वाई : मराठा शैलीतील मंदिर स्थापत्य केंद्र
वाईकर आणि कृष्णामाई, कृष्णामाई आणि तिचे घाट , घाट आणि घाटावरची मंदिरे यांच्या नात्यातून वाईकर व्यक्तीचे
भावविश्व घडत जाते. लहानपणी वाईत राहत असताना आलेल्या पाहुण्याला गावदर्शन घडवून
आणणे हे एक आनंदाचे काम असे. नदी, घाट , मंदिरे, पेठा, बाजारातून फेरफटका घडवत असे. आज खरंच प्रश्न पडतो त्यावेळी काय
दाखवत असेन मी त्यांना? कदाचित एखादी गोष्ट कशी पहायची ; कशी दाखवायची हे त्या फेर फटक्यातच मला कळत गेले.
वाई परिसरातील मंदिरे उत्तर मराठा काळातील आहेत. शाहू
महाराज ते पेशवाई या मराठा सत्तेच्या मध्य-उत्तर काळात १८व्या व १९व्या शतकात वाई
परिसरातील मराठा शैलीतील मंदिर स्थापत्याचा विकास झाला. माहुली, पुणे, वाई, लिंब, मेणवली, धोम या ठिकाणी नदीच्या तटाला भव्य घाट या काळात बांधले
गेले. घाटावरती आराध्य दैवतांची स्थापना झाली. निवासासाठी पेठा व भव्य वाडे बांधले
गेले. नदीकाठी बांधलेले, घाट, मंदिरे आणि वाडे मराठा स्थापत्य शैलीचे विशेष आहेत. शाहू
महाराज ते पेशवाई या काळात या गावात नगररचना , वाडास्थापत्या बरोबर वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे बांधली गेली.
वाई परिसरातील मराठा स्थापत्य शैलीतील मंदिरे :
वाई परिसरातील मराठा स्थापत्य शैलीतील मंदिरे पहायची असतील
तर वाई,
माहुली, लिंब, बावधन, बोपर्डी, मेणवली, धोम आणि क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणांना भेटी द्याव्या.
यातील प्रमुख मंदिरांमध्ये संगमक्षेत्र माहुली येथील मंदिरसमूहाचा समावेश होतो. १८
व १९ व्या शतकात शाहू महाराजांच्या काळात हा परिसर विकसित झाला. येथील अनेक मंदिरे
पंत प्रतिनिधींनी बांधली. यात काशी विश्वेश्वर मंदिर, शिवल महादेव मंदिर, भैरवदेव मंदिर, राधाशंकर मंदिर, बिल्वेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर ही मंदिरे दर्शनीय आहेत.
तर वाई येथील मंदिरांमधील ढोल्या गणपती मंदिर / महागणपती मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर , महालक्ष्मी मंदिर , उमामहेश्वर पंचायतन मंदिर, विष्णू मंदिर यांचे दर्शन घ्यावे लागेल. वाई परिसरातील धोम
येथील धोमेश्वर मंदिर, नृसिंह मंदिर , बोपर्डी व बावधन येथील शिवमंदिरे देखील वैशिष्ट्यपूर्ण
आहेत. वाई परिसरातील मंदिरांचा विकास १८ व्या शतकात ( १७५० ते १७८५ या कालखंडात) सरदार रास्त्यांच्या काळात झाला.
तर मेणवली येथील घाट व मंदिरे नाना फडणवीस यांच्या आश्रयाने बांधली.
वाई परिसरातील मंदिरांची ओळख करून घ्यायची असेल तर आधी भारतात
मंदिरे का बांधण्यास सुरुवात झाली, बांधकामाची तंत्रे, शास्त्रे आणि शैली कशा विकसित होत गेल्या हे माहित करून घेत
या मंदिरांचा परिचय करून घेऊ.
सर्वसामान्यांच्या भावविश्वात मंदिराचे महत्त्व अपोआप
रुजलेले असते आणि त्याला जिव्हाळ्याचे स्थान देखील असते.पण मंदिर म्हणजे केवळ तिथे जाऊन तुम्ही देवाचे दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा घालावी, नगारा-घंटा वाजवावी एवढ्या पुरतीच ती वास्तू नाही. मंदिर एक
सांस्कृतिक,
सामजिक केंद्र आहे. आजही भारतातील अनेक शहरातील
नागरी जीवन मंदिराच्या केंद्रका भोवती विकसित झालेले दिसते. हे समजून घ्यायचे असेल
तर देव दर्शनाबरोबर मंदिराचा इतिहास, त्याची बांधणी, त्याचे विविध विभाग , त्यांची रचना, मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव; यात्रा , मंदिराशी निगडीत कथा ; मिथके याची माहित घेणे रंजक आणि तितकेच महत्वाचे आहे.
अनाकलनीय, निर्गुण विश्वशक्ती मानवाच्या आकलनाच्या क्षेत्रात आली ती
सगुण उपासनेने! सगुणाचे प्रतिक म्हणजे मूर्ती! श्रध्येयाच्या उपासनेचे स्थान
म्हणजे मंदिर. आपल्या आराध्याच्या गुणांची
साकार प्रतिमा जसजसी विकसित होत गेली तशी
मूर्ती पूजा विकसित झाली. अर्थात आपल्या आराध्याला आपल्यापेक्षा उत्तम जागा, निवास हवा म्हणून मंदिरे स्थापन केली गेली. मंदिराची
संकल्पना मुर्तीपुजेमुळे विकसित होत गेली. मशीद, देऊळ, चर्च कोणतेही पूजास्थान असो त्याचा आकार, त्याची जागा, त्याची बांधणी ह्याचे संकेत विकसित होत जातात व त्याचे एक
शास्त्र तयार होते. भारतात स्थपती आणि शिल्पी समुदायांनी अनेक मंदिरे घडवली .
भारतीय संस्कृतीत मंदिराची परंपरा अनेक
शतकांमध्ये विकसित होत समृद्ध झाली. भारतात सूर्य , विष्णू, शिव, गणपती, शक्ती या पाच प्रमुख उपस्यांचे सौर, वैष्णव, शैव, गाणपत्य आणि शाक्त्य संप्रदाय आहेत. बरीच मंदिरे ही मंदिर
समुह आहेत. त्यात मुख्य देवात , तिच्याशी निगडीत उपदेवता, त्या देवतेचा अवतार वा तिच्या शक्तीरूपाचे प्रगटन यांची उपमंदिरे
या मंदिर समूहात असतात. या पाच प्रमुख संप्रदायांमध्ये समन्वय साधणारी
शंकराचार्यांच्या पंचायतन संकल्पनेवर आधारित अनेक मंदिरे बांधली गेली.
मंदिर रचना :
देवळाच्या वास्तूची मानवी शरीराशी कल्पना केलेली आहे. देऊळ
म्हणजे देवाचे शरीर. देवालयाला वास्तू
पुरुष कल्पून त्याच्या निरनिराळ्या अवयवांच्या रुपात वास्तू कल्पलेली असते. आज
सुद्धा घराच्या सर्वात खालच्या भागाला पाया, वास्तूच्या तळाशी असलेल्या थराला खूर , भिंतीला जंघा, शिखराच्या मध्यभागाला उर म्हणजे छाती , ज्याचावर कळस असतो त्याला स्कंध, कळस म्हणजे मस्तक म्हणतात.
त्यामुळे मंदिर रचना समजावून घेताना मंदिर दोन पद्धतीने
पाहावे लागते. पायापासून कळसापर्यंत; व बाहेरून आत गाभाऱ्यापर्यंत. हे असे पाहताना मंदिराचे शिखर, खांब, छत, वेगवेगळे मंडप , मंदिराचे बाह्यभाग, अलंकरण, स्तंभ, आणि मंदिरातील विविध शिल्पे; मूर्ती या गोष्टी
मंदिराची रचना समजून घेण्यासाठी पाहणे महत्वाचे आहे.
मंदिर शैली :
भारतात दक्षिण भारतातील शैलीला द्रविड शैली तर उत्तर
भारतातील शैलीला नागर शैली संबोधले जाते. नागर शैलीत शिखर असलेल्या मंदिरांचा
समावेश होतो,
तर द्रविड शैलीचे वैशिष्ट्य गोपुरांची भव्यता
हे आहे. या मुख्य शैलींमध्ये कालानुरूप स्थानिक शैली विकसित झाल्या जसे वेसर शैली,
कल्याणी चालुक्य शैली, महाराष्ट्रात यादव काळात विकसित झालेली यादव शैली, इ. महाराष्ट्रातील मंदिरांना सामान्यतः
हेमाडपंथी मंदिरे म्हणून संबोधले जाते. बरेचदा हे नाव सामान्य नामासारखे वापरले
जाते. मराठा महाराष्ट्रातील अनेक मंदिरात
यादव शैली, हेमाडपंथी शैलींबरोबरच इस्लामिक वास्तुरचनेतील अनेक लक्षणे सापडतात.
वाई परिसरातील मंदिरांचा विस्तार मराठा स्थापत्य शैलीत
झालेला दिसतो. देऊळे बांधताना दगडाबरोबर लाकूड, विटा व चुना यांचा वापर केल्याने ही मंदिरे वेगळी आणि दर्शनीय
आहेत. वाई येथील ढोल्या गणेश मंदिर / महागणपती
मंदिरात घडीव दगडात बांधलेला आयताकृती सभामंडप छोट्या चौथऱ्यावर असून सभामंडपाच्या
स्तंभावर छोट्या कमानींची योजना केलेली आहे. गर्भगृह चौरसाकृती असून शिखराचा शंकू
गर्भगृहाच्या चौरासाकृतीवर उभारला आहे. मंदिराचे
शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून उत्तर
मराठा शैलीतील महत्त्वाचे बांधकाम असून कळसावरती उलट्या पुष्पाची रचना शंकूच्या
आकारात आहे. मंदिर शिखराच्या बांधकामात विटा व चुन्याचा वापर केलेला दिसतो. मंदिराच्या
मागच्या बाजूला ४५ अंश कोनातील त्रिकोणाकृती रचना
पूर नियंत्रणासाठी बांधलेली दिसते.याच घाटावरील काशी विश्वनाथ मंदिरातील शिखरात चुन्याचा गिलावा
व त्यात निर्मिलेली शिल्पे विशेष आहेत. काशी विश्वनाथ मंदिरासारख्या मराठा
स्थापत्य शैलीतील मंदिरात प्रवेश करताना
मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना असून अनेक मंदिरांना बाहेरून तटबंदी केलेली असते.
तटबंदीवर फिरण्यासाठी मार्गिका असतात व तटाच्या भिंतीतून जिने काढलेले असतात.
प्रवेश द्वारातून आत गेल्यावर दगडी फरसबंदीचे पटांगण असते. पटांगणाच्या भोवती
तटबंदीच्या आतील बाजूस ओवऱ्या असतात. या ओवऱ्यामध्ये अनेकदा उपदेवतांची देऊळे
असतात वा ओवऱ्या यात्रिक निवासासाठी
वापरतात. महाराष्ट्रातील मंदिर परिसरात दिवे लावण्यासाठी दगडी स्तंभ उभारलेले
दिसतात. त्याला दीपमाळ म्हणतात. याचा आकार गोल, षटकोनी, अष्टकोनी असून वर निमुळता होत गेलेला असतो. दिवे
लावण्यासाठी खालपासून लहान कोनाडे किंवा पायऱ्या केलेल्या असतात. मंदिराच्या
आवारात बाग ,
पुष्करणी, साधक निवास या सारख्या रचना जागेच्या उपलब्धी नुसार
बांधल्या जातात. वाई परिसरातील अनेक मंदिरांमध्ये जलस्रोत म्हणून विहारी वा कुंडांचे बांधकाम केलेले आहे. बावधन
व क्षेत्र महाबळेश्वर येथील शिवमंदिर व
पंचगंगेच्या मंदिरातील कुंडे प्रसिद्ध आहेत.
मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी अनेक सभामंडप
असतात.मंडपात मध्यभागी एक चौकोनी किंवा
वर्तुळाकृती शीला असते तिला रंगशिला असे म्हणतात. कीर्तन, भजन, प्रवचन हे त्या ठिकाणाहून करायचे अशी पद्धत आहे. कीर्तन, भजन हे देवाकरता करायचे त्यासाठीची ही जागा. अनेक मंदिरात
देवासमोर आपली कला सादर करण्यासाठी नृत्य-मंडप विकसित झाले. मंदिर हे आध्यात्मिक
स्थानाबरोबर लोकजीवनाचे केंद्र असल्याने लग्न, नामकरण संस्कार होण्यासाठी अनेक मंदिरात कल्याण मंडप बांधले
आहेत. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये असे कल्याण मंडप पाहता येतात.
आराध्याचे दर्शन
घेण्याचा प्रमुख मान त्याच्या सेवेत सदासर्वकाळ असलेल्या त्याच्या वाहनाचा.
त्यामुळे मंदिराच्या मुख्य सभा मंडपासमोर असतो तो वाहनमंडप. शिवमंदिरात नंदी, विष्णूच्या मंदिरात गरुड , गणपती मंदिरात मूषक वाहनमंडपात स्थापित असतात. वाई पासून
जवळच धोम येथील धोमेश्वर मंदिरासमोरील नंदीमंडप कमळ पाकळ्यांच्या हौदात कासवावर
तोललेले आहे. हा हौद पाण्याने भरलेला असेल तर कमळ पुष्पातील पाण्यात तरंगणाऱ्या
कासवावर नंदी तरंगतो आहे असे भासते.
वाई
येथे १७५७ मध्ये आनंदराव भिकाजी रास्ते यांनी बांधलेले 'काशीविश्वनाथ' मंदिर मराठा स्थापत्य शैलीतील दर्शनीय मंदिर आहे.
काशीविश्वनाथ मंदिरातील तटबंदीच्यामधील प्रवेशद्वारावरील नगारखाना, कीर्तन मंडप, दीपमाळ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पण येथे दर्शनीय आहे तो येथील
वाहनमंडप व त्या मंडपातील काळ्या पाषाणात घडवलेला नंदी. नंदीचे अवयव, त्याच्या गळ्यातील अलंकार, घंटा पाहण्यासारख्या आहेत. मंदिराचे आवार व कीर्तन सभामंडप
भव्य आहे. मराठा शैलीतील मंदिरांमध्ये मंदिरातील सभामंडपातील स्तंभ उत्तम घडवलेले
असतात. सभामंडप दगडी असेल तर दगडात, अथवा सभामंडप लाकडात असेल तर लाकडी स्तंभ जरूर पाहावेत.
वाईतील विष्णू मंदिर व महालक्ष्मी मंदिरांना हे स्तंभ पाहण्यासाठी भेट द्यावीच
लागेल.
मराठा मंदिर शैलीत अनेक मंदिरांना उत्तर मराठा काळात
सभामंडप जोडले गेले. अनेक मंदिरात लाकडाचा वापर करून सभामंडपाचा विस्तार केला
गेला. लाकडी खांब व तुळयांनी बांधलेले हे
सभामंडप मूळ दगडी मंदिराशी जोडलेले आहेत. काही मंदिरांमधील सभामंडपांना सज्जा असून
ते दुमजली आहेत. सभामंडपातील छतावरील लाकडी कडेपाट व लाकडातील बुट्टीकाम पाहता
येईल. पुणे,
वाई येथील अनेक मंदिरांचे हे सभामंडप मराठा
मंदिर स्थापत्याचे वेगळेपण आहे.
प्रवेशद्वार व विविध सभामंडप पाहिल्यावर आता मंदिराच्या
मुख्य भागात प्रवेश करू. सभामंडपापासून आत जाताना एक छोटा कक्ष लागतो यात कोणतेही
कोरीव काम नसते ती जागा म्हणजे अंतराळ. अंतराळ : लौकिक जीवन व आराध्य याचा मध्य
/विलग करणारी जागा. देवाचे दर्शन घेण्याआधी आपल्या मनातील विकार, विचार ,भावना ह्या अंतराळात विरून जाव्यात आणि शुद्ध अंतःकरणाने देवाचे दर्शन
घेण्यासाठी तयार होण्याची जागा म्हणजे अंतराळ.
मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह अर्थात गाभारा. ज्या
ठिकाणी उपास्याचा वास असतो. मंदिराच्या मुख्यद्वाराच्या आणि गाभाऱ्याच्या
द्वारशाखेवर द्वार रक्षकांची शिल्पे असतात. द्वारशाखेच्या चौकटीवर ललाटबिंब असून
त्यामध्ये बहुतेक वेळा गणेश विराजमान असतो. प्रवेशद्वाराची चौकटीची द्वारशाखा
वेलबुट्टी,
याली, जलकुंभ यांच्या नक्षीने सजवलेली असते. गर्भगृह अंधारे असून
दोन गवाक्षांतून प्रकाश व्यवस्था केली जाते किंवा समयांच्या प्रकाशाने गाभारा
उजळला जातो.
गाभाऱ्यात असलेली मूर्ती हा त्यात वसणारा अंतरात्मा. जेव्हा आपण गाभाऱ्यात जाऊन देवाचे दर्शन घेतो , तेव्हा जिवाशिवाची भेट व्हावी यासाठी मंदिर रचनेत टप्प्याटप्याने आपल्याला लौकिक जीवनापासून वेगळे करत उपास्या पर्यंत अंतर्मुख करत नेले जाते .
तीर्थयात्रा/पर्यटन करतानाच्या भटकंतीत स्वतः मधील
शिवतत्त्वचा शोध घेता यावा यासाठी भारतीय माणसाने विकसित केलेल्या शक्तीकेंद्राचे दर्शन सर्वाना घडावे हीच
मनोकामना.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
(सदर लेख ऋतुपर्ण मासिकात प्रकाशित झाला)
Comments
Post a Comment