Skip to main content

सहपुस्तक चाचणी

 

सहपुस्तक चाचणी

               मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे; दूरचित्रवाणीवर दहावी,बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या, चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी...? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात, स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात, पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी...?

             माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले, 'अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका.' मी विचारले, का? काय झाले? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्यांदा एका विद्यार्थ्याने विचारले होते, 'सर या रोगाला परीक्षेत कमी वेटेज असताना तुम्ही एवढ्या तपशिलात का शिकवता आहात?' आता परीक्षेतील मार्कांच्या वेटेजनुसार का तुमच्याकडे पेशंट येणार आहेत."

म्हणजे परीक्षेसाठी आपण शिकतो का? की, आपण काय,किती शिकलो हे तपासण्यासाठी परीक्षा आहे? आपण शिकवलेले विद्यार्थ्याला किती समजले हे तपासून पुढील अध्यापनाची तयारी करण्यासाठी परीक्षा आहेत का? की, परीक्षेत काय विचारले जाणार आहे त्यासाठी आणि तेवढेच अध्यापन करायचे आहे?

             कॉपी कमी करायची असेल, स्मरणावरचा भार कमी करून आकलन, उपयोजन तपासायचे असेल तर `सहपुस्तक चाचणी' हा परीक्षा प्रकार उपयोगी पडेल असे वाटते. आज केंद्रिय परीक्षामंडळाने ९वी, १०वी साठी अशा सहपुस्तक चाचण्या सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात, आकारिक मूल्यमापनात अशा सहपुस्तक चाचण्या  घेण्यास परवानगी दिली आहे.

                  अध्यापनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी सक्षम बनवणे हे आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्यासाठी लागणारी विविध कौशल्ये शिकवणे, विविध अनुभव देणे आवश्यक आहे. माहिती प्राप्त करणे, समज वाढवणे, पूर्वज्ञानात नवीन अनुभव घेत भर घालणे हे तर विद्यार्थ्याला जमणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा वापर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीत करता आला पाहिजे. सहपुस्तक चाचणीने माहिती प्रधान प्रश्नांपासून आकलन तपासणाऱ्या प्रश्नांपर्यंत मूल्यमापनात बदल करता येणे शक्य आहे. सहपुस्तक चाचणी वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल.

१) पाठ्य पुस्तकावर आधारित सहपुस्तक चाचणी :

         याचे दोन स्तर करता येतील.

पहिल्या स्तरात विद्यार्थ्याचे पाठ्यपुस्तकाचे  वाचन, पाठ्यपुस्तकात प्रश्नानुरूप  आशय शोधता येणे, आशयाची प्रश्नानुरूप पुनर्मांडणी करता येणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रश्नपत्रिका तयार करावी.

दुसऱ्या स्तरावर उपयोजन, तुलना, विश्लेषण पातळीवरचे प्रश्न विचारता येतील. दुसऱ्या स्तराच्या चाचणीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा वापर संदर्भ म्हणून करता येईल पण प्रश्नांची उत्तरे थेट पाठ्यपुस्तकात मिळणार नाहीत असे प्रश्न असावेत. यासाठी ब्लुमच्या उच्चस्तरीय विचार कौशल्य सारणीचा विचार करावा.

२) पाठ्यपुस्तकेतर संदर्भावर आधारीत सहपुस्तक चाचणी :

                    पाठ्यपुस्तकातील संकल्पनांसंदर्भात विद्यार्थ्यांनी अवांतर पूरक वाचन करावे अशी अपेक्षा असते. विश्वकोष, अॅटलास, शब्दकोश, इंटरनेट वरील संकेत स्थळे या सारखे संदर्भ वापरत एखाद्या संकल्पनेबद्दल खुले प्रतिसादी (ओपन एन्डेड) प्रश्नांचा समावेश असलेली सहपुस्तक चाचणी घेता येईल. याला सहसंदर्भ सहपुस्तकचाचणी म्हणता येईल.

३) अध्यापकाने पुरवलेल्या संदर्भाचा वापर करत सहपुस्तक चाचणी :

            समाजात घडणाऱ्या अनेक घटना या पाठ्यपुस्तकातील संकल्पनांशी निगडीत असतात. पाठ्यपुस्तकातील संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी ह्या दैनंदिन जीवनातील घटनांचा उपयोग होतो. अशा घटना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तकातील घटकाचे आकलन चांगले असल्यास त्यांचे उपयोजन दैनंदिन घटना समजून घेण्यासाठी विद्यार्थी कसा करतो हे तपासता येईल, त्यासाठी आपण वर्तमानपत्रे, मासिके यात प्रकाशित झालेले लेख, अहवाल, वृत्त, नकाशे, छायाचित्रे, आलेख विद्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी अभ्यास साहित्य म्हणून द्यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पाठ्यपुस्तक वापराची परवानगी नसेल पण असे अध्यापकाने पुरवलेले अभ्यास साहित्य तो बरोबर बाळगू शकेल. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण रक्षण, प्रदूषण, नागरी कर्तव्ये या सारख्या अनेक विज्ञान, समाजशास्त्रातील घटकांसाठी अशी  चाचणी घेता येईल. अशा चाचणीसाठी अध्यापकाला विशेष मेहनत घेऊन संदर्भ साहित्य तयार करावे लागते.

४) प्रश्नपत्रिका सोडवताना कोणते संदर्भ लागतील हे ठरवण्याची संधी विद्यार्थ्याला  देणारी सहपुस्तक चाचणी :

                 शा सहपुस्तक चाचणीत विद्यार्थ्याला एका पानावर परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, माहिती लिहून आणण्याची परवानगी द्यावी. असा संदर्भाचा कागद विद्यार्थी परीक्षेच्यावेळी सोबत बाळगू शकेल. हा संदर्भकागद उत्तर पत्रिकेला जोडण्यास सांगावा म्हणजे अध्यापकाला त्याने कोणते संदर्भ वापरले आहेत हे लक्षात येईल आणि केवळ पाठ केले नाही किंवा आठवले नाही या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका सोडवताना जी अडचण येते ती दूर करून त्याला आकलन, उपयोजन पातळीवर प्रश्न सोडवण्यास सुलभता येईल

सहपुस्तक चाचणी घेताना :

१)      पुस्तक वापरायला मिळणार आहे म्हणजे अभ्यासाची गरज नाही असा भ्रम विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होतो.

२)      केवळ काठिण्यपातळी वाढवलेली प्रश्नपत्रिका म्हणजे सहपुस्तक चाचणीची प्रश्नपत्रिका नाही. विद्यार्थ्याचे आकलन, उपयोजन, विचार कौशल्य तपासणारे प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका सहपुस्तक चाचणीसाठी काढावी लागेल. माहिती शोधण्यापेक्षा माहितीची पुनर्मांडणी करणारी विचार कौशल्ये तपासता येतील असे प्रश्न विचारावेत. प्रश्नांमध्ये चिकित्सा करा, तुलना करा, तुमचे मत मांडा, तुम्ही काय कराल अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत.

३)      सहपुस्तक चाचणी सोडवताना वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

     आकारिक मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या मर्यादा दूर करण्यासाठी आवश्यक अशी परीक्षा घेण्यासाठी सहपुस्तक चाचणी हे साधन नक्कीच उपयोगी ठरेल. शालेय मूल्यमापनात पाठ करा, सादर करा, घोका आणि ओका  या चक्रातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करणाऱ्या सहपुस्तक चाचण्या घेण्याचे वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज आहे. 

आज लॉक डाऊनच्या काळात तंत्रस्नेही सहपुस्तक चाचण्या नव्हे तर सहसंदर्भ चाचण्या कशा घेता येतील, ऑनलाईन संदर्भ वापरण्यापासून ऑनलाईन गटाकार्य देत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करता येईल याबद्दल पुढिल लेखात विचार करूयात.

( प्रशिक्षकमध्ये प्रकाशित )                        

                                      प्रा. प्रशांत दिवेकर.

                                     ज्ञान प्रबोधिनी, पुणे.



Comments

  1. एखादे उदाहरण दिले तर जास्ती स्पष्टता येईल. जोडी परीक्षा किंवा अधिक वेळची परीक्षा असेही करण्याचा उपयोग होऊ शकतो.

    ReplyDelete
  2. प्रशांतजी, सध्याच्या म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षापासूनच्या वास्तवावर नेमके विश्लेषण मांडले आहे.
    परंतु सह पुस्तक परीक्षा आणि सह संदर्भ चाचण्या घेण्यासाठी शिक्षक तयार झाला पाहिजे तरच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा तो करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू शकेल. मुळात आपण म्हणतात तसे मुलांना अभ्यास कसा करावा हे शिकवणे जास्त महत्वाचे आहे. परंतु अध्यापन मात्र पारंपारिक पद्धतीने होते आहे. अजून पालक व वरिष्ठांचा अध्यापणाकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन आहे, तो बदलणे गरजेचे वाटते. परंतु प्रथम शिक्षकांना सक्षम करणे आवश्यक वाटते.
    आपल्या माध्यमातून शिक्षकांचे उद्बोधन होत आहे. आपले मनापासून धन्यवाद...

    ReplyDelete
  3. ERC तर्फे जर या संदर्भात साहित्य शिक्षक विद्यार्थी यांचे साठी उपलब्ध झाल्यास ते निश्चित उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, त्याने समस्त शिक्षकांना दिशा मिळेल असा विश्वास वाटतो.

    ReplyDelete
  4. पूर्वा देशमुख
    सर सध्याच्या वेळात या चाचण्यांची खरोखर आवश्यकता वाटते.

    ReplyDelete
  5. 👍👍👍🙏

    ReplyDelete
  6. प्रशांतजी, महत्वाचा विषय घेतला आहे. मध्यामात, समाजात, विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन् खरोखर असाच समज निर्माण होत आहे की आता काहींचा समज असाच होतोय की आता ओपन बुक exam म्हणजे आता शिक्षणाचा बट्याबोळ होणार आहे. दुसऱ्या बाजूला परत प्रश्न कसे असावेत या संदर्भात शिक्षक सर्वात महत्वाचा घटक आहे तो प्रशिक्षित आहे का? तयार आहे का? अन्यथा त्याचे देखील आयते पुस्तके, गाईड्स, प्रश्नसंच त्यांची उत्तरे आयती मिळायला लागली तर व्यायावस्था कोलमडेल. नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत चांगले दूरगामी परिणामी निर्माण करणारे आहे असे सर्वदूर ऐकायला मिळते. त्या संदर्भात जनजागृती होते देखील आहे. पण अमलबजावणी कशी होते हे जास्त महत्वाचे आहे. त्यावर systems निर्माण झाल्या पाहिजेत असे मला वाटते. आपण मांडलेल्या प्रत्येक घटकावर सविस्तर लेखाची अपेक्षा आहे. आपण ते चिंतन करून लिहिणार यात शंका नाही.

    ReplyDelete
  7. सह पुस्तक चाचणी, उत्तम उदाहरण. मात्र असेही काही विद्यार्थी आहेत की पुस्तकात पाहून परीक्षा द्यावयाची आहे म्हणजे 'वाचलं नाही तरी चालेल' हा विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यातून कायमचा नाहीसा करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागेल.

    ReplyDelete
  8. पूजा पवार सर ह्या चाचण्यांची खरोखर आवश्यकता आहे कारण की विद्यार्थ्यांचा जर पाया पक्का झाला नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण करत असताना येणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील उदाहरणार्थ वाचन करणे लेखन करणे त्यामुळे चाचण्या घेणे हे आवश्यकच आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...

বন্দে গুৰু পৰম্পৰা

বন্দে গুৰু পৰম্পৰা গুৰু পূৰ্ণিমা মানে জ্ঞান পৰম্পৰাৰ বাহক হোৱাৰ দিন । ইয়াম বিৱস্বতে যোগ প্ৰক্তৱনহম্ভায়ম । বিৱস্বণ মনভে প্ৰাহ মনুৰিক্ষৱকভে ব্ৰেৱীত ।। ( ৪ - ১ ) ( এটি অক্ষয় যোগৰ বিষয়ে মই সূৰ্য দেৱতাক বৰ্ণনা কৰিছো । বিৱস্বণে তেতিয়া মনুক সম্বোধন কৰিলে , আৰু মনুৱে ইক্ষৱাকুক সম্বোধন কৰিলে ) ।           ভাগৱত গীতাত   অৰ্জুনক উপদেশ দিওঁতে ভগৱান শ্ৰীকৃষ্ণই জ্ঞানৰ পৰম্পৰাৰ উদাহৰণ দাঙি ধৰিছে । তেওঁ কয় ,” মই এই অবিনাশী যোগ সূৰ্যক ( বিবাস্বণ ) প্ৰদান কৰিলোঁ , যিয়ে ইয়াক মনুলৈ আগবঢ়াই দিলে । “           ভাৰতীয় পৰম্পৰাত যেতিয়াই নতুন জ্ঞান বা দৰ্শন উপস্থাপন কৰা হয় , তেতিয়াই গুৰুৰ পৰম্পৰাৰ উত্তৰাধিকাৰিকো স্বীকৃতি দিয়া হয় , কাৰণ জ্ঞানৰ বংশ সংৰক্ষণ পাৰ হৈ গ ’ লেহে জ্ঞান বিস্তাৰিত হৈ উঠে ।           জ্ঞান প্ৰবোধিনীয়ে চাৰিজন মহান ব্যক্তিত্ব সমৰ্থ ৰামদাস , স্বামী বিবেকানন্দ আৰু যোগী অৰবিন্দক নিজৰ দূৰদৰ্শী হিচাপে ...