स्थळ-काळ-व्यक्ती त्रयीच्या आधारे इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी :
अर्थात परिस्थिती ज्ञान
इतिहासाचा
परिचय करून देण्यासाठी मी विद्यार्थ्यांना एक संवादलेखनाचे गटकार्य दिले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या प्रतापगडावरील लढाईच्या प्रसंगावर
आधारित कल्पनात्मक संवादलेखन करण्यास मी त्यांना सांगितले होते. अफजलखानाचा वध
झाल्यानंतर घडलेल्या प्रसंगांवर आधारित संवाद लिहिण्यासाठी त्यांना पुढील
परिस्थितींची कल्पना करण्यास सांगितले होते.
विद्यार्थ्यांसाठी
दिलेले प्रसंग
१. प्रतापगडावरील प्रसंग :
महाराज गडावर परतले आहेत. शामियान्यात प्रत्यक्ष काय घडले, याबद्दल ते गडावरील किल्लेदार आणि सदरेवरील इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी
बोलत आहेत.
२. राजगडावरील प्रसंग : महाराजांचा
निरोप्या राजगडावर पोहोचला आहे. त्याने अफजलखानाच्या वधाची बातमी दिल्यानंतर
त्याच्यात आणि जिजाऊ मासाहेब यांच्यात संवाद होत आहे.
३. लेखनिकाच्या घरी : प्रतापगडाच्या
सदरेवरील एक लेखनिक घरी परतला आहे. दिवसभरात घडलेल्या प्रसंगाबद्दल तो आपल्या
कुटुंबीयांशी संवाद साधत आहे.
४. प्रतापगडाच्या पायथ्याशी
असलेल्या वाडीत : एका सैनिकाची पत्नी विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली आहे. तिचा
नवरा प्रतापगडावरील सदरेवर सैनिक म्हणून काम करतो. विहिरीवर भेटलेल्या मैत्रिणीशी
ती शामियान्यात नेमके काय घडले, याबद्दल गप्पा मारत आहे.
५. आदिलशाही दरबारातील
प्रसंग : अफजलखानाच्या पराभवाचे वृत्त आदिलशाही दरबारात पोहोचले आहे. या
वृत्तावर दरबारात चर्चा सुरू आहे.
६. मुघलांच्या दिल्ली
दरबारातील प्रसंग : अफजलखानाच्या वधाची बातमी दिल्लीतील मुघल दरबारात पोहोचली
आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दरबारातील व्यक्तींमध्ये चर्चा होत आहे.
७. सुरतेच्या वखारीतील
प्रसंग : सुरतेच्या वखारीतील इंग्रज अधिकारी या घटनेची माहिती इंग्लंडला
पाठवण्यासाठी वृत्त तयार करण्याच्या तयारीत आहेत.
संवादांची
तुलना आणि चर्चेची प्रक्रिया
विद्यार्थ्यांनी
लिहिलेल्या संवादांचे वर्गात वाचन झाल्यानंतर, वेगवेगळे संवाद
लिहिणारे विद्यार्थी एकत्र येतील असे नवीन गट तयार केले. प्रत्येक गटाला आपल्या
संवादलेखनाची आणि इतर गटांच्या संवादलेखनाची तुलना करून त्यांमध्ये कोणते फरक आहेत
आणि हे फरक का पडले असावेत, यावर चर्चा करण्यास सांगितले.
या
चर्चेच्या पहिल्या फेरीत सर्व संवादांची तुलना करता यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी चर्चा करून तुलनेसाठी काही मुद्दे आणि निकष
निश्चित केले. उदाहरणार्थ, संवादातील पात्रांपैकी कोणाला
घटनेची माहिती आहे? त्या पात्राने घटनेचा किती प्रत्यक्ष
अनुभव घेतला आहे? त्याला घटनेची माहिती कोणी आणि कशा प्रकारे
दिली आहे? संवादातील इतर पात्रे कोणते प्रश्न विचारतील?
त्यांच्या प्रश्नांचा स्तर आणि स्वरूप कसे असेल? त्या प्रश्नांना संबंधित पात्र कोणत्या प्रकारे प्रतिसाद देईल?
या
मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संवादांची तुलना केली.
तुलना
करताना घटनेच्या तपशिलांमध्ये होत जाणारे बदल विद्यार्थ्यांनी नोंदवले. उदाहरणार्थ, घटना कधी घडली, याबाबतच्या तपशिलांत फरक दिसत होता.
प्रत्यक्ष घटनेच्या वेळी कोणत्या प्रहरी काय घडले, हा नेमका
तपशील संवादांमध्ये ‘काल घडलेली घटना’ आणि त्यानंतर ‘गेल्या महिन्यात घडलेला
प्रसंग’ असा बदलत गेला.
त्याचप्रमाणे, घटना कुठे घडली, याच्या स्थानविषयक तपशिलांतही बदल
होत गेले. शामियाना, प्रतापगडाचा पायथा, जावळीचे खोरे आणि महाराष्ट्र अशा क्रमाने घटनास्थळाचा उल्लेख अधिक व्यापक
आणि ढोबळ होत गेला.
घटनेत
कोण सहभागी होते, याच्या तपशिलांतही असाच फरक
दिसला. प्रत्यक्ष घटनेशी संबंधित सैनिकांची नेमकी नावे, त्यानंतर
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान, आणि पुढे मराठे व
आदिलशाही अशा व्यापक स्वरूपात सहभागी व्यक्ती आणि गटांचा उल्लेख होत गेला.
आदिलशाही
दरबार,
मुघलांचा दिल्ली दरबार आणि सुरतेच्या वखारीतील इंग्रज अधिकारी
यांच्या संवादांमध्ये घटनेची माहिती कोणत्या मार्गाने पोहोचली असेल, त्यात कोणते तपशील उपलब्ध असतील आणि त्या माहितीचे अर्थ लावताना कोणते
प्रश्न उपस्थित झाले असतील, यांचाही विचार करावा लागला.
अशा
प्रकारे,
घटना कधी घडली, कुठे घडली आणि त्यात कोण सहभागी होते किंवा
संबंधित होते, या तीन महत्त्वाच्या बाबींच्या तपशिलांतील
नेमकेपणा संवादानुसार कसा बदलत जातो, हे
विद्यार्थ्यांनी तुलनेतून स्पष्ट केले.
या
संवादलेखनाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एकाच
ऐतिहासिक घटनेकडे वेगवेगळ्या व्यक्तींच्या आणि परिस्थितींच्या दृष्टिकोनातून
पाहण्याची संधी मिळाली. एखादी घटना
घडते तेव्हा त्या घटनेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला तिचे स्वरूप, तपशील आणि परिणाम सारखेच समजतात, असे नाही.
प्रत्येकाची भूमिका, घटनेशी असलेला प्रत्यक्ष किंवा
अप्रत्यक्ष संबंध, त्याला उपलब्ध असलेली माहिती आणि त्याची
परिस्थिती यांनुसार घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, याची
कल्पना विद्यार्थ्यांना आली. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील घटनेचे केवळ पुनर्कथन
करण्याऐवजी, त्या घटनेशी संबंधित व्यक्ती कोण होत्या,
त्यांचे एकमेकांशी काय संबंध होते, कोणाला
घटनेची प्रत्यक्ष माहिती होती, कोणाला ती इतरांकडून मिळाली
होती आणि प्रत्येकाने आपले विचार कोणत्या पद्धतीने व्यक्त केले असते, याचा विचार करून विद्यार्थ्यांनी संवादांची रचना केली.
यानंतर
वेगवेगळ्या संवादांची तुलना करताना विद्यार्थ्यांना माहितीच्या
उपलब्धतेचा आणि तिच्या प्रसाराचा परिणाम समजून घेता आला. प्रत्यक्ष
घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीला उपलब्ध असलेले तपशील आणि काही अंतरावर
असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेली माहिती यांत फरक असू शकतो. काळ जसजसा पुढे जातो
आणि माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचते, तसतसे काही तपशील गाळले जाऊ शकतात, बदलू शकतात किंवा
त्यांत नवीन अर्थांची भर पडू शकते. तसेच, वेगवेगळ्या व्यक्ती
आणि संस्थांना एकाच घटनेतील वेगवेगळे पैलू महत्त्वाचे वाटू शकतात. या प्रक्रियेचा
विचार करताना विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती केवळ ऐकून किंवा वाचून
स्वीकारण्याऐवजी तिचा स्रोत, संदर्भ आणि विश्वासार्हता
तपासण्याची गरज लक्षात आली.
या
चर्चेतून इतिहासाच्या अभ्यासातील काही मूलभूत प्रश्नही विद्यार्थ्यांसमोर आले.
एखादी घटना नेमकी कुठे आणि केव्हा घडली? तिचा घटनाक्रम
काय होता? त्या घटनेत कोणत्या व्यक्ती आणि संस्था सहभागी
होत्या? त्यांची भूमिका काय होती आणि घटनेच्या घडामोडींमध्ये
त्यांचे महत्त्व काय होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी
कोणती ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत? त्यांपैकी कोणती साधने
कोणत्या प्रकारची माहिती देऊ शकतात आणि त्यांची विश्वासार्हता कशी तपासता येईल?
अशा प्रश्नांच्या आधारे ऐतिहासिक
घटनेचा अभ्यास करण्याची दिशा विद्यार्थ्यांना
मिळाली.
अशा
प्रकारे,
संवादलेखन आणि त्यानंतरची तुलना व चर्चा या प्रक्रियेतून इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ घटनांची माहिती किंवा कालक्रम
जाणून घेणे नव्हे, तर स्थळ, काळ आणि व्यक्ती या त्रयीच्या संदर्भात
घटनांचा अभ्यास करणे, ही समज विद्यार्थ्यांमध्ये
विकसित होण्यास मदत झाली. त्याचबरोबर, ऐतिहासिक साधनांचा
चिकित्सक वापर, माहितीची पडताळणी आणि वेगवेगळ्या
दृष्टिकोनांतून घटनेचे आकलन करण्याची दृष्टीही विकसित होऊ लागली.
इतिहास
शिकता-शिकवताना एखाद्या घटनेचा कालानुक्रम, त्यात सहभागी
व्यक्तींच्या भूमिका आणि घटनेशी संबंधित स्थळाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या
लक्षात येणे महत्त्वाचे आहे. इतिहासातील घटना या विशिष्ट काळातील आणि विशिष्ट
परिस्थितीतील मानवी कृतींमधून घडत असतात. त्यामुळे केवळ काय घडले, हे जाणून घेणे पुरेसे नसते; ती घटना का आणि कशी घडली,
कोणत्या व्यक्तींचा त्यात सहभाग होता आणि त्यांच्या कृतींवर
तत्कालीन परिस्थितीचा काय परिणाम झाला, याचाही विचार करावा
लागतो.
या
दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास केल्यास तो केवळ राजे-महाराजे आणि
राजेरजवाड्यांपुरता मर्यादित राहत नाही. सैनिक, सामान्य नागरिक,
स्त्रिया आणि स्थानिक समाज यांचा घटनांमधील सहभाग, त्यांचे अनुभव आणि त्यांचे दृष्टिकोन यांचाही विचार करता येतो. अशा
प्रकारे राजांचा इतिहास समजून घेण्याबरोबरच
समाजाचा इतिहास समजून घेण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये
विकसित करता येते.
इतिहासाच्या
मांडणीत एखाद्या घटनेचा महत्त्वाचा तपशील उपलब्ध नसणे, त्याला पुरेसा ऐतिहासिक आधार नसणे किंवा योग्य साधनांचा शोध घेण्याचे
प्रयत्न अपुरे पडणे, यांमुळे घटनेचे आकलन अपूर्ण राहू शकते.
म्हणूनच विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना योग्य प्रश्न विचारणे,
उपलब्ध माहितीचे स्रोत तपासणे आणि ऐतिहासिक साधनांच्या आधारे
निष्कर्ष काढणे यांचे महत्त्व समजावून देणे आवश्यक आहे.
एकदा
वर्गात विद्यार्थ्यांनी याच प्रतापगडाच्या लढाईची गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला.
तेव्हा मी त्यांना सांगितले, “तुम्ही मला जे प्रश्न
विचाराल, त्यानुसार आणि तेवढीच गोष्ट मी सांगेन.” त्यानंतर
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनुसार गोष्ट पुढे जात राहिली. मात्र, त्यांच्या प्रश्नांमध्ये अंगरक्षक कोण होते, हा
प्रश्नच आला नाही. त्यामुळे गोष्ट सांगताना सय्यद बंडा आणि जीवा महाले यांचा
उल्लेखच झाला नाही! प्रश्न विचारताना एखादा
महत्त्वाचा तपशील लक्षात न घेतल्यास तो संपूर्ण कथनातून कसा सुटू शकतो,
हे या गमतीशीर अनुभवातून विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.
वर्गातील
या छोट्याशा कृतीमुळे इतिहासाचा अभ्यास करताना स्थळ, काळ आणि व्यक्ती यांच्याबद्दल प्रश्न विचारून सुरुवात करणे किती आवश्यक आहे, हे
विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. इतिहासाचा अभ्यास
म्हणजे केवळ घटना ऐकणे किंवा पाठ करणे नव्हे, तर तिचे सर्व पैलू समजून घेण्यासाठी योग्य
प्रश्न विचारणे आणि त्यांची उत्तरे शोधणे ही प्रक्रिया आहे, हेही त्यांच्या मनावर ठसले.
इतिहासाचे अध्यापन करताना विशिष्ट काळात, विशिष्ट स्थळी, विशिष्ट
व्यक्तींनी केलेल्या कृती, त्यांमागील परिस्थिती आणि त्या
कृतींचे परस्परसंबंध विद्यार्थ्यांच्या मनात स्पष्टपणे रुजवणे महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे, या संदर्भांचा लोप झाल्यास काय घडू शकते,
हेही त्यांच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे. इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना केवळ घटनांची माहिती
देण्यापेक्षा त्या घटनांचा संदर्भ,
त्यातील व्यक्तींच्या भूमिका आणि त्यांच्यातील परस्परसंबंध
शोधण्याची दृष्टी विकसित करण्यास मदत करणे, हे
शिक्षकाचे प्राथमिक आणि प्राधान्याचे काम आहे.
इतिहासाच्या
पलीकडे : परिस्थिती ज्ञानाचा दृष्टिकोन
स्थळ, काळ आणि व्यक्ती या त्रयीचा विचार केवळ इतिहासाच्या अध्ययनापुरता मर्यादित
नाही. रोजच्या बातम्या पाहताना किंवा वर्तमानपत्र वाचताना आपल्या समोर येणाऱ्या
प्रत्येक घटनेचे आकलन करण्यासाठीही या तीन घटकांचे महत्त्व समजणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर, आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या माहितीमध्ये या तीनही
घटकांच्या संदर्भात कोणती माहिती अपुरी आहे, कोणते तपशील त्रोटक आहेत किंवा मांडणीत काय
विसंगती आहे, हे ओळखता येणेही महत्त्वाचे आहे.
अशा प्रकारे घटनांकडे पाहण्याची सवय विकसित झाल्यास आपल्या सभोवतालच्या
परिस्थितीचे अधिक नेमके आकलन होण्यास मदत होते.
ज्ञान
प्रबोधिनीत विद्यार्थ्यांना इतिहास, वर्तमान आणि
भविष्य यांचे एकत्रित आकलन व्हावे, या उद्देशाने परिस्थिती ज्ञान
हा स्वतंत्र विषय विशेष तासिकेच्या
स्वरूपात शिकवला जातो. मात्र, परिस्थिती ज्ञान म्हणजे केवळ
समकालीन इतिहासाचा अभ्यास नव्हे. समकालीन इतिहास म्हणजे आपल्या वर्तमानकाळाशी
जवळचा संबंध असलेल्या अलीकडच्या काळातील घटनांचा इतिहास. यामध्ये आपल्या जीवनावर
आणि समाजावर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांचा अभ्यास केला जातो.
जसे
अलीकडेच परिस्थिती ज्ञानाच्या काही तासिकेत आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी (Strait
of Hormuz) आणि मलाक्काची सामुद्रधुनी (Strait of Malacca) यांचा तुलनात्मक अभ्यास केला. नकाशाच्या साहाय्याने या दोन्ही
सामुद्रधुनींचे भौगोलिक स्थान, त्यांचे सामरिक महत्त्व आणि
त्यांच्यामधून होणारी आंतरराष्ट्रीय व्यापाराची वाहतूक समजून घेतली. त्यानंतर
मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात अलीकडच्या काळात घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास
केला.
भारताचे
या सागरी क्षेत्रातील हितसंबंध, इंडोनेशियातील सबांग
बंदराचे महत्त्व व त्याच्या विकासाच्या संदर्भातील घडामोडी, अंदमान-निकोबार
बेटांचे भौगोलिक आणि सामरिक स्थान, तसेच चीनचा या प्रदेशातील
वाढता प्रभाव आणि त्यासंदर्भातील 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स'
ही संकल्पना अशा विविध मुद्द्यांचा विचार केला. या सर्वांचा संबंध
आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक हितसंबंध, पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक सत्तासंतुलन
यांच्याशी कसा जोडला जातो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
या
अभ्यासासाठी नकाशांचा वापर करून भौगोलिक स्थान आणि विविध देशांचे हितसंबंध समजून
घेतले. त्याचबरोबर, भविष्यातील संभाव्य घडामोडींचा
विचार करण्यासाठी प्रसंगाधारित लेखन (Scenario Writing) हा
उपक्रम घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भूमिका कल्पून त्या
दृष्टिकोनातून विचार मांडण्यास सांगितले. उदाहरणार्थ, एखादी
आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनी चालवणारी व्यक्ती, अंदमान-निकोबार
बेटांवर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी व्यक्ती, भारताचा
संरक्षणमंत्री किंवा मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात राहणारा एक सामान्य
नागरिक अशा भूमिका विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या. प्रत्येकाच्या भूमिकेतून या प्रदेशातील घडामोडींकडे पाहताना
कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतील, कोणत्या चिंता
किंवा प्रश्न निर्माण होतील आणि भविष्यातील परिस्थितीबाबत काय भूमिका असेल, याचे लेखन त्यांनी केले.
या
प्रक्रियेत स्थळाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा, वर्तमानकाळातील
घडामोडींचा आणि त्यात सहभागी असलेल्या विविध देशांच्या व व्यक्तींच्या भूमिकांचा
एकत्रित विचार करून विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे आकलन करण्याचा प्रयत्न केला.
या
उदाहरणातून स्थळ–काळ–व्यक्ती या त्रयीचा एकत्रित विचार कसा करता येतो, हे स्पष्ट होते. होर्मुझ व मलाक्काच्या सामुद्रधुनी, सबांग बंदर आणि अंदमान-निकोबार बेटे यांचे भौगोलिक व सामरिक महत्त्व समजून
घेताना स्थळाचा विचार केला. या प्रदेशातील अलीकडच्या घडामोडी, बदलते सागरी हितसंबंध आणि भविष्यातील संभाव्य परिस्थिती यांचा अभ्यास
करताना काळाचा संदर्भ घेतला. तर भारत, इंडोनेशिया, चीन आणि इतर संबंधित देशांचे नेतृत्व, त्यांच्या
भूमिका, धोरणे आणि परस्पर हितसंबंध यांचा विचार करताना
व्यक्ती या घटकाचे महत्त्व समजून घेतले.
या
तिन्ही घटकांचे परस्परसंबंध लक्षात घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास केवळ
नकाशावर स्थळे शोधणे किंवा घटनांची माहिती मिळवणे यापुरता मर्यादित राहिला नाही.
वर्तमान परिस्थितीचे विविध दृष्टिकोनांतून आकलन करणे, त्यातील परस्परसंबंध शोधणे आणि भविष्यातील संभाव्य घडामोडींचा विचार करणे,
अशी अभ्यासाची दिशा विकसित झाली. अशा प्रकारे परिस्थिती ज्ञानाच्या
अभ्यासात स्थळ–काळ–व्यक्ती ही त्रयी वर्तमानातील घटनांचे सखोल आकलन
करण्यासाठी आणि भविष्याचा विचार करण्यासाठी एक महत्त्वाची अभ्यासचौकट ठरते.
परिस्थिती
ज्ञानाच्या अभ्यासात समकालीन इतिहासाच्या संदर्भातून वर्तमानातील घडामोडींची
पार्श्वभूमी समजून घेण्यास आणि त्यातून भविष्याचा विचार करण्यास मदत होते. मात्र, त्याहीपुढे जाऊन या घटनांशी माझे नाते काय आहे, त्यांचा
माझ्या जीवनावर, माझ्या समाजावर आणि माझ्या देशावर काय
परिणाम होतो, याचा विचार विद्यार्थ्यांना करावा लागतो.
त्यामुळे हा अभ्यास केवळ घटनांची माहिती मिळवण्यापुरता किंवा त्यांचे तटस्थ
निरीक्षण करण्यापुरता मर्यादित राहत नाही; विद्यार्थी
स्वतःला त्या परिस्थितीचा एक भाग म्हणून पाहू लागतात.
एखाद्या
घटनेच्या संदर्भात स्थळ, काळ आणि व्यक्ती या त्रयीचा
माझ्याशी काय संबंध आहे, त्या परिस्थितीत माझे स्थान काय आहे
आणि माझी भूमिका काय असू शकते, याचा विचार करणे हे परिस्थिती
ज्ञानाच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास
करताना विद्यार्थ्यांनी विकसित केलेली प्रश्न विचारण्याची आणि संदर्भ तपासण्याची
दृष्टी वर्तमानातील घटनांचे आकलन करण्यासाठीही उपयोगी ठरते. ज्ञान प्रबोधिनीत
समकालीन इतिहासाकडे याच व्यापक शैक्षणिक उद्दिष्टाने पाहिले जाते. इतिहास
शिकता-शिकवताना विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे आणि त्यातून नवे
शैक्षणिक अनुभव व अध्यापनाचे प्रयोग विकसित करण्यास प्रेरणा देणारे हे एक
महत्त्वाचे क्षेत्र आहे.
ज्ञान प्रबोधिनीतील समकालीन इतिहासाच्या अभ्यासाची ही व्यापक
संकल्पना इतिहास शिकता-शिकवण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भर घालते. इतिहासाचा
अभ्यास केवळ भूतकाळातील घटनांपुरता मर्यादित न ठेवता, वर्तमानातील घडामोडींच्या आकलनाशी आणि भविष्याचा
विचार करण्याशी जोडला जातो. नजीकच्या काळातील
घटनांचा अभ्यास करत असल्यामुळे वृत्तपत्रे, बातम्या,
विविध अहवाल आणि प्रत्यक्ष उपलब्ध माहिती यांसारखी साधने
विद्यार्थ्यांना वापरता येतात. त्यामुळे ऐतिहासिक साधनांच्या उपलब्धतेच्या काही
मर्यादा कमी होतात. घडणाऱ्या घटनाच अभ्यासाचा विषय असल्याने विद्यार्थ्यांना
प्रश्न विचारणे, माहितीची पडताळणी करणे, वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणे आणि स्वतःचे निष्कर्ष मांडणे यांची संधी
मिळते. अशा प्रकारे समकालीन इतिहास हा इतिहास शिक्षणात विद्यार्थ्यांना
विचारप्रवृत्त करणारा आणि नव्या शैक्षणिक अनुभवांना व अध्यापनाच्या प्रयोगांना वाव
देणारा महत्त्वाचा मार्ग ठरतो. इतिहास शिक्षण अधिक जिवंत, अनुभवाधारित
आणि जीवनाशी जोडणारे बनवणे, हे ज्ञान प्रबोधिनीचे इतिहास
शिकता-शिकवण्याच्या क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
इतिहास, वर्तमान आणि
भविष्य यांचा परस्परसंबंध समजून घेत विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालच्या
परिस्थितीचे चिकित्सक आकलन करण्यास प्रवृत्त करणारा परिस्थिती ज्ञान हा
ज्ञान प्रबोधिनीतील स्वतंत्र अध्ययनविषय तर आहेच; पण त्याचबरोबर
इतिहास शिक्षणाला जीवनाशी जोडणारा आणि विद्यार्थ्यांची विचार करण्याची दृष्टी
विकसित करणारा एक महत्त्वाचा शैक्षणिक दृष्टिकोनही आहे.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments
Post a Comment