तंत्रस्नेही अध्यापक ७
‘बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे’, किती
सहजपणे उच्चारतो हे वाक्य आपण!
आज सहा महिने झाले पहिले लॉकडाऊन जाहीर होऊन.
लॉकडाऊन जाहीर झाला आणि २०२०-२१ या नव्या वर्षासाठी केलेले संकल्प
गुंडाळून ठेवावे लागले. गेली दोन दशकं तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे शिक्षणरचनेवर जो
जो प्रभाव पडत होता, तो आपण आपल्या गतीने, आपल्या गरजेनुसार स्वीकारत होतो. बदल हा जेव्हा सावकाश होतो, आतून होतो तेव्हा आपण त्याला परिवर्तन म्हणतो, पण
अनेकवेळा परिस्थिती बदलायला भाग पडते किंवा ती उत्परिवर्तन घडवून आणते.
महामारीच्या याकाळात आपल्याला तंत्रस्नेही अध्ययन-अध्यापन प्रकियेचा स्वीकार करून
मुले शिकती राहतील यासाठी तंत्रस्नेही शैक्षणिक रचना निर्माण कराव्या लागल्या.
आपल्याला तंत्रस्नेही व्हावे लागले!
गेल्या सहा महिन्यातील आपल्या तंत्रस्नेही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आढवा
घेतला तर आपण या बदलाला चार प्रकारे सामोरे गेलो किंवा आपण हा बदल चार प्रकारे
स्वीकारला किंवा आपण हा बदल चार प्रकारे घडवून आणला असे लक्षात येईल.
१. पर्याय स्वीकारला (Substitution):
माझ्या
पारंपरिक अध्यापन पद्धतीतील साधनाच्या जागी मी तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या
साधनाची प्रतिस्थापना किंवा प्रतियोजना केली. जसे पेपर -पेन्सिल चाचणीच्या जागी
तीच चाचणी मी गुगल फॉर्मचा वापर करून घेऊ लागलो.
२. गुणवत्तापूर्ण
वाढ/भर घातली (Augmentation) :
माझ्या पारंपरिक अध्यापन पद्धतीतील साधनाच्या जागी मी तंत्रज्ञानाने उपलब्ध
केलेल्या साधनाची योजना केली. पण ही योजना करताना त्या साधनाच्या निवडीने माझ्या
वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या गुणवत्तेत भर पडली.जसे वर्गात एखादाच
डिस्प्लेबोर्ड आणि फळा असतो त्यामुळे मी विद्यार्थ्यांकडून अशा फळ्यावर एकत्र काम
करून घेऊ शकत नाही. पण पॅडलेट बोर्डसारख्या (https://padlet.com/ ) तंत्रज्ञानाचा
वापर करून मी विद्यार्थ्यांच्या सहभागातून गटचर्चेचे
संकलन करू लागलो.
३. परिवर्तन (Modification) :
या प्रकारच्या बदलात
एकाच्या जागी दुसरे असे न करता मी तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या साधनांचा वापर
करून पाठाची पुनर्मांडणी केली वा माझ्या
पाठ- व्यवस्थापनाच्या पद्धतीत नव्या गोष्टी आणल्या ; जसे गुगल डॉकमध्ये मी विद्यार्थ्यांच्या गटाबरोबर एखाद्या निबंधावर वा प्रकल्प वृत्तावर बरोबर काम केले, आम्ही
एकत्र मिळून एक ऑनलाईन माइंड मॅप तयार केला. मी शाळेत कार्यपत्रके धारीण्यांमध्ये
साठवत होतो, आता गुगल ड्राईव्हचा वापर करून मी कार्य
पत्रकांचे नीट संकलन करतोच पण आता ती फक्त माझ्यापुरती न राहता मी इतरांबरोबर शेअर
करू शकतो जे केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झाले.
४. नव्याने
स्वीकार (Redefinition) :
या प्रकारच्या बदलात केवळ
आणि केवळ तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळेच वेगळ्या शैक्षणिक अनुभवाची योजना करता
येणे शक्य झाले. याआधी असे अनुभव माझ्या योजनेच्या कक्षेबाहेरच होते. जसे मी महाविद्यालयीन
शिक्षण घेत होतो तेव्हा बेडकाचे विच्छेदन केले होते पण सध्या त्यावर बंदी असल्याने
त्याची योजना शक्य नव्हती. पण मी आता विच्छेदनाचा व्हर्चुअल अनुभव देऊ शकतो. परिसर अभ्यास किंवा इतिहास शिकवताना परदेशातील एखाद्या संग्रहालयाची व्हर्चुअल सहल घडवून आणतो. मुलांनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या प्रकल्प वृत्तांचा व्हिडीओवृत्ताचा यु ट्यूब चॅनल सुरू करतो.
( व्हर्चुअल संग्रहालय भेटींचे आयोजन कसे करायचे यासाठी भेट द्या https://prashantpd.blogspot.com/2020/06/blog-post_39.html )
आज अनेक शाळांमध्ये तंत्रज्ञान उपलब्ध असते पण तंत्रज्ञानाचा स्वीकार कसा
करायचा याचा विचार न झाल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गुणवत्तेत भर पडेल
यासाठी तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले जात नाही. शिक्षणप्रक्रियेत रूपांतर घडवून
आणण्याचे सामर्थ्य तंत्रज्ञानात आहे. हे सामर्थ्य स्वीकारायचे कसे याबद्दल
दिशादर्शक सॅमर (SAMR) मॉडेल रुबेन फुन्टेड्यूरा यांनी मांडले.
“SAMR” या बहुशब्दीय नावात
S म्हणजे Substitution पर्याय
किंवा प्रतिस्थापना
A म्हणजे Augmentation गुणवत्तापूर्ण वाढ/भर
M म्हणजे Modification परिवर्तन
आणि R म्हणजे Redefinition नव्याने स्वीकार किंवा नव्याने परिभाषित करणे.
प्रभावी तंत्रस्नेही अध्यापन कसे करावे याचा आपला मार्ग ठरवण्यासाठी या
मॉडेलचा वापर आपण करू शकू. तंत्रज्ञान स्वीकारायचे तंत्र आणि वापरात आणायची रणनीती
ठरविण्यासाठी या चार शब्दांची कसोटी आशयानुरूप शैक्षणिक तंत्रज्ञानाची निवड करताना
लावली पाहिजे. यातील पहिले दोन शब्द अध्यापन
प्रक्रिया तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कशी संवर्धित करायची याची दिशा दर्शवितात
तर शेवटचे दोन शब्द यासाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने
परिवर्तन कसे करायचे याचा मार्ग दर्शवतात.
एक उदाहरण घेऊन याचा विचार करू.
मला 'दुसरे महायुद्ध' हा घटक शिकवण्यासाठी
तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे.
हा घटक शिकवताना दुसऱ्या महायुद्धाचा घटनाक्रम वहीत हाताने लिहून गृहपाठ जमा
करण्याएवजी मी विद्यार्थ्यांना घटनाक्रम वर्ड डॉक्यूमेटमध्ये टंकलिखित करून जमा
करायला सांगतो म्हणजे मी पर्याय स्वीकारतो .(Substitution)
म्हणजे माझ्या पारंपरिक अध्यापन पद्धतीतील साधनाच्या जागी मी
तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या साधनाची प्रतिस्थापना किंवा प्रतियोजना करतो.
इतिहास अध्यापनात कालरेषा तयार करणे हे महत्त्वाचे अभ्यास साधन आहे. वहीत
कालरेषा मांडायला एक मर्यादा आहे. त्यामुळे जेव्हा मी विद्यार्थ्यांना पॉवर पॅाईंट
किंवा इतर ग्राफिक टूल्स वापरून आकर्षक व उत्तम मांडणी करण्यासाठी उपलब्ध असलेली
साधने वापरून डिजीटल कालरेषा तयार करायला सांगतो तेव्हा मी तंत्रज्ञानाने उपलब्ध
केलेल्या साधनाची योजना करताना योग्य त्या साधनाची निवड करून माझ्या वर्गातील
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत गुणवत्तेत गुणवत्तापूर्ण वाढ/भर (Augmentation) घालतो.
दुसऱ्या
महायुद्धात अनेक ठिकाणी अनेक घटना घडतात जसे एकाच वेळी युरोप, आफ्रिका, रशिया, आशिया या
ठिकाणी युद्ध सुरू असते पण मी शिकवताना युरोप आघाडी, आफ्रिकन
आघाडी वेगवेगळी शिकवतो आणि त्याचवेळी भारतीय स्वातंत्र्य युद्धात काय चालू आहे,
हे माहिती करून घेण्यासाठी वेगळा धडा असतो. या एकाच वेळी वेगवेगळ्या
ठिकाणी घडणाऱ्या घटना विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर उभे करणे अवघड आहे, पण पॅडलेट बोर्डसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांकडून
समांतर कालरेषा तयार करून घेऊ शकतो. एकाचवेळी एका डिजिटल फळ्यावर गटकार्य करत वर्ग
या कालरेषा तयार करू शकतो. इतिहास अध्यापनाबरोबर योग्य तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेने
सहकार्यात्मक अध्ययनाचा वेगळा प्रयोग मी करू शकतो कारण मी तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या साधनांचा वापर करून पाठाची नव्याने
पुनर्मांडणी (Modification) करतो.
आज व्हर्चुअल रियालिटी , ऑगमेंटेशन रियालिटी सारख्या तंत्रज्ञांनाच्या उपलब्धतेने मी दुसरे महायुद्ध शिकवण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाशी निगडीत संग्रहालायांच्या व्हर्चुअल भेटी घडवून आणू शकतो, युद्धक्षेत्राच्या ३६० डिग्री सहली योजू शकतो, व्हर्चुअल युद्धात मुले सहभागी होऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या विकासापूर्वी असे शैक्षणिक अनुभव माझ्या विचारांच्या कक्षेत नव्हते त्यांचा समावेश मी पाठ नियोजनात करतो म्हणजे तंत्रज्ञानाचा नव्याने स्वीकार (Redefinition) करून नवीन कल्पनेनुसार पाठ नियोजन करतो.
सॅमर (SAMR) मॉडेलची ब्लुमच्या
डिजिटल वर्गीकरण सारणीशी तुलना केली आणि अध्ययन अध्यापन पद्धतीतील बदलाची विचार
कौशल्यांशी सांगड घातली तर असे लक्षात येईल की,
पर्यायाचा स्वीकार (Substitution): लक्षात ठेवणे, आकलन/समजून घेणे
गुणवत्ता पूर्ण वाढ/भर घातली (Augmentation)
: उपयोजन
परिवर्तन (Modification) : विश्लेषण
करणे , मूल्यमापन करणे
नव्याने स्वीकार (Redefinition) : निर्मिती करणे
( तंत्रज्ञान आणि ब्लुमच्या डिजिटल वर्गीकरण सारणी याबद्दल अधिक माहितीसाठी वाचा तंत्रस्नेही अध्यापक ३ )
तंत्रज्ञानाने शिक्षणप्रक्रियेत बदल तर घडतो आहे आणि परिस्थितीने या बदलाच्या
गतीला वेग दिला आहे. नवीन शैक्षणिक धोरणात दोन स्वतंत्र प्रकरणे शिक्षणात तंत्रज्ञानाचा
वापर यावर आहेत. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात आपण केलेल्या तंत्रस्नेही अध्यापनाचे सॅमर (SAMR) मॉडेल वापरून
विश्लेषण करूया आणि येत्या काळात तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत कसा
स्वीकार आणि समावेश करता येईल यासाठीचे प्रयोग करण्यासाठी सॅमर (SAMR) मॉडेलची चतूःसूत्री
डोळ्यासमोर ठेवूयात.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
तंत्रस्नेही अध्यापक भाग १ ते ६ वाचण्यासाठी खालील लिंकलं भेट द्या
https://prashantpd.blogspot.com/p/blog-page_20.html
सर फारच छान स्पष्टीकरण.मी यात उल्लेख केलेल्या अनेक साधनांचा उपयोग करते. म्हणजे मी काळाबरोबर आहे हे समजले. दुसरा एक मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. नीतीशिक्षण, मूल्यशिक्षण हे रूजविण्यासाठीही चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. उत्तमोत्तम व्याख्याने, बोधकथा, प्रेरक कथा चलचित्र स्वरूपात विद्यार्थ्यांना दाखवणे सहज शक्य झाले आहे. सुंदर हस्ताक्षराचे नमुने, चित्रांचे नमुने सहजच शेअर केले जात आहेत.
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDeleteआत्ता पर्यंतच्या सगळ्या लेखांचे उत्तम सार. तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे काय हे अगदी समर्पक शब्दात मांडलेले आहे. उदाहरण सुद्धा अप्रतिम. अशी काही उदाहरणे अन्य विषयांमधली पण दिली तर जास्ती उपयोग होईल.
ReplyDelete