संस्कृतीच्या प्राणधारा : २
तमसो मा
ज्योतिर्गमय !
गेल्या रविवारी २१ जानेवारीला सकाळी बहिणभावंडे , मित्रमंडळी असा गोतावळा अर्धशतीच्या शुभेच्छा देण्यासाठी
सकाळी घरी एकत्र जमला होता. औक्षण
झाल्यानंतर गोडाचा आणि तिखटाचा केक आणि जीवेत् शरद शतम…. चे गायन झाले.
लहानपणी वाढदिवसाच्या दिवशी औक्षण आणि मित्रांबरोबर
खाणे-गप्पा हा कार्यक्रम असायचा. मित्रांच्या घरी वाढदिवसाला जायचो तेव्हा केक, केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकणे असा वाढदिवस साजरा केला
जायचा. आपली पद्धत नाही म्हणून आमच्याकडे केक, केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकणे हे केले जात नव्हते.
गेल्या काही वर्षांमध्ये ज्या वाढदिवस समारंभात सहभागी झालो
,
त्याचे माझे निरीक्षण : अनेक घरांमध्ये औक्षण - केक -
संस्कृत / मराठी गीत हा उपचार रूढ होतो आहे. मेणबत्त्या फुंकणे बंद झालं आहे, टाळलं जातं आहे आणि ज्या घरात आपली पद्धत नाही म्हणून केक, केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकणे हे केले जात नव्हते , त्या घरांमध्ये वाढदिवसाचा गोड पदार्थ म्हणून केकने प्रवेश मिळवला आहे.
वाढदिवस असो वा लग्न असो वा बढती, काहीतरी वाढ-प्रगती साजरी करायची आहे अशा अनेक सोहळ्यांचा केक हा पदार्थ भाग बनतो आहे. केक या
पदार्थाने गेल्या काही वर्षांत साजरं करणं याचा संकेत म्हणून घरात गुपचूप प्रवेश
केला आहे.
आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक संकेत आपल्याला काही माहिती देत असतात.
अनेकदा शिरा हा पोहे-उपम्यासारखा न्याहरीचा पदार्थ म्हणून
घरी केला जातो. ऋतुमानानुसार त्यात अननस, आंबा यांची जोड देऊन चव बदल केला जातो. पण कोणी दुधतुपातील
केळ्याचा स्वाद असलेला शिरा दिला तर लगेच आपण काय आज घरी पूजा होती का ? असे विचारतो. कारण पूजा
असेल तर प्रसाद म्हणून दुधतुपातील शिरा करणे हा रूढ झालेला संकेत आहे.
दक्षिण भारतात तांदळाची खीर - पायसम म्हणून कधीही केली
जाते. पण महाराष्ट्रीय घरात तांदळाची खीर तेवढ्या सहजतेने नेहमी केली जातं नाही
कारण श्रद्धाची खीर म्हणजे तांदळाची हा रूढ झालेला संकेत !
असे इस्कॉनमध्ये कोणीतरी भक्ताने प्रसाद म्हणून केक दिल्यावर क्षणभर मनात एक छोटासा धक्का बसला होता.
वेगवेगळ्या समाज गटात आदानप्रदान
होत असल्याने चालीरीत संक्रमित होत असतात अशा वेळी प्रश्न पडतो
कोणत्या कृती
समाजात संकेत म्हणून रूढ होत जातात
आणि कोणत्या
संकेतांचे चालीरीतीत रूपांतर होते ?
एखादा समाज
चालीरीतींचा स्वीकार कसा करतो?
कोणत्या
गोष्टी स्वीकारायच्या , कोणत्या नाकारायच्या हे कशाच्या आधारावर ठरते,
आणि ही
प्रक्रिया कशी घडते?
चालीरीती
समाजाच्या जीवन व्यवस्था निश्चित करतात, समाज व्यवस्थांना चौकट प्रदान करतात. चालीरीती
भौगोलिक गोष्टींबरोबरच तो समाज कोणती जीवनमूल्ये धारण करतो त्यावर निश्चित होत
असतात.
बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक
प्रार्थना आहे,
असतो मा सत् गमय,
तमसो मा
ज्योतिर्गमय,
मृत्योर्मा अमृतं
गमय ।
मला
असत्याकडून सत्याकडे ने.
मला अंधारातून
प्रकाशाकडे ने.
मला
मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जा.
भारतीय संस्कृतीत प्रकाशाची , तेजाची उपासना महत्त्वाची
मानली आहे. भारतीय शास्त्रांनी
भारतीय मनाला अंधाराचे भय कधीच घातले नाही तर तिमिरातून तेजाकडे हाच मार्ग
सांगितला आहे.
उपनिषदातील प्रार्थनेचे शतकानुशतके गायन केल्याने माझा
प्रवास असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून
प्रकाशाकडे अर्थात अज्ञानाकडून ज्ञानाकडे, मृत्यूपासून जीवनाकडे अर्थात नश्वराकडून शाश्वताकडे व्हावा
ही भारतीय समाजाने स्वीकारली जीवन मूल्यं आहेत.
दीप प्रज्ज्वलन अंधकारातून प्रकाशाकडे करायच्या प्रवास
सांगणारी सांकेतिक कृती आहे. तर दीप
विझणे- विझवणे उलटा प्रवास असल्याने अशुभ मानले आहे. दीपदर्शन, औक्षण हा चैतन्याच्या अर्थात तेजाच्या दर्शनाचा संकेत आहे.
भारतीय संस्कृती प्रकाशाची अर्थात तेजाची उपासक आहे.
तमसो मा ज्योतिर्गमय... अंधकारमय मनाला प्रकाशमय बनवण्यासाठी,
प्रेरणासंपन्न करण्यासाठी मानवातील ऊर्जेचे, चैतन्याचे मूर्त रूप
म्हणजे ज्योतीरूप, प्रकाशमान अग्नी!
स्वतःमधील मूळच्या ज्योतीरूपातील तेजाचे
प्रकटीकरण करण्यासाठी केलेला स्वाध्याय म्हणजे अग्नयश्च स्वाध्यायप्रव॑चने च अर्थात अग्नीची, तेजाची उपासना !
आणि हे घडावे यासाठी केलेली अभिष्ट चिंतन पर प्रार्थना
म्हणजे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना म्हणत
ज्यांनी तमसो मा ज्योतीर्गमय हे
जीवनमूल्य स्वीकारून
त्याप्रमाणे आचरणाचा प्रयत्न केला
त्यांचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे झाला.
म्हणून भारतीय परंपरेत शुभ
चिंतन करायचे असेल, कोणतेही
सत्कर्म करायचे असेल, मैत्री
करायची असेल, प्रतिज्ञा करायची असेल
तर औक्षण करून वा यज्ञवेदीवर अग्नीच्या साक्षीने केली जाते.
आपल्या रोजच्या जीवनात अनेक कृती
आपल्या आहेत का नाहीत? त्या कशा करायच्या ? अशाच
का करायच्या असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
अनेकदा पूर्वापार चालत आलेला संकेत आपण पाळत राहतो. संकेत रूपातला आचार आपल्यापर्यन्त
पोचतो पण बरेचदा त्या संकेतमागाचे, चालीरीती मागचे जीवन मूल्य संक्रमित होत नाही. पण
सांस्कृतिक मूल्ये प्रवाही असल्याने जीवनमूल्यांच्या
विरुद्ध दिशेने नेणाऱ्या चालीरीती, प्रथा समाजाकडून स्वीकारल्या जात नाहीत.
संस्कृतीरक्षण करणे म्हणजे जीवनमूल्ये संस्थापित करणाऱ्या
चालीरीती प्रथापरंपरा आणि संकेत प्रस्थापित करणे
आणि
जीवनमूल्यांच्या स्थापनेस विरोध करणाऱ्या
चालीरीती प्रथा -परंपरांना रोध करण्यासाठी प्रबोधन करणे.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
Comments
Post a Comment