वनस्पतीच्या
पुष्पोत्सवाची बातमी होती. बातमी वाचल्यावर वनस्पती अभ्यासक मंदार दातार यांनी एका
कार्यक्रमात वाचन केलेली एक कविता आठवली.
तोरणगडच्या
चढणीवरली निळी कारवी परवा फुलली
अशी बहरली
साद जणू अम्बरातली खाली आली
निळी कारवी
जेव्हा फुलते मधमाशांचा सुकाळ होतो
मकरंदाचे
कुंभ सांडती बहर एवढा अपार येतो।
निळी कारवी
फुलता फुलता अधिवासाचे चित्र बदलते
उतार ऐसे
पुलकित होती निलगिरीही सार्थ वाटते
कुठे कुरुंजी
कुठे वायटी, माळ कारवी आणि टोपली
सह्याद्रीच्या
बाहुंवरती एकातून उत्क्रांत जाहली ।
फुलून येते
कारवी जेव्हा वर्ष तिच्या ते मरणाचे
जीर्ण
जीवांना निरोप देऊन नवबिजांनी रुजण्याचे
पुढल्यावर्षी
याच ठिकाणी नसेल येथे ही निळाई
लाखलाख परी
नवस्वप्नांना रुजण्याची असेल घाई।
(
कवी : मंदार दातार )
निसर्गाचे आविष्कार, त्यामागचे सूत्र आणि त्याचे मानवी जीवनाशी असलेले नाते या कवितेत सुंदरपणे
मांडले आहे. परिसर अभ्यासाचा परिचय करून देताना निसर्गाच्या अशा आविष्कारांचे
दर्शन विद्यार्थ्यांना घडवणे, त्यामागचे
विज्ञानसूत्र उलगडून दाखवणे आणि त्या सूत्राचे मानवी जीवनाशी असलेले नाते विचारार्थ
विद्यार्थ्याच्या मनात अंतर्मुख होण्यासाठी सोडून देणे. हेच परिसर अभ्यासाच्या
अध्यापनाचे सूत्र आहे.
परिसर अभ्यास, विज्ञान
विषयाच्या अध्यापकांच्या प्रशिक्षणात मी कायम एक प्रश्न विचारतो, 'तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याच्या मनात तो राहतो त्या परिसराबद्दल कुतूहल
निर्माण करायचे आहे का?' जर याचे
उत्तर हो असेल तर तुम्ही परिसर अभ्यास, विज्ञान विषयाचे
अध्यापन करू शकाल. कारण हे विषय शिकवण्याची सुरुवात करण्यासाठी कुतूहल ही आवश्यक गोष्ट
आहे, त्याशिवाय शिकणे सुरूच होऊ शकत नाही. वर्गात विज्ञान, परिसर
अभ्यासाबद्दल माहिती पोहचवू शकाल पण शिकणे कुतूहलाशिवाय सुरू होऊ शकणार नाही.
आता हे करायचे असेल तर आपसूकपणे पुढील प्रश्न येतो मुळात शिक्षकाच्या मनात
तो राहतो त्या परिसराबद्दल कुतूहल आहे का ?
करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात थोडा निवांतपणा मिळाल्यावर आपल्या परिसरातील गोष्टींबद्दल असे कुतूहल एका अध्यापकाच्या मनात निर्माण झाले, त्याबद्दलचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि सुरू झाले, एक शिक्षक आणि त्याचे इच्छुक विद्यार्थी यांचे सहशिक्षण.
निगडीच्या नवनगर विद्यालयातील श्री. शिवराज
पिम्पुडे यांनी याकाळात झाडे, फुले, पक्षी, प्राणी एवढेच नव्हे तर आकाशातील ढग मुलांबरोबर शोधले. या
सहाध्यायनाचा त्यांचा अनुभव मांडणारे 'अन् पारिजातक
हसला' या पुस्तकाचा परिचय आणि वाच. मिलिंद वाटवे यांची परिसर
अभ्यासाचे सूत्र मांडणारी प्रस्तावना या अंकात प्रकाशित करत आहोत. श्री शिवराज
पिम्पुडे यांचे हे प्रयोग त्यांच्या ब्लॉगवर वाचनासाठी उपलब्ध आहेत ते जरूर
वाचावेत. http://shivrajpimpude.blogspot.com/. आपण 'अन् पारिजातक
हसला' ज्ञान प्रबोधिनी प्रकाशनच्या https://www.jpprakashane.org ला भेट देऊन खरेदी करू शकता.
याच अंकात वयम् संस्थेच्या जयश्री कुलकर्णी यांनी आपल्या
विद्यार्थ्यांसोबत ऋतू चक्राची दिनदर्शिका कशी उलगडली व त्यातून विद्यार्थ्याचे
अनुभव विश्व, त्याचा परिसर आणि त्याचे शिकणे यांची कशी सांगड घातली हे सांगणारा लेख
परिसर अभ्यासासाठीच्या वेगळ्या उपक्रमाचा परिचय आपल्यला करून देतो.
आपण असे परिसर अभ्यासातून विज्ञान अध्ययन, सामाजिक
शास्त्र अध्ययन, भाषा अध्ययनासाठी विद्यार्थ्यांबरोबर सहशिक्षणाचे प्रयोग केले
असल्यास त्याचे अनुभव प्रशिक्षकच्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी जरूर आमच्यापर्यंत
लिहून पाठवा.
सस्नेह,
प्रशांत दिवेकर
संपादक, ई प्रशिक्षक
शैक्षणिक उपक्रम संशोधिका
ज्ञान प्रबोधिनी,पुणे
ई प्रशिक्षक मासिकाचा ऑगस्ट २०२१ महिन्याचा
लेख वाचण्यासाठी भेट द्या
https://online.fliphtml5.com/bexdc/tijx/
खूप छान
ReplyDelete