पुस्तक परिचय : स्वीकारशील स्वदेशी
......परंतु अशा भयंकर
राज्यक्रांत्या आजू बाजूस चालत असताही त्यांच्याकडे पाहून ज्यांना आपल्या
गुलामगिरीची नि भिक्षांदेहीची शरम वाटत नाही, असे देश या भूमीवर काय थोडे आहेत?
पण अिटली अितकी मंदट झालेली नव्हती झालेली नव्हती. ति खडबडून जागी झाली. या
जागृतीचा परिणाम चहूंकडे दिसू लागला. स्वदेशाची प्रीति ही वांङ्मयात प्रथम
पादुर्भूत झाली. नंतर अिटलीमध्ये स्वदेशी चळवळ सुरु झाली. मिलनमध्ये तर या
स्वदेशी चळवळीचा कळसच झाला होता. प्रत्येक अुदात्त आणि धाडसी कृत्यांत तरुण वर्ग
जसा सदोदित आघाडीवर असतो तसाच तो अिटलीच्या राज्याक्रांतीतही होता. मिलनमध्ये
ऑस्ट्रियाच्या तंबाखूवर विद्यार्थ्यांनी कडक बहिष्कार टाकला. रस्त्यारस्त्यातून
विद्यार्थ्यांनी नाकेबंदी केली नि कोणी ऑस्ट्रियाची ओढतांना पाहिला की त्याला
हाणमारकरून देण्याचा सपाटा चालवला. या स्वदेशी चळवळीला लवकरच पूर्ण राजकीय
स्वरूप प्राप्त झाले. अमेरिकेतही स्वातंत्र्ययुद्धाच्या आधी अशीच स्वदेशी चळवळ
अुत्पन्न झाली. काय विलक्षण प्रकार आहे ? अितिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी.
अितिहासात स्वदेशी चळवळींचे पर्यवसान राज्याक्रांतीत नि स्वातंत्र्यप्राप्तीत
झाल्याची ही अुदाहरणे काही आकस्मित रीतीने घडून आलेली नाहीत. ते काही अपघात
नाहीत. त्यांच्या या विलक्षण साम्याचे विवरण करता येणे शक्य आहे. स्वदेशी चळवळ
म्हणजे ‘दुसऱ्याच्या लुटारूपणास आळा घालून आपल्या हक्कांचा बचाव करणे होय. आपले हक्क काय आहेत ते सामान्य लोकांस
अेकदम कळत नाही त्यांच्या ग्राहकशक्तीला अिटाकेच कळते की परक्यांच्या व्यापाराने
आपण बुडत आहोत. म्हणून ते त्या व्यापारावर बहिष्कार घाल्यांस तयार होतात. अितकी
त्यांची तयारी झाली की अर्थातच परके लोक आपल्या व्यापाराच्या संरक्षणार्थ जुलमी
अुपाय योजू लागतात. हा जुलूम सुरु झाला
की प्रथमतः व्यापारावर बहिष्कार घालणारे लोक अनायासेच सत्य मार्गाला
लागतात.त्यांना कळू लागते की, निर्जीव परदेशी कापडावर किंवा तंबाखूवर अगर चहावर
बहिष्कार घालून काही अुपयोग नाही. या निर्जीव वस्तूंवर राग काढण्यात काय अर्थ
आहे ? खरा राग या निर्जीव वस्तूंना ज्या सजीव वस्तूंचा आधार आहे त्यांच्यावरच
अुगविला पाहिजे. परक्या मालाला नव्हे तर परक्यांनाच बहिष्कार घातला पाहिजे......
मॅझिनी : आत्मचरित्र प्रस्तावना : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर |
स्वातंत्रवीर वि. दा. सावरकरांनी ज्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून
विदेशी कपड्याची होळी केली त्या लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आपण साजरे
करत आहोत. स्वराज्य,स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतु:सूत्री त्यांनी स्वातंत्रप्राप्तीचा
मार्ग म्हणून जनतेसमोर ठेवली. बंगालच्या फाळणीनंतर ह्या सूत्राचा पुरस्कार करून
देशभर जन आंदोलन उभे केले. स्वराज्य मिळवण्याचा मार्ग म्हणजे स्वकीयांनी स्वदेशी वस्तूंची निर्मिती करणे आणि परकीय
राजवटीला धक्का देण्याचा मार्ग म्हणजे बहिष्कार. याच स्वदेशी आणि बहिष्कार सूत्राचा विस्तार करत महात्मा गांधीजीनी ‘असहकार
चळवळ’ आणि ‘सविनय कायदेभंगाची चळवळ’ उभी केली.
चरखा हा स्वावलंबनाचे प्रतीक बनला. लोकमान्यांनी स्वराज्य बरोबर ‘सुराज्य’ या
संकल्पनेचा अनेक ठिकाणी उच्चार केला आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
अनेक नेत्यांनी याच स्वदेशी मंत्राचा वापर करून जनतेला देशाच्या विकास प्रक्रियेत
सहभागी होण्याचे आवाहन केले. या स्वतंत्रता दिनी १५ ऑगस्टला मा. पंतप्रधानांनी लाल
किल्ल्यावरून केलेली ‘आत्मनिर्भर’ भारताची घोषणा याचा सूत्राचा विस्तार आहे.
अशा
सूत्राची जेव्हा जेव्हा घोषणा दिली जाते त्या त्या वेळी लोकांच्या मनात अनेक
प्रश्न उभे राहतात. अशा घोषणा म्हणजे संकुचित वृत्ती नव्हे काय ? या परस्परावलंबी
जगात स्वावलंबन शक्य आहे का ? परावलंबी देशाला हे शक्य आहे का ? एका बाजूला परदेशी
गुंतवणुकीला निमंत्रण देत असताना आत्मनिर्भर भारताबद्दल बोलणे हा विरोधाभास नाही
का ? जागतिकीकरणाच्या काळात हे शक्य आहे का ? आपल्या निर्यात होणाऱ्या वस्तूंवर
इतर देशांनी बहिष्कार घातलेला आपल्याला परवडणार आहे का ?
हे
प्रश्न रास्तच आहेत पण मला एक प्रश्न मुळात पडतो की ‘स्वदेशी आणि बहिष्कार’,
‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणा राजकीय घोषणा आहेत का ? दर्शनी या घोषणा राजकीय
असल्या, त्या आधारावर चळवळी; राजकारण उभे केले जात असले तरी या घोषणा एखाद्या
देशातील नागरिकांना त्यांच्या नागरी कर्तव्याबद्दलची जाण वाढवण्यासाठी आणि नागरी
कर्तव्याच्या कृती करण्यासाठी उपयोगी आहेत. सामान्य नागरिकाला राष्ट्रीय
कर्तव्याबद्दल व्यक्तिगत प्रतिसादाची कृती करण्याची संधी अशा आवाहनाला प्रतिसाद
देताना मिळते. नुसता बहिष्कार पुरणार नाही तर त्याला समर्थ पर्याय म्हणून स्वदेशी
निर्मिती केली पाहिजे याची जाण असल्याने लोकमान्यांनी स्वदेशी ते बहिष्कार हा आयाम
मांडला आहे.
स्वावलंबी
आणि स्वयंपूर्ण होणे ही प्रत्येक नागरिकासाठी आणि राष्ट्रासाठी आवश्यक गोष्ट आहे.
स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीचे फक्त भावनिक आवाहन करून पुरत नाही तर त्यासाठीच्या
छोट्यामोठ्या कृतीची साखळी नागरिकांसमोर मांडवी लागते. त्या कृती मागचा विचारही
समजावून सांगावा लागतो आणि अशा स्वदेशी व्रताच्या पालनाचे व्यवहार आणि आग्रह यांचे
संतुलन साधायला शिकता आले तर देशातील प्रत्येक नागरिक कृतीशील देशभक्ती करू शकेल.
अशा
स्वदेशी जीवन शैलीच्या विविध पैलूंचा उलगडा करणारे, स्वदेशीच्या वैयक्तिक आचरणाचे
मार्ग निश्चित करण्यासाठीचे मार्गदर्शक पुस्तक म्हणजे ‘स्वीकारशील
स्वदेशी’ हे ज्ञान प्रबोधिनीचे
प्रकाशन.
स्वहितासाठी,
स्वत्त्वासाठी, संकृतीसाठी आणि स्वराज्यासाठी स्वदेशी अशा चार शीर्षकांखाली स्वदेशी
या संकल्पनेचा परिचय करून देणारे लेख यात समाविष्ट केले आहेत. भारतीय चित्रकला,
संगीत, नृत्य आणि शिल्पकला अशा स्वदेशी कलांचा परिचय करून देणारे ‘ओळख भारतीय
कलांची’ हे स्वतंत्र परिशिष्ट पुस्तकात समाविष्ट केले आहे.
भारतीय
वातावरणात व्यक्तिमत्व विकसनासाठी ‘स्वहिताची स्वदेशी’ या लेख समूहात आपली
आहारपद्धती, आपले खेळ, आपले आरोग्यशास्त्र यांचा परिचय करून देणारे लेख आहेत.
आपल्या देशातील परंपरेचा पाईक होऊन आपली वैशिष्ट्ये प्रत्यक्ष आचरणातून का आणि कशी
प्रकट करायची यासाठी ‘स्वत्त्वासाठी स्वदेशी’ या लेख समूहात पोशाखातील
स्वदेशी, अभिवादानातील स्वदेशी, भाषेतील स्वदेशी आणि कालगणनेतील स्वदेशी यांचा
परिचय करून दिला आहे. आपला भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपली संस्कृती
निर्माण करतो. यात काही मूल्य चिरंतन असतात, तर काही बदलावी लागतात. अशा ‘स्वदेशी
संस्कृती’ चा परिचय करून देणारे स्वदेशी सण आणि उत्सव, स्वदेशी पूजन संस्कृती,
स्वदेशी गृहरचना असे तीन लेख या पुस्तकात आहेत.
‘स्वदेशी
ते आत्मनिर्भरता’ या घोषणांच्या गलबल्यात आपण
कसे वर्तन करायचे, काय करायचे काय नाही याबद्दल विचार करण्यासाठी आणि कृती निश्चित
करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील असे तीन लेख स्वदेशी-तात्पुरती आणि नेहमीची, स्वदेशी
ग्राहक व्रत आणि ‘स्वीकारशील’ स्वदेशी बाणा या पुस्तकात आहेत.
स्वराज्यातील सुराज्याकडे वाटचाल करताना आपली नागरिकत्वाची जाण या लेखांमुळे
नक्कीच वाढेल.
स्वदेशी
व्रत म्हणजे केवळ
स्वदेशी वस्तूंचा वापर नव्हे !
तर या मातीती विकसित झालेल्या जीवनशैलीचे विविध पैलू
समजावून घेणे, त्याचा यथार्थ अभिमान बाळगणे, त्यातील कालोचित गोष्टींचा अंगिकार
करणे अन कालबाह्य गोष्टींमध्ये योग्यते बदल करणे म्हणजे स्वदेशीचा डोळसपणे स्वीकार
करणे होय.
कोणत्याही
देशाला प्रगतीकडे वाटचाल करताना जगाबरोबर संवाद साधत स्वतःतील स्वत्त्व टिकवण्यासाठी
डोळस आणि विचारपूर्वक स्वदेशीचे आचरण करण्यासाठी प्रत्येक प्रबोधकाने स्वीकारशील
स्वदेशी यापुस्तकाचा परिचय करून घेतला पाहिजे. स्वहित- स्वत्त्व – संस्कृती –
स्वातंत्र – स्वराज्य - सुराज्य यांच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी स्वदेशी व्रताचे
पालन करणाऱ्या सर्वाना ‘स्वीकारशील स्वदेशी’ नक्कीच पथदर्शक ठरेल.
प्रशांत
दिवेकर
ज्ञान
प्रबोधिनी, पुणे
‘समतोल’
मासिकाच्या दीपावली विशेषांक २०२० मध्ये प्रकाशित
Comments
Post a Comment