महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला जशी चौथीत शिवाजी
महाराजांची ओळख होते, तशीच शिवचरित्राची ओळख खरंतर मलाही झाली. त्याचवर्षी
वाईच्या गंगापुरी घाटावर कृष्णामाईच्या उत्सवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची
कथामाला ऐकायला मिळाली. काय ऐकले ते आज
आठवत नाही, पण घाटावरील लोकांची गर्दी, एक फळा आणि फळ्याशेजारी पांढऱ्या कपड्यातील दाढीवाल्या माणसाने काहीतरी
भारी सांगितलं होतं एवढंच आठवतयं. पुढे पाचवी - सहावीत राजा शिवछत्रपती आणि
श्रीमानयोगी ही दोन भारावून टाकणारी पुस्तके हातात पडली.
त्या तीन वर्षांत एक प्रश्न मनात घोळत असलेला आठवतो. तो म्हणजे, राजगडावरून प्रतापगडाला जाताना वाटेत शिरवळ, वाई यासारखी आदिलशाही ठाणी असताना आणि वाईत खासा अफजलखान असताना त्याने महाराजांना रस्त्यातच का पकडलं नाही?
कारण
राजगडाहून प्रतापगडला जायचे असेल तर नसरापूरला हायवेला लागायचे, मग शिरवळ-खंबाटकी घाट, जोशी विहीर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर
आणि प्रतापगड हा रस्ता पक्का डोक्यात होता.
आणखी एखादा वेगळा रस्ता असू शकेल, हे गावीच नव्हते. पुढे कधीतरी नकाशा बघितल्यावर खरा उलगडा झाला.
इतिहास अभ्यासताना
स्थान आणि वेळ, स्थान आणि घटना, क्षेत्र आणि कालखंड
या तीन जोड्यांचा विचार
करून अर्थ लावता यावा लागतो.
यासाठी शैक्षणिक उपक्रम संशोधिकेद्वारा आयोजित
ज्ञानवर्धन सादरीकरण व्याख्यानमालेत ‘इतिहासातील
भूगोल’ या विषयाची स्वतंत्र ओळख विद्यार्थ्यांना ओळख करून दिली
जाते. आपण आपल्या शाळांमध्ये गणेशोत्सव, शारदोत्सव, क्रांती सप्ताहाच्या काळात इतिहासाच्या
पाठक्रमातील आशयाला पूरक अशी विषयाची व्याप्ती विद्यार्थांसमोर मांडली जाईल अशा
सत्रांची योजना करू शकू.
हा अर्थ शोधण्यासाठी इतिहास अभ्यासकाने कायम
स्वतःला दोन प्रश्न विचारावेत.
पहिला प्रश्न घटना कुठे घडली? आणि तिथेच का घडली ?
आणि
दुसरा प्रश्न घटना कधी घडली? आणि तेव्हाच का
घडली?
मानवी संस्कृतीच्या विकासात स्थानमहात्म्य महत्त्वाचे
आहे. एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील भूआवरण आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेतून
जमीन, माती तयार होते. त्यावर वनस्पती आणि प्राण्यांचे प्रकार
अवलंबून असतात. त्यावर मानवाची उपजीविका कशी असणार हे निश्चित होते. त्यामुळे
नदीच्या खोऱ्यातील मानवी जीवन, आचार आणि
स्वभाव पर्वतरांगातील लोकांपेक्षा वेगळे असतात. नदीच्या खोऱ्यातील स्थिर
ग्रामसंस्कृती, बंदरांजवळची व्यापारीसंस्कृती विकसित होण्यात त्यांचे ‘स्थान’ महत्त्वाचे
आहे.
मध्यपूर्वेतून
भारतावर झालेल्या आक्रमणांनी भारतीय इतिहासाचा मोठा कालखंड व्यापला आहे. हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर या टोळ्यांचे उष्ण वाळवंटी क्षेत्रातील (ग्रेट
एरिड झोनमधील) स्थान, त्यामुळे त्यांचे भटके पशुपालक जीवन समजून घेतले पाहिजे. स्थलांतराचा
इतिहास हा मानवी भूगोलाचा इतिहास आहे. ग्रेट ब्रिटन आणि युरोपातील देश यांचा
इतिहास समजून घेताना ते देश दर्यावर्दी असण्यात त्यांचे 'स्थानमहात्म्य' महत्त्वाची भूमिका बजावते.
उत्तर अटलांटिक समुद्रातील वाऱ्याची दिशा, सागरी प्रवाह समजून घेतल्याखेरीज ख्रिस्तोफर कोलंबसच्या प्रवासाचा नीट उलगडा होत नाही.
आपण भारतीयांनी आपले जीवन मौसमी पावसाशी एवढे बांधून
घेतले आहे, की आपल्या इतिहासात सैनिकी मोहिमा पावसाळा अर्थात शेतीची
कामे संपल्यावर सुरू व्हायच्या. अर्थात पावसाळ्यातील तुडुंब वाहणाऱ्या, पूर आलेल्या नद्या हा अजून एक भौगोलिक घटक इतिहास घडवण्याला मर्यादा आणत
असल्याने लष्करी मोहिमा या काळात टाळल्या जात. पौरसापासून पानिपतापर्यंतचा इतिहास, नदी- तिला आलेले पूर, तिचा उतार
या भौगोलिक वैशिष्ट्यांच्या आकलनाशी निगडीत आहेत.
इतिहासाचा अभ्यास करताना मानवी समाजावर पाणी, मृदा, हवामान, ऋतू
यांसारख्या भौतिक घटकांचा असलेला प्रभाव
विचारता घेतला तरच नागरीकरण, सभ्यता, वसाहतवाद आणि स्थलांतर यासारख्या ऐतिहासिक प्रक्रियांचे
नीट आकलन होईल. नाहीतर ही इतिहासाची अभ्यासक्षेत्रे तारीख आणि घटना या दोन
घटकांपुरती मर्यादित होतील. 'इतिहास म्हणजे मनुष्य, स्थान आणि पर्यावरण यांच्या बदलत्या संबंधांतून घडलेल्या घटनांचा अभ्यास' ; जसे
मसाल्याच्या पदार्थांचे भौगोलिक स्थान हे त्याच्याशी निगडीत घटनांचे मूळ आहे.
पर्यावरणातील खनिज तेलाच्या शोधाचा परिणाम म्हणजे गेल्या शंभर वर्षांचा इतिहास
आहे. सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास आणि सांस्कृतिक इतिहास भौगोलिक घटकांशी
घट्ट बांधलेले आहेत.
भूगोलाने मानवी संस्कृती विकसित होण्याची
दिशा जशी निश्चित केली,
त्याबरोबरच ऐतिहासिक कथानायकांनी देखील
घटना कुठे आणि तेथेच का याचा विचार केल्याने
इतिहास घडला.
एक फार प्रसिद्ध नसलेलं उदाहरण अलीकडे वाचनात आले.
दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बलूनबॉम्ब तयार करून सोडले
होते. दोन खंडांच्या मधून वाहणाऱ्या 'जेट
स्ट्रीम' वाऱ्यांच्या प्रवाहावर हे फुगे तरंगत- तरंगत अमेरिकेत
पोहोचतील अशी योजना होती ; पण यातील
काहीच फुगे पोचू शकले आणि ते पकडले
गेल्याने अपेक्षित नुकसान झाले नाही.
उंबरखिंडीतील कारतलबखानाबरोबरच्या लढाईचा अभ्यास करताना ऐतिहासिक संदर्भामधील लढाईचे वर्णन वाचताना शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेले, अंगावर पोलादी चिलखत घातलेले बहारदार वर्णन वाचायला मिळते;
‘खानाचा वकील
महाराजांकडे येण्यास झाडाझुडुपांतून वाट काढीत निघाला. लांबूनच त्याला घोड्यावर
बसलेली महाराजांची अतिभव्य, अतिसुंदर
अन् अतितेजस्वी मर्दानी मूर्ती दिसली.
महाराजांनी अंगांत पोलादी चिलखत घातलें होतें व
मस्तकावर पोलादी शिरस्त्राण घातले होते. मानेवर जाळीदार झालर रुळत होती. मनगटावर, छातीवर, पाठीवर व
कमरेवर पोलादाच्या अत्यंत सुबक नक्षीच्या पोलादी पट्ट्या चिलखतांतच गुंफिलेल्या
होत्या. पायांतल्या पांढऱ्या सुरवारीवर ते किंचित अंजिरी झाक असलेले चिलखत अन्
शिरस्त्राण महाराजांस फारच शोभून दिसत होतें. त्यांनी कमरेवर पल्लेदार तरवार
लटकावली होती. पाठीवर विशाल ढाल बांधली होती. कानात मोत्यांचे चौकडे हलत होते.
भव्य कपाळ, गरुडासारखे घवघवीत नाक, चढणीदार
भिवया, अत्यंत पाणीदार डोळे, काळीभोर अन्
खुलून दिसणारी दाढी आणि मुखावर किंचित् स्मित-!’ (राजा शिवछत्रपती- मूळ संदर्भ शिवभारत)
पण ज्या ठिकाणी युद्ध घडले, जी जागा त्यांनी युद्धासाठी निवडली तिचे वर्णन 'उंबरखिंडीखाली तुफान अरण्य होते. वाट अरुंद,नागमोडी होती. महाराजांच्या मदतीला संह्याद्री सदैव महारुद्रासारखा उभा होता.' उंबरखिंडीचे एवढे त्रोटक वर्णन वाचायला मिळते. खरंतर उंबरखिंडीच्या लढाईचे विशेष वेगळेपण जोपर्यंत उंबरखिंडीचा नकाशा आपण पाहत नाही तोपर्यंत कळत नाही. तीच जागा महाराजांनी का निवडली? ते नकाशा पहिल्याशिवाय कळत नाही. त्या पखालीसारख्या दोन बाजूंनी तोंड बंद करता येईल अशा युद्धस्थानाच्या निश्चितीने विषम सैनिकी बळात महाराजांचा विजय कसा निश्चित केला ते नकाशा पाहिल्यावर लक्षात येते .
त्यामुळे इतिहास अध्ययनात नकाशाचे वाचन आणि अध्यापनात नकाशाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नकाशावर सैनिकी हालचाली दाखवून लढाईच्या शाब्दिक वर्णनाच्या पुढे जावून इतिहास अधिक दृश्यमान करता येईल.
इतिहासातील अशा घटना, प्रसंग समजून घ्यायचे असतील, तर प्रतिकृती तयार करणे हा एक वेगळा अध्ययन अनुभव आहे.
काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात इतिहासप्रेमी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली
पानिपतच्या लढाईची त्रिमितीय प्रतिकृती तयार केली होती. पानिपतच्या लढाईतील
पराक्रमाची गाथा कथा रूपात ऐकताना जे
कल्पनाचित्र मनासमोर उभे राहिले होते, त्यापेक्षा
सुस्पष्ट कल्पनाचित्र ती प्रतिकृती पाहत, कथा ऐकताना
मनासमोर उभे राहिले.
( ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथील पानिपत लढाई प्रतिकृती प्रदर्शन छायाचित्रे )
गेली सुमारे दहा वर्षे तरी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागमधील मोहन शेटेसर दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत शाळेतील
विद्यार्थ्यांचा सहभाग घेत अशा इतिहासातील लढायांच्या प्रतिकृती तयार करून घेत
आहेत. दरवर्षी मी या प्रदर्शनास भेट दिली आहे व सरांशी आणि मुलांशी या अनुभवावर
गप्पा मारल्या आहेत. खरंच, पुस्तकातील
छापील वर्णन, भौगोलिक प्रतिकृतीवर ऐतिहासिक घटनांची मालिका दाखवत
जिवंत करणे हा विशेष शैक्षणिक अनुभव आहे. आज प्रत्यक्ष प्रतिकृतीबरोबर संगणकावर
वेगवेगळी अनिमेशन टूल्स वापरून तयार केलेली 'ग्राफिक्स' इतिहास अध्यापनाचे उत्तम शैक्षणिक साधन आहे.
इतिहास अध्यापकाने घटना आणि कालखंड या इतिहासातील
संकल्पना स्थान आणि क्षेत्र या भूगोलातील संकल्पनांशी कशा अविभाज्यपणे जोडलेल्या
आहेत हे उलगडून बघण्याची सवय लावली तर इतिहास अभ्यासक अभ्यासासाठी अधिक सक्षम
बनेल.
इतिहास हा मानवी अनुभवांचे संचित असला,
तरी मानवी अनुभव ज्या ठिकाणी घडतात ते
क्षेत्र भौगोलिक आहे.
त्यामुळे भूगोल हा केवळ इतिहातील नाटकाचा
रंगमंच नाही,
तर ते नाटक घडवणारा सूत्रधार आहे.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी,पुणे
टीप :
१. इतिहास आणि भूगोल यांचे नाते सांगणाऱ्या अनेक घटना आहेत. ब्लॉग वाचताना आपल्याला आठवलेली उदाहरणे जरूर कॉमेंटमध्ये शेअर करावीत.
२. कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक
त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील.
चपखल शीर्षक. थोरले बाजीराव पेशवे यांची निजामसोबतची 'पालखेड' ची लढाई सुद्धा अभ्यासण्याजोगी आहे.
ReplyDeleteएकूणातच लढायांचा इतिहास समजून घेणे मनोरंजक असते, आधुनिक तंत्रज्ञानाची जोस दिल्याने ते सुस्पष्ट होण्यास मदत होते.व्हिडीओची कल्पना छान
ReplyDeleteमला वर्गात एका मुलाने प्रश्न विचारला होता की इस्तानबुल मधून यायचा रस्ता बंद झाला तर युरोपीय व्यापारी जमिनीवरच दुसरा मार्ग शोधून भारतात का आले नाहीत? सागरी मार्ग शोधायची गरज का पडली? मग जगाचा physical map काढून इतिहास शिकवावा लागला.
ReplyDelete