सर्वधर्मस्थळ
: एकात्मतेसाठीचा सहचार
२००२ मध्ये दहावी-बारावीची
परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींना घेऊन अरुणाचल प्रदेश अभ्यासदौऱ्याला गेलो
होतो. गुवाहाटीला पोचल्यावर चार गटात विभाजित होऊन अरुणाचलाच्या वेगवेगळ्या
भागातील जनजीवनाचा परिचय करून घेण्यासाठी प्रवास योजले होते. एक गट तेजू-वॉलॉंग
भागात, दुसरा
गट रोइंग परिसरात, तिसरा
गट जीरो परिसरात तर चौथा गट तवांग परिसरात गेला होता. आमचा गट तवांग भागातील
मोन्पा जनजाती वसलेल्या गावांमध्ये गेला होता. १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या
संदर्भात तवांग परिसर हे महत्त्वाचे युद्धस्थळ आहे. तवांगकडे प्रवास करताना वाटेत
जसवंतगढसारखी अनेक युद्धस्मारके लागतात. १९६२च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या
जवानांचे एक मोठे युद्धस्मारक तवांग येथे आहे. एक दिवस संध्याकाळी हे युद्धस्मारक
पाहण्यासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी बुमला खिंडीला भेट द्यायची होती. भारत-चीन
सीमेवरील हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने याठिकाणी जाण्यासाठी परवाना काढावा लागतो.
मुलींना स्मारकस्थळी सोडून, युद्ध
स्मारकासमोरच सैन्याच्या कार्यालयात परवान्याबद्दल पूर्तता करण्यासाठी गेलो.
बऱ्याच वेळाने दुसऱ्या दिवशी लेखी परवानगी देता येणार नाही पण वाटेत अडवत नाहीत
तोपर्यंत जेवढे जाता येईल तेवढे जाऊनया त्या दिशेने - असे तोंडी आश्वासन/ परवानगी
घेऊन परत आलो. अंधार पडला होता आणि यात बराच वेळ गेला होता पण तोपर्यंत मुलींच्या
पद्यगायनाने त्यांची जवानांशी मैत्री झाली होती आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या
प्रवासासाठी जवानांकडून भेट म्हणून मिल्क कॅन,
बिस्किटांची
रसददेखील मिळवली होती.
दुसऱ्या दिवशी प्रवासाला
सुरुवात केली. वाटेत दोन ठिकाणी चौकशी झाली पण तोंडी परवानगी सांगत पुढेपुढे जात
राहिलो. शेवटी एका कॅम्पच्या इथे अडवले व
लेखी परवाना असेल तर पुढे जाता येईल, असे
कोणतेही अर्ग्युमेंट चालणार नाही अशा आवाजाने प्रवास स्थगित झाला. एवढे लांब आलाच
आहात तर थोडावेळ परिसरात थांबायची सवलत दिली एवढेच. चालत थोडे अंतर पुढे जाऊन आलो
पण एवढ्या उंचीवर चालायला पुरेसे कष्ट पडत आहेत हे जाणवल्यावर परत आलो. चेक
पोस्टवरील जवानांकडून कळले की येथून पुढे मोठ्या पोस्ट नाहीत. जवानांच्या तुकड्या
काही काळ पुढील चौक्यांवर राहून परत या कॅम्पवर येतात. बर्फाच्या काळात तर
परिस्थिती अजून अवघड असते. कॅम्प पाहायची परवानगी पण नाकारण्यात आली. साधारण
तासाभराने आम्ही तेथे आहोत हे पाहून एक जवान परत आमची चौकशी करू लागला. आम्ही
कोठून आलो, कायकाय
पाहिले याबद्दल मुलींबरोबर बरीच प्रश्नोत्तरे झाली. जरा ओळख झाल्यावर आम्ही पुढे
जाता येत नाही किमान कॅम्प तरी बघायला मिळायला हवा होता अशी नाराजी त्यांच्याजवळ
व्यक्त केली. थोडा विचार करून ते म्हणाले कॅम्प नाही दाखवता येणार,
पण
कॅम्पमधील एक गोष्ट मी नक्की दाखवू शकेन. थांबा थोडावेळ,
असे
सांगून ते परवानगी काढण्यासाठी गेले. ते परत आल्यावर कळले की ते कॅम्पमधील
मंदिराचे पुजारी होते. ते आम्हाला त्यांच्याबरोबर मंदिरात घेऊन गेले. मंदिरात
प्रवेश केल्यावर वेगळेच दृश्य दिसले. एकाच छताखाली मंदिर,
मशीद,
गुरूद्वारा,
चर्च
रांगेत विसावले होते. दर्शन घेतल्यावर पुजारीबाबांनी सर्वधर्मस्थळाची संकल्पना
समजावून सांगितली. मग आम्ही त्याठिकाणी सर्वधर्म प्रार्थना म्हटल्यावर पुजारीबाबा
खुशच झाले. मंदिराबाहेरच्या मोकळ्या जागेत येऊन सर्वधर्म प्रार्थनेबद्दल गप्पा
चालू होत्या, त्यांना
ती प्रार्थना लिहून हवी होती. त्यामुळे लिखाणाचे काम एकाबाजूला सुरू होते. तेवढ्या दोन ट्रकमधून पन्नासएक जवान आले आणि
तीनच्या रांगांमध्ये उभे राहिले. कॅम्पचे सैन्य अधिकारी त्यांचे रिपोर्टिंग घेत होते. खुश असलेल्या
पुजारीबाबांना म्हणालो, साहेबांना
विचारा मुली जवानांसमोर प्रार्थना आणि काही देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम सादर
करू शकतील का? त्यांनी
परवानगी मिळवून आणलीच. मग काय! पुढचा तासभर दोन्ही बाजूंनी आमच्याकडून आणि
जवानांकडून गाण्यांचे उस्फूर्त
सादरीकरण झाले. दारात काही वेळासाठी उभे
राहण्यासाठी काहीवेळ परवानगी न मिळालेले
आम्ही सर्वधर्मप्रार्थनेच्या किल्लीने सुमारे दोन तास त्या कॅम्पवर होतो आणि नुसती
पोटपूजा न करता शंकरपाळी, बिस्किटांची
नवीन रसद भरून बाहेर पडलो. ही रसद पुढे आम्हाला गुवाहाटीपर्यंत पुरली.
विविधतेने नटलेल्या भारताचे
प्रतिबिंबच भारतीय सेनेत दिसून येते. या विविधतेतील एकत्व प्रकट होण्याकरता भारतीय
सेनादलाने सर्वधर्मसमभाव आचारात आणण्यासाठी जी प्रतीके स्वीकारली आणि जाणीवपूर्वक
जोपासली, यापैकी एक प्रमुख दृश्य प्रतीक म्हणजे सर्वधर्मस्थळ.
सैन्य निधर्मी करण्याऐवजी सैनिकांचे मनोबल टिकवणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून
धर्माचा विचार करून सैन्यात सर्वधर्मसमभाव आचरला जातो. आम्ही पाहिले तसे
प्रार्थना-मंदिर प्रत्येक कॅम्पवर असते. मोठ्या कॅम्पवर मंदिर,
मशीद,
चर्च,
गुरूद्वारा
स्वतंत्र असले तरी एकाच आवारात असतात व त्याला सर्वधर्मस्थळच म्हटले जाते. अशी
एकता सैन्यामध्ये येण्यासाठी धर्मगुरूंना प्रशिक्षण देण्यासाठी इन्स्टीट्युट ऑफ
नॅशनल इंटिग्रेशन या प्रशिक्षण केंद्राची स्थापना पुणे येथे करण्यात आली.
या संस्थेत रिलिजिअस टिचर अर्थात असे धार्मिक शिक्षण घेतलेले सैनिक तयार केले
जातात. पंडित, ग्रंथी,
मौलवी,
प्रिस्ट
आणि मॉन्क असे सर्वधर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. सर्वांनाच
प्रत्येक धर्माच्या मूलभूत संकल्पना, धार्मिक
विधींचे प्रशिक्षण दिले जाते. याच बरोबर मानसशास्त्र,
तत्त्वज्ञान,
समुपदेशन
यांचाही अभ्यासक्रमात समावेश केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे शिक्षक कोणत्याही
धर्माच्या पद्धतीने, श्रद्धांचा
आदर करत अंत्यसंस्कारदेखील करू शकतात. सैनिकांचे मनोबल आणि मानसिक स्वास्थ्य
टिकवण्यात यांचा मोठा वाटा आहे आणि अर्थातच सर्वधर्मस्थळाची रचना ही भारतीय
सैन्यासाठी महत्त्वाची रचना आहे.
प्रांतिक,
भाषिक,
धार्मिक,
जातीय,
वांशिक
अशी
सर्व प्रकारची विविधता असलेल्या भारतीय समाजाचे एकात्मरूप विकसित करण्यासाठी आणि
एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित करण्यासाठी भारतीय सैन्यादलांमध्ये हा सहचार कसा
जोपासला जातो याबद्दलची मांडणी करणारे कॅ. रघु रामन यांचे एक टेडेक्स
व्याख्यान ‘डायव्हर्सिटी
: इज न्यू नॅशनॅलिटी’ ऐकण्यासारखे
आहे. या व्याख्यानाची लिंक पुढे देत आहे.
Diversity : is New Nationality
भारताची राष्ट्रीय एकता ही या
विविधतेचा
स्वीकार करून देशाला एकत्वाकडे नेण्यासाठीच्या भारतातील नव्या आचारांवर अवलंबून आहे.
अनेक शतकांपूर्वी हिंदू धर्मातील उपास्यांचा आपापसातील भेद विसर्जित करून
प्रत्येकाची श्रद्धा स्वीकारत दुसऱ्याच्या श्रद्धेचा स्वीकार करायला शिकवण्याचा
आचार आणि रचना म्हणून आद्य शंकराचार्यांनी 'पंचायतन'
ही
संकल्पना मांडली. पंचायतन मंदिर म्हणजे
पाच देवतांचा समूह. विभिन्न उपास्य देवतांना मानीत असलेल्या उपासकांमधील सहचार
वाढवण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली.
पंचायतनपद्धतीनुसार विष्णू पंचायतनात विष्णूला मुख्यस्थान देऊन मंदिरसमूहात शिव,
गणपती,
सूर्य,
देवी
यांची मंदिरे असतात. याप्रमाणे गणेश पंचायतन ,
शिव
पंचायतन असतात. पंचायतन संकल्पनेने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि
सांप्रदायिक द्वेष-भेद कमी झाला.
आज
स्वतंत्र भारताला राष्ट्रीय एकतेसाठी
नव्या पंचायतनाची आवशकता आहे. स्वामी
विवेकानंदांनी भारतीयांना पन्नास वर्षांसाठी एक उद्दिष्ट दिले होते,
‘ भारतमाता एकच दैवत येत्या दिवसांचे....’ तवांगच्या
सर्वधर्मस्थळाला भेट दिल्यावर एक गोष्ट कळली, भारतीय सैन्यदलाचे
एकच दैवत आहे - ‘भारतमाता’
आणि
तिच्या सेवेसाठी समर्पित सैनिकांच्या श्रद्धांच्या जोपासनेसाठी आहे ‘सर्वधर्मस्थळ’.
आज
राष्ट्रीय एकतेसाठी गरज आहे भारतमातेला केंद्रस्थानी ठेवून तिच्याभोवती
भारतीयांमधील भारतीयत्त्वाच्या जोपासनेसाठी
सैन्यदलातील सर्वधर्मस्थळासारख्या
आधुनिक पंचायतनाची.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
सर्वधर्म प्रार्थना
ओम
तत्सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू।
सिद्ध
बुद्ध तू स्कंद विनायक सविता पावक तू।
ब्रह्म
मज्द तू यह्व शक्ति तू येशू पिता प्रभु तू।
रुद्र
विष्णु तू रामकृष्ण तू रहिम ताओ तू।
वासुदेव
गौ-विश्वरूप तू चिदानंद
हरि तू।
अद्वितीय
तू अकाल निर्भय आत्मलिंग
शिव तू।
अतिशय छान माहिती.धन्यवाद!🙏
ReplyDeleteInformative and worth reading.
ReplyDeleteअरुणाचल दौरा पुन्हा आठवला 👌👌👌
ReplyDeleteआज राष्ट्रीय एकतेसाठी गरज आहे भारतमातेला केंद्रस्थानी ठेवून तिच्याभोवती भारतीयांमधील भारतीयत्त्वाच्या जोपासनेसाठी सैन्यदलातील सर्वधर्मस्थळासारख्या आधुनिक पंचायतनाची. खूपच आवश्यक आहे.
ReplyDeleteखूप छान. वेगळी माहिती समजली.
ReplyDeleteभारत माता की जय। वंदे मातरम।
ReplyDelete🌾🌷🚩🇮🇳🙏🏻🇮🇳🚩🌷🌾
Very nice information!! Thanks ..🙏🏻🙏🏻
ReplyDeleteराष्ट्रीय एकात्मता या लेखांमधून खुपच चांगल्या पद्धतीने मांडलीआहे.
ReplyDeleteपूर्वा देशमुख
ReplyDeleteखूप छान सर.आपले विद्यार्थी खरोखर वेगळे अनुभव शिक्षण घेतात.आपली पद्य व प्रार्थना नेहमी समोरच्यांना भावतात.अरुणाचल
अनुभवणं राहिलेय सर........
भारतीय सैन्यदलाचे एकच दैवत ,"भारतमाता"🙏🙏व सैनिकांच्या श्रध्देच्या जोपासनेसाठी ," सर्वधर्म स्थळ "🙏🙏आपले पंतप्धान मोदीजी त्यांच्या प्रत्येक भाषणानंतर सांगतात की मेरे साथ जोरसे , पुरी ताकदसे बोलो , "भारतमाताकी जय "🙏🙏
ReplyDeleteखूपच छान , वेगळी माहिती तुमच्या आभ्यासदौऱ्याच्या अनुभवलेखनातून कळली प्रशांतदादा 🙏धन्यवाद 🙏
सर्व अभ्यासदौरा जशाचा तसा आठवला. वर्गातल्या अभ्यासापेक्षा या उपक्रमांनी आम्हाला जास्त शिकायला मिळाल :)
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखुप छान सर🙏
ReplyDelete