Skip to main content

खिचडी ते राम खिचडी


              शालेय पोषण आहार ,अर्थात 'माध्याह्न भोजन', 'खिचडी योजना' हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर मीठ,मसाले आणि तांदळाच्या हिशोबाने त्रस्त झालेले शिक्षक, कुठल्यातरी शाळेत निकृष्ट पोषण आहार पुरवला म्हणून किंवा खिचडीत खडे-आळ्या सापडल्या म्हणून तारस्वरात ओरडणारे टीव्ही चॅनलवरचे अँकर , तक्रार करणारे पालक हीच दृश्यं डोळ्यासमोर येतात.

             गेली काही वर्षे वाडा तालुक्यातील 'गोवर्धन इको व्हिलेज' या इस्कॉनमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पातील गोवर्धन गुरुकुलात नियमित जातो आहे.  पालघर परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याची योजना इस्कॉन मार्फत राबवली जाते.  दोन वर्षांपूर्वी  या 'अन्नमित्र'  स्वयंपाकघराला (
किचनला) भेट देण्याचा योग आला.  एका तीन मजली इमारतीत अन्नमित्र योजनेचे स्वयंपाक घर आहे.  प्रवेशद्वारावर नोंदणी आणि स्वच्छता यासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करून इमारतीत प्रवेश केला.  सर्वात वरच्या मजल्यावरच्या  पूर्वतयारी विभागात धान्य निवडणे, पाखडणे यांसारख्या धान्य स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी करून त्यांचे रोजच्या मेन्यू नुसार  आणि प्रमाणानुसार संच तयार केले जातात.  निवडलेले धान्य छोट्या ट्रॉलींमधून स्वयंपाक घरात आणले जाते आणि मोठ्या वाफेच्या कुकरमध्ये शिजवले जाते.  मेनूनुसार भाताबरोबर वेगवेगळ्या डाळींची आमटी आणि उसळी मोठ्या भांड्यात शिजवल्या जातात. नंतर मोठ्या पाईपच्या साहाय्याने हे सर्व प्रत्येक शाळेसाठी निर्धारित केलेल्या डब्यांमध्ये भरले जाते. प्रत्येक डबा सीलबंद केला जातो. अन्न शाळांकडे रवाना करण्यापूर्वी सभागृहाच्या दर्शनीभागात असलेल्या देवघरातील भगवान श्रीकृष्ण आणि   इस्कॉनचे संस्थापक श्री. प्रभूपाद  यांना नैवेद्य दाखवला जातो. मग हा गरम गरम प्रसाद  घेऊन गाड्या सकाळीच लवकर शाळांच्या दिशेने रवाना होतात.  अतिशय दुर्गम भागातील शाळांमधील मुलांपर्यंत गरम जेवण पोहोचेल या दृष्टीने वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे. 

           हा प्रकल्प बघण्यापूर्वीपण शालेय पोषण आहाराबद्दल अनेक प्रश्न मनात होतेच. या निमित्ताने त्यांनी पुन्हा उचल घेतली. 


                शहरी भागांमध्ये काम करताना काही वेळा प्रश्न पडतो की खरंच शालेय पोषण आहार योजना प्रत्येक शाळेमध्ये राबवणे गरजेचे आहे का ? 
मध्यंतरी छत्तीसगडमधून आलेल्या एका कार्यकर्त्यांबरोबर गप्पा मारत होतो.  ते छत्तीसगडमधील दुर्गम आदिवासी भागात अंगणवाड्या चालवतात.  गप्पांमध्ये त्यांनी दोनतीनदा शालेय पोषण आहार योजना त्यांच्या शाळांमध्ये कशी प्रभावीपणे राबवतात याचा उल्लेख केला.  गप्पांमध्ये थोड्या भोचकपणे कोणीतरी त्यांना विचारले थोडे शिक्षणाबद्दल काय प्रयोग चालू आहेत ते पण सांगा. त्यावर ते म्हणाले पुढची चार वर्ष विद्यार्थ्यांना नियमित आहार देऊ शकलो तर त्याच्यामधील  प्रथिनांची कमतरता भरून काढू शकू. कुपोषण दूर करणे शक्य झाले तरच अजून काही वर्षांनी आम्ही मनाच्या आणि बुद्धीच्या पोषणाला प्राधान्य देऊ शकू. 


         खरंच आज मध्यांन्न भोजनामुळे भारतातील अनेक मुलांना दिवसातून एकदा पोटभर जेवायला मिळते हे वास्तव आहे. आज भारतात शालेय पोषण आहार ही एक अतिशय महत्त्वाची शैक्षणिक योजना आहे. अन्नमय कोशाच्या पोषणा नंतरच विज्ञानमय कोशाचे पोषण होऊ शकते. 
                   पण आज बरेचदा होत असलेल्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे अनेकांच्या मनामध्ये या योजनेबद्दल किंतुपरंतु असतात. 

           शिक्षक प्रशिक्षणाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक शाळा पाहण्याचा योग येतो. प्रशिक्षणाच्या वेळी बाहेरून जेवण मागवण्यापेक्षा अनेक शाळांमध्ये आग्रहाने मुलांबरोबर जेवायला बसून मध्यांन्न भोजन चाखून देखील पाहिले. 


           काही शाळांमध्ये मध्यांन्न भोजन शिजवण्याची जागा,  वाढप व्यवस्था,  उरलेल्या  खरकट्या अन्नाचे व्यवस्थापन याबद्दल काहीही विचार केलेला नसतो. अनेक शाळांमध्ये जेवण झाल्यानंतर मुलांना खाली सांडलेले अन्न उचलून टाकण्याची सवय लावलेली नसते. विद्यार्थी खरकटे तेथेच सोडतात आणि शाळेतील शिपाई ते कोपऱ्यात लोटून देतात आणि मग कुजणाऱ्या भाताचा एक विशिष्ट वास त्या परिसरात भरून राहतो. शालेय व्यवस्थापनाच्या  उदासीनतेमुळे या योजनेचे एक कुबट दर्शन शाळेत गेल्यावर होते. 


              पण मी अशा अनेक शाळा देखील बघितल्या आहेत की ज्या ठिकाणी शिक्षक प्रेमाने आपल्या मुलांना जेवू खाऊ घालतात. अशा अनेक शाळांमध्ये देखील काही शाळा विशेष उठून दिसत. त्या शाळांनी त्यांच्या शाळेच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत मुलांकडून भाजीपाला लावून घेतला आहे. अशा शाळांमधील शिक्षक आनंदाने सांगत होते की आम्ही आमटी भाताच्या बरोबर मुलांना मध्यांन्न भोजनात भाजी पण देतो. मुले शाळेच्या परसबागेत काम करून भाजी पिकवतात तर आम्ही शिक्षक मीठ-मिरची व्यवस्था करतो. 


             मला वाटते ज्या ठिकाणी आदेश आहे म्हणून नाईलाजाने मध्यांन्न  भोजन शिजवले जाते त्याठिकाणी अव्यवस्था दिसते. 
ज्याठिकाणी कर्तव्य म्हणून शिक्षक जबाबदारीने काम करतात त्याठिकाणी मुलांना योग्य पद्धतीने उत्तम जेवण मिळते. 
पण भाजीपाला लागवड शिकवणाऱ्या शाळांमधील शिक्षक मात्र आदेशांत अपेक्षित असलेल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करतात मग अशा शाळांमध्ये  ही योजना निव्वळ शासकीय न राहता त्या शाळेची योजना बनते. 

            गेल्या काही वर्षात अनेक शाळांमध्ये पोषण आहार योजनेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गावातील महिला बचत गटांना दिलेली आहे. अशा शाळांमध्ये  अन्नाची गुणवत्ता अतिशय उत्तम आहे याचे कारण अन्न शिजवणारी बचत गटातील महिला आपल्या स्वतःच्या मुलाला प्रेमाने खाऊ घालावे या भावनेने स्वैपाक करतात. स्त्रीच्या स्थायी स्वभावाप्रमाणे महिला प्रेमाने या योजनेचे व्यवस्थापन करतात. घरच्या आमटी-भाता पेक्षा शाळेतील आमटी भात जास्त आवडतो असे सांगणारी अनेक मुले मली मला माहिती आहेत. याचे कारण या मातृभावी महिला बचत गटांचा या योजनेत झालेला समावेश.  


              लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या अन्नमित्र स्वयंपाकघरांत  अन्न हे भगवंताचा प्रसाद म्हणून शिजवले जाते आणि शाळांमधील बालगोपालांमधील भगवंताला हा प्रसाद भक्तिभावाने अर्पण केला जातो. भक्तिभावानेयुक्त निरपेक्ष सेवेने राबवलेला अन्नमित्र हा प्रकल्प , शालेय पोषण आहाराची योजना गुणवत्तेच्या वेगळ्याच टप्प्याला स्पर्श करतो. इस्कॉनमध्ये शालेय पोषण आहार प्रकल्पाची सुरुवात बंगळूरू परिसरात अक्षयपात्र योजनेने झाली. आज इस्कॉन मार्फत अक्षयपात्र योजने अंतर्गत चौदा राज्यातील बावन्न स्वयंपाकघरांतून वीस हजार शाळांमधील अठरा लाख विद्यार्थ्यांना तर अन्नमित्र योजनेअंतर्गत आठ राज्यातील एकवीस शहरांमधील सुमारे सहा हजार पाचशे शाळांतील दहालाख विद्यार्थ्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण शालेय पोषण आहारचा पुरवठा केला जातो.
                  सेवा म्हणून जेंव्हा एखादा प्रकल्प राबवला जातो तेंव्हा त्याची गुणवत्ता आणि त्याचा विस्तार किती होऊ शकतो याचे दर्शन अक्षयपात्र  आणि अन्नमित्रच्या निमित्ताने होते.


      शेवटी कोणत्याही योजनेत  किंवा प्रकल्पात  सहभागी होणारी व्यक्ती कोणत्या भावनेने सहभागी होते हे महत्त्वाचे असते. 
योजनेतील ‘कार्य’  करणारा 'कर्ता' 
आदेश असल्याने नाईलाज म्हणून काम उरकतो 
की निव्वळ कर्तव्य म्हणून काम करतो 
की आदेश आणि कर्तव्यापलीकडे जाऊन काम करतो ? 
  तो कामामध्ये कर्तव्य भावनेने सहभागी होतो 
का  स्वतःचेच काम आहे म्हणून प्रेम भावनेने सहभागी होतो 
का सेवा म्हणून समर्पण वृत्तीने सहभागी होतो.  

माणसामधील 'भावच' त्याच्या कर्माचे विशेष वेगळेपण निश्चित करतात. 


  भावचि कारण भावचि कारण ।
यापरतें साधन नाहीं नाहीं ।। 


 खिचडीची राम खिचडी या भावामुळेच होते !!

                                                        प्रशांत दिवेकर 
                                                             ज्ञान प्रबोधिनी, पुणे


















Comments

  1. अन्नदान श्रेष्ठ दान ! छान लेखन

    ReplyDelete
  2. सर खूप छान विचार मांडले आहेत.

    ReplyDelete
  3. सुंदर, छान विचार.

    ReplyDelete
  4. Khupach nemkya shabdat mandani aslela preranadayi lekh ahe.

    ReplyDelete
  5. Many school
    Growing vegetables and
    Using these vegetables for mid day meals.
    I personally experience in karnataka and chhattisgarh school.
    They do this very well. With the help of self help group and parent association.

    ReplyDelete
  6. विचार करण्याजोगा लेख यातील बहुतेक बाबीचे पालन आमच्या सगरोळीच्या शाळेत आम्ही करत आहोत धन्यवाद !

    ReplyDelete
  7. काही महिन्यांपूर्वी वर्ध्याला नई तालीम प्रकल्पात मुलांच्या भोजन व्यवस्थेचा खूप चांगला विचार झालेला पाहिला. त्याला शेती, श्रम, स्वावलंबन, संघभावना, सेवा , कौशल्य प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी जोडल्या आहेत.

    ReplyDelete
  8. खूप छान लेख.. चित्रं उभं राहिलं डोळ्यासमोर.
    आम्ही विद्याव्रत शिबिराच्या निमित्ताने ताम्हिणीच्या विंझाईदेवी हायस्कूल मधे जातो. तिथे असाच छान अनुभव येतो. जेवणात टंगळमंगळ करणार्या विद्यार्थ्यांना आईच्या मायेने दटावून जेवायला लावणारे शिक्षक पाहिलेत तिथे. ��

    ReplyDelete
  9. अनुभवसमृद्ध आणि सर्वंकष विचार करून लेख लिहला आहे.

    ReplyDelete
  10. लेख मुद्देसूद आणि प्रवाही झाला आहे. शीर्षक सुद्धा लक्षवेधक आहे. लेखाचा उद्देश माध्यान्न शालेय पोषण आहार त्याचे महत्व आणि त्यातील वेगवेगळे पैलू वाचकापर्यंत उत्तम रीतीने पोचत आहेत. वाचकांनी आपले अनुभव मांडून लेखाला अधिक समृद्ध आणि परिपूर्ण केले आहे.

    ReplyDelete
  11. योजनची गरज आहे किवा नाही हे स्पष्ट झाले नाही

    ReplyDelete
  12. Already in the govt aided schools thete is vacancy of almost 50 % teachers .

    ReplyDelete
  13. Already many govt schemes like Ration in Rs 2 or and rs 3 , MGNAREGA have paralyzed people in villages. Better ,make people responsible to nurture their kids.

    ReplyDelete
  14. खूप छान लेख
    आपले कर्तव्य करत असताना आपण ते किती मनापासून करतो यावर सगळे अवलंबून असते

    ReplyDelete
  15. अतिशय छान लेख आहे सर...
    आपण मांडलेल्या मताशी सहमत आहे.

    ReplyDelete
  16. अभ्यापूर्ण लेख, मध्यान भोजनाची गरज आहेच. इस्कॉनचे काम खरंच छान आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...