विज्ञानाची
भाषा
चिंचेला इंग्रजीमध्ये
टॅमरिंड (Tamarind) म्हणतात. टॅमरिंड हा शब्द
इंग्रजीमध्ये कसा आला हे समजण्यासाठी इतिहासाची थोडी ओळख असावी लागेल. आपल्याला
माहीत आहे की भारताचा खुश्कीच्या मार्गाने अरबस्तानातील देशांशी व
तेथून पुढे युरोपमधील देशांशी व्यापार
चालू होता. पुढे कॉन्स्टंटिनोपल या शहरावरील युरोपचे नियंत्रण कमी झाल्यावर हा
व्यापार टिकविण्यासाठी वेगवेगळ्या सागरी मार्गांचा शोध युरोपमधील देशांनी घेतला.
तात्पर्य भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचत. भारतातून चिंच अशीच
अरबस्तानात पोहोचली व तेथून युरोपात. अरबी भाषेत खजूराला तमार (tamar)
म्हणतात. चिंच आणि खजुरामध्ये तपकिरी रंग, कोळ
काढता येणे, एक बी असणे असे साम्य आहे. त्यामुळे चिंचेला
अरबीमध्ये तमार - हिंद (Tamar-hind) म्हणजेच भारतीय (हिंदी)
खजूर (Date of India) म्हटले जाते. याचाच भ्रंश होत पुढे
टॅमरिंड (tamarind) हा शब्द तयार झाला. मार्कोपोलो टॅमरिंडचे
स्पेलिंग (tamarandi) असे करतो. शब्दाचा उगम शोधणे खरेच
मजेचे असते.
मराठीमध्ये 'ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये' अशी म्हण आहे.
वरील दोन्हीपैकी नदीचे मूळ शोधणे खरंच एक शैक्षणिक अनुभव होऊ शकेल. ऋषी आणि नदी
माहीत नाही पण अभ्यास करताना शब्दाचे मूळ शोधणे ही कृती आनंददायक आणि अभ्यासाची
समज, आकलन वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे.
व्युत्पत्तीशास्त्र
म्हणजेच इटमॉलॉजी (Etymology) मध्ये शब्दाचा इतिहास,
शब्दाचे मूळ, काळाच्या ओघात शब्दाच्या रूपात
झालेला बदल आदींचा अभ्यास केला जातो.
शब्द कसा तयार होतो हे
विद्यार्थ्याला समजावून सांगितले तर विज्ञान, गणित,
तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे यांचे अध्ययन
करणे सोपे व अर्थपूर्ण होईल. शब्दांचे स्पेलिंग पाठ करण्यापेक्षा शब्द कसा तयार
झाला हे समजले तर संकल्पनेचा अर्थ विद्यार्थ्याला अधिक उत्तम प्रकारे समजेल.
मराठीतील अनेक संज्ञांचे मूळ संस्कृत भाषेत सापडते ( छद्मपाद : छद्म म्हंजे खोटा
वा फसवा + पाद म्हणजे पाय ) त्याप्रमाणे अनेक इंग्रजी शब्द लॅटिन आणि ग्रीक
भाषेतील शब्दांपासून निर्माण झालेले असतात. इंग्रजी शब्दाची अशी लॅटिन/ ग्रीक
शब्दाच्या अर्थाने चिकित्सा केली तर तो शब्द कसा तयार झाला हे विद्यार्थ्याच्या
लक्षात येईल.
उदा: Photo:
light
Tropo: turn, change
Syn: with other
Thesis: arrangement
Ism: The process of
आता हे मूळ शब्द वापरून संज्ञांची शीर्षके कशी तयार
होतात हे पाहा. Photosynthesis म्हणजे काय? तर arranging things together using light.
शब्द photo+ syn+thesis
phototropism म्हणजे काय ? तर the process of turning in response to light.
शब्द photo + tropo + ism
इंग्रजी भाषेतून
विज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर लॅटिन आणि ग्रीक मूळ शब्द वापरून संज्ञा कशी
तयार होते हे सांगणाऱ्या शैक्षणिक कृती विज्ञान अध्यापकाने विद्यार्थ्यांकडून करून
घेतल्याचा उपयोग होतो. संज्ञा कशी तयार होते? अशा
शब्दांची फोड केल्यास शब्द तीन प्रमुख भागांनी बनतो असे लक्षात येईल.
उपसर्ग + मूळ शब्द किंवा मूळ शब्द + प्रत्यय
मूळ शब्दाला
उपसर्ग किंवा प्रत्यय लागून शब्द तयार होतात.
उदा. endo हा
उपसर्ग अंतर्गत (internal ) किंवा आतील स्थान दर्शवणारा आहे
तो अनेक मूळ शब्दांना जोडल्यावर अनेक वैज्ञानिक शब्द तयार होतात.
उदा. endoscopy, endodermis,
endocrine, endoplasm. लेखाच्या शेवटी विज्ञान अध्ययनाच्या दृष्टीने
उपयुक्त ठरतील अशा उपसर्ग, मूळशब्द व प्रत्ययांची यादी दिली
आहे. ती वापरून आपण विदयार्थ्यांचे शब्दाचे आकलन वाढेल यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या
अनेक कृती घेऊ शकाल, जसे
१) प्रथम विद्यार्थ्यांना उपसर्ग, मूळ शब्द आणि प्रत्ययांची ओळख करून दयावी.
२) काही शब्दांची फोड करून सांगावी.
३) शब्द तयार करण्यास सांगावे.
उदा. Gynoecium चा
संदर्भ लक्षात घेऊन फुलाच्या इतर भागाच्या स्थानाचा विचार केला तर epi,
hypo आणि peri हे तीन उपसर्ग लागून तीन
प्रकारच्या फुलांचे प्रकार निश्चित होतात. जसे Epigynous flower या
प्रकारच्या संज्ञा विदयार्थी तयार करू शकतात.
४) उपसर्ग, मूळ शब्द
आणि प्रत्ययाची कार्डे करून घेतली आणि त्यासोबत विद्यार्थ्याला संज्ञेचे वर्णन
करणारे कार्ड दिले तर शब्द तयार करण्याचा खेळ वर्गात घेता येईल.
५) शब्दांबद्दलची प्रश्नमंजूषा घेता येईल.
वैज्ञानिक संकल्पनांच्या
शब्दाचे आकलन न होणे ही विद्यार्थ्यांची खरी अडचण आहे. शब्द समजला तर संकल्पनेच्या
आकलनाचा प्रवास सोपा होईल. अन्यथा विद्यार्थी फक्त घोकंपट्टी करत राहतील. आज अनेक
शाळांमध्ये विज्ञान आणि गणितासाठी माध्यम भाषा म्हणून इंग्रजीचा वापर केला जात
आहे. सेमी इंग्लिश व इंग्लिश माध्यम स्वीकारण्याची एक लाट (क्रेझ) आली आहे. अशा शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद केल्यावर
विद्यार्थ्यांना इंग्लिश शब्दांची ओळख होणे वा ओळख करून देणे हाच शिक्षकांसमोरचा
महत्त्वाचा प्रश्न आहे असे लक्षात येते.
यासाठी विज्ञान व
गणिताच्या अध्यापकांनी विज्ञानातील आशय शिकवण्याबरोबर विज्ञानासाठी आवश्यक भाषेचे
काही तास घेतले तर विद्यार्थ्यांना नक्की मदत होईल असे वाटते तुम्ही विज्ञान
अध्ययनाला पूरक अशा भाषेच्या तासांच्या रचना विकसित केल्या असतील तर आपल्या
शैक्षणिक उपक्रमाची माहिती ब्लॉगच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर शेअर करा.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
( ई-प्रशिक्षक वर्ष १ अंक
७ मध्ये प्रकाशित )
Nice information sir.
ReplyDeleteमहत्त्वाचा लेख आहे हा. धन्यवाद!
ReplyDeleteVery interesting and essential artical for both,,,student and teachers
ReplyDeleteFlip class room model ला उपयुक्त वाटतं.
Deleteखूपच सुंदर माहिती आहे ही. विशेषतः वैद्यकीय शिकण्याऱ्यांना ही कल्पना खूप उपयोगी होईल.
ReplyDeleteEtymology of scientific terms...this could be an year-long project in itself, for highschool students. Words could be classified and distributed to groups. Internet is there, of course, but that could be a last resort. Students could meet experts, and discuss, etc. A lot of additional skills can be honed, that way.
ReplyDeleteThanks,Sir, for showing a lesser-tred path.