Skip to main content

तंजावर : श्री समर्थ रामदास स्वामी मठाच्या भेटीचा योग



              सन २०१५, दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दिवेकर, पायगुडे,  नाईक सपरिवार पाँडिचेरी ते कन्याकुमारी सहलीला गेलो होतो.  या सहलीमध्ये दोन दिवस तंजावरमध्ये होतो. दुपारी तंजावरमध्ये  पोचलो. संध्याकाळी  तंजावरमधील प्रख्यात बृहदेश्वर मंदिर पाहिले.  मंदिर पाहून झाल्यावर रात्रीच्या टिफिनला काही पर्याय मिळतो का किंवा बरे टिफिन कुठे मिळेल यासाठी एका चौकात चौकशीसाठी थांबलो होतो. ( दक्षिणेत रात्री जेवण मिळत नाही टिफीनवरच भागवावे लागते. 😊)

              आमचे बोलणे ऐकून एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि त्यांनी आमची चौकशी केली, "तुम्ही पुण्याहून आला आहेत का? तुम्ही गद्रे आहात का ?"
 "आम्ही पुण्याहून आलोय,  पण गद्रे नाही. " मी उत्तरलो.

             तंजावरमध्ये मराठी बोलणारी व्यक्ती भेटल्याने आपसूकच गप्पा सुरू झाल्या. ते सद्गृहस्थ पुण्यात शिक्षणासाठी राहिलेले असल्याने त्यांना पुण्याची माहिती होती. ते गृहस्थ तंजावरचेच राहाणारे आहेत हे कळल्यावर त्यांच्याकडून संध्याकाळच्या टिफिनबद्दल मुद्द्याची माहिती काढून घेतली. आमची चौकशी करताना त्यांनी तंजावरमध्ये आज काय काय बघितले, उद्या  काय बघणार आहोत, याची चौकशी केली आणि काही ठिकाणे सुचवली.

           निरोप घेताना त्यांनी विचारले की तंजावरमध्ये श्री रामदास स्वामींचा मठ आहे.  तो तुम्ही  पाहणार आहात का ? या मठाबद्दल ऐकले होते पण इंटरनेटवर त्याचा पत्ता मिळाला नव्हता व आल्यापासून तंजावरमध्ये ज्यांना विचारले त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे उद्याच्या यादीत श्रीरामदास स्वामी मठ नाही असे त्यांना सांगितले.

         निरोप घेताना आमच्याकडे हसून बघत ते म्हणाले,"तुम्हाला जर मठाला भेट द्यायची असेल तर उद्या सकाळी या. हा माझा पत्ता, मी त्या मठाचा वारसदार स्वामी आहे.  मी सकाळी आठ वाजता कामावर जाणार आहे, पण तुम्ही मठात येऊन दर्शन घेऊ शकता."  असे सांगून त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दिला.

         दुसऱ्या दिवशी तंजावरचा राजवाडा, सरस्वती ग्रंथालय बघायचे होते आणि संध्याकाळी पुढच्या ठिकाणासाठी रेल्वे पकडायची होती, तेव्हा दिवसभराच्या कार्यक्रमात वेळ मिळाला तर जाऊ मठात असा विचार केला.  सकाळी राजवाडा, सरस्वती ग्रंथालय बघण्यासाठी आठ वाजता आवरून तयार झालो होतो.  तेवढ्यात गोस्वामी रामदासी यांचा फोन आला,"पोहोचतायना ना मठात ?  तुम्ही येणार असाल तर तुमच्यासाठी थोडावेळ थांबून उशीरा दहा वाजता बाहेर जाईन."  आवरून तयार असल्याने आम्ही तातडीने त्यांनी सांगितलेल्या पत्त्याचा शोध घेत मठात पोचलो.

         प्रथम दर्शनी श्रीरामदास स्वामी मठ एक छोटेखानी निवासवजा मंदिर होते.  मठात गेल्यावर श्री रामरायाचे दर्शन घेतले आणि गोस्वामी रामदासीं  बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की हे राममंदिरातील जे पंचायतन आहे, त्या मूर्ती सज्जनगडाच्या मंदिरातील मूर्ती घडवण्यापूर्वीच्या नमुना मूर्ती आहेत.

           समर्थ १६७७ साली रामेश्वरी तीर्थयात्रेला गेले होते. वाटेत  तंजावरला श्री रामदास स्वामी आणि व्यंकोजी महाराजांची भेट झाली. त्यावेळी समर्थांबरोबर असलेल्या भीम महाराजांना समर्थांनी तंजावर मठाच्या स्थापनेसाठी तंजावरला थांबवले व दक्षिण भारतातील कामाची सूत्रे दिली. कोणतीही दक्षिणी भाषा येत नसताना भीम महाराजांनी दक्षिणेत रामदासी कार्याचा प्रसार केला.

          दर्शनानंतर मंदिरात बसलो आहोत तर दरवर्षी विद्याव्रत शिबिरात सज्जनगडावर किंवा शिवथर घळीत  जी भजने म्हणतो ती  म्हणूया अशी कल्पना पुढे आली. मग प्रवीण आणि रागिणीने काही भजने आणि धुनी सांगितल्या. आमची भजने आणि धुनी ऐकल्यावर गोस्वामींना आनंद झाला. ते म्हणाले की थांबा अजून थोडावेळ. तुम्हाला काही विशेष दाखवतो. असे सांगून ते सोवळे नेसून आले. त्यांच्या हातात सोवळ्यात गुंडाळलेली एक पोथी होती आणि बरोबर काही तसबिरी होत्या.

                नमस्कार करून त्यांनी पोथीभोवती गुंडाळलेली सोवळ्याची आवरणे उलगडण्यास सुरुवात केली.  एकातएक सात-आठ वस्त्रांत बांधलेला तो ग्रंथ म्हणजे मठाचे संस्थापक भीम महाराज यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली दासबोधाची प्रत होती. समर्थांनी अक्षर कसे असावे याचे जे निकष सांगणारे जे श्लोक लिहिले आहेत त्याप्रमाणे....

वाटोळे सरळ मोकळे वोतले मसीचे काळे

कुळकुळीत वळीत चालिल्या मुक्तमाळा जैशा

अक्षरमात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट

आडव्या मात्र त्याही नीट आर्कुलीं वेलांड्या

पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहात गेले

येका टाकेचि लिहिले ऐसे वाटे.....


         याप्रमाणे अक्षराच्या सर्व निकषांची पूर्तता करणारे हस्ताक्षर आणि उत्तम सजावट असलेला तो ग्रंथराज होता.

            गोस्वामींनी मग दासबोधाची छापील प्रत दिली आणि ताडून बघण्यास सांगितले. जणू त्याच लक्षणांतील... 'कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना' हे समर्थांनी सांगितलेले लिखाणाचे लक्षण तपासून बघण्यास  सांगितले.

         नंतर त्यांनी मठाचे संस्थापक भीम महाराज यांनी काढलेली दोन चित्रे दाखवली. त्यातील एक चित्र समर्थांचे होते.  आज समर्थांची एका बाजूने दर्शन  देणारी जी चित्रे काढली जातात ती चित्रे या भीम महाराजांच्या चित्राच्या नक्कली आहेत. त्या चित्रांमधील दुसरे चित्र तर मजेशीर होते. ती  एक 'सेल्फी' होती होती. हे सेल्फी चित्र म्हणजे भीम महाराजांनी काढलेले स्वतःचे पोर्ट्रेट होते.

         गप्पांमध्ये भीम महाराजांपासून ते आजच्या मठाच्या जीर्णोद्धारापर्यंतच्या अनेक कथा त्यांनी सांगितल्या . काही कथा चाफळच्या उत्सवाच्या वेळी जसा चमत्कार होऊन उत्सव निर्विघ्न पार पडला, या स्वरूपाच्या साक्षात्काराच्या कथा होत्या, प्रचितीचा महिमा सांगणाऱ्या कथा होत्या. 

        नियोजनाच्या, विचाराच्या कक्षेत नसताना ही दोन तासांची भेट अचानक घडून आली.  समर्थांच्या मठाचे दर्शन घडले, ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे पाहता आली. अनेक मिथक कथा ऐकता आल्या. ३५० वर्ष  एक ऐतिहासिक ठेवा बघता आला.

        आदल्या दिवशी संध्याकाळी तंजावरच्या चौकात मठाधिपती गोस्वामी भेटले, सकाळी त्यांनी दूरभाष करून आम्हाला बोलावून घेतले, म्हणून  हे दर्शन झाले .

          गेली वीस वर्षे मी, मिलिंद, प्रवीण विद्याव्रत शिबिरासाठी सज्जनगड वा  शिवथरघळीत नियमित जात आहोत. त्यामुळे आमचा दर्शनाचा योग होता असें म्हणताना, थोडी श्रद्धा कमी पडते का चिकित्सा आड येते माहीत नाही... पण ही भेट घडावी, ही श्री समर्थांचीच इच्छा होती!




प्रशांत दिवेकर 
ज्ञान प्रबोधिनी, पुणे


श्री समर्थ रामदासस्वामी मठ, तंजावर

श्री समर्थ रामदासस्वामी मठ, तंजावर
                          


दासबोध प्रत, श्री समर्थ रामदासस्वामी मठ, तंजावर


Comments

  1. समर्थांची इच्छा असणार

    ReplyDelete
  2. खूप छान भेट ! कधी कधी आपण तिकडे जाऊ कि नाही असा विचार देखील केलेला नसतो पण ते घडते. हि भेट अशीच म्हणावी लागेल. तुमची श्रद्धा आहे कि नाही हा प्रश्नच येत नाही. ती शक्ती सर्व घडवून आणते यावर मात्र विश्वास वाढतो.

    ReplyDelete
  3. अप्रतिम सर!आमच्या इतिहास अभ्यास शिबिरात आपण हा किस्सा सांगितलेला..तेव्हाही आणि आत्तही अंगावर काटा आला !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...