इतिहास शिकता-शिकवताना.......भाग 2
दंतकथा अभ्यासताना
अनेकदा
क्षेत्रभेटींच्या वेळी एखाद्या ऐतिहासिक ठिकाणास भेट दिल्यावर स्थानिक गावकरी त्या
ठिकाणाबद्दल माहिती सांगताना तेथे घडलेल्या घटनांबद्दल छान रंजक कथा ऐकवतात. कुठे
भीमाने एका रात्रीत कुंड बांधलेले असते, कुठे पांडवांनी बांधलेले मंदिर असते
बरेचदा ते एका रात्रीत बांधलेलं असतं, काही कथांमध्ये रूप बदल असतो तर काही
कथांमध्ये विशेष शक्ती प्राप्त झालेल्या असतात,गुप्त दरवाजे;भुयारे असतात.
अशा कथा ऐकताना मजा येते; काही वेळा भारी वाटते. पण नंतर मनात अनेक प्रश्न उभे राहातात , खरचं असे घडले असेल ?
एकदा सोलापूरजवळ माचणूर क्षेत्री गेलो असताना अशीच एक कथा ऐकायला मिळाली.
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब
मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्यापासून संरक्षण
मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रह्मगिरी गावाजवळ भीमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या
आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुघल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या
किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे. या किल्ल्याचे नाव माचणूर कसे पडले
याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिद्धेश्वराची
पिंडी (शिवलिंग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर
भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. या
प्रकाराने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य
म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे
ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फुले
दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश
होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने
सिद्धेश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही
महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. |
अशा कथा इतिहास अध्यापन करताना सांगायच्या का?
या कथांमध्ये खरेच इतिहास दडलेला असतो का ?
असेल तर त्यातील खरा इतिहास कसा शोधायचा आणि शोधायला कसे शिकवायचे?
अशा प्रकारच्या कथांना
दंतकथा , मिथककथा , लोककथा असे
अनेक शब्द वापरले जातात. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या दंतकथा, पौराणिक संदर्भ असलेल्या मिथककथा आणि लोकजीवनाचा संदर्भ असलेल्या लोककथा
असे या कथांचे ढोबळ नामकरण करता येईल. बहुतेकवेळा अशा कथा लिखित नसतात. त्या मौखिक
परंपरेने एक पिढी दुसऱ्याला ऐकवत असते. अशा कथांत सत्य असू शकते किंवा नसू शकते.
पण अशा कथा पूर्णपणे कल्पितकथा देखील नसतात.
दंतकथांनाच इतिहास समजणे चुकीचे, पण मानवाला आपल्या भूतकाळाबद्दल कमालीचे आकर्षण असते. त्यामुळेच मानवी समाज
कथांना शतकानुशतके धारण करून असतो. एखादा समाज शतकानुशतके अशा कथा का धारण करतो हे
इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे. भूतकाळ समजून घेताना त्यातील तपशील शोधणे, त्याचा अर्थ लावणे फक्त पुराव्याच्या मदतीने जमत नाही. सर्जनशीलता, प्रतिभा वापरून अर्थ शोधावा लागतो.
अशा कथांमधील काही कथा पूर्णपणे वास्तव कथा असतात तर
काही कथा ऐकताना दर्शनी त्या वास्तवाला
म्हणजे स्थान, व्यक्ती, प्रसंगाला
धरून योग्य आहेत असे वाटते पण कथा
पूर्णपणे कल्पित गोष्ट असते. काही कथा वास्तव जगातील असतात पण कथा मांडणीत
चमत्काराचा स्पर्श असतो. काही कथा पूर्णतः परीकथाच असतात.
एखादी कथा ऐकल्यावर त्यातील वास्तव, रंजक करण्यासाठी वर्णनात घातलेली भर, त्यात प्रक्षेपित केलेले चमत्कार/ दिव्यत्व वेगळे कसे करायचे ? हे करायचे असेल तर कथा तपासून पाहायला शिकावे लागेल. कथा तपासून बघायची
असेल तर कथेला प्रश्न विचारावे लागतील .
वरील चौकटीतील कथेला काय-काय प्रश्न विचारावे लागतील की
ज्यांच्या साहाय्याने या कथेतील इतिहासापर्यंत पोहोचता येईल .
१. ब्रह्मगिरी
गाव भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे का ?
२. या
गावाच्या जवळ किल्ला किंवा त्याचे अवशेष आहेत का ?
३. औरंजेबाच्या
कागदपत्रात ब्रह्मगिरी गावी किल्ला बांधल्याचा उल्लेख सापडतो का ?
४. असेल तर
कोणत्या कागदपत्रात ? जसे सोलापूरच्या जिल्ह्याच्या गँझिटियरमधे या क्षेत्राबद्दल काही माहिती आहे का?
५. औरंगजेब
न्यायदान करत असे, म्हणजे त्याचे दीर्घकाळ वास्तव्य होते का ?
६. औरंगजेब
मूर्तिभंजक होता का ? अजून कुठेकुठे त्याने मूर्तिभंजन केले ?
७. दीर्घकाळ
या ठिकाणी राहिल्यामुळे स्थानिकांचा त्याला चिवट विरोध होत होता का ?
८. चिवट
विरोध दर्शवण्यासाठी कथेत भुंग्यांची उपमा वापरली असेल का ?
९. औरंगजेबाने मांसाचे ताट का पाठवले असेल ?
१०. सैनिकी
दडपशाहीपेक्षा स्थानिक लोकांवर मानसिक आघात करण्यासाठी त्याने मांस पाठवले का ?
११. थाळीतील
वस्तू कोणी बदलल्या असतील का ?
१२. देवस्थानाला
दिलेल्या वर्षासनाचे कागद उपलब्ध आहेत का ?
१३. खरेच
महाराष्ट्र शासन असे वर्षासन आजही देते का ?
प्रश्नांच्या यादीत अजून प्रश्नांची भर घालता येईल. असे
बहुविध आणि बहुदिश प्रश्न अभ्यासकाला उभे करता आले पाहिजेत. कारण प्रश्न हे
विचाराचे वाहन आहे.
विद्यार्थ्यांना कथा वाचून असे प्रश्न काढायला सांगून
त्यावर ‘इतिहास अभ्यासताना........’अशी चर्चा घेता येईल.
या चर्चेत प्रथम कथेतील मुख्य विषयवस्तू निश्चित करावी
लागेल आणि त्यातील आंतरिक सुसंगती तपासावी लागेल. त्याचबरोबर कथेचा उगम आणि प्रसार
याबद्दल विचार करावा लागेल. असा विचार करण्यासाठी वर उल्लेखलेल्या प्रश्नांचा
विचार करता आला पाहिजे. असे प्रश्न अवास्तव घटना कशी घडली यापेक्षा कथेतील अवास्तव
काय आहे हे शोधायला मदत करतात आणि कथेचा प्रवास वास्तवाबरोबर कसा झाला असेल याच्या
उत्तराकडे घेऊन जातात.
त्यामुळे माचणूरच्या घटनेत अद्भुत असे दोन संदर्भ आहेत -
भुंग्यांचा आणि मांसाचे फुलात रूपांतर झाले. यापलीकडची माहिती ऐतिहासिकदृष्ट्या
तपासून पाहणे शक्य आहे. भुंग्यांचा आणि मांसाचे फुलात रूपांतर यातील रूपक उलगडता
आले तर कथा अजून वास्तवाच्या जवळ घेऊन जाता येईल.
इतिहास अभ्यासताना मिळालेल्या माहितीबद्दल
असा सर्वांगीण, परिपूर्ण विचार करायला शिकले आणि
शिकवले पाहिजे.
प्रेरणा-जागरणाबरोबर इतिहासातील वास्तव; तथ्य
ओळखण्यासाठी चिकित्सक विचार करायला शिकणे
हे इतिहास शिकता-शिकवतानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
असा परिपूर्ण विचार केला तरी या विचारातून कथेचे
तात्पर्य शोधून कथा स्विकारताना त्या कथेवर असलेली समाजाची श्रद्धा, त्या कथेमुळे समाजात रूजलेली आणि समाजाने जपलेली मूल्ये, कथेचा समाज मनावर असलेला पगडा आणि कथेतील कल्पिताला धक्का बसल्याने समाजावर
होणारा परिणाम याचा विचार करून कथा स्वीकारावी लागते.
बरेचदा कशा कथा प्रसंगांचे गद्य विश्लेषण केले जाते आणि हे
काय भाकड अशा निष्कर्ष काढला जातो. चिकित्सक विचारात विश्लेषणा पलीकडे जावून अभ्यासक
वर मांडल्याप्रमाणे परिपूर्ण विचार करून निष्कर्षाप्रत येतो.
त्यामुळे इतिहास अध्यापन करताना वर्गात मिथकांविषयी चर्चा
झालीच पाहिजे. कारण आपल्या संस्कृतीतील रामायण, महाभारत, संत चरित्रे याप्रकारचे अभ्यास
साहित्य गोष्टीरूप मिथकांनी, रूपक
कथांनी भरलेले आहे. अशा कथांमध्ये प्रतीके
वापरून मानवी जीवनाविषयी सखोल भाष्य केलेले असते, ते समजले पाहिजे. यातील अर्थ अभ्यासकाला
नीट उलगडला नाही तर गोष्टी नाकारण्याकडे अभ्यासकाचा कल होऊ शकतो. त्यामुळे अशा रूपकांचा अर्थ
शोधायला शिकवणं हे मुलांना संस्कृतीशी जोडण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे.
असाच एक प्रसंग आठवतो. २००२ मध्ये दहावीच्या वर्गाला
परीक्षा झाल्यावर अरुणाचल अभ्यास दौऱ्याला घेऊन गेलो होतो. तवांगला जाताना वाटेत
जसवंतगढला सैनिकांकडून भारत-चीन युद्धाच्या वेळी जसवंतसिंग आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी केलेल्या पराक्रमाचे रोमांचकारी वर्णन करणारी, त्यांच्या वीरमरणाची गाथा सांगणारी
युद्धकथा ऐकता आली. प्रत्यक्ष युद्धस्थानी भारत चीन युद्धाचा गोष्टीरूप
इतिहास ऐकणे हा विशेष अनुभव होता. १९६२ च्या लढाईचे तपशील माहिती करून घेतल्यावर
स्मारकातील जसवंतसिंग यांचे मंदिर,त्यांच्या
वस्तू, त्यांचा पुतळा हे पण पाहिले. हे दाखवताना आजही जसवंतबाबा
अडचणीत सापडलेल्या जवानांना, सैनिकांच्या
ताफ्याला कशी मदत करतात, आजही
त्यांचे अस्तिव कशा श्रद्धेने जपले आहे याबद्दलचे अनेक प्रसंग जवान श्रद्धने सांगत
होते.
रात्रीच्या आढावा बैठकीत या भेटीबद्दल गप्पा झाल्या.
भारत चीन युद्ध, त्यातील जवानांचा पराक्रम याचा विलक्षण प्रभाव गटावर पडलेला जाणवत होता.
त्याच्या बोलण्यात तो अभिनानाने डोकावत होता. पण या अनुभवातील आजही जसवंतबाबा
मदतीसाठी उभे राहणे याच्या कथा गटाला 'काहीही हं' या कॅटेगरीतले वाटत होत्या.
आज भारत-चीन सीमेवर १३,००० फुटांवरील बर्फाच्छादित शिखरांवर ऑक्सिजनच्या कमतरतेत भारतीय सीमेचे रक्षण करताना जर जसवंतबाबा अडचणीच्या वेळी माझ्या मदतीला धावून येणार आहेत असा विश्वास देणारी कथा सैनिकांचे मनोबल उंचावत असेल, त्यांचा निर्धार टिकवून ठेवत असेल तर अशा कथा चिकित्सेच्या पलीकडे जाऊन श्रद्धेने स्वीकाराव्या लागतील. इतिहासाचा अभ्यास करताना समाजाने अशा कथा का स्वीकारल्या, शतकानुशतके त्या का सांभाळल्या हे समजून घेऊन आपल्याला त्यांचा आदर करायला शिकावे लागेल.
प्रशांत दिवेकर ज्ञान प्रबोधिनी, पुणे
टीप : कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित
करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील.
छान विवेचन. अतिशय balanced
ReplyDeleteछान! परवा झालेले इतिहास अध्यापक प्रशिक्षण आठवले. तिथे तुम्ही यावरचं कृतिकाम गटात छान घेतलं होतं. संतचरित्र सांगताना नेहमी हा प्रश्न पडतो, संतानी आपल्या अभंगातून मांडलेलं जीवनविषयक तत्वज्ञान सांगायचं, की त्यांच्या जीवनातील चमत्कार सांगायचा?
ReplyDeleteछान .विचार करायला लावेल असं लिखाण.
ReplyDeleteआजपर्यंत न ऐकलेली कथा वाचनात आली. खूपच विचार अन अन प्रश्न मनात आले.
ReplyDeleteइतिहास खूपच उत्कृष्ट प्रकारे शिकवता येऊ शकतो हे समजले हा लेख वाचून. मी इतिहासाची शिक्षिका नसले तरी मला इतिहासा विषयी खूप उत्सुकता आहे की खरच असे घडले असेल का?
ReplyDeleteह्या लेखात केलेल्या विश्लेषणा मुळे माझी इतिहास जाणून घेण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली. आणखी एक जाणवले की इतिहास शिकवताना सुद्धा प्रश्न का व कसे विचारावे हे शिकवून मुलांमध्ये critical thinking skills develop करू शकतो.
इतिहास हा विषय कृतीयुक्त पध्दतीने कसा शिकवता येईल याची कल्पना आली. एखाद्या घटनेचा चिकित्सक विचार कसा करता येईल हे लक्षात आले.
ReplyDeleteदंतकथा / लोककथा डोळसपणे कश्या पहाव्या याची चांगली मांडणी केली आहे. हाच डोळसपणा इतर अनेक ठिकाणी कामास येतो.
ReplyDeleteतू जसवंत गडचे उदाहरण दिले आहेस. त्या स्मारकामध्ये बोर्डवर लढाईचे वर्णन आहे. स्मारक युद्धस्थानावर आहे असे ही सांगितले जाते. वर्णन वाचून जर कोणता हल्ला कोठून आला वगैरे पहायला गेलो तर दिशांची गल्लत झालेली दिसते. एक तर ते स्मारक युद्धाच्या जागी नसावे. किंवा वर्णन कवीकल्पना मधून आले असावे. युद्ध प्रसंगी कोणीच नोंदी ठेवत नाही. अनेकांच्या आठवणीतून युद्ध प्रसंग साकारतो. स्मारक सुद्धा अगदी सोईच्या ठिकाणी आहे, अगदी हम रस्त्याला लागून. माला वाटते स्मारकाचा उद्देश इतिहासाला जाग आणणे असतो. तो उद्देश हे स्मारक नक्कीच साधते. पण झालेल्या युद्धाचा पूर्ण तपशील समजतो असे नाही.
जसवंत बाबा सारख्या कहाण्या अनेक ठिकाणी ऐकायला येतात. त्या कहाण्याच आहेत हे लक्षात ठेवणे महत्वाचे.
रवींद्र आपटे
२०/०५/२०२१
प्रशांतजी, आपले लिखाण सहजतेने भिडते. आपल्या लिखाणामुळे बरेच आयाम कळतात.
ReplyDeleteधन्यवाद.
मी मूळची इतिहासाची शिक्षिका पण नंतर मराठी विषय घेवून एम. ए. केले.
ReplyDeleteइतिहास आवडीचा आहे...
इतिहास शिकवताना काय केले पाहिजे , हे खूपच छान सांगितले आहे.
दंतकथा ह्या कथाच असतात पण मनोबल उंचावण्यासाठी त्याचा छानच उपयोग होतो.हे मलाहघ आपल्यासारखे पटते...खूप छान...
विदुला मुळे आज प्रथम मी ब्लॉग ची लिंक पाहिली..
खूप छान.....
दंतकथा / मिथकांकडे अशाप्रकारे पाहण्याची दृष्टी येणे इतिहास अभ्यासात उपयुक्त ठरेलच.स्थानिक परिसरांत अशा अनेक दंतकथा प्रचलीत असतात .या पद्धतीने त्यांचा उलगडा झाला तर आजुबाजूच्या घटना -प्रसंग- वस्तू -वास्तू -प्रथा याविषयी अभ्यास व भावनिक जुळणी पण होईल...... परिसरातील प्रचलित दंतकथांचा अर्थ समजून घेणे असा प्रकल्प ही करता येईल ...छान लेख ..हे तंत्र म्हणून वापरून पाहता येईल
ReplyDeleteइतिहासा वरचा हा लेख खूप छान आहे. अनेक उदाहरणातून नेमकेपणाने इतिहास कसे शिकवावे हे समजते. इतिहास शिकविण्या चा मुख्य हेतू् व उद्दिष्ट साध्य होण्यासाठी हा लेख मार्गदर्शक आहे.
ReplyDeleteएखाद्या गोष्टी चे सखोल ज्ञान कसे मिळवावे किंवा कशा प्रकारे व्यक्त केले पाहिजे असे दोन्ही बाजूंनी उपयोग होईल
ReplyDelete