Skip to main content

अनुभवाची कथा करता यायला हवी !!


           अनुभवाची कथा करता यायला हवी !!

                   पंधरा-सोळा  वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी मी पद्मावती परिसरातील  सरस्वती बंगल्यात  राहात होतो. जून महिन्याचा दुसरा आठवडा असेल. एका रविवारी सकाळी सव्वासहा- साडेसहा वाजता विवेकराव पोंक्षेसरांनी हाक मारली. सरांनी नुकतीच नवीन  कावासाकी घेतली होती. सकाळीसकाळी लांब फेरी मारून येण्यासाठी न्यायला आले होते.

                    त्यावेळी टेमघर धरणाचे काम पूर्ण होत आले होते आणि पावसाळा सुरू झाल्याने धरणाच्या क्षेत्रात पाणी अडविले जाणार होते.  त्यामुळे पाण्याखाली जाणारी गावेवाड्यावस्त्या तेथून हलवण्यास सुरुवात झाली होती. त्यादिवशी  टेमघर धरणाच्या बॅकवॉटरच्या  क्षेत्रातील काही गावांना भेटी दिल्या.  लोकं घरांचे वासे काढून, राहती-निवासी घरे मोकळी करत होते. घराच्या अंगणातील आणि परसातील ज्या वृक्षांनी आजपर्यंत फळे दिली, सावली दिली ती पण पाण्याखाली जाणार असल्याने त्यांच्या फळ्या पडल्या जात होत्या.  लोकं एकतर गावाच्या क्षेत्रात उंचीवर किंवा धरणाच्या खाली ज्या ठिकाणी नवीन वस्ती वसवण्यासाठी जागा दिली होती अशा ठिकाणी स्थलांतरित होत होती.  कित्येक शतके ज्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या राहात होते, ते या धरणामुळे  बेघर होऊन स्थलांतरित होत होते. विश्वास पाटलांच्या झाडाझडती कादंबरीतील  दृश्ये प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत होती.


                  उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे वाटेत करवंदे, जांभळे यांचा फराळ चालला होता. वाटेतील झाडांना रायवळ आंबे लटकत होते आणि फणस लगडले होते.   एका वाडीतील घराच्या दारात थांबलो.  अंगणात सातवी-आठवीतील मुलगा घरातील सामान एका जागी गोळा करत होता.  घराची कौले, वासे, फळ्या, एका बाजूला मांडत होता. आता कुठे जाणारकुठे राहाणार याबद्दल त्याच्याशी गप्पा झाल्या.  त्याच्या अंगणात दोन मोठी फणसाची झाडे होती.  त्याला विचारले फणस देणार का ? तो म्हणाला, हो घेऊन जावा. एका फणसाचे  किती पैसे द्यायचेअसे त्याला विचारले.  तेव्हा तो सातवी-आठवीतील छोटा मुलगा म्हणाला आम्ही  दारातील फणस विकत नसतो.  तुम्हाला हवा तर घेऊन जावा.


                 ज्याचे घरच मोडले आहे, तो मुलगा असे उत्तर कसे देऊ शकतो ? पैशांची गरज असताना देखील दारातील फणस आम्ही विकत नाही, हवा तर घेऊन जावा, असे मोठ्या मनाने कसे म्हणू शकतो असा प्रश्न मनात घेऊन आम्ही दोघे परत आलो.

                  त्यानंतरचा शनिवार असेल. सकाळी उपासना मंदिरात उपासनेसाठी बसलो होतो.  उपासनेनंतर विवेकरावांनी विद्यार्थ्यांसमोर चिंतन मांडत असताना वरील अनुभव मांडला आणि तो मुलगा असे उत्तर कसे देऊ शकला, पैशाची गरज असतानादेखील कोणत्या तत्त्वांच्या, मूल्यांच्या आधारावर त्याच्या तोंडून असे उद्गार बाहेर पडले, त्याच्यावर कोणत्या भारतीय मूल्यांचा नकळत संस्कार झाला होता, भारतीय संस्कृतीत कोणती गोष्ट विकायची, कोणती गोष्ट विकायची नाही याबद्दलचे संकेत काय आहेत, कोणती गोष्ट दान करावी,दान  करू नये, दानाचा संस्कार होण्यासाठी भारतीय समाजाने कशा प्रकारची जीवनशैली स्वीकारली आहे, त्याबद्दलची भारतीय समाजाची भूमिका याबद्दल विस्ताराने मांडणी केली. मांडणीत अनेक उदाहरणे दिली. जसे आजही अनेक शेतकरी कुटुंबात व्यवसाय म्हणून गाईचे दूध विकतील पण तुम्ही त्याचे स्नेही असाल आणि त्यांच्याकडे दूध मागायला गेलात तर ते तुम्हाला विकणार नाही. त्याचे पैसे न घेता देतील. कारण दारात आलेल्या याचकाला विकायचे विकायचे कसे. आजही भारतातील अनेक समाज  दुधाचा आहारात समावेश करत नाहीत कारण दुधावर पहिला अधिकार वासराचा आहे. त्यामुळे ती त्यांच्या खाण्यापिण्याची गोष्टच नाही. विकणे किंवा विकत घेणे तर लांबच.. !

                  प्रवासात पडलेल्या एका प्रश्नावर सरांनी एवढा विचार केल्याचे पाहून मी त्या चिंतनानंतर भारावून गेलो होतो. 

            
                  खरंतर अनुभव आम्ही दोघांनी घेतला होता. त्या मुलाचे उद्गार दोघांनाही तेवढेच भावले होते. पण मी अशी मांडणी करू शकलो असतो का ?

               आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. त्या ग्रहण करणे ही अनुभवात प्रवेश करण्याची पहिली पायरी आहे. यासाठी सजगता लागते. आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात, पण त्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आपल्या नजरे समोर घटना घडते,पण ती आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. ती नोंदवण्यासाठी आपली ज्ञानेंद्रिये सजग नसतात. ते सावधपण सरावाने आणि स्थिरतेने येते.


             एखादा अनुभव आपण कसा ग्रहण करतो हे आपण त्या अनुभवात कसे सहभागी होतो त्यानुसार ठरते. एखाद्या अनुभवात आपला सहभाग अनुभवानुसार तटस्थ किंवा कृतीशील असू शकतो. अनुभवात सहभागी होताना त्या परिसरातील घटक आणि व्यक्ती यांच्याबरोबर आपले नाते प्रस्थापित व्हावे लागते.  


             पण शिकण्यासाठी नुसते अनुभवात सहभागी होऊन पुरत नाही. तर त्या अनुभवाकडे आपल्याला वळून बघायला यावे लागते. अशी वळून बघण्याची संधी घेणे फार महत्त्वाचे असते.


             एखादा अनुभव घेताना अनुभवाकडे वळून बघणे हा दुसरा टप्पा असतो.  अनुभवाकडे वळून बघताना आपण आपली निरीक्षणे ती योग्य क्रमाने लावतो, ती  तपासून बघतोघडलेल्या घटनाक्रमातील प्रसंगांचा परस्पर संबंध काय याचा अर्थ शोधतो. हे निरीक्षण तटस्थपणे  करता आले तर आपल्याला त्या अनुभवाच्या अनेक बाजू डोळ्यासमोर येतात. त्यामुळे अभ्यास सहलीतील रात्रीच्या आढावा बैठका फार महत्त्वाच्या आहेत. त्यात आपण दिवसभरातील अनुभवांची उजळणी करत असतो.


             दुसऱ्या टप्प्यात असे अनुभवाकडे वळून बघत असताना जो आढावा घेतला जातो, त्यावर मनन आणि चिंतन होणे हा अनुभव ग्रहणाचा तिसरा टप्पा आहे. त्या अनुभवातून आपण काय शिकलो त्याचे रसग्रहण करून सार नोंदवता यायला हवे. ही प्रक्रिया जेव्हा घडते तेव्हा  तो अनुभव आपण पचवतो आणि तो अनुभव आपल्याशी जोडला जातो. यासाठी अभ्याससहलीत दैनंदिनी लेखन ( आजच्या काळात फेसबूक, व्हॅाट्सअॅप पोस्ट लेखन ) उपयोगी पडते.


              असे अनुभवातून  जे सूत्र सापडते, ते सूत्र वेगवेगळ्या अनुभवांच्या ठिकाणी परत वापरून बघणेवेगवेगळ्या परिस्थितीत तपासून पाहाणे हा अनुभव ग्रहणाचा चौथा टप्पा आहे. तपासून बघताना आपण ते सूत्र स्वतः बाबत तपासून बघतो. एका अनुभवातील शिक्षण दुसऱ्या अनुभवत संक्रमण करता येणे हा अनुभवातून शिकण्याचा चौथा टप्पा आहे. अनुभव कथनातून इतरांपर्यंत ते सूत्र पोचवून त्यांना स्वतःबद्दल त्या सूत्राचे  प्रयोग करण्याची प्रेरणा देणे हा यातील सर्वात अवघड टप्पा आहे. हे साधायचा असेल तर  अनुभवकथनाच्या वेळी श्रोत्यांना पहिल्या तीन टप्प्यातून नेण्याएवढे अनुभवकथन जिवंत करता येणे महत्त्वाचे आहे.

    
              


•    सजगता : अनुभवात प्रवेश करण्यासाठी ही अत्यावश्यक (इसेन्शिअल ) गोष्ट असल्याने याचा अनुभव शिक्षणाच्या टप्प्यात समावेश केला नाही.
•     टप्पा १ :  अनुभवात सहभाग 
•    टप्पा २ :  अनुभवाकडे वळून बघणे
•    टप्पा ३ :   अनुभवाचे रसग्रहण
•     टप्पा ४ :  अनुभवाचे संक्रमण ( स्वतःमध्ये किंवा इतरात )

              जेव्हा एखादा प्रसंग वा घटना आपण वरील चार टप्प्यांतून नेतो, तेव्हा तो  अनुभव आपण पूर्णार्थाने घेतो व आपण त्या अनुभवातून काहीतरी शिकून नवीन अनुभव घेण्यासाठी तयार होतो हे एक अनुभवचक्र आहे.

              
              प्रत्येक घटना, प्रसंगात  दरवेळी हे अनुभवचक्र पूर्ण होईलच असे नाही. एकतर त्या अनुभवाची तेवढी तीव्रता नसते किंवा आपण तेवढे सजग प्रतिसादी नसतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात आणि स्मृतीच्या पटलात विरून जातात. काही घटना, प्रसंगांचेच  आपण किस्से सांगू शकतो, काही किस्स्यांचे आपण गोष्टीत रुपांतर करू शकतो आणि काही गोष्टींचे कथेत रुपांतर करू शकतो.

            अनुभवांच्या  गुणात्मकतेनुसार अनुभवांचे ' किस्से – गोष्टी – कथा ' हे तीन टप्पे करता येतील.


               किस्स्यांमध्ये रंजकता अधिक असते.  गोष्ट परिसराभोवती व पात्रांभोवती केंद्रत असते. तर  कथा एका विचार भोवती केंदित असते. कथा त्या विचाराबद्दलच्या समस्येच्या निराकारणाच्या प्रयत्नाचे वर्णन करते व त्या प्रयत्नाच्या यश अपयशाबद्दल विचार करायला लावते.


             शेवटी कथा म्हणजे तरी काय तर एखाद्या काल्पनिक वा प्रत्यक्ष प्रसंगाची चित्रमाला, जी व्यक्तीला एका अनुभवातून प्रवास करायला लावते व त्या प्रवासात व्यक्ती अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार करते.  


             पोंक्षेसरांबरोबरच्या  टेमघर परिसरात केलेल्या प्रवासातून मी काय शिकलो तर आपल्याला आपल्या अनुभवाची कथा करता यायला पाहिजे.

            १९९९ च्या ईशान्य भारत दौऱ्यानन्तर मी केलेलं अनुभव कथन आणि आज या ब्लॉगच्या माध्यमातून करत असलेले  अनुभव कथन बघता वाटतंयहे थोडंथोडं जमायला लागलय तर !!







                                                                                                                                                                                                                              प्रशांत दिवेकर 
ज्ञान प्रबोधिनी, पुणे






Comments

  1. खूप छान... तुम्ही लिहिता ते तुम्ही स्वतः पचवलेलं आहे हे जाणवतं..हेतू,कथाबीज आणि आजची कथा छान पोचली.तुमचे वैविध्यपूर्ण लिखाण विषय , कारण घेतलेल्या अनुभवांची विविधता आहे.पण मला या अनेक लेखातून ,या ब्लॉग वरच्या लेखातून एक शांतता जाणवते वाचलं की...कुठेच गडबड,भावनिक गोंधळ नाही... घेतलेले अनुभव खरोखरीच कथेतून गुंफून पुढे येत रहातात...लिखाणाला सुंदर ठेहराव आहे.. खोली आहे.विषय तर पोचतोस पण वाचलं की खूप शांत वाटतं..हे लिखाणाचं सामर्थ्य वाटतंय...खूप छान.. आजचा लेख फारच आवडलाय मला.

    ReplyDelete
  2. very similar to Kolb's cycle
    त्यात शेवटी प्रत्यक्ष कृती मांडलेली आहे. या लेखनात abstract conceptualizationचे आणखी बारकावे आणि टप्पे आले आहेत. आणि अत्यन्त सहज सोप्या भाषेत.

    ReplyDelete
  3. अनुभवांचे संक्रमण हे खूप महत्वाचे वाटले. आधीच्या पायऱ्या पूर्ण केल्याशिवाय संक्रमण होऊच शकत नाही, आणि संक्रमण झाल्याशिवाय आपल्याला अपेक्षित शिक्षण प्रक्रिया घडू शकत नाही. खूप आवडले लेखन!

    ReplyDelete
  4. एखाद्या प्रसंगात अनुभवाचे विविध टप्पे कसे असू शकतात हे वरील मांडणीत अतिशय उत्तम रित्या लक्षात आले . लेखन आवडले .

    ReplyDelete
  5. अनुभव शिक्षणाचे खूप छान टिपण या निमित्ताने वाचायला मिळाले. लेखनाची भाषा अतिशय चागली वाटली . एखाद्या प्रसंगात अनुभवाचे टप्पे कसे किती असू शकतात हे यानिमित्ताने लक्षात आले.

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेखनशैली... प्रवाही शब्द योजना... श्रीमंत अनुभव... संक्रमण टप्पे वाचायला आवडतील...!

    ReplyDelete
  7. Very informative & useful to teachers.After reading it,differencs among any episode,story & tale can be clarified properly.Thank you🙏

    ReplyDelete
  8. फार उपयुक्त चिंतन... पोंक्षे सरांकडून आणि तुमच्याकडून मला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत...!

    तुम्ही फारच वेगळ्या शैलीने हे मांडले...!

    धन्यवाद !

    ReplyDelete
  9. फार उपयुक्त चिंतन... पोंक्षे सरांकडून आणि तुमच्याकडून मला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत...!

    तुम्ही फारच वेगळ्या शैलीने हे मांडले...!

    धन्यवाद !

    ReplyDelete
  10. नक्कीच अनुभवकथन महत्त्वाचे आहे.फारच छान !वाचून लिहिण्याची प्रेरणा मिळत आहे.

    ReplyDelete
  11. माझ्या आजोळी - बुलढाण्याच्या एका लहान गावात- ताक कधीच विकत नव्हते ... निरोप पोहोचायचे कुठूनतरी- यांच्याकडे ताक केले आहे..म्ग आम्ही लहान मुले ते घेऊन येणार... दुसरा अनुभव उन्हाळ्यात करवंदं आणि चारोळीचे फळ विकणार्या ताई घरी डोक्यावर टोपली घेऊन येत... बहुतेक दररोज ते कुणाच्या तरी अंगणात सावलीत थोडावेळ बसत, आम्हा लहान पोरांना पाणी मागणार... त्यांना पाणी दिल्यावर ते पाणी पिणे होईपर्यंत आही फुकट करवंदं खाणार... मोठ्यांसाठी हवी असतील तर त्या बाई विकायच्या, ’लेकराच्या खाण्याचे पैसे घेता का?" असं वाक्य आजही आठवतं....अनुभव ते कथा ही मांडणी आवडली

    ReplyDelete
  12. खरंच खूप साधेपणाने खूप मोठी शिकवण देणारा लेख ....

    ReplyDelete
  13. सर अनुभवाची कथा जमली आहे. खूप काही शिकायला मिळाले.

    ReplyDelete
  14. Swa anubhava varun dusryana marg milato

    ReplyDelete
  15. शिक्षणात संदर्भ निर्माण करण्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया.खूप छान गुंफले आहे.

    ReplyDelete
  16. प्रशांत सर अगदी छान लिहिले आहे. या निमित्ताने विवेक रावांचा एक वेगळा पैलू आपल्या माध्यमातून वाचायला मिळाला. धन्यवाद असेच विविध पैलू वाचायला मिळतील अशी अपेक्षा.

    ReplyDelete
  17. कथा निर्मितीसाठी मिळालेले अनुभव व त्या अनुभवा वरील प्रक्रिया समजून घेता आली. छानसमजले

    ReplyDelete
  18. खूपच सुंदर व मनाला भावणारी कथा आहे

    ReplyDelete
  19. प्रशांत सर,
    खूपच छान लेख.अनुभवाकडे पाहण्याचे ४ टप्पे सोप्या भाषेत स्वानुभवातून उत्तम रित्या लिहिले.अनुभवाकडे बघण्याची एक वेगळी दिशा मिळाली.आपल्याला आलेल्या अनुभवातून कथा तयार करता यायला पाहिजे हा एक महत्वाचा संदेश ही आपण दिला आहे.

    ReplyDelete
  20. खूपच छान अनुभवकथन आहे .कथेतून आलेला छोटा आशय,संस्कार खूप प्रभावीपणे मांडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच अनुभवांकडे कस पाहायचं व त्याची गोष्ट कशी करायची ,हे सार शिकण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  21. खूप दर्जेदार लेखनशैली 👍👍

    ReplyDelete
  22. अप्रतिम लेखनशैली .प्राथमिकच्या मुलांना याची कथा कशी सांगता येईल याचा विचार करत आहे.खूपच दर्जेदार लेखन.सहजता आहे.वाचताना प्रत्यक्ष चिञ उभे राहिले.

    ReplyDelete
  23. सुरेख लेख आहे. आपल्या मनातील विचार अतिशय सहजपणे मांडले आहे.सहज मांडणी आणि खोलवर रूजलेला विचार यामुळे लेख खूपच छान झाला आहे...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...

Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam

  Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam Namaste to all. I feel honoured to speak on Indian Knowledge Systems in Education at Samvit Sangam , organized by Samvit Research Foundation. I had the privilege to represent Jnana Prabodhini and speak at Samvit Sangam — a one-day symposium on the integration of Indian Knowledge Systems (IKS) in school education. I’ll keep to the time and share a few key points and practices from Jnana Prabodhini, so we can stay on track with the schedule. In the inaugural session, Anuragji raised important questions regarding the term Indian Knowledge System —its acronym IKS, and whether we ought to replace it with Bhartiya Gyan Parampara . For clarity, I will continue to refer to it as IKS-Parampara . The distinction between “ Indian Knowledge System ” and “Bhartiya Gyan Parampara” is significant. The English term “system” invokes several dimensions: What is the foundation of this system? What are the sources of its knowl...