तंत्रस्नेही अध्यापकत्व : ३
अरुणाचल प्रदेशामधील
विवेकानंद केंद्राच्या शाळांमधील समाजशास्त्र अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण
वर्गासाठी जयरामपूरला गेलो होतो. प्रशिक्षण वर्गाच्या सुरुवातीला
प्रशिक्षणार्थींची ओळख व्हावी म्हणून काही खेळ घेत होतो आणि त्या खेळात बाद होईल त्याने
‘माझ्या लक्षात राहिलेले अध्यापक’ या विषयावर त्याच्या
शिक्षकांचे नाव सांगून ते का लक्षात राहिले हे सांगायचे होते. नव्यानेच विवेकानंद केंद्राच्या शाळेत
अध्यापन करण्यास सुरुवात केलेल्या शिक्षिकेने तिच्या एका विज्ञान शिक्षिकेचे नाव
सांगितले आणि त्या शिक्षिका का लक्षात राहिल्या तर त्यांनी वर्गात आम्हाला लोणचं खायला दिले होते,
असे सांगितले.
लोणचं खायला दिलं
म्हणून शिक्षक लक्षात राहिले ? त्या शिक्षिकेला थोडे स्पष्टीकरण
द्यायला सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या,
प्राथमिक शाळेपासून विज्ञानाच्या पुस्तकात संतुलित आहार,
आहारातील पोषक घटक,पोषणमूल्ये, जीवनसत्त्वे याबद्दलची माहिती वेगवेगळ्या धड्यात अभ्यासाला होती. पण मला शिकवणाऱ्या बहुतेक शिक्षकांनी वर्गात आहाराबद्दल भरपूर माहिती सांगितली,
काहीच शिक्षक असे होते की
ज्यांनी वर्गात तक्ते दाखवले किंवा माहिती सांगताना पुस्तकातील
चित्रे बघायला सांगितली, पण या एकच शिक्षिका अशा होत्या की ज्यांनी शिकवताना वर्गात पंधरा-वीस वाट्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ भरून आणले होते व त्यादिवशी जे पदार्थ फक्त
पुस्तकात वाचले होते ते प्रत्यक्ष बघायला आणि चाखायला मिळाले.
नियमित शाळेतील वर्ग
असू दे वा दूरस्थ शिक्षणातील आभासी वर्ग, आपण एखाद्या संकल्पनेचे
विद्यार्थ्यांना दर्शन होण्यासाठी, त्यांचा संकल्पनेशी निगडीत
घटकांवर विचार होण्यासाठी कोणत्या प्रकारचे शैक्षणिक अनुभव योजतो, हे फार महत्त्वाचे आहे.
पाठ नियोजन करताना
अध्ययन उद्दिष्टे, अध्ययन अनुभव आणि अध्ययन निष्पत्ती या तिन्हींचा विचार आपल्याला करावा लागतो.
या तीन घटकांची नेमकी
व योग्य मांडणी जेव्हा अध्यापक करतो
आणि त्यांची सांगड जेव्हा जमते, तेव्हा
पाठ नियोजनाचा उत्तम नमुना तयार होतो.
ब्लूमच्या डिजिटल वर्गीकरण सारिणीचा वापर करून अध्यापक डिजिटल तासिकेसाठीची शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करू शकतो तसेच विद्यार्थ्याने कोणती
कौशल्ये शिकणे गरजेचे आहे हे ठरवू शकतो. त्याबरोबरच
अध्यापक विद्यार्थ्यांना प्राथमिक विचार कौशल्यांकडून
उच्चस्तरीय विचार कौशल्यांकडे नेऊ शकतो. आज प्रश्नपत्रिकेत 'हॉट्स' 'प्रश्नांचा
समावेश करण्यात आला आहे. पण प्रश्नपत्रिकेत हॉट्सचा समावेश
करण्याआधी अध्यापकाने अध्ययन उद्दिष्टांमध्येच एखादा घटक समजून घेताना विद्यार्थ्यांचा
प्राथमिक विचार कौशल्यांकडून उच्चस्तरीय विचार कौशल्यांकडे कसा प्रवास होईल याचा विचार
करून संकल्पना अध्यापनाचा क्रम ठरवला पाहिजे.
तसेच विद्यार्थ्यांबरोबरच्या प्रत्यक्ष
व आभासी सत्रांमध्ये हा विचारांचा प्रवास घडून आल्यास उच्च स्तरीय अध्ययन उद्दिष्टे
साध्य होऊ शकतात.
ब्लूमची डिजिटल वर्गीकरण सारिणी
क्षेत्र
|
अर्थ
|
निर्मिती करणे ( Creating
)
|
नवनिर्मिती करणे
|
मूल्यमापन करणे ( Evaluating )
|
चिकित्सा करणे, भूमिका निश्चित करून निर्णय करणे, परीक्षण करणे,
समीक्षा करणे.
|
विश्लेषण करणे
(
Analyzing)
|
संकल्पनेशी निगडीत गुणधर्म,
कल्पना यातील सहसंबंध शोधता येणे.
|
उपयोजन करणे
(
Applying)
|
नवीन परिस्थितीत माहिती वापरता येणे.
|
आकलन / समजून
घेणे
(
Understanding)
|
संकल्पनेबद्दल स्पष्टीकरण देता येणे.
|
लक्षात ठेवणे
(Remembering)
|
संकल्पनेबद्दल माहिती,
तथ्ये यांचा परिचय.
|
वरील उद्दिष्टांपर्यंत
जर अध्ययन प्रक्रिया न्यायची असेल तर वर्गात विद्यार्थ्यांबरोबर आशयाबद्दल चर्चा करताना
कोणता प्रश्न आधारभूत प्रश्न म्हणून आपण निश्चित करतो, त्यानुसार
प्राथमिक विचार कौशल्यांकडून उच्चस्तरीय विचार कौशल्यांकडे विद्यार्थ्यांचा प्रवास
होतो.
वरील मुद्दे स्पष्ट होण्यासाठी दोन उदाहरणांतील
प्रश्नांचा विचार करू.
उदाहरण १
: शून्य सावली दिवस
●
शून्य सावली दिवस म्हणजे
काय
?
●
महाराष्ट्रात वर्षातून दोन वेळा शून्य
सावली दिवस का येतो ?
●
शून्य सावली दिवस वर्षात एकच वेळा
येतो अशी ठिकाणे कोणती असतील ?
●
भारताच्या नकाशात गावानुसार
दिलेल्या शून्य सावली दिवसाच्या वेळा पाहून शून्य सावली दिवसाची तारीख आणि वेळा का
व कशी बदलते याची कारणमीमांसा करा.
●
सन २०२१ साठी शून्य सावली दिवसाबद्दल
भारताचा नकाशा तयार करा.
●
विज्ञान मंडळाने योजलेल्या शून्य सावली
दिवस कार्यक्रमाचे माहितीपत्रक तयार करा.
उदाहरण २
: आपला शेजारी देश :
म्यानमारचे हवामान
●
म्यानमारच्या हवामानाची वैशिष्ट्ये
सांगा.
●
भारताचे हवामान व म्यानमारचे
हवामान यांची तुलना करा.
●
दिलेल्या माहितीच्या
आधारे भारत आणि म्यानमार यांच्या हवामानाच्या घटकांचे आलेख तयार करा.
●
तापमान आणि पर्जन्यमान यांचे आलेख पाहून म्यानमार
देशासाठी शेतीसाठी योग्य कालखंड कोणता ते सांगा.
●
तापमान आणि पर्जन्यमान यांचे आलेख पाहून म्यानमार
देशासाठी पीक योजना सुचवा.
●
भारत आणि म्यानमार हे
एकाच भौगोलिक उपखंडाचे भाग आहेत का ?
●
हवामानाच्या घटकानुसार
भारत आणि म्यानमारचे वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे तयार करा.
एकदा यातून अध्यापन करण्यासाठीच्या
प्रश्नाची निवड केली की अध्ययन अनुभव निश्चित करता येतो व तो अनुभव देण्यासाठीचे तंत्रज्ञान
निवडता येते.
कोणत्या अध्ययन अनुभवांसाठी
तंत्रज्ञान वापरावे ?
तर जे अनुभव वर्गात देता येत नाहीत,
वेळेच्या मर्यादेमुळे देता येत नाहीत, भौगोलिक
मर्यादेमुळे देता येत नाहीत, खर्चिक असल्यामुळे देता येत नाहीत,
धोकादायक असल्यामुळे देता येत नाहीत इत्यादि. अशा
अनुभवांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो.
मग चित्र, चलचित्र, अॅनिमेशन,सिम्युलेशन आदींच्या
माध्यमातून आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येणे शक्य होते. त्यानंतर हे अनुभव देण्यासाठीच्या प्रोजेक्टर सारख्या साधनांची निवड करता येते.
या महामारीच्या काळात आपण दूरस्थ शिक्षणाचे अनेक प्रयोग करत आहोत. झूम, यु ट्यूब, फेसबुक,
व्हॉट्सअप या सारख्या तंत्रज्ञान माध्यमांद्वारे
योजत
असलेल्या दूरस्थ अध्यापनात आपल्या आभासी वर्गामध्ये आपण कोणत्या प्रकारचे शैक्षणिक
अनुभव योजू शकू ? त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वापरता कसा येईल
?
दूरस्थ शिक्षणासाठी
आपण आभासी वर्गातील तासिकेच्या वेळेला देण्याचे शैक्षणिक अनुभव आणि तासिके व्यतिरिक्त
विद्यार्थ्यांनी घरी त्यांच्या अभ्यासाच्या वेळी घेण्याचे शैक्षणिक अनुभव असे दोन गटात
वर्गीकरण करावे. यालाचा आपण ऑनस्क्रीन अनुभव आणि ऑफस्क्रीन अनुभव
अशी दोन सोपी नावे देवू .
आज आभासी वर्ग आयोजित
करण्यासाठी अनेक माध्यमातून वर्गखोल्या उपलब्ध आहेत, जसे झूम,
गुगलमीट,वेबेक्स मिटींग्स, स्काईप इ. अजून चार नवीन अॅप्स उपलब्ध होतील.
प्रत्येकाच्या सकारात्मक गोष्टी आणि मर्यादा लक्षात घेऊन व्यावहारिक
निकषांवर निवड करण्याआधी हे आभासी वर्ग कसे वापरायचे याबद्दल अध्यापकाचा विचार होणे
महत्त्वाचे आहे.
आभासी वर्गामध्ये तीन प्रकारची सत्रे अध्यापकाने
योजावीत.
१. अध्यापन सत्रे २. संपर्क
सत्रे ३. अभ्यास सादरीकरण सत्रे
दूरस्थ वर्गाच्या अध्यापन
सत्रांमध्ये म्हणजेच झूम, गुगल इत्यादीद्वारे आपण तयार केलेल्या
वर्गखोलीत अध्यापन करताना फोटो, व्हिडिओ , ऑडिओ इत्यादींचा वापर करून अध्यापन करावे. हे अध्यापन
आपल्या शाळेत दृक्-श्राव्य साधनांचा वापर करून ई-लर्निंग तास घेतो त्या प्रकारचे अध्यापन असेल. जुन्या दृक्-श्राव्य कक्षात स्लाईड प्रोजेक्टर वापरताना विद्यार्थी अंधारातच असायचे. महामारीच्या या काळात वर्गाच्या
चार भिंतींबाहेर विद्यार्थी असल्याने काही वेगळ्या प्रकारच्या अध्ययन अनुभवांची योजना
करता येणे शक्य आहे. असे अध्ययन अनुभव आणि अध्ययन कृती आभासी वर्गांमध्ये विद्यार्थी घरी
असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात. विद्यार्थी त्याच्या घराच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून उपलब्ध
साधनव्यक्तींच्याबरोबर अभ्यास करू शकेल अशा अध्ययन कृती सुचवण्यासाठी आणि त्याने केलेल्या
कामाचा आढावा घेण्यासाठी संपर्क सत्रांची योजना करावी लागेल.
आपल्या आभासी वर्गाचे
नियोजन करताना आपल्याला किती तासिका रूढ पद्धतीने अध्यापन करण्यासाठी वापरायच्या आहेत,
किती तासिका विद्यार्थ्यां बरोबरच्या संपर्क सत्रांमध्ये शैक्षणिक कृतींबद्दल
त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी वापरायच्या आहेत आणि किती तासिका त्यांनी केलेल्या
कामाचे सादरीकरण त्यांनी करावे , त्यावर आपण प्रतिसाद द्यावा
व मूल्यमापन करावे याच्यासाठी वापराव्या लागतील, याचे नियोजन
अध्यापकाला करावे लागेल. मग त्याप्रमाणे पाठ नियोजन करता येईल.
आपण आपल्या आभासी
वर्गात आपला स्क्रीन विद्यार्थ्यांबरोबर शेअर करतो आहोत, मग तो स्क्रीन झूमचा असेल वा गुगल मीटचा असेल वा वेबेक्स मिटींग्सचा
असेल वा अन्य कोणत्याही
नवीन अॅप्लिकेशनचा असेल महत्त्वाचे काय आहे तर अध्यापक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गात
काय घडवून आणू इच्छितो.
आपण तंत्रज्ञान वापरून
कोणता अध्ययन अनुभव देऊन इच्छितो आणि तो अध्ययन अनुभव घेत असताना विद्यार्थ्याने
काय विचार करणे आपल्याला अपेक्षित आहे, हे पाठ नियोजनाच्या वेळी
अधिक निश्चित करणे आवश्यक आहे. अध्ययन निष्पत्ती आधी निर्धारित केली तर आपण विद्यार्थ्याला
आशयाच्या ओळख पातळीपासून, आकलन , उपयोजन
व नवनिर्मिती पातळीपर्यंत नेऊ शकतो.
दोन दिवसांपूर्वी
मला एक फोन आला की तुम्ही आमच्या अध्यापकांसाठी झूम सत्र घ्याल का ? झूम सत्र घेईन पण विषय काय ?
तर त्यांनी उत्तर दिले की विषय तुम्ही ठरवा. आम्हाला झूम सत्र हवे आहे.
व्याख्यानांसाठी बोलावले
जाते तेव्हा अनेक ठिकाणी प्रस्तावना करणारे आज प्रशांत दिवेकर पीपीटी व्याख्यान देणार
आहेत, अशी प्रस्तावना करतात. व्याख्यानाचा
विषय सांगतच नाही. एक लक्षात घेतले पाहिजे की पीपीटी हे साधन
आहे. विषय मांडणीसाठी मी गोष्ट सांगेन, चित्र दाखवेन, छापील माहिती दाखवेन नाहीतर पीपीटी दाखवेन. कोणत्या साधनाच्याद्वारे दाखवतो, हे महत्त्वाचे नसून मला काय दाखवायचे
आहे, कशासाठी दाखवायचे आणि त्यातून काय साध्य करायचे आहे,
हे महत्त्वाचे आहे. मग उपलब्धतेनुसार तंत्रज्ञान
निवडता येईल वा विकसित करता येईल.
तंत्रस्नेही अध्यापक व्हायचे असेल तर हे लक्षात ठेवले पाहिजे कि तंत्रज्ञानाने
उपलब्ध केलेली गॅजेट ही साधने आहेत, साध्य नाही.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Well written and insightful
ReplyDeleteअध्यापकांना साध्य आणि साधन यातला फरक आपल्या विषयासाठी निश्र्चित करायला हवा, हे अगदी पटलं
ReplyDeleteअतिशय निकडीचे व उत्तम काम तुम्ही हाती घेतले आहे. लेख उत्तम आहेत. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
ReplyDeleteVery useful while teaching
ReplyDeleteThank you Sir
खूप धन्यवाद सर, प्रभावी ऊद्बोधन करणारा लेख.. विचारांना योग्य दिशा मिळाली...
ReplyDeleteVery innovative and excellent prashant sir
DeleteKhup brobr sir .khup chan
ReplyDeleteसोदाहरण आणि नेमके लेखन केलेले आहे. मात्र या गोष्टी अमलात आणणे अवघड आहे. मनापासून जिद्दीने प्रयत्न केले की जमेल.
ReplyDeleteफार छान मालिका चालू आहे. त्यामुळे पुढील भागांत विषयी उत्सुकता दाटून येते.
👌👌 सध्या distance learning चा विचार करता एखादा घटक असा तंत्रज्ञानाचा वापर करुन पोहोचवणे सोयिस्कर वाटते आहे. संपर्क सत्रे या मुद्द्याचा अधिक विचार करायला हवा असे वाटते .
ReplyDeleteमाहितीपूर्ण अप्रतिम लेख...
ReplyDeleteसर आजच्या परिस्थितीत अनुकूल तंत्रज्ञान. पण खुप तयारी सत्र घेणारऱ्याला करावी लागेल. मुख्य तंत्रज्ञान शिकाव लागेल.
ReplyDeleteमाहितीपूर्ण आणि मार्गदर्शक लेख
ReplyDeleteसर मला हा घटक खूप आवडला.अगदी माझ्या मनातील शंका जी मला संपर्क सत्र विषयी प्रकर्षाने भेडसावत होती त्या शंकेचे आपण पूर्ण पणे निरसन केले त्या साठी मनःपूर्वक धन्यवाद! ब्लूम ची डिजिटल सारणी नक्कीच मार्गदर्शन पर आहे तसेच एखाद्या घटकावर आधारभूत प्रश्न अभ्यासपूर्वक विचारला तर नक्कीच संपर्क सत्र attend करतांना आपल्या मुलांत आपल्या जवळ अध्यापक नसला तरी त्या घटका विषयी चर्चा अभ्यास करतांना आत्मविश्वास निर्माण होईल.आपण आणखी एक चांगली बाब लक्षात आणून दिली, ती म्हणजे ऑनलाईन अनुभव व ऑफलाईन अनुभव.आपण संपर्क सत्र घेतांना या बाबींचा योग्य विचार केल्यास आपले संपर्क सत्र निशंसय यशस्वी होईल.या मुळे आपलें विद्यार्थी नक्कीच घटकाचे उपयोजन पातळीवर अध्ययन करू शकतील.
ReplyDeleteसर आपल्या या घटका मुळे आता आत्मविश्वासाने child friendly संपर्क सत्र घेण्यास मला जमेल असा विश्वास वाटतोय.
मनापासून आभार.
तुमचा अनुभव पण छान आहे.सर मी असेच वेगवेगळ्या शिक्षकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव वाचले आहेत त्या पैकी सिल्व्हिया अशट्न-वॉर्नर यांचे टीचर, तौत्तौचान आणि अजून अशी अनुभव कथन करणारे लेख वाचले आहेत. प्रयोगशील अनुभव कथांचा छान च प्रभाव माझ्या अध्यापन पध्दतीवर झाला व माझे अध्ययन अध्यापन समृध्द झाले.
ReplyDeleteसर आपण सांगितलेला अनुभव ही खूपच छान आहे, प्रत्यक्ष अनुभूतीतून आपणांस सहज शिक्षण देता येते. आपल्या ला आलेले अनुभव नक्कीच अजून वाचायला आवडतील सर.