इतिहास शिकता-शिकवताना : ५
माहितीच्या कल्पनाचित्रणातून इतिहासाचा वेध घेऊया
इतिहास
शिकवताना मी विद्यार्थ्यांना अनेकदा एक गटकार्य दिले आहे. हे गटकार्य देताना
विद्यार्थ्यांना मी प्रथम त्या काळच्या परिस्थितीत घेऊन जातो. “कल्पना करा, तुम्ही छत्रपती
शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर खात्यात काम करत आहात. बहिर्जी नाईक यांनी
तुम्हाला सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील परिस्थितीची माहिती गोळा करण्याची जबाबदारी
दिली आहे. मोहिमेचे उद्दिष्ट स्पष्ट
आहे—कमीत कमी वेळेत सुरतेपर्यंत पोहोचणे, तेथील परिस्थितीचा
अचूक अंदाज घेणे आणि मोहिमेसाठी आवश्यक माहिती मिळवून सुरक्षितपणे परत येणे. ही
मोहीम मुघल साम्राज्याच्या आतल्या भागातील एका महत्त्वाच्या व्यापारी पेठेशी
संबंधित आहे. त्यामुळे मोहिमेपूर्वी शक्य तितकी अचूक आणि विविध प्रकारची माहिती
मिळवणे आवश्यक आहे.
आता तुम्ही गुप्तहेर म्हणून टेहळणीसाठी निघाला आहात. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळवावी लागेल? ती कोणाकडून मिळू शकेल? कोणत्या मार्गाने मिळवता येईल? मिळालेली माहिती खरी आणि विश्वासार्ह आहे, हे कसे ठरवाल? वेगवेगळ्या व्यक्तींकडून किंवा स्रोतांकडून मिळालेल्या माहितीमध्ये फरक असेल, तर कोणती माहिती स्वीकाराल? आणि शेवटी इतकी सारी माहिती महाराजांसमोर अशा कोणत्या पद्धतीने मांडाल, की त्यावरून योग्य निर्णय घेता येईल?
तुम्हाला प्रत्यक्ष सुरतेला जाऊन माहिती मिळवायची आहे. मात्र, तुम्ही निघण्यापूर्वी तुम्हाला हे ठरवावे लागेल की
नेमकी कोणती माहिती गोळा करायची, ती कोणाकडून मिळवायची आणि
ती कशी मिळवायची.”
असे
सांगितल्यावर विद्यार्थी स्वतःला त्या भूमिकेत ठेवून विचार करू लागतात. आता
त्यांना पाठ्यपुस्तकातील सुरतेची वसूली हा पाठ शिकायचं नसतो तर ; उलट “मला काय माहीत
असणे आवश्यक आहे?” हा प्रश्न स्वतःला विचारायचा असतो. प्रत्येक गट आपापल्या परीने माहितीची
यादी तयार करतो. सुरतेमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? व्यापारी
कोण आहेत? त्यांच्याकडे कोण काम करते? शहराची
रचना कशी आहे? वेगवेगळ्या पेठांमध्ये कोणत्या वस्तू मिळतात?
शहरात प्रवेशासाठी परवाना लागतो का? तो कोण
देतो? कोणकोणते समुदाय आणि देशांतील व्यापारी येथे येतात?
जकात कुठे घेतली जाते? खजिना खाजगी आणि
सरकारी; कुठे ठेवला जातो ? सुरक्षा
व्यवस्था कशी आहे? सुरतेकडे जाणारे आणि परत येणारे मार्ग
कोणते आहेत? जवळचा मार्ग कोणता? मार्गात
कोणत्या अडचणी येऊ शकतात? अशा प्रश्नांची यादी विद्यार्थी
स्वतः तयार करतात.
यानंतर
प्रत्येक गटाला “तुम्ही ही माहिती
कोणाकडून मिळवाल?” असा
प्रश्न दिला जातो. विद्यार्थी व्यापाऱ्याचा मुनीम, कारकून,
हमाल, नावाडी, वाटाड्या,
भिकारी, दरवेश, जकात
नाक्यावरील लेखनिक, स्थानिक दुकानदार, प्रवासी
अशा विविध व्यक्तींचा विचार करतात. त्यातून त्यांच्या लक्षात येते की, वेगवेगळ्या व्यक्तींकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती
असू शकते.
पुढे
प्रश्न येतो—“ही माहिती तुम्ही कशी मिळवणार?” विद्यार्थी संवाद साधणे, गप्पा मारणे, निरीक्षण करणे, बाजारपेठेत फिरणे, प्रवाशांशी बोलणे, टेहळणी करणे, एखाद्या ठिकाणी काम करून परिसर समजून घेणे, व्यापारी
म्हणून व्यवहार करणे अशा विविध पद्धती सुचवतात. या टप्प्यावर विद्यार्थ्यांची
भूमिका अधिक सक्रिय होते—ते माहितीचे शोधक, प्रश्नकर्ते आणि स्रोत निवडणारे बनतात.
यानंतर
प्रत्येक गटाला त्यांच्या तयार झालेल्या यादी तपासत, “यातील कोणती माहिती आकडेवारीच्या स्वरूपात हवी?
कोणती माहिती वर्णनात्मक स्वरूपात हवी?” असा प्रश्न विचारला की, विद्यार्थी संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती यांतील
फरक विचार अनुभवातून समजून घेऊ लागतात. उदाहरणार्थ, व्यापाऱ्यांची
संख्या, वस्तूंचे प्रमाण, प्रवासाचे
अंतर किंवा वेळ यांसाठी संख्यात्मक माहिती आवश्यक आहे; तर
बाजारपेठेचे स्वरूप, व्यापाऱ्यांचे अनुभव, शहरातील वातावरण किंवा सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप, करमणुकीची साधने
अशांसाठी गुणात्मक माहिती आवश्यक ठरू शकते
असे त्यांच्या लक्षात येते.
यानंतर
नाट्यीकरणच्या माध्यमातून विद्यार्थी या भूमिका प्रत्यक्ष
जगतात. काही विद्यार्थी व्यापारी, काही मुनीम, काही हमाल, काही जकात नाक्यावरील लेखनिक, काही प्रवासी किंवा स्थानिक नागरिक बनतात; तर काही
विद्यार्थी माहिती गोळा करणाऱ्या गुप्तहेरांची भूमिका करतात. गुप्तहेराची भूमिका
करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावे
लागतात, मिळालेली माहिती
नोंदवावी लागते, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेल्या
माहितीची तुलना करावी लागते आणि कोणती माहिती
अधिक विश्वासार्ह वाटते, याचा विचार करावा लागतो. त्यावेळी त्यांच्या लक्षात येते कि गुप्त
मोहिमांच्या वेळी अशी माहिती थेट प्रश्न विचारून मिळवता येत नाही तर गप्पा मारत
आडमार्गाने प्रश्न विचारत, समोरच्याला संशय येवू न देता गोळा करावी लागते. अशा भूमिका नाट्याच्या वेळी
त्याच्या लक्षात येते कि अशी कामे किती अवघड आणि
जोखमीची आहेत. पुस्तकात सुरतेची वसुली या पाठात शिवाजी महाराज इथून निघाले –
सुरतेला पोचले – खजिना घेवू यामार्गे परत आले या छापील वाक्यांच्या पलीकडचे घटनेत दडलेले महानाट्य त्यांच्या अनुभव विश्वाला स्पर्शून जाते.
अशा कृतींच्या
दरम्यान विद्यार्थी केवळ इतिहासातील एक घटना शिकत नाहीत, तर त्या घटनांच्या कल्पनाविश्वात
जगत ते इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकाप्रमाणे काम करतात. प्रश्न निर्माण करणे →
माहितीची गरज निश्चित करणे → स्रोत
शोधणे → माहिती मिळवणे →
नोंद करणे → संख्यात्मक व गुणात्मक
माहिती वेगळी करणे →
स्रोतांची तुलना करणे →
माहितीची विश्वासार्हता तपासणे →
निष्कर्ष काढणे →
माहिती निर्णयक्षम पद्धतीने मांडणे अशी संपूर्ण प्रक्रियेचा
एक
वैचारिक प्रयोग ( Thought Experiment) ते अनुभवत असतात.
यातून
पुढची स्वाभाविक प्रश्न मालिका
विद्यार्थ्यांसमोर ठेवता येते—“आपल्याला मिळालेल्या माहितील कोणती माहिती खरी आणि विश्वासार्ह आहे,
हे आपण कसे ठरवणार?” वेगवेगळ्या
स्रोतांमधून वेगवेगळी माहिती मिळाली तर कोणती स्वीकारणार? तिची
पडताळणी कशी करणार? आणि शेवटी महाराजांसमोर एवढी सारी माहिती
कशा पद्धतीने सादर करणार , की त्यांना मोहिमेचे नियोजन आणि मोहिमेतील निर्णय
घेणे सोपे जाईल?
इतिहास
शिकता-शिकवताना आपण अनेकदा तहातील कलमे, करारातील अटी, प्रदेशाचे हस्तांतरण, खंडणी किंवा महसूल यांसारखी माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडतो. मात्र ती
केवळ शब्दांत ऐकल्याने किंवा पाठ्यपुस्तकात वाचल्याने त्यामाहितीतील संख्यात्मक
मूल्ये आणि माहितीची व्याप्ती विद्यार्थ्यांच्या लक्षात येतेच असे
नाही. ‘चारशे चौरस किलोमीटरचा प्रदेश’, ‘ मोठी खंडणी’,
‘इतके अंतर’, ‘इतके सैनिक’ किंवा ‘इतके दिवस
चाललेली मोहीम’ या संख्यांचे प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्या मनात उभे राहणे आवश्यक
आहे.
यासाठी
केवळ संख्या सांगणे पुरेसे नाही; तर तिचे संदर्भ आणि प्रमाण विद्यार्थ्यांच्या
अनुभवविश्वाशी जोडता आले पाहिजे. प्रदेशाचे क्षेत्रफळ परिचित प्रदेशाशी तुलना करत,
प्रवासाचे अंतर नकाशावर दाखवत, महसूल किंवा
खंडणीची रक्कम तत्कालीन आणि समकालीन आर्थिक व्यवहारांशी जोडत, सैनिकांच्या संख्येची परिचित समूहाच्या आकाराशी तुलना करत अशा अनेक पद्धतींनी ऐतिहासिक घटनेचे कल्पनाचित्र
निर्माण करता येते.
हे
कल्पनाचित्र केवळ संख्यात्मक नसते. ऐतिहासिक माहितीची संख्यात्मक, गुणात्मक, चित्रात्मक आणि
नकाशात्मक अशा विविध प्रकारात मांडणी करता येते.
आकडेवारी तक्त्यात किंवा आलेखात मांडणे, तत्कालीन
परिस्थितीचे वर्णन समजून घेणे ती परिस्थिती चित्रे; आकृत्यांतून; रेखाटने, नकाशे
यांच्या माध्यमातून उभी करणे, सलग क्रमाने घडणाऱ्या घटना नकाशावर दाखवणे; त्यांचे मार्ग निश्चित करणे —या सर्व कृतींच्या माध्यमांतून
इतिहाचे चित्र अधिक स्पष्टपणे समजून घेता येते. उदाहरणार्थ, पुरंदरच्या
तहाचा (१६६५) अभ्यास करताना तहानुसार शिवाजी महाराजांना द्यावे लागलेले किल्ले आणि
त्यांच्याशी संबंधित मुलुख नकाशावर दाखवणे.
त्यांच्या भौगोलिक व्याप्तीची आणि उर्वरित किल्ल्यांशी त्यांची तुलना करणे.
त्याचप्रमाणे दांडी यात्रेचा (१९३०) अभ्यास करताना साबरमती आश्रमापासून
दांडीपर्यंतचा सुमारे ३९० किमीचा प्रवास नकाशावर दाखवून,
प्रत्येक दिवसाच्या प्रवासाचे नियोजन आणि सहभागी सत्याग्रहींची संख्या यांचे दृश्य
कल्पनाचित्र विद्यार्थ्यांना तयार करता येईल.
म्हणूनच
ऐतिहासिक माहितीचे स्वरूप, प्रमाण, व्याप्ती, आणि परस्परसंबंध
समजून घेत तिचे विविध माध्यमांतून
कल्पनाचित्र करता येणे ही इतिहास
अध्ययनातील एक महत्त्वाची क्षमता आहे. इतिहासातील
माहिती केवळ लक्षात ठेवण्याऐवजी तिचा संदर्भ समजून घेणे आणि तिचे कल्पनाचित्र मनात उभे करणे हा इतिहास अध्ययनाचा महत्त्वाचा भाग
आहे.
इतिहास
अध्ययनातील या प्रक्रियेत एक महत्त्वाचे कौशल्य-माहितीची
हाताळणी याचा वेध घेता येतो —जसे माहितीचा
शोध, माहितीचे स्रोत,
तिची पडताळणी, वर्गीकरण, विश्लेषण आणि तिचा योग्य संदर्भात वापर.
इतिहास शिकताना आपण केवळ भूतकाळातील घटना आणि व्यक्तींची माहिती मिळवत नसतो; तर विविध स्रोतांमधून मिळालेल्या माहितीचा
अर्थ लावत, तिची
विश्वासार्हता तपासत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निष्कर्षापर्यंत कसे पोहोचायचे हे शिकत असतो.
आजच्या
माहितीच्या युगात इतिहासाच्या अध्ययनासाठी ही क्षमता अधिकच महत्त्वाची ठरते.
पुस्तक,
नकाशा, पत्र, शिलालेख,
चित्र, तोंडी माहिती, वर्तमानपत्र,
संग्रहालयातील वस्तू किंवा डिजिटल माध्यमातून मिळालेली
माहिती—प्रत्येक स्रोताची वैशिष्ट्ये आणि मर्यादा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे
इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना केवळ ‘माहिती’ देण्याऐवजी माहिती हाताळण्याची आणि तिच्याशी चिकित्सकपणे व्यवहार
करण्याची प्रक्रिया करण्याची आणि त्याआधारे संकल्पना चित्र तयार करण्याची
प्रक्रिया अनुभवायला देणे आवश्यक
आहे.
टाइम
मशीनमधून काळाच्या टप्प्यांवर मागे जाऊन इतिहासातील त्या घटना प्रत्यक्ष अनुभवणे
शक्य नाही; पण कल्पनाशक्तीच्या
भरारीने त्या घटनांची व्याप्ती,
स्वरूप आणि संदर्भ समजून घेणे नक्कीच शक्य आहे. इतिहासातील उपलब्ध
माहिती, आकडे, नकाशे, चित्रे आणि विविध स्रोत यांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मनात भूतकाळाचे
एक जिवंत कल्पनाचित्र उभे करता येते.
अशा रीतीने इतिहासातील एका प्रसंगापासून सुरुवात करून विद्यार्थी हळूहळू माहितीचे स्रोत, माहिती संकलनाच्या पद्धती, संख्यात्मक व गुणात्मक माहिती, माहितीची
विश्वासार्हता, पडताळणी, विश्लेषण आणि
माहितीचे सादरीकरण या विविध टप्प्यांचा अनुभव घेतात. इतिहास शिकताना ‘माहिती मिळवणे’ एवढेच
महत्त्वाचे नसून माहितीबरोबर विचारपूर्वक व्यवहार
करणे किती महत्त्वाचे आहे, हे अशा गटकार्यातून
विद्यार्थ्यांना अनुभवता येते. अशा शैक्षणिक अनुभवातून इतिहास केवळ वाचलेली माहिती
न राहता समजून घेण्याचा विषय बनतो. इथेच इतिहासाच्या अध्ययनातील ‘माहिती हाताळणे’ ही क्षमता विद्यार्थ्यांच्या
प्रत्यक्ष अनुभवातून विकसित होऊ लागते.
आजच्या
काळात इतिहासाच्या अध्ययनात डेटा आणि डेटा
सायन्सचा वापर विद्यार्थ्यांना इतिहासातील प्रवाह, बदल आणि परस्परसंबंध अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत करू शकते. त्याचे
तीन महत्त्वाचे उपयोग म्हणजे—ऐतिहासिक प्रवाह
समजून घेणे, ऐतिहासिक
घटनांचे दृश्यीकरण करणे आणि सामाजिक-सांस्कृतिक बदलांचा संख्यात्मक अभ्यास करणे.
इतिहासातील
विविध स्रोतांमधील माहितीचा डेटा सायन्सच्या साहाय्याने अधिक सखोल आणि सूक्ष्म
अर्थ लावता येणे शक्य आहे.
त्यामुळे इतिहासाकडे केवळ घटनांची कालानुक्रमिक मांडणी म्हणून न पाहता, मानवी जीवनातील विविध पैलू समजून घेण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे.
मानवी जीवनाचा अवकाशीय, कालिक, संसाधनविषयक
आणि सामाजिक संदर्भ डेटाच्या आधारे अभ्यासता येतो. डेटा सायन्सच्या साहाय्याने
ऐतिहासिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन, वर्गीकरण आणि विश्लेषण करून इतिहासाच्या लेखनासाठी नवे पुरावे व अर्थ शोधता येतात. पुरातत्त्वीय
स्थळांवरील माहिती, वस्तूंचे वितरण आणि वास्तूंची नोंद यांचे
विश्लेषण करून प्राचीन समाजजीवन, व्यापार आणि नगररचना समजून
घेता येते. जनगणना, आर्थिक आकडेवारी आणि इतर सांख्यिकीय
माहितीच्या विश्लेषणातून आधुनिक भारतातील सामाजिक व आर्थिक बदलांचा मागोवा घेता
येतो. अशा प्रकारे डेटा सायन्स इतिहास लेखन अधिक पुराव्याधारित करण्याबरोबरच
विद्यार्थ्यांना इतिहासातील माहितीचे विश्लेषण करून त्याचा अर्थ लावण्याची नवी
साधने उपलब्ध करून देते.
उदाहरणार्थ, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)च्या साहाय्याने मराठा
साम्राज्याच्या विस्ताराचा नकाशा तयार करून किल्ले, डोंगररांगा,
घाटमार्ग आणि महत्त्वाची ठिकाणे यांचा परस्परसंबंध अभ्यासता येतो.
त्यातून भौगोलिक परिस्थितीने राज्यकारभार आणि सत्तासंबंधांवर कसा परिणाम केला,
हे विद्यार्थ्यांना समजते. त्याचप्रमाणे विविध कालखंडांतील जनगणना
आणि इतर आकडेवारीची तुलना करून लोकसंख्या, स्थलांतर, नागरीकरण किंवा साथीचे रोग यांमधील दीर्घकालीन बदलांचा अभ्यास करता येतो.
इतिहासातील
संसाधनांचे वितरण आणि सत्तासंबंध यांचाही डेटाच्या आधारे अभ्यास करता येतो.
उदाहरणार्थ, जमीन महसूल, शेतीचे
उत्पादन किंवा जमिनीच्या मालकीची आकडेवारी नकाशावर मांडल्यास विविध प्रदेशांतील
आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक विषमता यांचे स्वरूप अधिक स्पष्ट होऊ शकते. अशा
प्रकारे अवकाश, काळ, संसाधने आणि
सामाजिक सत्ता या विविध आयामांमधील परस्परसंबंधांचा अभ्यास करून इतिहासातील
गुंतागुंतीच्या प्रक्रियांचे अधिक समग्र आकलन होणे शक्य आहे.
अशा
कृतीतून इतिहासाचे अध्ययन हे केवळ
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट होते. गणित आणि संख्याशास्त्राच्या
सहाय्याने आकडेवारी समजून घेता येते; भूगोल आणि नकाशाशास्त्रातून घटनांची अवकाशीय व्याप्ती व परस्परसंबंध
उलगडता येतात; तर संगणकशास्त्र आणि डेटा सायन्समधून मोठ्या
प्रमाणातील माहितीचे विश्लेषण व दृश्यीकरण करता येते. या विविध ज्ञानशाखांचा उपयोग
केल्याने इतिहासातील माहिती अधिक अर्थपूर्ण पद्धतीने समजून घेता येते. त्यामुळे
इतिहास शिकवतानाही विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञान एकत्र आणून पुराव्यांच्या आधारे इतिहास समजून घेण्याची आणि त्याचा अर्थ
लावण्याची संधी मिळू शकते.
म्हणूनच
ऐतिहासिक माहितीची व्याप्ती, स्वरूप आणि परस्परसंबंध
समजून घेऊन तिचे विविध माध्यमांतून कल्पनाचित्र करता येणे ही इतिहास अध्ययनातील एक
महत्त्वाची क्षमता आहे. यासाठी ऐतिहासिक आकडेवारीचे तक्ते व आलेख तयार करणे,
ऐतिहासिक घटनांची नकाशावर मांडणी
करणे, विविध स्रोतांतील माहितीची तुलना करणे, माहितीचे दृश्यरूपात रूपांतर करणे आणि डिजिटल माहितीच्या साहाय्याने
ऐतिहासिक बदलांचा शोध घेणे अशा विविध शैक्षणिक कृती करता येतील आणि करून घेता येतील. उदाहरणार्थ, भारताच्या
जनगणनेतील लोकसंख्येतील बदलांचा आलेख तयार करणे, १८५७च्या
उठावातील प्रमुख केंद्रे नकाशावर दाखवणे, जालियनवाला बाग
हत्याकांडासंबंधी विविध स्रोतांची तुलना करणे, दांडी
यात्रेचा मार्ग आणि कालावधी दृश्यरूपात मांडणे किंवा मराठा साम्राज्याच्या
विस्ताराचे डिजिटल नकाशाद्वारे अध्ययन करणे अशा कृती करता येतील.
अशा
कृतींतून विद्यार्थी केवळ माहितीचे संकलन करणारे
न राहता तिचे विश्लेषण करणारे, त्या आधारे
अर्थ शोधणार आणि सादरीकरण करणारे इतिहास-अन्वेषक बनतील. इतिहास शिकता-शिकवताना माहिती
हाताळण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे
विद्यार्थ्यांना भूतकाळ समजून घेण्याबरोबरच पुराव्यांच्या आधारे विचार करण्याची
सवय लावणे होय.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments
Post a Comment