जंगली हत्तींची
शिरगणती
श्री. विजय स्वामी
२० मार्च २००१
रोजी अरुणाचल प्रदेशातील सर्व जंगली हत्तींची शिरगणती केली गेली. अरुणाचल
प्रदेशातील हत्तींचे नैसर्गिक अधिवास व संरक्षित जंगलातून जंगली हत्तींची संख्या
मोजण्यात आली. सुमारे आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे १९९३ नंतर
हत्तींची पद्धतशीर शिरगणती करण्यात आली.
एक
छायाचित्रकार म्हणून या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. माझ्या
दृष्टीने हा एक वेगळा अनुभव ठरला. श्री एक. के. सेन ( मिहाओ अभयारण्याचे डी. एफ. ओ. ) हे आमच्या मोहिमेचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली
दिबांग जिल्ह्यातील
हत्तीची शिरगणती केली जाणार होती. १९९३ साली झालेल्या हत्तींच्या शिरगणतीचा
त्यांना अनुभव होता.
दि. १८ मार्च रोजी
श्री सेन यांच्या पथकात मी सामील झालो. आमच्या पथकात सुमारे १५ वनरक्षकांचा
समावेश होता. आमचा पहिला दिवस २० मार्चसाठीचे नियोजन करणे, शिरगणतीची पद्धत ठरविणे, स्थाने निश्चित
करणे, आवश्यक
साहित्य गोळा करणे या प्रकाराची पूर्वतयारी करण्यात गेला . संपूर्ण राज्यातील हत्तींची शिरगणती सोपी जावी, म्हणून राज्यची चार
विभागात विभागणी केली होती.
विभाग १ - भाईराबकुंड ते सुबानसिरी नदी
विभाग २ - सुबानसिरी नदी
ते सियांग नदी
विभाग ३ - सियांग नदी
ते नोआदिहींग नदी
विभाग ४ - नोआदिहींग नदी
ते नागालँडची सीमा
प्रत्येक विभागाची पुन्हा गटात व उपगटात
विभागणी केली होती. त्यापैकी विभाग ३ मधील गट १, उपगट-१ ची म्हणजे बिजारी, बोमजिर,
इफिपानी, सिसीरी नदी
ह्या क्षेत्रात होणाऱ्या शिरगणतीत माझा
सहभाग होता. आम्ही घेतलेल्या साहित्यात
दुर्बिणी,
छोटे-हलके तंबू, पाण्याचे कॅन, बाटल्या, स्लिपिंग बॅग, विजेऱ्या, कोरड्या
अन्नपदार्थांची पाकिटे,
नकाशे आदी
गोष्टींचा समावेश होता. गरज पडली तर धोकादायक परिस्थितीत
वापरण्यासाठी बंदुकाही घेतल्या होत्या. कारण जंगली हत्तींची शिरगणती करणे हे एक अवघड
व धोकादायक काम आहे.
आमच्या
पथकाशिवाय दहा जणांचे एक पथक आधीच ह्या कामाला लागले होते. त्यांच्याकडे शिरगणतीसाठीची
ठिकाणे निश्चित करण्याचे काम होते. ही स्थाने हत्तींची नियमित वर्दळ असलेली ठिकाणे
असतात. जसे डोंगरातील मिठागरे किंवा खारट पाण्याचे स्रोत, पिण्याच्या
पाण्याची ठिकाणे,
स्थलांतराचे
मार्ग, अन्नाच्या
उपलब्धतेची निश्चित ठिकाणे आदी.
हत्ती
नोंदवताना वेगवेगळ्या ओळख खुणा नोंदवाव्या लागतात. शिरगणतीच्या कामात हत्तींचे
वेगवेगळ्या गटात वर्गीकरण नोंदवणे आवश्यक होते. जसे सात फुटांपेक्षा मोठे ते प्रौढ, ५ ते ७ फुटातील
मध्यमवयीन, पौगंडावस्थेतील
व लहान पिल्ले आदी. वयाबरोबर नर टस्कर/ नर मखना,
मादी आदी
गोष्टीही नोंदवावयाच्या होत्या.
कामाच्या
सोयीसाठी आम्ही तीन गटात विभागणी केली व कामे वाटन घेतली. माहिती काढणारा गट, निरीक्षणे
नोंदवणारा गट आणि वाटाड्या गट असे गट पाडले. श्री. सेन ह्यांनी हत्तींची शिरगणती
करताना काय सावधानता बाळगायला पाहिजे, ह्याबाबत उपयुक्त सुचना सांगितल्या. जंगली हत्ती माणसांच्या
हालचालीने-वावराने बुजण्याची शक्यता असल्याने हरतऱ्हेची सावधानता बाळगणे गरजेचे
असते. पांढऱ्या व लाल रंगामुळे हत्ती विचलित होऊन रागावण्याची शक्यता असल्य अशा
रंगांचे कपडे घालणे टाळावे. सावधानता म्हणून आम्ही ज्या प्रशिक्षित हत्तींवरू
जंगलात हिंडणार होतो,
त्या मादी
होत्या. कारण जर एखाद्या जंगली नर
हत्तीशी गाठ पडली तर तो दुसऱ्या नर हत्तीवर लगेच चाल करू शकतो. त्याला आव्हान देऊ
शकतो.
थेट शिरगणती (ह्या
प्रकारच्या शिरगणतीत प्रत्यक्ष पाहूनच नोंद केली जाते, पायांचे ठसे
आदी खुणांवरून नोंदी केल्या जात नाहीत.) हत्तींपासून सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असते.
हत्तींच्या मागावर असताना वाऱ्याची दिशा विचारात घ्यावी. अनावश्यक आवाज
टाळावा; कारण
हत्तींची घ्राणेंद्रिये व कान अतिशय तीक्ष्ण असतात.
आपल्या
हालचालीने बिचकून हल्ला करण्यास उद्युक्त झालेला हत्ती ओळखता येतो. आक्रमण करण्यास
उद्युक्त झालेला हत्ती आपले कान मागच्या बाजूला ताठ सरळ करतो व शक्य तेवढे घट्ट
मानेला चिकटवून ठेवतो,
सोंड पुढच्या
बाजूला ताठ सरळ करून मोठ्याने चित्कार करतो. हत्ती सुमारे ६० किमीच्या गतीने
पाठलाग करू शकतो,
सुमारे ५० मी.
अंतरावर क्षणभर विश्रांतीसाठी थांबून परत ६० किमी. गतीने धावू शकतो. समजा एखाद्या
हत्तीने चाल केलीच तर विचलित होऊ नये, अनावश्यक पळू नये. त्याऐव दाट झाडी झुडपात, दगडकपारींच्या सांद्रीत लापावे. कारण हत्ती अशा
ठिकाणी आपली सोंड घालून शत्रू हुडकण्यास बिचकतात.पळण्याची वेळ आली तर वाऱ्याच्या
विरुद्ध दिशेला पळावे. अशा अनेक दक्षतेच्या सूचना मनात
घोळवतच आम्ही मोहिमेला प्रारंभ केला.
१९ तारखेला
आम्ही बिजारी येथील फॉरेस्ट रेंज ऑफिसात पोहोचलो. आमच्या मोहिमेसाठी एकंदर ६
प्रशिक्षित हत्तींची सोय केली होती. सायंकाळी मागोवा काढण्यासाठी गेलेल्या गटाने
हत्तींच्या हालचालींबद्दल माहिती आणली. जंगली हत्तींच्या एका मोठ्या कळपाची नोंद सिसीर नदीच्या
पूर्वेकडच्या जंगलात करण्यात आली होती.
त्याप्रमाणे मग
२० तारखेसाठीची
शिरगणतीची योजना ठरविण्यात आली.
दुसऱ्या दिवशी
सकाळी पाच वाजता बिजारी आयबीपासून ९ किमी अंतरावर सिसीर नदीच्या कडेला जमायचे
निश्चित झाले. जंगलात कोठे प्रवेश करायचा, हे त्यावेळीच
निश्चित करायचे होते. २० मार्च रोजी आम्ही सकाळी लवकर ४.०० वाजता उठून जंगलाकडे
मार्गक्रमण केले. श्री. सेन वाहनचालकाची भूमिका बजावत होते. थोड्या वेळाने एके
ठिकाणी मला सहा हत्ती रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसले. आनंदाने मी ओरडलो. "हत्ती ! हत्ती!" श्री. सेन
म्हणाले,"असे मोठ्याने
ओरडू नका. ते आपल्याला जंगलात फिरण्यासाठी बोलावलेले प्रशिक्षित हत्ती आहेत. एक
लक्षात ठेवा, जंगलात एखादा
हत्तींचा कळप दिसला तर आपला आनंद आवाज करून व्यक्त करू नका. जंगली हत्ती त्यामुळे
बुजून हल्ला करू शकतो. जंगलात संपूर्ण शांतता पाळा." नंतर आम्ही चार गटात तीन-तीन जणं
विभागलो व कोणी नदीच्या कोणत्या बाजूने मार्गक्रमण करायचे ते निश्चित केले.
नंतर आम्ही
आमच्यासाठी आलेलेल्या हत्तीवर
बसून जंगलाकडे निघालो. हत्तीवर बसण्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. चढताना
एक-दोनदा पडता पडता वाचलो. सर्वजण सामानासह व्यवस्थित बसल्यावर आम्ही जंगलात
प्रवेश केला. जंगल अतिशय दाट होते. अधूनमधून पक्ष्यांचे आवाज, सांबर चितळांचे
डुरकणे व आमच्या हत्तीचा आवाज एवढेच आवाज येत होते. जसजसा दाट जंगलात प्रवेश केला
तसा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज नोंदवता आले. वाटेत आम्हाला वाघ व त्याच्या बछड्यांच्या पावलांचे ठसे
दिसले. हत्तीवरून सफारी करताना झाडांच्या फांद्या, वेली ह्यांचे फटकारे सतत बसत होते. सुमारे दोन तीन तास
सफारी केल्यावरसुद्धा कुठेही कळपाच्या हालचालीची चिन्हं दिसली नाहीत. हत्तीवर बसून
अंग फार अवघडून गेले होते. दुपारी नदीकाठी थोडावेळ आम्ही विश्रांती घेतली. श्री.
सेन एक उत्साही वनपाल होते. संध्याकाळपर्यंत कळप दिसला नाही तर रात्रीसुद्धा शोध
जारी ठेवायचा असे त्यांनी घोषित केले.
दुपारी प्रवास
सुरू केल्यावर अर्ध्या तासाने माहुताने अचानक हत्ती थांबविला व आम्हाला खूण केली.
आजूबाजूच्या कोवळ्या झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या. जंगली केळींचे खुंट
मोडलेले होते. सर्व नुकतेच घडल्यासारखे वाटत होते. नक्कीच काही वेळापूर्वी येथून
जंगली हत्तींचा कळप गेला
होता. त्यांच्या पावलांचे ठसे व एक लहान पिल्लू चिखलात लोळल्याचे ठसे दिसत
होते. खुणा ताज्या होत्या. नक्कीच नुकताच येथून कळप गेला, हे निश्चित
करणाऱ्या या
खुणा होत्या. त्याच मार्गावरून थोडं पुढ गेल्यावर आमचा हत्ती अचानक थांबला.
माहुताने समजून भीतीयुक्त आनंदाने आम्हाला खूण केली. नक्कीच जवळपास जंगली हत्तींचा
कळप होता. माहुताने अंकुश लावून आमच्या हत्तीला अजून पुढे रेटले.
आणि ! आणि ! अखेर
दिवसभर आम्ही ज्यांच्या मागावर होतो तो जंगली हत्तींचा कळप दृष्टीक्षेपात आला.
आम्ही संपूर्ण शांतता पाळत आणखी थोडे पुढे सरकलो. कळपातील काही हत्ती आमच्याकडे
पाहात अस्वस्थ हालचाली करत होते. आमच्या जवळ वेळ थोडाच होता. फार काळ
आम्ही त्या कळपाच्या जवळ थांबू शकणार नव्हतो. प्रत्येकाने निश्चित केल्यानुसार
आपापली कामे करण्यास सुरुवात केली. हत्तींची संख्या, लिंग, आवाज, उंची, वय, प्रत्येकाच्या
अंगावरच्या वैशिष्ट्यपूर्ण खुणा नोंदवल्या. फटाफट् फोटो घेतले. फोटो घेण्यासाठी
अगदी कमी वेळ होता. योग्य कोन मिळत नव्हता. पण भराभर फोटो घेणे गरजेचे होते.
हत्तींची माहिती नोंदवण्यास त्याची मदत होणार होती. आम्ही त्या कळपात एकंदरीत सोळा
जंगली हत्ती व दोन बच्च्यांची नोंद केली.
सायंकाळी दमून, थकून आम्ही
सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. आमचे मुक्कामाचे ठिकाण जंगलातच होते. रात्रभर
हत्तींच्या कळपाने बांबूंचे खुंट मोडल्याचे आवाज जंगलात घुमत होते. आम्ही मात्र
दमल्यामुळे लगेचच झोपेच्या आधीन झालो.
विजय स्वामी
कार्यकारी संचालक , रिवॉच
दिबांग व्हॅली जिल्हा, अरुणाचल प्रदेश
शब्दांकन- प्रशांत दिवेकर
छात्र प्रबोधन / सौर भाद्रपद, शके १९२४, सप्टेंबर २००२ मध्ये प्रकाशित
वाह....सुंदर आणि जिवंत अनुभव
ReplyDeleteWah sundar
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDelete