‘शरीरम् आद्यम् खलु धर्मसाधनम्’ शरीर हे धर्माचरणाचे साधन आहे. भारतीय तत्त्वज्ञानात आत्म्याचे वाहन म्हणून शरीराला स्थान दिले आहे. शरीर आत्म्याच्या अभिव्यक्तीचे साधन आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्रियांचा आविष्कार शरीराच्या माध्यमातून होत असतो. आनंदयुक्त कार्यक्षम दीर्घायुष्य जगायचं असेल तर सतेज शरीर आवश्यक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत युक्ताहारविहाराला महत्त्व आहे. आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ - श्री योगी अरविंद शरीर आत्म्याच्या अभिव्यक्तीचे साधन मानतात. श्री योगी अरविंद म्हणतात." चैत्य पुरुषाचे आरोहण आणि अतिमानवाचे अवतरण घडण्यासाठी व्यक्तीला मोठी तपस्या करावी लागते. अशी तपस्या करण्यासाठी शरीर सुंदर सतेज असले पाहिजे. मन सुदृढ, पवित्र संयमशील असले पाहिजे. बुद्धी तेजस्वी अहंकार रहित, राष्ट्र शरण, मानवता शरण, ईश्वर शरण असली पाहिजे. श्री अरविंदाच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात शरीर, मन व बुद्धी यांची शुद्धी, सुदृढता आणि सौंदर्य यांच्या विकसनाला मोठे स्थान आहे. एखाद्या संगीतकाराला आपली रचना उत्कृष्टपणे सादर करायची असेल तर चांगल्या वाद्यांची आवश्यकता असते. तशीच सुदृढ शरीराची आवश्यकता आपले पृथ्वीवरील जीवनकार्य सफल करण्यासाठी मानवाला असते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री अरविंदाच्या योगात साधकांसाठी शारीरिक विकसन उपक्रम प्रशिक्षणाची सोय केली आहे. श्री अरविंद आश्रमातील शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट विजेते खेळाडू तयार करणे, नवनवीन उच्चांक गाठणे तसेच मनोरंजन, फावला वेळ घालवण्याचे साधन नसून चैत्य पुरुषाचे मानवात अवतरण होण्यासाठी आवश्यक असे सतेज सुंदर शरीर घडविणे हे आहे. महत्त्वाची गोष्ट शरीर नसून शरीराच्या आधारे दिव्यचेतना प्रगट करणे ही आहे. आश्रमातील शारीरिक उपक्रमांची दिशा, उपक्रमांची रचना व कार्यवाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. सुदृढ शरीराचे आरोग्य, स्नायुबल, चपळता, लवचिकता, कौशल्य हे शारीरिक विकसनाचे पैलू आहेत. योग्य आहार, निद्रा, विश्रांती, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, योग्य काम ह्यांचा समावेश असलेल्या सुनियोजित कार्यक्रमाची रचना व कार्यवाही केली तर सुदृढ आरोग्यपूर्ण शरीराची निर्मिती करणे शक्य आहे. शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमासाठी निवडलेले उपक्रम बलसंपन्नता, वेग व चपळता, तोल व लवचिकता, स्नायू व इंद्रियांचा समन्वय ह्यांचा समतोल साधणारे आहेत.
अरविंदाश्रमातील
शारीरिक शिक्षणांच्या कार्यक्रमात आश्रमातील सुमारे १३०० विद्यार्थी, स्त्री-पुरूष
साधक नियमित सहभागी होतात. वय, क्षमता ह्यांचा विचार करून सर्वांची १४ गटांत
विभागणी केली आहे. वय, क्षमता ह्यांचा विचार करून प्रत्येक गटात योग्य असा शारीरिक
क्रीडा प्रकारचा कार्यक्रम दिलेला असतो. वरच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्रीडा
प्रकार निवडायचे व व सराव करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते व त्यासाठी
वेळापत्रकात विशेष संधी, उपलब्ध केल्या जातात. मुले व मुलींसाठी एकच कार्यक्रम असतो.
विद्यार्थ्याची वर्षातून दोनदा तर साधकांची वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी केली
जाते. आश्रमाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे वर्ष डिसेंबरच्या मध्यात सुरू होते.
वर्षातील साडेसहा महिने दोन सत्रात (१६ डिसेंबर -३१ मार्च, १ जून - ३१ ऑगस्ट)
विभागून आश्रमाच्या शारीरिक शिक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम असतो. ह्या कालावधीत
सर्व उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच सराव करून घेतला जातो. आश्रमातील २५
वर्षांपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीला सायंकाळच्या शारीरिक शिक्षणाच्या
कार्यक्रमात सहभागी व्हावेच लागते. १२-२५
ह्या वयोगटाच्या कार्यक्रमात दोन दिवस खेळ, २ दिवस जिमनॅस्टिक, १दिवस अॅथलॅटिक्स,
१दिवस पोहणे तर १दिवस कॉम्बॅट खेळासाठी असतात. १२–२५ वयोगटाच्या वरच्या व खालच्या
वयोगटासाठी त्यांच्या गरजा व क्षमता लक्षात घेऊन वरील सर्व उपक्रमांचा
समावेशअसलेला कार्यक्रम निश्चित केला जातो. आश्रमात प्रशिक्षित अशा
मार्गदर्शकांच्या मदतीने ह्या कार्यक्रमांची रचना व कार्यवाही केली जाते.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दोन सत्रांच्या मधल्या कालावधीत (१ एप्रिल- ३१ मे, १
सप्टेंबर - ३१ ऑक्टोबर) स्पर्धा असतात. या कालावधीत विशिष्ट क्रीडा प्रकारांसाठी
सराव व मार्गदर्शन केले जाते व स्पर्धा सत्राच्या शेवटी सामने घेतले जातात. दोन स्पर्धासत्रे चार भागात
विभागली असून ह्या चार स्पर्धासत्रात
क्रमश: खेळ, जिमनॅस्टिक, पोहणे, अॅथलॅटिक्स ह्या क्रीडा प्रकारांचा सराव करतात व
सामने खेळतात. ह्याशिवाय १ नोव्हेंबर ते
२ डिसेंबर ह्या कालावधीत वार्षिक
क्रीडाप्रात्यक्षिकांचा सराव केला जातो. क्रीडावर्षाच्या शेवटी ३ डिसेंबर ते १५
डिसेंबर या कालावधीत सहलीचे आयोजन केले जाते. आश्रमाच्या शाळेत शारीरिक शिक्षण
विभागाचे उपक्रम आठवड्याचे सात दिवस व वर्षाचे सर्व दिवस चालू असतात. शारीरिक
शिक्षणाच्या उपक्रमांना सुट्टी नसते.
१९४५ साली पाँडेचरी येथील श्री
अरविंद आश्रमात शारीरिक शिक्षणाचा स्वतंत्र विभाग सुरू झाला. कोणत्याही साधनाशिवाय
केवळ १४ विद्यार्थ्यासाठी एका छोट्या मैदानात त शारीरिक शिक्षणातील प्रयोगांना सुरूवात
झाली. आज आश्रमाची रचनाबद्ध प्रशिक्षण योजना आहे. दोन मोठी मैदाने. अॅथलॅटिक्स मैदान,
जलतरण तलाव, जिन्मॅशिअम व व्यायामशाळा याचा शिक्षणांत उपयोग केला जातो. श्री अरविंदांच्या
शैक्षणिक प्रयोगातील शारीरिक विकसनाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व शारीरिक व्यायाम आणि
हालचाली पूर्णत: अशा योजल्या जातात की त्यातून शरीरातील समतोल, सामर्थ्य आणि सौंदर्य
विकसित होईल.
प्रशांत
दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे ३०
Comments
Post a Comment