उपक्रम कुणाचा ? प्रदर्शन कुणाचे ...
B.Sc. करत असताना मधुकर बाचुलकर सरांचा स्लाईडशो आणि M.Sc. करताना एस. आर. यादव सर आणि टी. एम. पाटील सर यांचे स्लाईड-शो बघितल्यावर आपल्याकडे एस. एल. आर. कॅमेरा असावा आणि अशी फोटोग्राफी आपल्याला करता यावी अशी इच्छा मनात होती पण तेंव्हा ते शक्य नव्हते. पर्याय म्हणून कॅलेंडरवर प्रकाशित होणारी वनस्पतींची छायाचित्रे गोळा करण्याचा छंद लागला. पुढे या संग्रहात माझी आत्या माधुरी फाटक हिने गोळा केलेल्या छायाचित्रांची मोठी भर पडली. सुमारे दोनशे वनस्पतींची मोठ्या आकाराची पोस्टर्स गोळा झाली होती.
२००० साली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेला एका स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एक छान मोठा काचफलक मिळाला होता. या काचफलकात दर आठवड्याला एका वनस्पतीचे पोस्टर आणि एक पानभर त्या वनस्पतीची माहिती लावायला सुरुवात केली. काही आठवड्याने काही विद्यार्थिनी यासाठी मदत करू लागल्या. त्यावेळी नववीच्या वर्गासाठी मी गटकार्याचे तास घेत होतो. पुढे त्या वर्गालातील विद्यार्थिनींच्या जोड्या करून त्यांना काचफलक व्यवस्थापनाचे जोडी कार्य दिले. दोन-तीन महिने नियमित हा उपक्रम चालू होता. एक दिवस वर्गात गप्पा मारताना अशी किती चित्रे माझ्याकडे आहेत असा प्रश्न कुणी तरी विचारला. साधारण दोनशे चित्रे आहेत असे कळल्यानंतर ती सगळी चित्रे लावून लावून होई पर्यंत आमची दहावी होऊन जाईल असा वर्गाकडून प्रतिसाद मिळाला. मग आपण या संग्रहाचे प्रदर्शन योजावे असे ठरवले. वर्गासमोर प्रदर्शनाची कल्पना मांडली आणि विद्यार्थिनींचे गट करून त्यांना वनस्पती अभ्यासासाठी वाटून दिल्या . संदर्भ कसे बघायचे ते सांगितले.
प्रदर्शनाच्या ठरवलेल्या तारखेच्या आधी दहा दिवस वर्गात आढावा घ्यायला गेलो. तर वर्गात माहिती गोळा करण्याचा आनंदच होता. २० % पण माहिती गोळा झाली नव्हती. संदर्भ शोधून माहिती काढणे, ती नेमकी करून टंकलिखित करणे, त्याच्या प्रिंट आऊट काढून लॅमिनेटेड करणे आणि मग प्रत्यक्ष प्रदर्शन कक्षाची उपासना मंदिरात उभारणी करणे अशी बरीच कामे राहिली होती. वर्गात कामाचा आढावा घेतल्यावर असे लक्षात आले की हे काम दहा दिवसात पूर्ण होणे अवघड आहे. अजून प्रदर्शनाची प्रसिद्धी केली नव्हती त्यामुळे आढावा घेतल्यावर वर्गातील मुलींना म्हंटले की आपण प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू . मी पोंक्षे सरांशी बोलून नवीन तारीख मिळवतो.
माझे बोलणे झाल्यावर काही मुली उभ्या राहिल्या आणि त्यांनी मागणी केली की प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू नका. परत एकदा समजुतीची तथ्यं वर्गासमोर ठेवली आणि पटवून दिले कि हे काम वेळेत आणि अपेक्षित गुणवत्तेने पूर्ण होणे अवघड आहे. माझे बोलणे झाल्यानंतर वर्गातील विशेष प्रबोधकत्व असलेली एक कन्या उभी राहिली आणि म्हणाली, “ सर, तुम्हाला पाहिजे तर तारीख पुढे ढकला पण आम्ही त्याच तारखेला प्रदर्शन भरवणार.” आणि मग सर्व वर्गानेच तिच्या सुरात सूर मिसळला. वर्गाचा सूर बघून त्यांना म्हंटले आता ठरवलेल्या दिवशी प्रदर्शन लागणे ही माझी जबाबदारी नाही तर तुमची जबाबदारी आहे आणि वर्गातून बाहेर पडलो.
आणि मग पुढचे आठ दिवस सकाळी आठ ते रात्री- नऊ पर्यंत विद्यार्थिनी गटागटाने येत होत्या. सलग काम चालू होते. आजही आठवते संगणक कक्षातील तो विशेष ‘वत्सला’ संगणक आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर सतत आवाज करत असायचा. मुलींनी ठरवून मला सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी अतिशय नेटके प्रदर्शन उपासना मंदिरात उभारले होते.

उपासना मंदिरातील ते प्रदर्शन आजही आठवते. अतिशय नेटकेपणाने लॅमिनेट करून दोनशेपेक्षा जास्त वनस्पतींची पोस्टर्स आणि प्रत्येकाबद्दल माहितीपत्रक योग्य पद्धतीने मांडले होते. प्रशालेच्या शैक्षणिक साधनात या संग्रहाने एक मोठी भर पडली होती.
या वर्गातील काही मुली या प्रदर्शनात एवढ्या गुंतल्या होत्या की , त्यांनी बारावी झाल्यानंतर एकत्र येऊन हे प्रदर्शन पुन्हा भरवले आणि आता त्या प्रदर्शनात त्यांनी गोळा केलेल्या चित्रांची भर घातली होती.
या वर्गातील काही मुली या प्रदर्शनात एवढ्या गुंतल्या होत्या की , त्यांनी बारावी झाल्यानंतर एकत्र येऊन हे प्रदर्शन पुन्हा भरवले आणि आता त्या प्रदर्शनात त्यांनी गोळा केलेल्या चित्रांची भर घातली होती.
त्यावेळी त्या विद्यार्थिनीचे “ सर, तुम्हाला पाहिजे तर तारीख पुढे ढकला पण आम्ही त्याच तारखेला प्रदर्शन भरवणार.” हे उत्तर थोडे आगाऊपणाचे वाटले होते. पण आज अनेक उपक्रम, सहली, अभ्यास दौरे यांच्या आयोजनानंतर लक्षात येते कि कोणता शैक्षणिक उपक्रम यशस्वी झाला हे कसे ठरवायचे ? तर जेंव्हा तो उपक्रम माझा न राहता विद्यार्थ्यांचा झाला तेंव्हा.
शैक्षणिक उपक्रम योजताना उद्दिष्टांची मांडणी, नेटके नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण उपक्रम कधी यशस्वी होऊ शकतो तर, जेंव्हा हा उपक्रम शाळेने किंवा शिक्षकाने योजलेला आहे असं न रहाता हा उपक्रम शाळेने माझ्यासाठी योजला आहे नव्हे हा माझाच उपक्रम आहे हा भाव आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो तेंव्हा. खरंतर त्यावेळी तो उपक्रम खरा शिकण्याचा अनुभव बनतो.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
सुंदर लेख.सर्वाना प्रेरणा दिल्यामुळे संघटनेनी काम छान झाले.
ReplyDelete