पुस्तक
परिचय : ‘शिक्षण व्हावे चैतन्यदायी’
नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात विचार मंथन सुरू झाले
आहे. धोरण विचार प्रत्यक्ष कृतीरूपात आणण्यासाठी येत्या दहा वर्षाचा कालखंड हा
संक्रमणाचा कालखंड असणार आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबर शिक्षणाची
गुणवत्ता हा महत्त्वाचा घटक या कालखंडात
कृतीरूप आराखड्यात आणण्यासाठी रचनाबद्ध
प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणत्याही देशाच्या विकासाच्या गतीचा पाया देशाच्या शैक्षणिक योजनांमध्ये असतो. या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘रूप पालटू शिक्षणाचे’ या उद्दिष्टाने हा जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था, त्यांचे कार्यकर्ते भारतभर पसरले आहेत. अशा शिक्षण
संस्थांपैकी एक - ज्ञान प्रबोधिनी.
ज्ञान
प्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीतील जेवणदायी
शिक्षण व जीवनदायी शिक्षण या दोन्हीचा विचार आणि
त्याबद्दल दीर्घकाळ शैक्षणिक प्रयोग करून ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण
प्रणालीच्या घटकांचा अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळांपर्यंत विस्तार
करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली : ‘भारतीय विद्यार्थ्यांची गुणवत्ता
वाढविण्यासाठी चळवळ ! भारतीय शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चळवळ !! आणि शैक्षणिक
रचनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चळवळ !!!’ सुरू झाली त्या प्रा. विवेकराव
पोंक्षेसरांचे शैक्षणिक चिंतन ‘शिक्षण व्हावे चैतन्यदायी’ या पुस्तकात संकलित केले आहेत .‘शिक्षण व्हावे चैतन्यदायी’ या पुस्तकाचे ऑक्टोबर महिन्यात प्रकाशन करण्यात आले.
सुमारे
३५ वर्ष स्वतः मधील प्रयोगशीलता जपत ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांची रचना
व नेतृत्व करणाऱ्या विवेकराव पोंक्षेसरांच्या शिक्षण विषयक सूत्रांचे व शैक्षणिक
प्रयोगांच्या अनुभवांचे संकलन या
पुस्तकात केले आहे. शिक्षण विचार, कृतिशील शिक्षण आणि
प्रशिक्षक मासिकातील शिक्षकांबरोबरचा संपादकीय संवाद या तीन
शीर्षकाखाली पुस्तकात लेखन संकलित
केले आहे. पुस्तकातील भाग चार 'घडता घडविताना' हे अनुभव कथनात्मक व्यक्तिदर्शन घडवणारे निवेदन आहे
मूर्त
अनुभवातून अमूर्त विचारांकडे विद्यार्थ्यांचा प्रवास घडवायचा असेल तर अध्यापक
कल्पक आणि प्रयोगशील असला पाहिजे. औपचारिक रचनेतील अनुभवापासून खुल्या
अनुभवांपर्यंत ज्यात संकल्पनांपासून समाजापर्यंत जाणीव विस्तारणाऱ्या अनुभवांची
रचना ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये विवेकरावांच्या नेतृत्वाखाली विकसित झाली. सहाध्याय दिन, सरस्वती पूजना, विक्री उपक्रम या सारख्या कृतिशील
शिक्षणासाठीच्या उपक्रमांचा परिचय ‘कृतिशील शिक्षण’ या भागातील आठ लेखांमध्ये करून घेता येईल.
या
शैक्षणिक प्रयोगांमधून जे मूर्त विचारसूत्र दीर्घकाळच्या प्रयोगशील चिंतनातून
विकसित झाले अशा शिक्षणविचारांचा परिचय पुस्तकाच्या पहिल्या भागातील : ‘शिक्षण विचार’ मधील अध्ययन अनुभवातून ज्ञाननिर्मिती, वैज्ञानिक दृष्टीकोन, कलारसास्वाद,
मुक्त विद्या केंद्र या लेखांमध्ये संकलित केला आहे.
पोंक्षेसर
शिक्षणक्षेत्राकडे मनुष्य घडणीची प्रयोगशाळा म्हणून पाहात. समृद्ध शिक्षणातून
समर्थ भारत घडवायचा असेल तर हे एकट्याचे काम नाही तर त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील
प्रयोगशील प्रतिभासंपन्न अध्यापकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, त्यांचे संघटित प्रयत्नच हे स्वप्न साकारू शकतात याची जाण
असल्याने पोंक्षेसरांनी अशा शिक्षकांसाठी विचार आणि शैक्षणिक प्रयोगांचे
आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणून प्रशिक्षक मासिक सुरू केले. या मासिकाच्या
संपादकीय पानावरून शिक्षकांशी केलेला संवाद म्हणजे या मनुष्यघडणीच्या प्रयोगशाळेत
काम करणाऱ्या अध्यापक संशोधकांशी या स्वप्नाबद्दल केलेला मुक्त संवाद आहे. असे
काही निवडक संवाद प्रशिक्षकाच्या ‘संपादकीय पानावरून’ या पुस्तकाच्या भाग तीनमध्ये संकलित केले आहेत.
एखादी
व्यक्ती समजून घ्यायची असेल तर तिच्या घडणीच्या
कालखंडाचा आढावा घ्यावा लागतो. पण ‘आय एम टीचर बाय चॉइस, नॉट बाय चान्स’ असे
जाणीवपूर्वक ठरवून शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या शिक्षकाचा आचार आणि विचार
समजून घ्यायचा असेल तर तिचा ‘घडता-घडविताना’चा विचार आणि अनुभव पुस्तकाच्या चौथ्या भागात संकलित केले आहेत. एमकेसीएलने
महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञांच्या घेतलेल्या मुलाखतींमधील विवेकराव पोंक्षेसरांची
दीर्घ मुलाखत त्यांच्यातील अध्यापक, पालक, कल्याणमित्र, अभ्यासक अशा विविध रूपांचे दर्शन
देणारी आणि प्रेरणा जागरण करणारी आहे.
पोंक्षेसर नेहमी म्हणत, ‘ मोटिव्हेशन फर्स्ट ! आनंददायी शिक्षणाचा अर्थ शिक्षण सोपे करणे नसून, शिक्षण कितीही अवघड असले तरी त्यासाठी कष्ट घेताना आनंद वाटणे हाच होय. शिक्षकाचे आपल्या विद्यार्थ्यावर खूप प्रेम हवे. ती आनंददायी शिक्षणाची पहिली पायरी आहे. शिक्षकाने फक्त आपल्या विषयात रममाण होऊन चालणार नाही तर त्याचे अध्यापन विद्यार्थीकेन्द्री असले पाहिजे. असा शिक्षक ज्याने स्वतःचे भावविश्व विद्यार्थ्यांना खुले करून दिले आहे त्याचा प्रवास शिक्षकाकडून गुरूकडे होतो.’ असा एका शिक्षकाचा आचार्यत्वाच्या दिशेनं झालेला प्रवास जाणून घेण्यासाठी जरूर वाचा : ‘ शिक्षण व्हावे चैतन्यदायी’
या
पुस्तकाबरोबरच ज्ञान प्रबोधिनीतील विविध
शैक्षणिक प्रयोगांचा आणि शैक्षणिक
साहित्याचा परिचय करून घेत आपण शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या ज्ञान
प्रबोधिनीच्या चळवळ सदस्य होऊ शकता. या दृष्टीने या महिन्यापासून ज्ञान
प्रबोधिनीतील शैक्षणिक प्रकाशने आपण आता http://jpprakashane.org वर
ऑनलाईन खरेदी करू शकता. प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रकाशनांचा परिचय करून
घेण्यासाठी वरील संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
शिक्षण व्हावे चैतन्यदायी : पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Comments
Post a Comment