हार्मनी अर्थात संवादिता !!
जून महिन्याच्या अखेरीला
बरेच दिवसांची प्रतीक्षा असलेल्या एका पुस्तकाची छपाई पूर्ण झाली. पुस्तकाचा विषयच
वेगळा आहे ‘अरुणाचलप्रदेशामधील विविध
जनजातींच्या पारंपरिक वस्त्रांच्या वीणकामातील भौमितिक आकारांचे संकलन’. अरुणाचल प्रदेशातील विविध जनजाती आजही स्वयंपूर्णतेने आपली पारंपरिक
वस्त्रे घरच्या हातमागावरच विणतात. अतिशय आकर्षक रंग आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन
असलेले कोट , गाले ( महिला लुंगीसारखे गुंडाळतात असे वस्त्र
) विणले जातात. प्रत्येक जनजातीची डिझाईन वैशिष्ट्यपूर्ण असतात. डिझाईन वरून
व्यक्ती कोणत्या जनजातीची आहे हे ओळखता येऊ शकते. या डिझाईन मध्ये वेगवेगळे
भौमितिक आकार वापरले जातात. चौकान ( डायमंड ), त्रिकोण,
कोन , रेषा, बिंदू यांचा
वापर करून वेगवेगळ्या संगती आणि रचना कशा तयार केल्या जातात अशा डिझाईनचे संकलन या
पुस्तकात केले आहे. अरुणाचल प्रदेशात रिवॉच (RIWATCH) या
संशोधन संस्थेचे श्री. विजय स्वामी आणि त्यांचे सहकारी यांनी हे संकलन केले आहे.
या पुस्तकाचे नाव ठेवण्याची चर्चा सुरु असताना विजयजींनी ‘हार्मनी
इन टेक्स्टाईल’ हे नाव निश्चित केले. पुस्तकाचा विषय भौमितिक
आकारांचे संकलन म्हणजे खरंतर चौकोनी विषय आणि या विषयाच्या शीर्षकासाठी 'हार्मनी' असा नादवाचक शब्द का योजला असेल ? बरेच दिवस माझ्या मनात हा प्रश्न घोळत होता.
शब्दशः हार्मनी म्हणजे
संवादिता, सहचार, एकतान.
ज्यातून अविरोध, संगम, ऐक्य, अर्थैकत्व प्रतीत होते.
आणि या पुस्तकात असा कोणता
संवाद घडतो ? ....
तीन वर्षांपूर्वी अहमदाबाद
मधील 'कॅलिको'
संग्रहालयाला दिलेली भेट आठवली. संग्रहालयात कापडावरील कलमकारी,
कच्छी, पाटण पटोला, बाटिक
यासारख्या विविध प्रकारांचे विणकाम आणि भरतकाम यांचे असंख्य नमुने होते. चित्रकला असो वा भरतकाम असो वा विणकाम
असो प्रत्येक कलाकृतीतून कलाकाराची साधना व्यक्त होत होती. धागे गुंफताना
कलाकाराकडे माध्यमावरील प्रभुत्व, कल्पकता आणि उच्च
अभिव्यक्तीसाठीची उत्कट साधना या तीन
गोष्टी असतात. त्यांची पेड जेव्हा जमून येते तेव्हाच कलाकार अशी कलाकृती निर्माण
करू शकतात. धागा तोच असला, हातमाग तोच असला आणि कलाकार ही
तोच असला तरी; जेव्हा धागा, हातमाग आणि
कलाकार या तिन्हींमध्ये योग्य समन्वय
साधला जातो म्हणजे ते एका सुरात एकमेकांशी संवाद साधतात म्हणजेच त्यांच्यात एकतानता
अर्थात हार्मनी निर्माण होते आणि तेव्हाच अशी कलाकृती निर्माण होते. अरुणाचलात तर
वस्त्र निर्मितीचे लोकजीवनाशी घट्ट नाते आहे. त्यामुळे 'हार्मनी
इन टेक्स्टाईल' शीर्षक फारच भावले...
अशी हार्मनी अर्थात संवादिता
आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे आणि आपल्या आयुष्याला व्यापून राहिलेली
आहे.
२००५ मध्ये नागालँड मधील 'मेसुलूमी'
गावी गेलो होतो. म्यानमारच्या सीमेलगत पर्वत रांगामध्ये हे गाव
वसलेले आहे. एक दिवस रात्री गावकऱ्यांनी फिरायला येता का विचारले. ते त्यांच्या
शेतीच्या कामासाठी बाहेर चालले होते. त्यांच्या बरोबर डोंगर उतरून नदीच्याकडेला
आलो. थोड्या वेळाने त्यांनी नदीच्या दुसऱ्या बाजूच्या डोंगर उतारावरील जंगल पेटवून
दिले. हाहा म्हणता आग जंगलात पसरली. नागालँडमध्ये ‘झूम’
शेती करतात असे भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते. परीक्षेसाठी
मुलांकडून त्याचा अभ्यास देखील करून घेतला होता, पण
पहिल्यांदाच या प्रकारच्या शेतीची तयारी कशी करतात ते पाहत होतो. साहजिकच मनात
पर्यावरणाच्या या ऱ्हासाबद्दल अनेक प्रश्न, काळजीचे विचार
आले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांबरोबर याबद्दल बोलत होतो. असे जंगल नष्ट करून कसे
चालेल याबद्दल विचारत होतो. तेव्हा एक जाणता माणूस म्हणाला झूम शेतीने जंगल नष्ट
होत नाही. आमच्या पारंपरिक पद्धतीमध्ये गावरानाचे
बारा भाग केलेले आहेत. एका भागातील जंगल जाळून शेतीसाठी जमीन तयार केली
जाते. त्या जमिनीत पाच-सहा वर्ष पीक घेता
येते. एकदा जमिनीचा कस कमी झाला की ती जागा मोकळी सोडली जाते आणि शेती नवीन जागी
स्थलांतरित होते. काही वर्षात त्या जागी परत वनस्पतींची वाढ होते. ती जागा परत
शेतीसाठी वापरेपर्यंत तेथे रान माजते. अशा तऱ्हेने गावाचे शेतीचे क्षेत्र आणि वन
क्षेत्र संतुलित राहते. गप्पांच्या शेवटी त्याने जंगलांच्या ऱ्हासासाठी आधुनिक
जीवन शैली आणि अर्थव्यवस्थेलाच कारणीभूत ठरवले आणि ते बऱ्याच अंशी खरे देखील आहे.
पारंपरिक संकेतानुसार, श्रद्धांनुसार जीवन जगणारा हा आदिवासी
समाज निसर्गाशी हार्मनी राखत जीवन जगत असतो. शिकार केल्यावर काय करायचे आणि काय
नाही करायचे याबद्दलचे या समाजातील टॅबूज् (सामाजिक संकेत )समाजाला निसर्गाबरोबर सुसंवाद
साधत संतुलित जीवन जगायला शिकवतात....
संतुलनासाठी एखाद्या
प्रणालीच्या घटकांमध्ये सुसंवाद असणे
महत्त्वाचे आहे. मग ते निसर्गातील जैविक; अजैविक घटक असोत वा मानवी
शरीरातील पेशी असोत. हे संतुलन जेव्हा बिघडते, विसंवाद
निर्माण होतो तेव्हा असंतुलन निर्माण होते आणि ते असंतुलन प्रदूषणाच्या रूपाने
निसर्गात तर कर्करोगाच्या रूपाने मानवी शरीरात
प्रकट होते.
आपण प्रबोधिनीमध्ये उपासनेच्या
वेळी पेटीची साथ घेतो. पेटीला इंग्लिशमध्ये 'हार्मोनियम' तर मराठीत 'संवादिनी' म्हणतात.
( संवादिनी सारखा छान शब्द असताना या वाद्याला पेटी म्हणणे अगदीच गद्य आहे. ) 'संवादिनी' गायकाला स्वतःच्या सुरांशी संवाद साधण्यास
मदत करते पण त्याच बरोबर गायकाला सहगायक आणि वादकांशी सुसंवाद साधत सर्वांमधील एकतानता
साधण्यासाठी पण मदत करते. अशी एकतानता जेव्हा साधली जाते तेव्हा त्याची अभिव्यक्ती
उत्तम कलाकृतीत होते. ( संचातील सहगायक आणि वादक मिळून हार्मनी साधतात का मुळात हार्मनी
असतेच तेथे सर्वजण मिळून पोचतात? )
उपासना ही प्रबोधाकांसाठी
अशीच एक संवादिनी आहे. उपसानातील "परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये आणि
प्रबोधिनीमध्ये" याचे उच्चारण आपली प्रबोधीनिशी; हिंदुत्वाशी
अर्थात आपल्या देशाचे व्यापक रूप दृष्टीसमोर आल्याने आपली देशाशी असलेली एकतानता
यावर आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते. उपासनेतील विरजामंत्रात जेव्हा आपण
आपल्या विश्वापासून, आपल्या परिसरापर्यंत, आपल्या शरीरातील ज्ञानकर्मेंद्रिये, आपले पंचकोश
यांच्यापासून आपल्या सूक्ष्मरूपापर्यंतच्या शुद्धींचा विचार करतो ,तेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्त्वातील विरोध कमी करून आपल्या आचार, विचार आणि उच्चारातील अर्थैकत्व कसे साधले जाईल यासाठी अर्थात
व्यक्तिमत्वातील हार्मनीसाठी स्वतःशी संवाद साधत असतो.
अशा हार्मनीतून काय सध्या होते? तर त्या त्या प्रणालीतील
घटकांमध्ये एकत्वाची भावना (Feeling
of oneness) निर्माण होते. ज्यातून ऐक्य निर्माण होऊ शकते.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रातील घटकात म्हणजे राज्यांमध्ये, समाज घटकांमध्ये संवादिता असणे महत्त्वाचे आहे. संकटकाळी, जेव्हा देशावर आक्रमण होते तेव्हा राष्ट्रीय घटकांमध्ये अशी एकतानता
(संवाद) निर्माण होते. सर्वांचे प्रयत्न एकाच उद्दिष्टाप्रत परावर्तीत होतात आणि तेव्हा
देशप्रेमाची लाट समाज मनात निर्माण होते. नागरिक, समाज गट
आणि नागरी व्यवस्था देशाप्रती समर्पण करण्यास उद्युक्त होतात. जेव्हा राष्ट्रीय
घटकांमध्ये एकतानतेचा अभाव अर्थात विसंवाद निर्माण होतो तेव्हा देश प्रश्न,
समस्या निर्माण होतात.
अशा विसंवादाचे दर्शन
जागोजागी होत असते. २००५ च्या ईशान्य भारत मैत्री अभियानातील एका प्रसंग आठवतो.
प्रबोधिनीतील एक युवा गट मेघालयातील खासी टेकड्यांमधील 'पिनुर्सला'
गावात गेला होता. त्या गावातील तरुण मुलामुलींबरोबरच्या गप्पा रंगात
आल्या होत्या. बराचवेळ गप्प असलेली डेलिना मध्येच उसळून म्हणाली, ‘आम्ही शिक्षणासाठी महाराष्ट्रात येऊन राहिलो हे खरं आहे. पण जेव्हा
पुण्यात आलो तेव्हा आम्हाला नेपाळी,
चिनी, जपानी म्हटले तेव्हा धक्काच बसला.
निसर्गाने आम्हाला वेगळी चेहरेपट्टी दिली म्हणून आम्ही भारतीय नाही का?’
याचा उलटा अनुभव जेव्हा मी
मिझोरममध्ये रियाक पीकला गेलो होतो तेव्हा
आम्हाला बघून तेथील स्थानिक युवकांनी डखार, डखार अशा हाका मारल्या.
डखारचा अर्थ जेव्हा विचारला तेव्हा 'विदेशी नागरिक' असा अर्थ कळला. नागालँडमध्ये गेल्यावर तुम्ही भारतातून आलात का असे
विचारले जाते, आपल्याच देशात जेव्हा आपल्याला विदेशी नागरिक म्हणून संबोधले जाते,
तेव्हा नागरिका-नागरिकांमधील, राज्या-राज्यांमधील विसंवाद दृश्य होतो. बरेचदा हा विसंवाद
एकमेकांप्रतीच्या अज्ञानातून निर्माण झालेला असतो. जेव्हा तिरके प्रश्न विचारून
जातीधर्माबद्दल बोलले जाते तेव्हा हा विसंवाद बरेचदा पूर्वाग्रहातून निर्माण
झालेला असतो. अनेकदा हा विसंवाद एखादी गोष्ट कोणाला उपलब्ध आहे कोणाला नाही यातून
निर्माण झालेला असतो.
व्यक्ती, कुटुंब,समाज आणि राष्ट्रीय प्रणालीतील घटकांमध्ये विसंवाद का निर्माण होतो किंवा
त्याच्यातील एकतानता का हरवते ? ....
अज्ञान आणि
पूर्वाग्रहांबरोबर एकमेकांच्या अधिक्षेत्रावर केलेले आक्रमण विसंवादास कारणीभूत
ठरते. प्रत्येकाला आपल्या मर्याद क्षेत्राची जाण असली पाहिजे. त्याचे संतुलन प्रत्येक
घटकाला साधता आले पाहिजे. त्याच बरोबर जेव्हा एकमेकांत मिसळण्याची वेळ येते तेव्हा
दुधात साखर विरघळल्यासारखे एकरूप होता आले पाहिजे. मर्यादा आणि एकरूपता
यांचे भान व्यक्तीला, समाजाला आले तर अस्मितांची टक्कर न होता विस्तारित
अस्मितांचे समाजमन घडत जाईल. त्यातूनच व्यक्तीचा; समाजाचा
प्रवास सहजीवनाकडे सुरु होईल.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम
करणे म्हणजे 'संवादिनीचे' काम करणे. जेथे विसंवाद
आहे तेथे संवाद निर्माण करणे आणि जेथे सुसंवाद आहे तेथे एकतानता निर्माण करणे. अशी
एकतानता निर्माण झाली तरच समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा भाव रुजेल. राष्ट्रीय
एकात्मतेसाठी राष्ट्रीय संवादिता गरजेची आहे. लेखात सुरुवातीला म्हंटले तसे
संवादिता, एकतानता अर्थात हार्मनी..अशा हर्मनीतूनच विविधतेतून
आविष्कारित झालेले राष्ट्र –भारत!! ... नव्हे एकाच
आविष्काराची विविध प्रकटने असलेले राष्ट्र म्हणजे भारत!! ....असे घडेल तर भारत
या शब्दाला अर्थैकत्व प्राप्त होईल.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Informative as always! Like the ending 👌
ReplyDeleteखूप छान !!
ReplyDeleteछान मांडणी केली आहे
ReplyDeleteबहुतेक वेळा अशी संवादिता निर्माण होण्यासाठीचे प्रयत्न तुझ्या सारख्या सुजाण भारतीयांकडून अतिशय मनापासून केले जातात . पण त्याला जर राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर लेखात इच्छिलेली राष्ट्रीय एकतानता साध्य करणे फारसे अवघड राहणार नाही.
ReplyDeleteमांडणी छान झाली आहे. सर्वांनीच एकतानतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. याला वेळ द्यावा लागणार. घाई करून चालणार नाही.
ReplyDeleteकमाल!
ReplyDeleteदिवेकर सर...
ReplyDeleteहार्मनीची छान मांडणी करुन त्यातील विसंवाद छान मांंडला आहे.....सुंदर विचार अरुणाचल प्रदेशातील लोकांचे मांले आहे...
देश एकसंघ ठेवायचा असेल तर सर्वांनी संवादिनी होणे गरजेचे आहे.....
संवादिनीच्या माध्यमातून ईशान्य भारताची खासियत, त्यांची
ReplyDeleteजीवनशैली यांची छान सांगड घातली आहे.
खूपच छान.....हार्मोनि ह्या शब्दाचा अर्थ अगदी सहजतेने आपल्याशी जोडलेला आहे....विसंवाद चे संवादिनी मध्ये रूपांतर आणि ही संवादिनी आपल्या भारत देशाला विविधतेत एकतेचे जाणीव ठेवते ह्याची मांडणी खूप आवडली..
ReplyDeleteकेल्याने देशाटन... याचा पुढचा टप्पा हा ती संवादिता सापडणे हा आहे, जोडून ठेवणाऱ्या गोष्टी ह्या शोधत जाव्या लागतात, त्यातून जोडले जाऊ शकतो हा विश्वास दृढ होणे म्हणजे हार्मनी समजणे असे वाटते.
ReplyDeleteकेल्याने देशाटन... याचा पुढचा टप्पा हा ती संवादिता सापडणे हा आहे, जोडून ठेवणाऱ्या गोष्टी ह्या शोधत जाव्या लागतात, त्यातून जोडले जाऊ शकतो हा विश्वास दृढ होणे म्हणजे हार्मनी समजणे असे वाटते.
ReplyDeleteनमस्कार सर.
ReplyDeleteमहत्वपूर्व अर्थ आपल्या या लेखातून कळाला. मीही संवादिनीला आता पेटी न म्हणता संवादिनीच म्हणणार.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य केलेले असे संवादिते शोधणे, त्यांचे कार्य अनुभवणे आणि त्यांच्याप्रमाणे संवादिता होण्याचा प्रयत्न करणे ही प्रेरणा आपल्या या लेखातून मिळाली.
२ गटातील साम्य एकमेकांना highlight झाल्यावर संवाद चालू होतील. महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि बंगाल मधील दुर्गा पूजा हे एकप्रकारचे साम्य आहे.
ReplyDeleteमला नरेंद्र मोदींनी सध्याच्या कोरोना काळात थाळी नाद व दिवे लावणे संवादिनी शी संबधित उदाहरणे वाटतात.मी असे ऐकून आहे की अरुणाचल प्रदेशात समाजातील वर्गानुसार नक्षीकाम व वेशभूषेत वैविध्य आहे हे खरे आहे का?
ReplyDeleteकार्यामध्ये (संघटने मध्ये) एकासंधपणा, एकनिष्ठ पणा हवा असेल तर संवादिनी असणे महत्वाचे ठरेल. ते कार्य नक्कीच यश देणारे असेल.
ReplyDelete'अस्मितांची टक्कर न होता विस्तारित अस्मितांचे समाजमन घडत जाईल' - ह्यातील टक्कर टाळणे हे अनेकांना महत्त्वाचे वाटते पण अस्मिता विस्तारणे हे मला जास्त महत्वाचे वाटते. हा विस्तार काही वेळा धक्के बसूनही होतो. हार्मनी ही त्या विस्तारित अस्मितेत आहे. न झालेल्या टकरेमुळे असलेली शांतता ही कधी सुखद संवादाची तर कधी निस्तेज, निर्जीव समाज मनाची सुद्धा असेल.
ReplyDeleteया सर्वाचा मागे एक मध्यवर्ती भूमिका आहे. या वरचा विश्वास दृढ होत जाणे, आवश्यक आहे. हे राष्ट्र एकच आहे. अशी भावना वाढली पाहिजे.
ReplyDeleteअशी संवादिता तयार होण्यासाठी नजीकच्या काळातील IPL सारखे प्रयोग महत्त्वाचे वाटतात..
ReplyDeleteउत्तराखंड मधील अतिशय दुर्गम गावात (जिथे वीज, टीव्ही सुद्धा पोचले नाहीयेत) गेल्या नंतर तेथील मुलं मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर kings भांडत होती, असं पाहिलं..
क्रिकेट, बॉलीवूड या गोष्टी त्या नंतर महत्त्वाच्या वाटायला लागल्या..
तुम्ही भारतातून आलात का?
ReplyDeleteअसा प्रश्न काश्मीर मध्ये पण आपल्याला विचारला जातो, आणि याच अनुभव मी घेतलेला आहे. असे काही घडले की आपण अंतर्मुख होऊन जातो. लक्षात येते की राष्ट्रीय एकात्मता हे खूप गरजेचे आणि महत्वाचे काम आहे. आणि प्रत्येकाने याचे भान ठेवून नेहमी राष्ट्रीय एकात्मतेला छेद जाणार नाही अशी कृती करायला पाहिजे
हार्मनी हा खरोखरच नादमय शब्द.. आपले बोलणे हे असेच आहेत सर..जे या हृदयी ते त्या हृदयी संवादत असतात. संवादिनी ही प्रत्येक पावलांवर साथ देते तेव्हा ती घटना, त्यावेळीचे भावदर्शन अधिक परिणामकारक दर्शविते. फार सुंदर माहिती दिली सर 🙏
ReplyDeleteWhat seems seamless is often very complex ; Indian regions and Diversity is immensely intricate until a United Loom makes it the National Flag! :-)
ReplyDeleteI wish all Social Science teachers pass on this feeling of Symbiosis and Harmony as you- Beautifully written, Sir.