Skip to main content

भटकंती : प्राणी संग्रहालयाला भेट

भटकंती : प्राणी संग्रहालयाला भेट 

आपण विद्यार्थ्यांना सुट्टीतील अभ्यासात वेगवेगळ्या कृती करायला सांगतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमध्ये आकारिक मूल्यमापनात वेगवेगळ्या कृती करून घेतो .

एका विज्ञान शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्राणी संग्रहालयाला भेट देण्याचे कार्य दिले. 

या क्षेत्रभेटीची तयारी कशी करावी व क्षेत्रभेटीत काय करावे याबद्दल एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना लिहिलेले पत्र

                 मित्रांनो , तुम्ही कधी हत्ती पळताना बघितला आहे ? हत्तीची मारामारी बघितली आहे ?

           १९९८ साली मी काझीरंगा अभयारण्यात गेलो होतो . भारतात एकशिंगी गेंडा बघायचा असेल तर आसाम व  बंगाल मधील काही अभयारण्यातच  बघायला मिळतात. उंच हत्ती लपेल अशा हत्तीगवताच्या पाणथळी गवताळ प्रदेशात गेंडे पाहायला मिळतात. जमीन दलदलीची असल्याने हत्तीवरून फेरफटका मारावा लागतो. हत्तीवर बसवून तुम्हाला गेंड्याच्या जवळ घेऊन जातात. सकाळी ६ च्या सुमारास हत्ती  सफारीसाठी तयार होऊन आम्ही मचाणावर हत्तीची वाट बघत उभे होतो. पर्यटकांचा एक गट घेऊन हत्तींचा कळप मचाणाकडे येत होता. दोन पाच मिनिटांत हत्ती पोचणार, आधीचे प्रवासी उतरणार आणि मग आम्ही हत्तीवर बसून जंगल फेरीसाठी जाणार....कधी एकदा हत्तीवर बसतो असे झाले होते.......हत्ती जवळ येताना दिसत होते , इतक्यात एका  सुळे असलेल्या नर हत्तीने दुसऱ्या हत्तीला मागून टक्कर दिली. इतर हत्ती घाबरून चित्कार करत सैरावैरा पळू लागले. हत्ती ६० कि.मी. प्रती तास वेगाने पळू शकतो. एका हत्तीने  माहुताला सोंडेने उचलून फेकले . एका पर्यटकाने घाबरून हत्तीवरून उडी मारली.  सुमारे अर्धा तास ही पळापळ चालू होती. वनअधिकारी व वन संरक्षकांनी शांत असलेल्या हत्तींचे एक मोठे रिंगण करून घाबरलेल्या व पिसाळलेल्या हत्तीला शांत  करत सफारी मचाणापर्यंत आणली व प्रवाशांची सुटाका केली. अर्धा एक तास हे नाट्य आमच्या भोवती चालू होते.             मित्रांनो , तुम्ही कधी हत्ती पळताना बघितला आहे ? हत्तीची मारामारी बघितली आहे ?

असे प्रसंग क्वचितच अनुभवायला मिळतात. पण तुमच्यापैकी काही जण पालकांबरोबर कान्हा , जिम कोर्बेट, ताडोबा यासारख्या अभयारण्यात जंगल सफारीसाठी गेले असतील. जंगलातील वाघाचे दर्शन सहजासहजी  होत नाही. तुमच्या बरोबरच्या वनरक्षकांना वाघाच्या जंगलवाटा माहीत असतात म्हणून प्राणी बघायला मिळतात. नाहीतर जंगलातील  प्राणी तुम्ही येणार म्हणून फोटो सेशनसाठी तुमच्या स्वागतासाठी उभे असतात की काय ? वन्य प्राणी माणसाची चाहूल लागली तरी गायब होतात. प्राण्याचे दर्शन नशिबात असावे लागते ! नशीब वगैरे काही नाही खरे तर प्राणी दिसायला जंगलाचा अभ्यास असावा लागतो, न कंटाळता परत परत जंगलभेटी कराव्या  लागतात .

भीमाशंकरच्या जंगलात शेकरू नावाची झुपकेदार शेपटीची सॉफ्ट टॉयसारखी मोठ्ठी खार राहते. महाराष्ट्र राज्याची ती ओळख आहे.  शेकरू पाहण्यासाठी मी खूप वेळा भीमाशंकरला गेलो. कधी त्यांचे आवाज ऐकायला आले ,  त्यांची घरटी दिसली . जंगलात हिंडताना त्यांचा वावर जाणवत होता पण दर्शन काही होत नव्हते. शेकरू पाहण्यासाठी न कंटाळता ८ -१० वेळा गेलो तेव्हा त्यांचे दर्शन झाले.

प्राणी पाहायला खरच जंगलात जाण्याची गरज आहे ? खरेतर आपल्या अवतीभवती कितीतरी प्राणी असतात. हॅ काय ! चला वर्षभरात कोणकोणत्या प्राण्यांनी तुमच्या घराला भेट दिली याची यादी करूया. वर्षभरात माझ्या घराला भेट दिलेले प्राणी :

मी पण  तुमच्या बरोबर  यादी करतो ...कुत्रा, मांजर , पाल, कोळी , कावळा , पारवा , बुलबुल , मधमाशी, गाधील्माशी , चिलट , डास , ढेकुण , झुरळ , मटार सोलताना सापडलेली आळी, उंदीर  , चिचुंद्री ...............चला किमान २० प्राण्यांची नावे लिहू.

झाली का यादी ?

बघा कितीतरी प्राणी आपल्याबरोबर राहतात ना ? आपल्या घरात आपल्या नकळत राहतात. कसे राहतात ? काय खातात ? त्यांचे घर कुठे असते ? कशापासून बनलेले असते ? घराच्या त्याचा भागात का राहतात ? आपल्याला जर त्यांच्याबद्दल माहिती मिळवायची असेल तर आपल्या मनात असे असंख्य प्रश्न पडावे लागतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्राण्यांचे निरीक्षण करावे लागेल . ते कायकाय करतात त्याचे चित्र काढता येईल , कॅमेरा वापरून फोटो काढत येतील , शुटींग करता  येईल , लिहून ठेवता येईल.

आता थोडं घर बाहेर जावू.

चला तुमचा आवडत प्राणी कसा चालतो ते पाहू . कोणता प्राणी आठवला ?

आई बाबांबरोबर बागेत खेळायला गेल्यावर हट्ट करून  घोड्यावर बसताना . या सुट्टीत बागेत गेल्यावर घोडा चालताना कशी पावले टाकतो हे पाहायचे आहे. 


सोबत एक चित्र दिले आहे त्याप्रमाणे चालायला सुरुवात केल्यावर घोडा पावले टाकतो का ? चित्रातील पावलांचा क्रम बरोबर आहे का ? त्याने पळायला सुरुवात केली तर अशीच पावले टाकतो ? आणि वरातीत नाचताना काय क्रम असतो ?

आपण चालताना कशी पावले टाकतो ? हात कसे हलवतो ? उजवे पाउल पुढे टाकताना आपला कोणता हात पुढे असतो ? मान व खांद्याची स्थिती कशी असते ?

चला हे दाखवण्यासाठी  एक खेळणे तर करू . पुठ्ठ्यामधून एका प्राण्याचा आकार  कापा . चित्रात दाखवल्या प्रमाणे त्याला हलवता येतील असे चार सुटे पाय बसावा. 

प्राणी कसा चालतो ते पाहून त्याचे पाय हलवून दाखवा. नाहीतर असे करा दोन मित्रांनी मिळून चार पायाचा प्राणी तयार करा. एकाने पुढचे दोन पाय बनायचे तर दुसरयाने वाकून त्याची कंबर पकडायची ; झाला चार पायाचा प्राणी ! नृत्य नाटकात असे घोडे , लायन डान्स  पाहायला मिळतात . तुमच्या शाळेच्या स्नेह संबेलनात देखील अशी नृत्ये असतात. कोणती जोडी बरोबर  चालू शकते स्पर्धा लावा . करून तर पहा मज्जा येईल .

प्राणी प्रत्यक्ष पाहणे शक्य नसेल तर खाली दिलेल्या लिंक पहा.  वेगवेगळे प्राणी कसे चालतात याचे व्हिडीओ आहेत.

घोडा कसा पाळतो हे पाहण्यासाठी पुढील लिंक पहा 

घोडा कसा पाळतो ? 

हत्ती कसा चालतो ? 

वाघ कसा चालतो ? 

यु ट्यूबवर तुम्हाला अशा लिंक शोधता येतील

 प्राणी निसर्गात कसे राहता ? काय खातात ? कधी  झोपतात ? याचा अभ्यास केला जातो कारण माणसाला जगण्यासाठी प्राण्यांची मदत होते. वाहतुकीसाठी  प्राण्याचा उपयोग होते, अनेक प्राण्यांपासून अन्न मिळते ,औषधे मिळतात आणि ते चांगलेमित्र देखील असतात.  गाय पाळून दुध मिळावयाचे असेल तर गाय काय खाते, किती खाते, तिला किती पाणी लागते , वासरू कधी जन्माला येते, तिला कोणते रोग होतात , माणसाचाच डॉक्टर तिला तपासणार का प्राण्यांसाठी वेगळे डॉक्टर असतात ?  अशी भरपूर माहिती पाळणार् याला असेल  तरच तिची नीट  काळजी घेता येईल.

आई-बाबांकडे कुत्रा पाळायचा हट्ट करत असाल तर आधी कुत्राच्या सवयी माहित असाव्या लागतील. तुमच्या शाळेत , सोसायटीत सी सी टीव्ही असेल तर तुमच्या कुत्र्या ; मांजराला त्याचा समोर २४ तास बसावा तो झोपतो कधी , जागा कधी असतो , किती वेळ झोपतो , काय खातो , किती खातो  , कसे खातो ते पहा . गुगुरताना कसा आवाज काढतो , भूंकताना कसे ओरडतो ते पहा. वेळ नोंदवा.

एकदा जवळपासचे प्राणी पाहता आले की चला आता कात्रजाला प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला जावूया . मित्रमित्रांचा गट तयार करा , बरोबर कोणी तरी मोठे घ्या आणि चला कात्रजला. जरा थांबा ! जाण्यापूर्वी काय काय पाहायचे, काय करायचे ते ठरवुया.

प्राणी संग्रहालयात मोठे पिंजरे , संरक्षक कठडे करून त्यामधील मोकळ्या  जागेत प्राण्यांना  ठेवले जाते. त्यांची योग्यती काळजी घेतली जाते , त्यांना आहार पुरवला जातो. प्राणी जगाची ओळख माणसाला व्हावी म्हणून अशी प्राणी संग्रहालये उभारली जातात. काय पाहावे प्राणी संग्रहालयात , काय करू शकाल प्राणी संग्रहालयात ?

·      प्राणी संग्रहालयातील प्राण्याची यादी तयार करा

·      प्राणी संग्रहालयाचा नकाशा तर करा , त्यामध्ये कोणता प्राणी कुठे ठेवला आहे ते दाखवा.

·      प्राण्याची माहित सांगणारे माहितीफलक वाचा.

·      प्राण्याचे शाकाहारी, मासाहारी , सर्वाहारी ई. गटात आहार नुसार विभागणी करा.

·      शिंग असलेले / नसलेले प्राणी ,शेपटी असलेले /नसलेले प्राणी , पायाला खुर असलेले प्राणी / पायाला लादी असलेले प्राणी , जमिनीवर रहणारे / झाडावर रहणारे असे किती प्रकारे प्राण्यांचे  गट करु शकाल.

·      कोणते प्राणी बीळ करून राहतात, जमिनीवर राहतात , फांद्यांवर राहतात , पाण्यात राहतात

·      एखाद्या प्राण्याच्या पिंजर् या समोर उभे राहून २ मिनिटांमध्ये ते कोण्या हालचाली करता ते नोंदवा. जसे माकडाच्या पिंजरयासमोर उभे राहिल्यास माकड कधी पायाने खाजावते , दुसरया  माकडाच्या शरीराची सफाई कसे करते. त्याचा वेळे नुसार तक्ता तयार करा. बाबांच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करा 

·      प्राणी संग्रहालातील पिंजरा साफ करणारे कामगार , रक्षक , वनाधिकारी यांच्याशी  गप्पा मारून प्राण्यांना  काय खायला देतात , प्रत्येक प्राणी किती खातो , प्राण्याच्या विष्ठेचे काय करतात, प्राण्यांचे  डॉक्टर त्यांना कधी तपासतात असे प्रश्न विचारून माहिती मिळावा,

·      प्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करा.

·      पिल्ल आणि वाढ झालेल्या प्राण्यात काय फरक असतो ? नारमादी दिसायल वेगळे असता का सारखेच दिसतात.

·      नमुन्या दाखल वर काही उपक्रम सुचवले आहेत. तुम्हाला अजून काही सुचले का ?

मग कात्रजला भेट देणार ना ? जाताना वही , पेन्सील , दुर्बीण , कॅमेरा , पाण्याची बाटली , डबा न्यायला विसरू नका. 
        दिवस भर प्राणी संग्रहालयात काय केले ? चौकटीत प्राणी संग्रहालय भेटीची एक चित्रफीत आहे ती पहा. अस ठरवून पहायला ; निरीक्षण करायला शिकलात तर आपल्या भवतालात काय काय घडते आहे हे तुम्हाला सहज समजू शकेल. सस्तन प्राणी ,कीटक, पक्षी , वनस्पती, ढग , माती, दगड , असे बरेच काही पाहता येईल ; नोंदावता येईल. असे भवताल पाहतानाच माणसाला अग्नीचा , चाकाचा , शेतीचा शोध लागला. माणसाची प्रगती , विकास या माणसाच्या निरीक्षणाच्या सवइनेचं झाला. निसर्गाची गुपिते ; रहस्ये मानवाला निरीक्षणातून उलगडत गेली.

मला आठवते तुमच्याच वयाच्या एका लहान मुलीची गोष्ट. एका छोट्या खेडे गावात राहणारी ही  मुलगी एक दिवस शाळेतून वेळेवर  घरी पोचली नाही. जरा जास्तच उशिर झाला म्हणून गावात सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. पण ही मुलगी कुठेच सापडेना. संध्याकाळी उशिरा घरी परत आली. आईने रागावून विचारले कुठे गेली होतीस. ती म्हणाली इथंच कोंबड्यांच्या खुराड्यात लपले होते दिवस भर , मला कोंबडी अंडे कसे देते ते पाहायचे होते. पुढे हे मुलगी आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात गेली , चिम्पान्झी  माकडांचा अभ्यास करण्यासाठी. या मुलीचे नाव होते जेन गुडाल.

ऐकायची आहे तिची गोष्ट , जेन चिम्पान्झी बरोबर कशी राहिली , कुठे राहिली , तिने काय पहिले , काय निरखले .....मग बोलवा मला तुमच्या वर्गात  जेनची गोष्ट सांगायला. बोलावणार ना ?                                                                                                             अच्छा भेटू

                                                                                                 प्रशांत सर                                                                                                

ता. क.

वाचताना मनात विचार आला असेल ना की करोनामुळे सध्या घरीच आहोत तर प्राणी संग्रहालयाला भेट कशी देणार ? तर काही प्राणी संग्रहालयांनी त्यांच्या आभासी सहली 

( व्हर्चुअल सहली ) सुरु केल्या आहेत त्याच्या लिंक खाली देत आहे त्या नक्की बघा.

https://www.youtube.com/watch?reload=9&v=MALhRHSaio8

https://naturalhistory.si.edu/visit/virtual-tour

https://www.chesterzoo.org/virtual-zoo-2/

https://www.chesterzoo.org/virtual-zoo-2/

ज्ञान प्रबोधिनी, पुणे 

ई- प्रशिक्षक वर्ष ४ अंक ७ ( फेब्रुवारी २०१७ ) 


Comments

  1. सर क्षेत्ररभेट म्हणताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा या यादीत भरपूर भर पडली.वाचताना मीच एक विद्यार्थी होते.असा प्रयोग नक्की करुन बघेन

    ReplyDelete
  2. फारच छान... जेनीची गोष्ट तर भारी आहेच... पण निरीक्षणांसाठीचे मुद्दे मस्तच...

    ReplyDelete
  3. प्रशांतजी मी अनेकदा कुत्रा, घोडा, गाय कीटक आदी प्राण्याच्या चालण्याच्या लयीचा निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. लेखाचा चांगला उपयोग होईल मला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...