संपादकीय संवाद : १
सस्नेह नमस्कार,
गेल्या महिन्यात एका शिक्षकांच्या
गटासाठी प्रकल्प पद्धतीचा परिचय करून देण्यासाठी एक चार दिवसीय कार्यशाळा घेतली.
कार्यशाळेत एका प्रश्नावर शिक्षकांना काम करायला दिले होते. प्रश्न समजून घेऊन
आवश्यक उत्तर मिळवण्यासाठी काहीतरी गोळा करावे लागेल, मुलाखती घ्याव्या
लागतील, सर्वेक्षण करावे लागेल, प्रयोग करावे लागतील अशा स्वरूपाचे प्रश्न
‘प्रकल्पाचा प्रश्न’ म्हणून दिले होते.
प्रश्नाचे स्वरूप समजेल व आकलन होईल अशी चर्चा झाल्यावर गटांना काम करण्यासाठी वेळ दिला होता. तास-दीड तासाने गटांचे काम बघण्यासाठी गेलो तर काही गट नुसतेच बसलेले दिसले विचारले तर ‘सर, यासाठी सूक्ष्मदर्शक लागेल ? यासाठी पदार्थाची वेष्टने लागतील ? आमच्या प्रश्नांसाठी बटाटे लागणार आहेत ? असे प्रतिसाद आले.
या प्रतिसादांवर ‘मग मिळवायला अडचण काय आहे
आहे ? ‘ असे विचारल्यावर प्रतिसाद आले ‘ सूक्ष्मदर्शकासाठी प्रयोगशाळेपर्यंत जावे
लागेल! रस्त्यावर पडलेली किंवा शाळेच्या कचरा कुंडीतील वेष्टने कशी उचलायची!!
मेसमध्ये बटाटा मागितला आणि तेथील कर्मचारी देणार नाही म्हणाले तर !!!’
प्रतिसादांवरून
लक्षात येते की मला शिकण्यासाठी जे लागणार
आहे ते मलाच मिळवावे लागेल, त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत, असा विचारच गटाने केला नव्हता. जे लागेल ते कोणीतरी आणून देईल मग आम्ही अभ्यास करू अशा विचारात गट होता.
शिकण्यासाठी
एक स्थितीशीलता सोडून एका गतीशिलतेत प्रवेश करावा लागतो, एक सुखाची स्थिती ( कम्फर्ट
झोन ) सोडावी लागते. असे ‘स्वयं’सूचनेने शिकण्यासाठी आवश्यक गतीशिलतेमध्ये प्रवेश
करण्याचे अनुभव विद्यार्थ्यांना देता येतील का ? अशा अनुभवांमधून असे ‘स्वयं’सूचना
देऊ शकतील असे स्वाध्यायी घडवता येईल का ?
जोनाथन
लीव्हिंगस्टन सीगल या रिचर्ड बाख यांच्या पुस्तकातील सलिव्हानने जोनाथन दिलेला एक
प्रतिसाद आठवतो. जोनाथानच्या यशाबद्दल अभिनंदन करताना सलिव्हान म्हणतो, ‘ नाही जोन, तसं नाहीये. मी
गेल्या दहा हजार वर्षात जे गल पक्षी पहिले, त्यात नवीन शिकण्याचं भय जवळजवळ नाही
असा धाडसी तू एकच भेटलास!’
अनुभव शिक्षणाची योजना करताना नवीन अनुभव
घेण्यातील, नवीन शिकण्यातील आनंद घ्यायला विद्यार्थी शिकतील अशा अनुभवांची योजना
करूया.
सस्नेह,
प्रशांत
दिवेकर
( संपादकीय जानेवारी २०२४)
आपण निर्माण केलेले प्रश्न फार महत्वाचे आहेत. अशी स्थितीशिलता हाच शिक्षण प्रक्रियेतील अडथळा जाणवतो. गतिशीलता निर्माण करावयाची झाल्यास परस्पर संवाद, प्रश्न निर्माण होणे, जिज्ञासा व ती जिज्ञासा जो पर्यंत शमवली जात नाही तो पर्यंत करावयाची धडपड निर्माण करता यायची असेल तर परस्पर संवाद व तितकी स्पेस या शालेय व्यवस्थेत निर्माण होणे देखील आवश्यक वाटते. परंतु असे तंत्र असल्यास जाणून घ्यायला देखील आवडेल.
ReplyDelete