इतिहास शिकता-शिकवताना .......भाग १
पाच
वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशामधून
शिक्षकांचा एक गट महाराष्ट्र दर्शन यात्रेनिमित्त पुण्यात आला होता. पुण्यातील वास्तव्यात त्यांच्यासाठी दोन
दिवसांचे अभ्यासशिबिर योजले होते. अभ्यासशिबिरात त्यांच्यासाठी प्रबोधिनी परिसरात
एका हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. पुणे विद्यार्थी गृहापासून सुरुवात करून ज्ञान
प्रबोधिनीपर्यंत दीड-दोन तास मोहन शेटेसरांनी या शिक्षकांसमोर या परिसराचा इतिहास
जिवंत केला. वासुदेव बळवंत फडके, न्यायमूर्ती
रानडे, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस,
हुतात्मा राजगुरुंसारख्या अनेक राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील
व्यक्तींची निवासस्थाने आणि कथाप्रसंगांचे दर्शन शिक्षकांना झाले.
हेरीटेज
वॉकहून परत आल्यावर शिक्षकांशी या अनुभवाबद्दल गप्पा मारत होतो. अनेक शिक्षक
भारावले होते. एक शिक्षक मला म्हणाले,’आज
पहिल्यांदा माझ्या मनाला स्पर्शून गेले की अनेक वर्षे मी ज्या व्यक्तींबद्दल
वर्गात बोलत होतो, ती चालतीबोलती जिवंत माणसे होती. इतकी
वर्षे माझ्या दृष्टीनं या घटना आणि व्यक्ती एखाद्या काल्पनिक कादंबरीसारख्या आणि
त्यातील कथानायकांसारख्या होत्या. एखाद्या परिसरात हे खरंच घडलं असेल का असा मनात
प्रश्न असायचा.’
दुसरा
प्रसंग आठवतो तो माझ्याबाबतीलाच आहे. मी २००५ मध्ये मोईरांगला पहिल्यांदा भेट
दिली. मोईरांग मणिपूर राज्यातील, भारत-म्यानमार सीमेजवळ वसलेलं
छोटं गाव आहे. आझाद हिंद फौजेच्या इतिहासात मोईरांगला महत्त्वाचे स्थान आहे. आझाद
हिंद फौजेच्या भारतात प्रवेश करण्यासाठी ब्रिटिश सेनेबरोबर भारताच्या प्रवेशद्वारी
ज्या लढाया झाल्या, त्यातील एका महत्त्वाची लढाई मोईरांगला
झाली. दुर्दैवाने या लढाईत आझाद हिंद सेनेचा पराभव झाला. आज मोईरांगला आझाद हिंद
सेनेचे स्मारक आणि संग्रहालय आहे. प्रत्यक्ष लढाईचे तपशील, युद्धसाहित्य
यांचे प्रदर्शन स्मारकभवनात आहे. सुभाषबाबूंचा जर्मनीपासून जपानपर्यंतचा प्रवास,
जपानमधील कार्य आणि सेनेसह ब्रह्मदेशातून भारतात प्रवेश प्रदर्शनात मांडला आहे. आझात हिंदसेनेचे ध्वज,
शस्त्रास्त्रे, सेनानी यांची माहिती
प्रदर्शनाला भेट दिल्यावर मिळते. यातील बरीच माहिती या ना त्या निमित्ताने वाचली
होती. पण मोईरांगच्या संग्रहालयातील एक दालन पाहताना मला नव्यानेच कळले की त्या
लढाईत स्थानिक मणिपुरी (मैतेयी) लोकांचा सहभाग होता. त्यांनी स्थानिक गट स्थापन
करून सुभाषबाबूंना कसं साहाय्य केलं होतं.
या
स्थानिक गटांनी आझाद हिंद सेनेचे स्वागत करून
त्यांना आर्थिक आणि प्रत्यक्ष सैनिकी मदत केली. मणिपुरी जनतेने दिलेल्या या
योगदानाबद्दल मी कधीच वाचलेलं नव्हते. सिंगापूर, ब्रह्मदेशातील अनिवासी भारतीयांनी सुभाषबाबूंना कशी मदत केली, महिलांनी सभेनंतर कसे अंगावरील दागिने दान केले अशा कथा वाचल्या होत्या,
ऐकल्या होत्या पण आझाद हिंद सेना भारताच्या प्रवेशद्वारी आली
त्यावेळी भारतीय लोकांनी सेनेला असे
साहाय्य केलं, याच्याबद्दल मी कधीच काही वाचलं नव्हतं. अनेक
वर्षे मनात एक प्रश्न घोळत होता की आझाद हिंद सेना भारताच्या सीमेवर पोचली तेव्हा
भारतीय काय करत होते ? भारतीयांनी आझाद हिंद सेनेचे असे थंड
स्वागत का केले ? त्याचे उत्तर मोईरांगला भेट दिल्यावर
मिळाले.
ही दोन्ही उदाहरणं आठवल्यावर मला असं वाटतं
की ते अरुणाचली शिक्षक काय किंवा मी काय दोघांजवळ माहितीची कमतरता होती आणि
दोघांनाही इतिहासातील घटनांचे छापील शब्दांपलीकडील दर्शन नव्हते.
माहितीची
आणि दर्शनाची अपूर्णता हे इतिहास अध्ययन-अध्यापनातील पहिले महत्त्वाचे आव्हान आहे.
माहितीच्या अपूर्णतेने, माहिती
तुकड्या-तुकड्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचल्याने, घटनांमधील
तथ्य आपल्यापर्यंत न पोचता तथ्याचा विपर्यास आपल्यापर्यंत पोहोचल्याने अनेक
समज-गैरसमज आणि मतमतांचा गलबला तयार होतो. हे
समज-गैरसमज आणि मतमतांचा गलबला यांच्या कोलाहलात चिकित्सक विचारालाच
मर्यादा आल्याने अभ्यासक त्यातच हरवून जातो व त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांपर्यंत त्याला
पोहोचणे अवघड होऊन बसते.
अरुणाचली
शिक्षकाला हेरीटेज वॉकच्या वेळी, अरे! मी जिथे
उभा आहे याच ठिकाणी लोकमान्य उभे होते, याच रस्तावरून
क्रांतिवीर चाफेकर रॅंडचा वध करायला गेले, याच विठ्ठल
मंदिरात हुतात्मा राजगुरू राहात होते ही जाणीव स्पर्श करून गेली.
हीच जाणीव; तोच
थरार मी तवांगला जाताना जसवंत गढला अनुभवला होता. मोईरांगला गेल्यावर त्या ठिकाणाबद्दल तीच जाणीव, अरे! हेच ते मोईरांग जेथे सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना लढली. ‘अरे ! हेच ते मोईरांगला जेथे माझे मणिपुरी बांधव आझाद हिंद सेनेचे
पाठीराखे झाले होते.’ मनाला स्पर्शून गेली होती.
हीच जाणीव; तोच थरार; तेच दु:ख कोकण सहलीतून परततांना पावनखिंडीत डोळ्यातून अश्रू गाळीत राहुलदादाकडून बाजीप्रभूंची कथा ऐकताना मुलींच्या डोळ्यात दाटून आलं होतं. हीच जाणीव; तीच थरथर; तोच अभिमान रायगडाच्या सदरेवर उपासना करताना मुलांच्या मनात दाटून आला होता. हीच जाणीव; हाच अभिमान कोयना धरण आणि त्याच्या चौथ्या टप्प्याचे काम पाहताना मनाला स्पर्शून गेला होता.
राष्ट्राचा
इतिहास समजून घेण्यासाठी अभ्यासकाला जसा
चिकित्सक विचार करता यायला हवा, अभ्यासविषयाशी
आपले बौद्धिक नाते जुळवता यायला हवे, त्यापेक्षा किंचित
जास्त हा अभ्यास करताना ही जाणीव, तो थरार अभ्यासकाच्या मनात
निर्माण व्हायला हवा. विद्यार्थ्याचे आशयाशी भावनिक नाते निर्माण होणे, त्याच्या मनात अभिमानाची जाणीव निर्माण होणे, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी
इतिहास शिकणे–शिकवणे यासाठीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे
उद्दिष्ट असेल तरच विद्यार्थ्याला या सगळ्या इतिहास अभ्यासविषयाशी आपले नाते काय
आहे हे कळेल.
ब्लॉगच्या
या मालेत इतिहास अध्ययन करण्यासाठी अध्ययन-अध्यापनाची उद्दिष्टे कशी निश्चित
करायची ,
इतिहास अध्ययनासाठी आवश्यक चिकित्सक विचारकौशल्य कशी विकसित करायची, इतिहास अध्यायनातून प्रेरणा
जागरण झाल्यानंतर त्यातून भविष्योन्मुख होण्यासाठी अध्ययन अनुभवांची योजना कशी
करायची याबद्दलचा विचार आणि प्रबोधिनीमध्ये अध्यापकांनी केलेल्या
कृती,अनुभव, प्रयोग
मांडणार आहे.
प्रशांत
दिवेकर
ज्ञान
प्रबोधिनी, पुणे
Historical travels create
roadmaps.
Historical speeches create
mindsets.
Historical habits create cultures.
Historical mistakes create wisdom.
पु. लं. च्या हरी तात्यांची आठवण झाली मधला एक परिच्छेद वाचताना. "त्यांचा इतिहास जिवंत होता " या वाक्याचा संदर्भ आत्ता कळला.
ReplyDeleteअसा अनुभव मला सुभाषबाबूंचं घर पाहताना, त्यांची पत्र वाचताना आणि साबरमती आश्रम बघताना आला होता.
ReplyDeleteया लेखमालेतील लेख वाचण्यास खूप उत्सुक आहे सर🙏
ReplyDeleteशिक्षणाबद्दलची आणि त्यातही विशेषकरून इतिहास शिक्षणाची तळमळ आणि विविध आयाम काय असतात /असावे हे खूप समर्पकपणे मांडले आहे.
ReplyDelete👍अतियंत उपयुक्त लेखन झाले आहे सर 👌शब्दांपलिकडचे दर्शन होणे .. आशयाशी भावनिक नाते जोडले जाणे .. हा प्रयत्न ‘प्रेरणा जागरण’ या इतिहास अध्यापनाच्या प्रमुख पण आव्हान ठरत असलेल्या दिशेने नेणारा 👍👍त्या संदर्भातील कृती- प्रयोग नक्कीच मार्गदर्शक असतील 👍
ReplyDelete👍अतियंत उपयुक्त लेखन झाले आहे सर 👌शब्दांपलिकडचे दर्शन होणे .. आशयाशी भावनिक नाते जोडले जाणे .. हा प्रयत्न ‘प्रेरणा जागरण’ या इतिहास अध्यापनाच्या प्रमुख पण आव्हान ठरत असलेल्या दिशेने नेणारा 👍👍त्या संदर्भातील कृती- प्रयोग नक्कीच मार्गदर्शक असतील 👍
ReplyDeleteअतिशय उपयुक्त आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतोय याची अनुभूती देणारा. अध्यापनात मार्गदर्शक ठरतील.
ReplyDeleteउत्तम, उपयुक्त, ओघवते, वास्तव, चित्रदर्शी. उत्सुकता वाटतेय.
ReplyDeleteआपली इतिहासाची सर्व पाठ्यपुस्तके सुधारायला हवीत.
प्रशांत लेखमाला चांगली होणार हे तुझा पहिला लेख सांगून जातो.
ReplyDeleteमोईरांग चे museum मी दोन वेळा पाहिले. पहिल्यांदा पूर्ण उधवस्त पोलिसांची छावणी असलेले व नंतर परत उभे. नेताजींचा भव्य पुतळा व सिंगपूरच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेच्या स्थभाची प्रतिकृती तर भावतेच, पण तू म्हणतोस तसे आतील दालन मधील अनेक सामान्य लोकांची छाया चित्रे व त्यांनी आझाद हिंद सेनेसाठी केलेलं काम, इतिहासातील नवीन पान दाखवते. सेना पोचण्या अगोदरच त्यांनी भूमिगत जाळे तयार केले होते. They were eyes and ears of Azad Hind. अनेकजण माघारी हटत चाललेल्या सेने बरोबर ब्रम्हदेशला गेले. थेट माऊंट पोपा पर्यन्त, जेथे सेनेचा पूर्ण पराभव झाला. ब्रम्हदेशच्या माझ्या प्रवासात मी मुद्दाम माऊंट पोपाला जाऊन आलो.
जसवंत गड सारखाच अनुभव मी चिशूलला घेतला. अक्साईचीन च्या खाली चिशूल. वर रोजंगला खिंड दिसते. इथेच ती इतिहासिक लढाई झाली. ११ – १२ हजार फूट उंचीवर आपण विमानाने रणगाडे आणले. येथील १३ कुमौ व शैतान सिंह यांचे स्मारक ६२ च्या युद्धाच्या आढवणी ताज्या करते.
इतिहासाला अनेक पदर असतात. खालच्या वर्गात जरी सर्वमान्य एकदा पदर समजवला तरी पुढील काळात इतिहासाच्या अनेक पदरांचे अस्तिव्य जाणवले पाहिजे.
रवींद्र आपटे
१५/०५/२०२१