आज ५ सप्टेंबर ' शिक्षक दिन ' आपल्या शिक्षक भूमिकेचे आवलोकन करण्याचा दिवस. ज्यांच्याकडे पाहत आपण शिक्षक म्हणून काम करण्यास शिकलो त्या कै. आ. विवेकराव पोंक्षे सरांचे ‘प्र’शिक्षक मासिकातील संपादकीयमधून संकलित केलेले शिक्षकांसाठीचे आवाहन आपणाबरोबर या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे.
आवाहन
सस्नेह नमस्कार,
गेली अनेक वर्षे तुम्ही-आम्ही शिकवण्याचं व्रत वगैरे घेऊन काम करतो आहोत. देशाच्या भावी शिल्पकारांना घडवायचा प्रयत्न करतो आहोत. विश्वास वाटावा अशी परिस्थिती चहुबाजूला दिसत नसताना समाज-जीवनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांना एक व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणूनही तोंड द्यायचा प्रयत्न करतो आहोत. पण खरे तर हेही आपल्याला जाणवलं आहे की यातल्या बर्याच प्रश्नांचे मूळ बर्याचदा त्या 25 फूट × 25 फूट आकाराच्या वर्ग नावाच्या खोलीतच आहे. त्या खोलीत शिकवत असतानाच आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. ते प्रश्न सोडविण्याची धडपडही आपण करत असतो. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काही फार मोठ्या शिक्षणतज्ञांची गरज नसते. गरज असते ती आपल्या सारख्या धडपड करणार्या समानधर्मी सुहृदांची.
तुमच्या सारख्या प्रयोगशील, धडपड्या अध्यापकांच्या दृष्टीने समोरचा तो वर्ग म्हणजे मनुष्यघडणीच्या प्रयोगांची जिवंत प्रयोगशाळा असते. वर्गात शिकवत असताना, मुलामुलींतल्या सुप्त क्षमता फुलवताना, त्यांच्यात प्रेरणा जागवताना अध्यापकांजवळ असायला लागते ती शास्त्रज्ञांची चिकाटी आणि सर्जनशील कलावंतांची प्रतिभा. ती आपल्याजवळ असते. पण मध्येच कधीतरी बदलत्या परिस्थितीचं वादळ येतं आणि आपलीच पणती विझते की काय अशी शंका मनात यायला लागते. उत्साह कमी व्हायला लागतो आणि पाटीबहाद्दरांत तर आपण जमा होत नाही ना असं वाटायला लागतं. मला माहिती आहे ही अवस्था क्षणिक असते. पुन्हा जोमानं नव्या परिस्थितीत, नव्या मनांना आपल्याजवळचं धन भरभरून द्यायला आपण सज्ज होतो. अशा शिक्षकांचे कौतुक आहे.
वर्गातल्या वाढत्या संख्येपासून ते मार्काच्या जीवघेण्या स्पर्धेपर्यंत अनेक प्रश्न ‘आ’वासून आपल्यासमोर उभे आहेत. या सार्यांमुळे शिक्षण प्रक्रियेचा मूळ अर्थच हरवून जातो आहे, असे वाटायला लागले आहे. या बदलत्या परिस्थितीला नेमका व योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता शिक्षकांच्यात यायला हवी. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी अध्यापक म्हणून आम्हाला जे जे करायला लागेल ते ते करण्याचे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच तो आमचा अधिकार आहे अशी भावना मनात असली पाहिजे. मग त्या उर्मीतून आम्हाला आवश्यक अशा अनेक छोट्या मोठ्या कृती सुचायला लागतील. विद्यार्थ्यांविषयी तीव्र प्रेम मनात असलं की वेळेच्या बंधनापलिकडे जाऊन अगदी ग्रामीण परिसरातील शाळेतही बरंच काही रूजवता येतं.
‘प्र’शिक्षक या शिक्षकांसाठीच्या मासिकाच्या जन्माच्या वेणा सुरू असतानाच एक प्रतिक्रिया उमटली होती. “अहो, आज सारा समाजच पोटार्थी झाला आहे! तर शिक्षक एकटे काय करणार? शिक्षकांकडून काहीसुद्धा घडणार नाही!” त्यावेळी ती प्रतिक्रिया कानाआड करताना मनात म्हटलं होतं की सेतूबंधनातला खारीचा वाटा तरी आम्ही उचलणार की नाही? आज त्यावर विचार करताना पुन्हा असे वाटते आहे की खारीच्या वाट्याने काय होणार आहे? ही फारच छोटी आकांक्षा झाली. आमचा वाटा तर हनुमंताचा असला पाहिजे. आज गरज आहे ती दीपस्तंभ होण्याची नव्हे तर प्रत्यक्ष आदित्य नारायण होण्याची, की ज्याच्या प्रकाशात सारे समाजजीवन उजळून निघेल.
त्यासाठी अध्यापक अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध व्हायला हवेत. धडपडणार्या शिक्षकांच्यात संवाद वाढायला हवा. धडपडणार्या शिक्षकांच कुटुंब विस्तारत जायला हवं, तरच शिक्षणाचं शिक्षणपण आपण टिकवून ठेवू शकू. आपण केलेले प्रयत्न एकमेकांना कळवायला हवेत. दुसर्यांनी केलेल्या प्रयोगांत आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडतील.
गेल्याच आठवड्यात एका विद्यार्थी-शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. उघड्या माळावर. तोरणा किल्ल्याच्या कुशीत, राहुट्यांमधील वस्ती आणि दिवसभर अनौपचारिक शिक्षण होईल असा भरगच्च कार्यक्रम ही त्या शिबिराची काही वैशिष्ट्ये. पण त्या सार्यांत काही अद्भूत, दुर्मिळ असे पाहायला सापडले. त्या सार्या विद्यार्थीगटात मुलाहून मूल झालेले आणि तरीही अध्यापकत्वाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षक दिसले. ते शिक्षक पहाटे मुलांसोबत काकडत्या थंडीत उठत होते. सकाळी त्यांच्याबरोबरीने धावत होते. मुलांना बरोबर भोजनाची व्यवस्था लावत होते. तंबूंची स्वच्छता ठेवत होते. दुपारी पाण्यात डुंबत होते. संध्याकाळी मैदानावर मुलांशी मस्तीही करत होते. हे सारे करत असताना कळत नकळत मुलांना शिकवत होते. मनात आले असे १० हजार शिक्षक आपल्या देशात उभे राहिले तर आपला देश नक्की विश्वाचे नेतृत्व करेल.
सस्नेह,
विवेक पोंक्षे
‘प्र’शिक्षक संपादकीयमधून संकलित -वर्ष1 अंक1 (डिसें95/जाने.96) + प्र’शिक्षक-वर्ष1 अंक 2 (फेबु‘-मार्च 1996) + ‘प्र’शिक्षक वर्ष 2अंक 5 ऑगस्ट-सप्टेंबर1997
संकलन : मृण्मयी वैशंपायन
पोंक्षे सरांना अपेक्षित शिक्षक जेव्हा प्रत्येक शाळेत तयार होईल तेव्हा मूल सज्ञान नाही तर सुजाण बनेल
ReplyDelete